स्तोत्रसंहिता 119:73-104
स्तोत्रसंहिता 119:73-104 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तुझ्या हातांनी मला निर्माण केले आणि आकार दिला; मला बुद्धी दे म्हणजे मी तुझ्या आज्ञा शिकेन. तुझा सन्मान करणारे मला पाहून हर्ष करतील, कारण मला तुझ्या वचनात आशा सापडली आहे. हे परमेश्वरा, तुझे निर्णय न्यायानुसार आहेत हे मला माहित आहेत, आणि तुझ्या सत्यतेने मला पीडिले आहे. तू आपल्या सेवकाला दिलेल्या वचनानुसार, आपल्या कराराच्या विश्वसनीयतेने सांत्वन कर. मला कळवळा दाखव यासाठी की, मी जिवंत राहीन, कारण तुझे नियमशास्त्र माझा आनंद आहे. गर्विष्ठ लज्जित होवोत, कारण त्यांनी माझी निंदानालस्ती केली आहे; पण मी तुझ्या विधींचे मनन करीन; तुझा सन्मान करणारे माझ्याकडे वळोत, म्हणजे त्यांना तुझे निर्बंध कळतील. मी लज्जित होऊ नये याकरिता माझे हृदय आदराने, तुझ्या निर्दोष नियमाकडे लागू दे. मी तुझ्या विजयासाठी उत्कंठा धरतो; मी तुझ्या वचनावर आशा ठेवली आहे. माझे डोळे तुझे वचन पाहण्यास आसुसले आहेत; तू माझे सांत्वन कधी करशील? कारण मी धुरात ठेविलेल्या बुधलीसारखा झालो आहे; तरी मी तुझे नियम विसरलो नाही. तुझ्या सेवकाचे किती वेळ वाट पाहावी लागणार आहे? जे माझा छळ करतात. त्यांचा न्याय तू कधी करशील? गार्विष्ठांनी माझ्यासाठी खाचा खणून ठेविल्या आहेत, तुझे नियमशास्त्र झुगारले आहे. तुझ्या सर्व आज्ञा विश्वसनीय आहेत; ते लोक माझा छळ अनुचितपणे करत आहेत; मला मदत कर. त्यांनी पृथ्वीवरून माझा जवळजवळ सर्वनाश केला; पण मी तुझे विधी नाकारले नाहीत. तुझ्या कराराच्या विश्वसनीयतेने वचन दिल्याप्रमाणे मला नवजीवन दे, याकरिता की, मी तुझ्या तोंडचे निर्बंध पाळीन. हे परमेश्वरा, तुझे वचन स्वर्गात सर्वकाळ स्थिर आहे; तुझे वचन स्वर्गात ठामपणे प्रस्थापित आहे. तुझी सत्यता सदासर्वदा सर्व पिढ्यानपिढ्यासाठी आहे; तू पृथ्वीची स्थापना केलीस आणि म्हणून ती टिकून राहते. त्या सर्व गोष्टी आजपर्यंत, तुझ्या निर्णयात म्हटल्याप्रमाणे राहिली आहेत, कारण सर्व गोष्टी तुझी सेवा करतात. जर तुझे नियमशास्त्र माझा आनंद नसता, तर माझ्या दुःखात माझा नाश झाला असता. मी तुझे निर्बंध कधीच विसरणार नाही, कारण त्याद्वारे तू मला सजीव ठेवले आहे. मी तुझाच आहे; माझा उध्दार कर. कारण मी तुझे निर्बंध शोधले आहेत. दुष्टांनी माझा नाश करायची तयारी केली आहे, पण मी तुझ्या कराराच्या निर्बंधाचा शोध घेईन. प्रत्येकगोष्टीला त्याची मर्यादा असते हे मी पाहिले आहे, पण तुझ्या आज्ञा व्यापक, मर्यादे पलीकडे आहेत. अहाहा, तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहेत! दिवसभर मी त्याच्यावर मनन करतो. तुझ्या आज्ञा मला माझ्या शत्रूंपेक्षा ज्ञानी करतात, कारण तुझे नियम नेहमी माझ्याजवळ आहेत. माझ्या सर्व शिक्षकांपेक्षा मला अधिक बुद्धी आहे. कारण मी तुझ्या कराराच्या निर्बंधाचे मनन करतो. वयोवृध्दापेक्षा मला अधिक कळते; कारण मी तुझे विधी पाळतो. तुझे वचन पाळावे म्हणून मी आपले पाऊल प्रत्येक वाईट मार्गापासून दूर ठेवतो. या करता, मी तुझे वचन पाळावे. मी तुझ्या निर्णयापासून दुसऱ्याबाजूला वळलो नाही, कारण तू मला शिकविले आहे. तुझे वचन माझ्या चवीला कितीतरी गोड आहेत, होय माझ्या मुखाला मधापेक्षा गोड आहेत. तुझ्या विधींच्याद्वारे मला बुद्धी प्राप्त होते; यास्तव मी प्रत्येक खोट्या मार्गाचा द्वेष करतो.
