YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 119:17-32

स्तोत्रसंहिता 119:17-32 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

आपल्या दासाला औदार्य दाखव, म्हणजे मी जिवंत राहून तुझे वचन पाळीन. तू माझे नेत्र उघड, म्हणजे तुझ्या नियमशास्त्रातील अद्भुत गोष्टी माझ्या दृष्टीस पडतील. मी ह्या जगात केवळ उपरा आहे; तुझ्या आज्ञा माझ्यापासून गुप्त ठेवू नकोस. तुझ्या निर्णयांची सर्वदा उत्कंठा धरल्यामुळे माझा जीव कासावीस झाला आहे. गर्विष्ठांना तू धमकावतोस, तुझ्या आज्ञांपासून बहकणारे शापित आहेत. निंदा व तिरस्कार माझ्यापासून दूर कर; कारण मी तुझे निर्बंध पाळतो. अधिपतीही बसून आपसांत माझ्याविरुद्ध बोलतात; पण तुझा दास तुझ्या नियमांचे मनन करतो. तुझे निर्बंध मला आनंददायी आहेत. ते माझे मंत्री आहेत. माझा जीव धुळीस मिळाला आहे; तू आपल्या वचनाप्रमाणे मला नवजीवन दे. मी आपला वर्तनक्रम तुझ्यापुढे मांडला आणि तू मला उत्तर दिलेस; तू आपले नियम मला शिकव. तुझ्या विधींचा मार्ग मला समजावून दे, म्हणजे मी तुझ्या अद्भुत कृत्यांचे मनन करीन. माझा जीव खेदाने गळून जातो; तू आपल्या वचनाप्रमाणे मला आधार दे. असत्याचा मार्ग माझ्यापासून दूर कर; करुणा करून तुझे नियमशास्त्र मला दे. मी सत्याचा मार्ग निवडला आहे; मी तुझे निर्णय आपल्यासमोर ठेवले आहेत. मी तुझे निर्बंध धरून राहिलो आहे; हे परमेश्वरा, मला फजीत होऊ देऊ नकोस. तू माझे मन विकसित करतोस, तेव्हा मी तुझ्या आज्ञांच्या मार्गाने धावतो.

स्तोत्रसंहिता 119:17-32 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

आपल्या सेवकावर दया कर याकरिता की; मी जिवंत रहावे, आणि तुझे वचन पाळावे. माझे डोळे उघड म्हणजे तुझ्या नियमशास्रातील अद्भुत गोष्टी माझ्या दृष्टीस पडतील. मी या देशात परका आहे; तुझ्या आज्ञा माझ्यापासून लपवू नकोस. तुझ्या योग्य निर्णयांची सतत उत्कंठा धरल्यामुळे माझा जीव चिरडून गेला आहे. तू गर्विष्ठांना रागावतोस, तुझ्या आज्ञापासून भरकटतात ते शापित आहेत. माझ्यापासून लाज आणि मानहानी दूर कर, कारण मी तुझ्या कराराची आज्ञा पाळली आहे. अधिपतीही माझ्याविरूद्ध कट रचतात आणि निंदा करतात, तुझा सेवक तुझ्या नियमांचे मनन करतो. तुझ्या कराराची आज्ञा मला आनंददायी आहे, आणि ते माझे सल्लागार आहेत. माझा जीव धुळीस चिकटून आहे; आपल्या वचनाप्रमाणे मला नवजीवन दे. मी तुला आपले मार्ग सांगितले आणि तू मला उत्तर दिलेस; तू मला आपले नियम शिकव. मला तुझ्या विधींचा मार्ग समजावून दे. यासाठी की, मी तुझ्या आश्चर्यकारक शिक्षणाचे मनन करावे. माझा जीव दुःखाने गळून जातो; आपल्या वचनाने मला उचलून धर. असत्याचा मार्ग माझ्यापासून दूर कर; कृपाकरून तुझे नियमशास्त्र मला शिकीव. मी विश्वासाचा मार्ग निवडला आहे; मी तुझे योग्य निर्णय आपल्यासमोर ठेवले आहेत. मी तुझ्या कराराच्या निर्बंधास चिकटून राहिलो आहे; हे परमेश्वरा, मला लज्जित होऊ देऊ नकोस. मी तुझ्या आज्ञांच्या मार्गात धावेन, कारण तू ते करण्यास माझे हृदय विस्तारित करतोस.

स्तोत्रसंहिता 119:17-32 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

मी जिवंत असेपर्यंत मला विपुल आशीर्वादित करा, म्हणजे मी तुमच्या वचनाचे पालन करीत राहीन. तुमच्या नियमशास्त्रातील अद्भुत रम्य गोष्टी पाहण्यासाठी माझे डोळे उघडा. या पृथ्वीवर मी केवळ एक प्रवासी आहे; तुमच्या आज्ञा माझ्यापासून लपवून ठेऊ नका. तुमच्या नियमांची सतत लागलेली उत्कंठा मला कासावीस करते. तुमच्या आज्ञांपासून पथभ्रष्ट झालेल्या शापित आणि गर्विष्ठ लोकांना तुम्ही धमकाविता. त्यांनी केलेला उपहास व तिरस्कारास माझ्यापासून दूर करा, कारण मी तुमच्या आज्ञा पाळतो. अधिपती जरी एकत्र बसतात व माझ्याविरुद्ध बोलतात, तरी तुमचा सेवक तुमच्या विधींचे मनन करेल. तुमचे नियम मला आनंददायी वाटतात; तेच माझे सल्लागार आहेत. मी पूर्णपणे निरुत्साही होऊन धुळीत पडून आहे; तुम्ही आपल्या वचनानुसार माझ्या जीवनाचे जतन करा. मी माझ्या मार्गाचे वर्णन केले आणि तुम्ही मला उत्तर दिले; तुमचे नियम मला शिकवा. तुमच्या शिक्षणाची पद्धत मला समजू द्या, म्हणजे मी तुमच्या अद्भुत कृत्यांचे मनन करेन. दुःखाने मी हतबल झालो आहे; तुमच्या वचनांद्वारे मला सशक्त करा. असत्य मार्गापासून मला दूर ठेवा; तुमच्या कृपेनुसार आपल्या विधिनियमांचे मला शिक्षण द्या. विश्वसनीय मार्गाची मी निवड केली आहे; तुमच्या नियमांवर मी आपले हृदय केंद्रित केले आहे. याहवेह, मी तुमच्या आज्ञांना चिकटून राहतो, मला लज्जित होऊ देऊ नका. मी तुम्ही आज्ञापिलेल्या मार्गावर धावत आहे, कारण तुम्ही माझी समज विस्तृत केली आहे.