YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 119:97-112

स्तोत्रसंहिता 119:97-112 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

अहाहा, तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहेत! दिवसभर मी त्याच्यावर मनन करतो. तुझ्या आज्ञा मला माझ्या शत्रूंपेक्षा ज्ञानी करतात, कारण तुझे नियम नेहमी माझ्याजवळ आहेत. माझ्या सर्व शिक्षकांपेक्षा मला अधिक बुद्धी आहे. कारण मी तुझ्या कराराच्या निर्बंधाचे मनन करतो. वयोवृध्दापेक्षा मला अधिक कळते; कारण मी तुझे विधी पाळतो. तुझे वचन पाळावे म्हणून मी आपले पाऊल प्रत्येक वाईट मार्गापासून दूर ठेवतो. या करता, मी तुझे वचन पाळावे. मी तुझ्या निर्णयापासून दुसऱ्याबाजूला वळलो नाही, कारण तू मला शिकविले आहे. तुझे वचन माझ्या चवीला कितीतरी गोड आहेत, होय माझ्या मुखाला मधापेक्षा गोड आहेत. तुझ्या विधींच्याद्वारे मला बुद्धी प्राप्त होते; यास्तव मी प्रत्येक खोट्या मार्गाचा द्वेष करतो. तुझे वचन माझ्या पावलाकरता दिवा आहे, आणि माझ्या मार्गासाठी प्रकाश आहे. तुझे निर्णय पाळण्याची मी शपथ वाहिली आहे, व ती पक्की केली आहे. मी फार पीडित आहे; हे परमेश्वरा तुझ्या वचनात वचन दिल्याप्रमाणे मला जिवीत ठेव. हे परमेश्वरा, माझ्या मुखातील वचने ही स्वसंतोषाची अर्पणे समजून स्वीकार कर, आणि मला तुझे निर्णय शिकव. माझे जीवन नेहमीच धोक्यात असते, तरी मी तुझे नियमशास्त्र विसरलो नाही. दुष्टांनी माझ्यासाठी पाश रचला आहे, पण मी तुझ्या विधीपासून भरकटलो नाही. तुझे निर्बंध माझे सर्वकाळचे वतन म्हणून मी स्वीकारले आहे, कारण त्याच्या योगे माझ्या मनाला आनंद होतो. तुझे नियम सर्वकाळ शेवटपर्यंत पाळण्याकडे मी आपले मन लाविले आहे.

स्तोत्रसंहिता 119:97-112 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

अहाहा, मी तुमच्या विधिनियमांवर कितीतरी प्रीती करतो! मी दिवसभर त्यांचे चिंतन करतो. तुमची वचने सतत माझ्यासह असतात, आणि ती माझ्या शत्रूंपेक्षा मला अधिक ज्ञानी करतात. मला माझ्या सर्व शिक्षकांहून अधिक शहाणपण आहे, कारण तुमच्या नियमांचे मी सतत मनन करतो. मी माझ्या वडीलजनांपेक्षाही अधिक सुज्ञ आहे, कारण मी तुमच्या आज्ञा पाळतो. दुष्टाईच्या मार्गावर मी माझी पावले टाकीत नाही, जेणेकरून मी तुमच्या आज्ञांचे पालन करू शकेन. मी तुमच्या वचनाकडे पाठ फिरवीत नाही; कारण तुम्ही स्वतः मला शिक्षण दिले आहे. किती मधुर आहेत तुमची वचने, माझ्या मुखात ती मला मधापेक्षाही गोड लागतात! तुमच्या नियमांद्वारेच मला सुज्ञता प्राप्त होते; म्हणून मी प्रत्येक खोट्या मार्गाचा तिरस्कार करतो. तुमचे वचन माझ्या पावलांकरिता दिवा व माझ्या मार्गावरील प्रकाश आहे. मी शपथ घेतली आहे व सुनिश्चित केले आहे, की मी तुमच्या नीतियुक्त नियमांचे पालन करेन. याहवेह, माझी पीडा असह्य झाली आहे; आपल्या अभिवचनाप्रमाणे माझे जतन करा. याहवेह, माझ्या मुखातून निघालेल्या स्वैच्छिक स्तवनाचा स्वीकार करा, आणि तुमचे नियम मला शिकवा. जरी मी माझे जीवन सतत स्वतःच्या हातात घेतो, तरी मी तुमचे नियम विसरणार नाही. दुष्ट लोकांनी माझ्यासाठी सापळे लावलेले आहेत, तरीपण मी तुमच्या मार्गावरून ढळणार नाही. तुमचे नियम माझा सर्वकाळचा वारसा आहेत, माझ्या अंतःकरणाचा उल्हास आहेत. शेवटपर्यंत पूर्ण हृदयाने तुमचे आज्ञापालन करण्याचे मी निश्चित केले आहे.

स्तोत्रसंहिता 119:97-112 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

अहाहा, तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहे! दिवसभर मी त्याचे मनन करतो. तुझ्या आज्ञा मला आपल्या वैर्‍यांपेक्षा अधिक सुज्ञ करतात; कारण त्या सदोदित माझ्याजवळच आहेत. माझ्या सर्व शिक्षकांपेक्षा मी अधिक समंजस आहे. कारण मी तुझ्या निर्बंधांचे मनन करतो. वयोवृद्धांपेक्षा मला अधिक कळते, कारण मी तुझे विधी पाळतो. तुझे वचन पाळावे म्हणून मी आपले पाऊल प्रत्येक वाईट मार्गापासून आवरतो. तुझ्या निर्णयांपासून मी ढळलो नाही, कारण तू मला शिकवले आहेस. तुझी वचने माझ्या जिभेला किती मधुर लागतात! माझ्या तोंडाला ती मधापेक्षा गोड लागतात. तुझ्या विधींच्या द्वारे मला बुद्धी प्राप्त होते, म्हणून मी प्रत्येक असत्य मार्गाचा द्वेष करतो. तुझे वचन माझ्या पावलांसाठी दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे. तुझे न्याय्य निर्णय पाळीन अशी शपथ मी वाहिली आहे, व ती निश्‍चित केली आहे. मी फार पिडलो आहे; हे परमेश्वरा, तू आपल्या वचनाप्रमाणे मला नवजीवन दे. हे परमेश्वरा, माझ्या तोंडची वचने ही स्वखुशीची अर्पणे समजून मान्य कर; तुझे निर्णय मला शिकव. मी आपला जीव नेहमी मुठीत धरून आहे, तरी मी तुझे नियमशास्त्र विसरलो नाही. दुर्जनांनी माझ्यासाठी पाश मांडला आहे, तरी तुझ्या विधींपासून मी बहकलो नाही. तुझे निर्बंध माझे सर्वकाळचे वतन म्हणून मी स्वीकारले आहेत, कारण त्यांच्या योगे माझ्या मनाला हर्ष होतो. तुझे नियम सर्वकाळ शेवटपर्यंत पाळण्याकडे मी आपले मन लावले आहे.