स्तोत्रसंहिता 119:73-104 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तुमच्या हातांनी मला घडविले आणि आकार दिला; आता तुमचे नियम समजण्यास मला सुबुद्धी द्या. जे तुमचे भय धरतात ते सर्वजण मला बघून उल्हासित होवोत, कारण मी तुमच्या वचनावर आशा ठेवली आहे. हे याहवेह, तुमचे निर्णय अगदी न्याय्य आहेत, हे मला माहीत आहे; सत्यतेने तुम्ही मला शिक्षा दिली; तुमच्या अभिवचनानुसार तुमची अक्षय प्रीती माझे सांत्वन करो; मी जगावे म्हणून तुमची दया मला प्राप्त होवो कारण तुमचे नियम माझा आनंद आहेत. गर्विष्ठ लोकांची अप्रतिष्ठा होवो, विनाकारण त्यांनी मजवर अन्याय केला आहे, परंतु मी तुमच्या नियमांचे मनन करेन. तुमचे भय धरणारे व तुमचे नियम समजणारे, ते सर्वजण माझ्याकडे वळोत. मी निर्दोष अंतःकरणाने तुमच्या विधींचे पालन करेन, म्हणजे मी कधीच लज्जित होणार नाही. तुम्ही केलेल्या तारणप्राप्तीसाठी माझा जीव उत्कंठित झाला आहे, पण तुमच्या वचनावर मी आशा ठेवतो. तुमच्या अभिवचनपूर्तीची वाट पाहून माझे डोळे शिणले आहेत; मी म्हणतो, “तुम्ही माझे सांत्वन केव्हा करणार?” जरी मी धुरात ठेवलेल्या बुधल्यासारखा झालो आहे; तरी मी तुमचे नियम कधीही विसरत नाही. तुमच्या सेवकाने किती काळ वाट पाहावी? माझा छळ करणार्यांना तुम्ही कधी शिक्षा कराल? अहंकारी मला अडकविण्यासाठी खड्डे खणत आहेत, जे तुमच्या नियमाविरुद्ध आहे. तुमच्या सर्व आज्ञा विश्वसनीय आहेत; तुम्ही मला साहाय्य करा, विनाकारण माझा छळ होत आहे. त्यांनी पृथ्वीवरून मला जवळपास नामशेषच केले होते; तरी तुमचे नियम मी नाकारले नाही. तुमच्या अक्षय प्रीतीस अनुसरून माझ्या जिवाचे रक्षण करा, म्हणजे तुमच्या मुखातून निघालेले नियम मला पाळता येतील. हे याहवेह, तुमचे वचन अनंतकाळचे आहे; ते स्वर्गात सर्वकाळ स्थिर राहते. तुमची विश्वसनीयता पिढ्यान् पिढ्या टिकून राहते; तुम्ही पृथ्वीची स्थापना केली आणि ती आजतागायत स्थिर आहे. तुमचे नियम आजवर अस्तित्वात आहेत, कारण सर्वकाही तुमची सेवा करतात. जर तुमचे नियम माझ्या सुखाचा ठेवा झाले नसते, तर पीडेने माझा केव्हाच अंत झाला असता. मी तुमचे नियम कधीही विसरणार नाही, कारण त्यांच्याद्वारे तुम्ही माझ्या जीवनाचे जतन केले आहे. मी तुमचा आहे, माझे तारण करा; कारण मी तुमच्या विधीचा शोधक आहे. दुष्ट लोक माझा नाश करण्याची वाट पाहत आहेत, तरी मी माझे चित्त तुमच्या अधिनियमाकडे लावेन. प्रत्येक परिपूर्णतेला सीमा असते, परंतु तुमच्या आज्ञा निस्सीम आहेत. अहाहा, मी तुमच्या विधिनियमांवर कितीतरी प्रीती करतो! मी दिवसभर त्यांचे चिंतन करतो. तुमची वचने सतत माझ्यासह असतात, आणि ती माझ्या शत्रूंपेक्षा मला अधिक ज्ञानी करतात. मला माझ्या सर्व शिक्षकांहून अधिक शहाणपण आहे, कारण तुमच्या नियमांचे मी सतत मनन करतो. मी माझ्या वडीलजनांपेक्षाही अधिक सुज्ञ आहे, कारण मी तुमच्या आज्ञा पाळतो. दुष्टाईच्या मार्गावर मी माझी पावले टाकीत नाही, जेणेकरून मी तुमच्या आज्ञांचे पालन करू शकेन. मी तुमच्या वचनाकडे पाठ फिरवीत नाही; कारण तुम्ही स्वतः मला शिक्षण दिले आहे. किती मधुर आहेत तुमची वचने, माझ्या मुखात ती मला मधापेक्षाही गोड लागतात! तुमच्या नियमांद्वारेच मला सुज्ञता प्राप्त होते; म्हणून मी प्रत्येक खोट्या मार्गाचा तिरस्कार करतो.
