YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 139:7-19

स्तोत्रसंहिता 139:7-19 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

मी तुझ्या आत्म्यापासून कोठे निसटून जाऊ शकतो? मी तुझ्या सान्निध्यापासून कोठे पळून जाऊ शकतो? मी जर वर आकाशात चढलो तर तिथे तू आहेस; जर मी खाली मृत्यूलोकात अंथरूण केले तरी, पाहा, तेथे तू आहेस. जर मी पहाटेचे पंख धारण करून आणि समुद्राच्या अगदी पलीकडच्या तीरावर जाऊन राहिलो तरी तेथे तू आहेस. तरी तिथे ही तुझा उजवा हात मला धरतो. आणि तू मला हाताने धरून नेतोस. जरी मी म्हणालो, खचित अंधार मला लपविल, आणि तरीही रात्र माझ्याभोवती प्रकाशच होईल. काळोख देखील तुझ्यापासून काहीच लपवित नाही. रात्रही दिवसासारखीच प्रकाशते, कारण तुला काळोख आणि प्रकाश दोन्ही सारखेच आहेत. तू माझे अंतर्याम निर्माण केलेस; तूच माझ्या आईच्या गर्भात मला घडवले. मी तुला धन्यवाद देतो, कारण तुझी कृत्ये भयचकीत आणि आश्चर्यकारक आहेत, हे तर माझा जीव पूर्णपणे जाणतो. मी गुप्तस्थळी निर्माण होत असता, आणि पृथ्वीच्या अधोभागी विलक्षण प्रकारे माझी घडण होत असता माझी आकृती तुला गुप्त नव्हती. तू मला गर्भात पिंडरूपाने असताना पाहिलेस; माझा एकही दिवस उगवण्यापूर्वी ते सर्व तुझ्या पुस्तकात नमूद करून ठेवले होते. हे देवा, तुझे विचार मला किती मोलवान आहेत, त्यांची संख्या किती मोठी आहे. मी जर ती मोजू लागलो तर ती वाळूच्या कणांपेक्षाही जास्त ठरतील. जेव्हा मी जागा होतो, तेव्हाही मी तुझ्याजवळच असतो. हे देवा! जर तू दुष्टांना मारुन टाकशील; अहो हिंसाचारी मनुष्यांनो! माझ्यापासून दूर व्हा.

स्तोत्रसंहिता 139:7-19 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मी तुझ्या आत्म्यापासून कोठे निघून जाऊ? मी तुझ्या समक्षतेपासून कोठे पळून जाऊ? मी वर आकाशात चढलो तरी तेथे तू आहेस; अधोलोकी मी आपले अंथरूण केले तरी पाहा, तेथे तू आहेस. मी पहाटेचे पंख धारण करून समुद्राच्या अगदी पलीकडल्या तीरावर जाऊन राहिलो, तरी तेथेही तुझा हात मला चालवील; तुझा उजवा हात मला धरून ठेवील. “अंधकार मला लपवो, माझ्या भोवतालच्या प्रकाशाचा काळोख होवो,” असे जरी मी म्हणालो, तरी अंधकारदेखील तुझ्यापासून काहीएक लपवत नाही; रात्र दिवसाप्रमाणे प्रकाशते, काळोख आणि उजेड हे तुला सारखेच आहेत. तूच माझे अंतर्याम निर्माण केलेस; तूच माझ्या आईच्या उदरी माझी घडण केलीस. भयप्रद व अद्भुत रीतीने माझी घडण झाली आहे, म्हणून मी तुझे उपकारस्मरण करतो; तुझी कृत्ये अद्भुत आहेत हे माझा जीव पूर्णपणे जाणून आहे. मी गुप्त स्थळी निर्माण होत असता आणि पृथ्वीच्या अधोभागी विलक्षण प्रकारे माझी घडण होत असता माझी आकृती तुला गुप्त नव्हती. मी गर्भात पिंडरूपाने असताना तुझ्या नेत्रांनी मला पाहिले, आणि माझा एकही दिवस उगवण्यापूर्वी ते सर्व तुझ्या वहीत नमूद करून ठेवले होते. हे देवा, मला तुझे संकल्प किती मोलवान वाटतात! त्यांची संख्या किती मोठी आहे! ते मी गणू लागलो तर वाळूच्या कणांपेक्षा अधिक ठरतील; मला जाग येते तेव्हाही मी तुझ्याजवळच असतो. हे देवा, तू दुर्जनांना ठार मारून टाक; अहो रक्तपात करणार्‍यांनो, माझ्यापासून दूर व्हा.