YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 119:145-160

स्तोत्रसंहिता 119:145-160 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मी अगदी मनापासून तुझा धावा करतो; हे परमेश्वरा, माझे ऐक; मी तुझे नियम पाळीन. मी तुझा धावा करतो; तू मला तार, म्हणजे मी तुझे निर्बंध पाळीन. उजाडण्यापूर्वी उठून मी आरोळी मारतो; मी तुझ्या वचनांची आशा धरतो. तुझ्या वचनाचे चिंतन करायला रात्रीच्या प्रत्येक प्रहरापूर्वी माझे डोळे उघडे असतात. तू आपल्या वात्सल्यास अनुसरून माझी वाणी ऐक; हे परमेश्वरा, तू आपल्या निर्णयांना अनुसरून मला नवजीवन दे. दुष्कर्म योजणारे माझ्याजवळ आले आहेत; ते तुझ्या नियमशास्त्रापासून दूर आहेत. हे परमेश्वरा, तू जवळ आहेस; तुझ्या सर्व आज्ञा सत्य आहेत. तुझ्या निर्बंधांवरून मला पूर्वीपासून ठाऊक आहे की, ते तू सर्वकाळासाठी स्थापले आहेत. माझे दुःख पाहा, त्यापासून मला सोडव; कारण मी तुझे नियमशास्त्र विसरलो नाही. माझा वाद तू चालव, मला मुक्त कर; तू आपल्या वचनाप्रमाणे मला नवजीवन दे. तारण दुर्जनांपासून दूर आहे; कारण ते तुझ्या नियमांचा आश्रय करीत नाहीत. हे परमेश्वरा, तुझी करुणा थोर आहे; तू आपल्या निर्णयांना अनुसरून मला नवजीवन दे. माझ्या पाठीस लागणारे व माझे शत्रू पुष्कळ आहेत. तरी मी तुझ्या निर्बंधांपासून ढळलो नाही. विश्वासघातक्यांना पाहून मला वीट आला आहे, कारण ते तुझे वचन पाळत नाहीत. तुझे विधी मी किती प्रिय मानतो ते पाहा; हे परमेश्वरा, तू आपल्या वात्सल्याने मला नवजीवन दे. तुझे वचन संपूर्णपणे सत्य आहे; तुझे सर्व न्याय्य निर्णय सनातन आहेत.

स्तोत्रसंहिता 119:145-160 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

मी संपूर्ण मनापासून तुला हाक मारतो, हे परमेश्वरा, मला उत्तर दे, मी तुझे नियम पाळीन. मी तुला हाक मारतो; तू मला तार आणि मी तुझे कराराचे नियम पाळीन. मी उजडण्यापूर्वी पहाटेस उठतो आणि मदतीसाठी आरोळी मारतो. तुझ्या वचनात माझी आशा आहे. तुझ्या वचनावर चिंतन करण्यासाठी रात्रीच्या प्रत्येक प्रहरापूर्वी माझे डोळे उघडे असतात. तुझ्या कराराच्या विश्वसनीयतेने माझी वाणी ऐक; हे परमेश्वरा, तू आपल्या निर्णयानुसार मला जिवंत ठेव. जे माझा छळ करतात ते माझ्याजवळ येत आहेत, पण ते तुझ्या नियमशास्रापासून फार दूर आहेत. हे परमेश्वरा, तू जवळ आहेस आणि तुझ्या सर्व आज्ञा सत्य आहेत. तुझ्या कराराच्या निर्बंधावरून मला पूर्वीपासून माहित आहे की, ते तू सर्वकाळासाठी स्थापिले आहेत. माझे दु:ख पाहा आणि मला मदत कर, कारण मी तुझे नियमशास्त्र विसरलो नाही. तू माझा वाद चालव आणि माझा उद्धार कर. तू आपल्या वचनाप्रमाणे मला नवजीवन दे. दुष्टपासून तारण फार दूर आहे, कारण त्यांना तुझे नियम प्रिय नाहीत. हे परमेश्वरा, तुझी करुणा थोर आहे, तू आपल्या निर्णयास अनुसरुन मला नवजीवन दे. मला छळणारे माझे शत्रू पुष्कळ आहेत, तरी मी तुझ्या कराराच्या निर्बंधापासून मागे वळलो नाही. विश्वासघातक्यांना पाहून मला वीट आला आहे. कारण ते तुझे वचन पाळीत नाहीत. तुझ्या विधींना मी किती प्रिय मानितो ते पाहा; हे परमेश्वरा, तुझ्या वचनाप्रमाणे कराराच्या विश्वसनीयतेने मला जिवंत ठेव. तुझ्या वचनाचे मर्म सत्य आहे; तुझ्या न्यायीपणाचा प्रत्येक निर्णय सर्वकाळ आहे.

स्तोत्रसंहिता 119:145-160 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

हे याहवेह, मी मनापासून धावा करीत आहे; मला उत्तर द्या, म्हणजे मी तुमच्या नियमांचे पालन करेन. मी आरोळी मारून म्हणतो, माझे रक्षण करा म्हणजे मी तुमच्या आज्ञा पाळू शकेन. सूर्योदयापूर्वी मी उठून मदतीसाठी तुमचा धावा करतो; माझी संपूर्ण आशा तुमच्या वचनावर आहे. मी रात्रभर माझे नेत्र उघडेच ठेवतो, म्हणजे तुमच्या अभिवचनांचे चिंतन करू शकेन. तुमच्या वात्सल्य-कृपेनुसार माझी प्रार्थना ऐका; याहवेह, तुमच्या वचनानुरुप माझे जतन करा. माझ्याविरुद्ध कारस्थान करणारे निकट आले आहेत, पण ते तुमच्या नियमशास्त्रापासून दूर आहेत. परंतु हे याहवेह, तुम्ही माझ्याजवळ आहात, व तुमच्या सर्व आज्ञा सत्य आहेत. अनेक वर्षापूर्वी तुमच्या अधिनियमांबद्दल मी हे शिकलो आहे की, ते तुम्ही सर्वकाळासाठी स्थापिले आहेत. माझ्या दुःखाकडे पाहा आणि मला त्यातून सोडवा, कारण मी तुमच्या आज्ञा विसरलो नाही. माझ्या वादाचे समर्थन करा आणि माझी सुटका करा; आपल्या अभिवचनाप्रमाणे माझ्या जीवनाचे जतन करा. दुष्ट लोक तारणप्राप्तीपासून फार दूर आहेत, कारण ते तुमच्या नियमांचा मुळीच शोध करीत नाहीत. हे याहवेह, तुमची दया किती महान आहे; तुमच्या नियमानुसार माझे जतन करा. मला छळणारे कितीतरी शत्रू आहेत, पण मी तुमचा आज्ञाभंग केला नाही. मला या विश्वासघातक्यांचा वीट आला आहे, कारण ते तुमच्या वचनाचे पालन करीत नाहीत. याहवेह पाहा, मी तुमच्या आज्ञांवर किती मनापासून प्रीती करतो; तुमच्या वात्सल्यानुरूप माझी जोपासना करा. तुमची सर्व वचने पूर्णपणे सत्य आहेत; तुमचे सर्व नीतियुक्त न्याय अनंतकाळचे आहेत.