स्तोत्रसंहिता 119:73-104 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तुझ्या हातांनी मला निर्माण केले व घडवले; तुझ्या आज्ञा शिकण्यास मला बुद्धी दे. तुझे भय धरणारे मला पाहून हर्ष करतील; कारण मी तुझ्या वचनाची आशा धरली आहे. हे परमेश्वरा, तुझे निर्णय न्यायानुसार आहेत, आणि सत्यतेने तू मला पिडले आहेस हे मी जाणतो. तू आपल्या सेवकाला दिलेल्या वचनानुसार तुझ्या वात्सल्याने मला सांत्वन प्राप्त होऊ दे. माझ्यावर करुणा कर म्हणजे मी जगेन; कारण तुझ्या नियमशास्त्रात मला आनंद आहे. गर्विष्ठ फजीत होवोत, कारण त्यांनी लबाडीने माझ्यावर अन्याय केला आहे; मी तर तुझ्या विधींचे मनन करीन. तुझे भय धरणारे माझ्याकडे पाहोत, म्हणजे त्यांना तुझे निर्बंध कळतील. मी लज्जित होऊ नये म्हणून माझे चित्त तुझ्या नियमांकडे पूर्णपणे लागू दे. तू सिद्ध केलेल्या तारणाची उत्कंठा धरून माझा जीव व्याकूळ झाला आहे, पण मी तुझ्या वचनाची आशा धरतो. तुझ्या वचनाचा ध्यास लागून माझे डोळे शिणले आहेत; “तू माझे सांत्वन केव्हा करशील” असे मी म्हणत आहे. धुरात ठेवलेल्या बुधल्यासारखा मी झालो आहे; तरी मी तुझे नियम विसरलो नाही. तुझ्या सेवकाचे दिवस कितीसे उरले आहेत? माझ्या पाठीस लागणार्यांना तू कधी शासन करशील? गर्विष्ठांनी माझ्यासाठी खाचा खणून ठेवल्या आहेत; ते तुझ्या नियमशास्त्राप्रमाणे चालत नाहीत. तुझ्या सर्व आज्ञा सत्य आहेत; ते खोटेपणाने माझ्या पाठीस लागले आहेत, तू मला साहाय्य कर. त्यांनी पृथ्वीवरून माझा जवळजवळ नायनाट केला; तरी मी तुझे विधी सोडले नाहीत. तू आपल्या वात्सल्याने मला नवजीवन दे, म्हणजे मी तुझ्या तोंडचे निर्बंध पाळीन. हे परमेश्वरा, तुझे वचन स्वर्गात सर्वकाळ स्थिर आहे. तुझी सत्यता पिढ्यानपिढ्या आहे; तू पृथ्वी स्थापली व ती तशीच कायम आहे. तुझ्या निर्णयांविषयी म्हणावे तर ते आजपर्यंत टिकून आहेत, कारण सर्व पदार्थ तुझे सेवक आहेत. तुझ्या नियमशास्त्रात मला आनंद नसता तर माझ्या दुःखात माझा अंत कधीच झाला असता. तुझे विधी मी कधीही विसरणार नाही, कारण तू त्यांच्या योगे मला नवजीवन दिले आहेस. मी तुझा आहे, माझे तारण कर, कारण मी तुझ्या विधींचा आश्रय केला आहे. दुर्जन माझा नाश करण्यास टपले आहेत; तरी मी तुझे निर्बंध ध्यानात धरीन. सर्व पूर्णतेला मर्यादा असते हे मी पाहिले आहे, पण तुझी आज्ञा अत्यंत व्यापक आहे. अहाहा, तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहे! दिवसभर मी त्याचे मनन करतो. तुझ्या आज्ञा मला आपल्या वैर्यांपेक्षा अधिक सुज्ञ करतात; कारण त्या सदोदित माझ्याजवळच आहेत. माझ्या सर्व शिक्षकांपेक्षा मी अधिक समंजस आहे. कारण मी तुझ्या निर्बंधांचे मनन करतो. वयोवृद्धांपेक्षा मला अधिक कळते, कारण मी तुझे विधी पाळतो. तुझे वचन पाळावे म्हणून मी आपले पाऊल प्रत्येक वाईट मार्गापासून आवरतो. तुझ्या निर्णयांपासून मी ढळलो नाही, कारण तू मला शिकवले आहेस. तुझी वचने माझ्या जिभेला किती मधुर लागतात! माझ्या तोंडाला ती मधापेक्षा गोड लागतात. तुझ्या विधींच्या द्वारे मला बुद्धी प्राप्त होते, म्हणून मी प्रत्येक असत्य मार्गाचा द्वेष करतो.