स्तोत्रसंहिता 139:1-14
स्तोत्रसंहिता 139:1-14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
हे परमेश्वरा, तू माझी परीक्षा केली आहेस, आणि तू मला जाणतोस; मी केव्हा बसतो आणि केव्हा उठतो ते तुला माहित आहे; तुला माझे विचार खूप दुरुनही समजतात. तू माझे चालने आणि माझे झोपणे बारकाईने पाहतो; तू माझ्या मार्गांशी परिचित आहेस. हे परमेश्वरा, माझ्या मुखातून निघणारा एकही शब्द तुला पूर्णपणे माहित नाही असे मुळीच नाही. तू मागून व पुढून मला घेरले आहेस, आणि माझ्यावर तू आपला हात ठेवला आहेस. हे ज्ञान माझ्या कल्पनेपलीकडचे आहे; ते खूप अगम्य आहे, ते मी समजू शकत नाही. मी तुझ्या आत्म्यापासून कोठे निसटून जाऊ शकतो? मी तुझ्या सान्निध्यापासून कोठे पळून जाऊ शकतो? मी जर वर आकाशात चढलो तर तिथे तू आहेस; जर मी खाली मृत्यूलोकात अंथरूण केले तरी, पाहा, तेथे तू आहेस. जर मी पहाटेचे पंख धारण करून आणि समुद्राच्या अगदी पलीकडच्या तीरावर जाऊन राहिलो तरी तेथे तू आहेस. तरी तिथे ही तुझा उजवा हात मला धरतो. आणि तू मला हाताने धरून नेतोस. जरी मी म्हणालो, खचित अंधार मला लपविल, आणि तरीही रात्र माझ्याभोवती प्रकाशच होईल. काळोख देखील तुझ्यापासून काहीच लपवित नाही. रात्रही दिवसासारखीच प्रकाशते, कारण तुला काळोख आणि प्रकाश दोन्ही सारखेच आहेत. तू माझे अंतर्याम निर्माण केलेस; तूच माझ्या आईच्या गर्भात मला घडवले. मी तुला धन्यवाद देतो, कारण तुझी कृत्ये भयचकीत आणि आश्चर्यकारक आहेत, हे तर माझा जीव पूर्णपणे जाणतो.
स्तोत्रसंहिता 139:1-14 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
याहवेह, तुम्ही मला पारखले आहे आणि मला ओळखले आहे. माझे बसणे व माझे उठणे तुम्ही जाणता; दुरून देखील तुम्हाला माझा प्रत्येक विचार समजतो. माझे जाणे-येणे व विश्रांती घेणे, हे देखील तुम्ही ओळखून आहात; माझ्याबद्दलची प्रत्येक गोष्ट तुम्हाला माहीत आहे. हे याहवेह, माझ्या जिभेवर शब्द येण्यापूर्वीच, ते सर्व तुम्हाला माहीत असतात. तुम्ही माझ्यापुढे व मागे, माझ्या सभोवती असता; तुम्ही आपला हात माझ्या मस्तकावर ठेवला आहे. हे ज्ञान इतके भव्य व अद्भुत आहे, की इतक्या उदात्ततेपर्यंत पोहोचणे मला अशक्य आहे. तुमच्या आत्म्यापासून दूर मी कुठे जाऊ? तुमच्या समक्षतेपासून दूर मी कुठे पळू? मी वर स्वर्गात गेलो, तरी तिथे तुम्ही आहात; अधोलोकात माझे अंथरूण केले, तर तिथेही तुम्ही आहातच. मी पहाटेच्या पंखांवर स्वार होऊन अत्यंत दूरच्या महासागरापलिकडे वस्ती केली, तर तिथेही तुमचा हात मला धरून चालवील; तुमचा उजवा हात मला आधार देईल. मी म्हणालो, “अंधार मला लपवून टाकेल, आणि माझ्या सभोवतीचा प्रकाश रात्रीत बदलून जाईल,” अंधकार देखील तुमच्यापुढे अंधकार नाही, कारण तुमच्यापुढे रात्र दिवसासारखीच प्रकाशमान आहे; कारण अंधकार हा तुम्हाला प्रकाशासमान आहे. माझ्या शरीरातील अंतरंगाची घडण तुम्हीच केली आहे; माझ्या मातेच्या उदरात माझी देहरचना केली. मी तुमची स्तुती करतो, कारण तुम्ही मला भयपूर्ण व अद्भुत रीतीने निर्माण केले आहे; तुमचे हे कार्य किती अद्भुत आहे, हे मी पूर्णपणे जाणतो.
स्तोत्रसंहिता 139:1-14 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
हे परमेश्वरा, तू मला पारखले आहेस, तू मला ओळखतोस. माझे बसणे व उठणे तू जाणतोस, तू दुरून माझे मनोगत समजतोस. तू माझे चालणे व माझे निजणे बारकाईने पाहतोस आणि माझ्या एकंदर वर्तनक्रमाची माहिती तुला आहे. हे परमेश्वरा, तुला मुळीच ठाऊक नाही, असा एकही शब्द माझ्या मुखातून निघत नाही. तू मागूनपुढून मला वेढले आहेस, माझ्यावर तू आपला हात ठेवला आहेस. हे ज्ञान माझ्या कल्पनेपलीकडचे आहे; हे अगम्य आहे, हे माझ्या आवाक्याबाहेरचे आहे. मी तुझ्या आत्म्यापासून कोठे निघून जाऊ? मी तुझ्या समक्षतेपासून कोठे पळून जाऊ? मी वर आकाशात चढलो तरी तेथे तू आहेस; अधोलोकी मी आपले अंथरूण केले तरी पाहा, तेथे तू आहेस. मी पहाटेचे पंख धारण करून समुद्राच्या अगदी पलीकडल्या तीरावर जाऊन राहिलो, तरी तेथेही तुझा हात मला चालवील; तुझा उजवा हात मला धरून ठेवील. “अंधकार मला लपवो, माझ्या भोवतालच्या प्रकाशाचा काळोख होवो,” असे जरी मी म्हणालो, तरी अंधकारदेखील तुझ्यापासून काहीएक लपवत नाही; रात्र दिवसाप्रमाणे प्रकाशते, काळोख आणि उजेड हे तुला सारखेच आहेत. तूच माझे अंतर्याम निर्माण केलेस; तूच माझ्या आईच्या उदरी माझी घडण केलीस. भयप्रद व अद्भुत रीतीने माझी घडण झाली आहे, म्हणून मी तुझे उपकारस्मरण करतो; तुझी कृत्ये अद्भुत आहेत हे माझा जीव पूर्णपणे जाणून आहे.