स्तोत्रसंहिता 135:1-21
स्तोत्रसंहिता 135:1-21 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वराच्या नावाची स्तुती करा. परमेश्वराच्या सेवकांनो, तुम्ही त्याची स्तुती करा. परमेश्वराच्या घरात उभे राहाणाऱ्यांनो, आमच्या देवाच्या घराच्या अंगणात उभे राहाणाऱ्यांनो, तुम्ही त्याची स्तुती करा. परमेश्वराची स्तुती करा, कारण तो चांगला आहे; त्याच्या नावाचे गुणगान करा कारण ते करणे आनंददायक आहे. कारण परमेश्वराने याकोबाला आपल्यासाठी निवडले आहे, इस्राएल त्याच्या मालमत्तेप्रमाणे आहे. परमेश्वर महान आहे हे मला माहीत आहे, आमचा प्रभू सर्व देवांच्या वर आहे. परमेश्वराची जी इच्छा आहे तसे तो आकाशात, पृथ्वीवर, समुद्रात आणि खोल महासागरात करतो. तो पृथ्वीच्या शेवटापासून ढग वर चढवतो. तो पावसासाठी विजा निर्माण करतो; आणि आपल्या भांडारातून वारे बाहेर आणतो. त्याने मिसर देशातील मनुष्यांचे आणि प्राण्यांचे दोघांचे पहिले जन्मलेले मारून टाकले. हे मिसरा, त्याने तुझ्यामध्ये, फारो व त्याचे सर्व सेवक यांच्याविरूद्ध चिन्ह व चमत्कार पाठवले. त्याने पुष्कळ राष्ट्रांवर हल्ला केला, आणि शक्तीमान राजांना मारून टाकले, अमोऱ्यांचा राजा सीहोन व बाशानाचा राजा ओग आणि कनानमधल्या सर्व राज्यांचा पराभव केला. त्यांचा देश त्याने वतन असा दिला, आपल्या इस्राएल लोकांसाठी वतन करून दिला. हे परमेश्वरा, तुझे नाव सर्वकाळ टिकून राहिल, हे परमेश्वरा, तुझी किर्ती सर्व पिढ्यानपिढ्या राहील. कारण परमेश्वर आपल्या लोकांचा न्याय करील, आणि त्यास आपल्या सेवकांचा कळवळा येईल. राष्ट्रांच्या मूर्ती सोन्या व रुप्याच्या आहेत, त्या मनुष्याच्या हाताचे काम आहेत. त्या मूर्त्यांना तोंड आहे, पण त्या बोलत नाहीत; त्यांना डोळे आहेत पण त्या पाहत नाहीत. त्यांना कान आहेत, पण त्या ऐकत नाहीत, त्यांच्या मुखात मुळीच श्वास नाही. जे त्या बनवितात, जे प्रत्येकजण त्याच्यावर भरवसा ठेवणारे त्यांच्यासारख्याच त्या आहेत. हे इस्राएलाच्या वंशजांनो, परमेश्वराचा धन्यवाद करा; अहरोनाच्या वंशजांनो, परमेश्वराचा धन्यवाद करा. लेवीच्या वंशजांनो, परमेश्वराचा धन्यवाद करा. परमेश्वराचा आदर करणाऱ्यांनो परमेश्वराचा धन्यवाद करा. जो परमेश्वर यरूशलेमेत राहतो, त्याचा धन्यवाद सियोनेत होवो. परमेश्वराची स्तुती करा.
स्तोत्रसंहिता 135:1-21 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
परमेशाचे स्तवन करा!2 परमेश्वराच्या नावाचे स्तवन करा; परमेश्वराचे सेवकहो, स्तवन करा; परमेश्वराच्या घरात, आमच्या देवाच्या घराच्या अंगणात उभे राहणारे तुम्ही त्याचे स्तवन करा. परमेशाचे स्तवन करा,2 कारण परमेश्वर चांगला आहे. त्याच्या नावाची स्तोत्रे गा, कारण ते मनोरम आहे. कारण परमेशाने आपणासाठी याकोबाला निवडले आहे, आपले स्वतःचे धन होण्यासाठी इस्राएलास निवडून घेतले आहे. परमेश्वर थोर आहे; आमचा प्रभू सर्व देवांपेक्षा थोर आहे हे मी जाणतो. परमेश्वराला जे काही बरे वाटते ते तो आकाशात व पृथ्वीवर, समुद्रात व सर्व जलाशयांत करतो. तो दिगंतांपासून मेघ वर चढवतो, पावसासाठी विजा उत्पन्न करतो; तो आपल्या भांडारातून वारे बाहेर आणतो. त्याने मिसर देशातील मनुष्यांचे व पशूंचेही प्रथमजन्मलेले मारून टाकले. हे मिसर देशा, त्याने तुझ्यामध्ये, फारो व त्याचे सर्व सेवक ह्यांच्यावर चिन्हे व उत्पात पाठवले. त्याने अनेक राष्ट्रांचा मोड केला; बलवान राजे मारून टाकले; अमोर्यांचा राजा सीहोन व बाशानाचा राजा ओग ह्यांना मारून टाकले; कनान देशातील सर्व राज्यांचा मोड केला; आणि त्यांचा देश त्याने वतन करून दिला; आपले लोक इस्राएल ह्यांना वतन करून दिला. हे परमेश्वरा, तुझे नाव चिरकाल राहील; हे परमेश्वरा, तुझे स्मरण पिढ्यानपिढ्या राहील. कारण परमेश्वर आपल्या लोकांचा न्याय करील, त्याला आपल्या सेवकांचा कळवळा येईल. राष्ट्रांच्या मूर्ती केवळ सोनेरुपे आहेत, त्या मनुष्यांच्या हातच्या कृती आहेत. त्यांना तोंड आहे पण बोलता येत नाही; त्यांना डोळे आहेत पण दिसत नाही. त्यांना कान आहेत पण ऐकू येत नाही; आणि त्यांच्या मुखात मुळीच श्वास नाही. त्या बनवणारे व त्याच्यावर भाव ठेवणारे सर्व त्यांच्यासारखे बनतात. हे इस्राएलाच्या घराण्या, परमेश्वराचा धन्यवाद कर; हे अहरोनाच्या घराण्या, परमेश्वराचा धन्यवाद कर; हे लेवीच्या घराण्या, परमेश्वराचा धन्यवाद कर; परमेश्वराचे भय धरणार्यांनो, परमेश्वराचा धन्यवाद करा. यरुशलेमेत वस्ती करणार्या परमेश्वराचा धन्यवाद सीयोनेतून होवो. परमेशाचे स्तवन करा!1