स्तोत्रसंहिता 119:145-152
स्तोत्रसंहिता 119:145-152 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मी संपूर्ण मनापासून तुला हाक मारतो, हे परमेश्वरा, मला उत्तर दे, मी तुझे नियम पाळीन. मी तुला हाक मारतो; तू मला तार आणि मी तुझे कराराचे नियम पाळीन. मी उजडण्यापूर्वी पहाटेस उठतो आणि मदतीसाठी आरोळी मारतो. तुझ्या वचनात माझी आशा आहे. तुझ्या वचनावर चिंतन करण्यासाठी रात्रीच्या प्रत्येक प्रहरापूर्वी माझे डोळे उघडे असतात. तुझ्या कराराच्या विश्वसनीयतेने माझी वाणी ऐक; हे परमेश्वरा, तू आपल्या निर्णयानुसार मला जिवंत ठेव. जे माझा छळ करतात ते माझ्याजवळ येत आहेत, पण ते तुझ्या नियमशास्रापासून फार दूर आहेत. हे परमेश्वरा, तू जवळ आहेस आणि तुझ्या सर्व आज्ञा सत्य आहेत. तुझ्या कराराच्या निर्बंधावरून मला पूर्वीपासून माहित आहे की, ते तू सर्वकाळासाठी स्थापिले आहेत.
स्तोत्रसंहिता 119:145-152 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
हे याहवेह, मी मनापासून धावा करीत आहे; मला उत्तर द्या, म्हणजे मी तुमच्या नियमांचे पालन करेन. मी आरोळी मारून म्हणतो, माझे रक्षण करा म्हणजे मी तुमच्या आज्ञा पाळू शकेन. सूर्योदयापूर्वी मी उठून मदतीसाठी तुमचा धावा करतो; माझी संपूर्ण आशा तुमच्या वचनावर आहे. मी रात्रभर माझे नेत्र उघडेच ठेवतो, म्हणजे तुमच्या अभिवचनांचे चिंतन करू शकेन. तुमच्या वात्सल्य-कृपेनुसार माझी प्रार्थना ऐका; याहवेह, तुमच्या वचनानुरुप माझे जतन करा. माझ्याविरुद्ध कारस्थान करणारे निकट आले आहेत, पण ते तुमच्या नियमशास्त्रापासून दूर आहेत. परंतु हे याहवेह, तुम्ही माझ्याजवळ आहात, व तुमच्या सर्व आज्ञा सत्य आहेत. अनेक वर्षापूर्वी तुमच्या अधिनियमांबद्दल मी हे शिकलो आहे की, ते तुम्ही सर्वकाळासाठी स्थापिले आहेत.
स्तोत्रसंहिता 119:145-152 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मी अगदी मनापासून तुझा धावा करतो; हे परमेश्वरा, माझे ऐक; मी तुझे नियम पाळीन. मी तुझा धावा करतो; तू मला तार, म्हणजे मी तुझे निर्बंध पाळीन. उजाडण्यापूर्वी उठून मी आरोळी मारतो; मी तुझ्या वचनांची आशा धरतो. तुझ्या वचनाचे चिंतन करायला रात्रीच्या प्रत्येक प्रहरापूर्वी माझे डोळे उघडे असतात. तू आपल्या वात्सल्यास अनुसरून माझी वाणी ऐक; हे परमेश्वरा, तू आपल्या निर्णयांना अनुसरून मला नवजीवन दे. दुष्कर्म योजणारे माझ्याजवळ आले आहेत; ते तुझ्या नियमशास्त्रापासून दूर आहेत. हे परमेश्वरा, तू जवळ आहेस; तुझ्या सर्व आज्ञा सत्य आहेत. तुझ्या निर्बंधांवरून मला पूर्वीपासून ठाऊक आहे की, ते तू सर्वकाळासाठी स्थापले आहेत.