YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 119:137-160

स्तोत्रसंहिता 119:137-160 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

हे परमेश्वरा, तू न्यायी आहेस, आणि तुझे निर्णय योग्य आहेत. तू आपले निर्बंध न्याय्य व पूर्ण विश्वसनीय असे लावून दिले आहेत. रागाने माझा नाश केला आहे, कारण माझे शत्रू तुझे वचन विसरले आहेत. तुझ्या वचनाची खूपच पारख झाली आहे, आणि ते तुझ्या सेवकाला प्रिय आहे. मी उपेक्षणीय आणि तुच्छ मानलेला आहे, तरी मी तुझे विधी विसरत नाही. तुझे न्याय्यत्व हे सर्वकाळ योग्य आहे, आणि नियमशास्त्र सत्य आहे. मला खूप संकट आणि क्लेशांनी घेरिले आहे, तरी तुझ्या आज्ञांत मला आनंद आहे. तुझ्या कराराचे निर्बंध सर्वकाळ न्याय्य आहेत; मला बुद्धी दे म्हणजे मी जगेन. मी संपूर्ण मनापासून तुला हाक मारतो, हे परमेश्वरा, मला उत्तर दे, मी तुझे नियम पाळीन. मी तुला हाक मारतो; तू मला तार आणि मी तुझे कराराचे नियम पाळीन. मी उजडण्यापूर्वी पहाटेस उठतो आणि मदतीसाठी आरोळी मारतो. तुझ्या वचनात माझी आशा आहे. तुझ्या वचनावर चिंतन करण्यासाठी रात्रीच्या प्रत्येक प्रहरापूर्वी माझे डोळे उघडे असतात. तुझ्या कराराच्या विश्वसनीयतेने माझी वाणी ऐक; हे परमेश्वरा, तू आपल्या निर्णयानुसार मला जिवंत ठेव. जे माझा छळ करतात ते माझ्याजवळ येत आहेत, पण ते तुझ्या नियमशास्रापासून फार दूर आहेत. हे परमेश्वरा, तू जवळ आहेस आणि तुझ्या सर्व आज्ञा सत्य आहेत. तुझ्या कराराच्या निर्बंधावरून मला पूर्वीपासून माहित आहे की, ते तू सर्वकाळासाठी स्थापिले आहेत. माझे दु:ख पाहा आणि मला मदत कर, कारण मी तुझे नियमशास्त्र विसरलो नाही. तू माझा वाद चालव आणि माझा उद्धार कर. तू आपल्या वचनाप्रमाणे मला नवजीवन दे. दुष्टपासून तारण फार दूर आहे, कारण त्यांना तुझे नियम प्रिय नाहीत. हे परमेश्वरा, तुझी करुणा थोर आहे, तू आपल्या निर्णयास अनुसरुन मला नवजीवन दे. मला छळणारे माझे शत्रू पुष्कळ आहेत, तरी मी तुझ्या कराराच्या निर्बंधापासून मागे वळलो नाही. विश्वासघातक्यांना पाहून मला वीट आला आहे. कारण ते तुझे वचन पाळीत नाहीत. तुझ्या विधींना मी किती प्रिय मानितो ते पाहा; हे परमेश्वरा, तुझ्या वचनाप्रमाणे कराराच्या विश्वसनीयतेने मला जिवंत ठेव. तुझ्या वचनाचे मर्म सत्य आहे; तुझ्या न्यायीपणाचा प्रत्येक निर्णय सर्वकाळ आहे.

स्तोत्रसंहिता 119:137-160 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

हे परमेश्वरा, तू न्यायी आहेस; तुझे निर्णय सरळ आहेत. तू आपले निर्बंध न्याय्य व पूर्ण विश्वसनीय असे लावून दिले आहेत. माझ्या आवेशाने मला ग्रासून टाकले आहे, कारण माझे शत्रू तुझी वचने विसरले आहेत. तुझे वचन अगदी शुद्ध आहे; ते तुझ्या दासाला प्रिय आहे; मी क्षुद्र व तुच्छ मानलेला आहे, तरी मी तुझे विधी विसरत नाही. तुझे न्याय्यत्व हे सनातन न्याय्यत्व आहे, आणि तुझे नियमशास्त्र सत्य आहे. संकट व क्लेश ह्यांनी मला घेरले आहे, तरी तुझ्या आज्ञांत मला आनंद आहे. तुझे निर्बंध निरंतर न्याय्य आहेत; मला बुद्धी दे म्हणजे मी जगेन. मी अगदी मनापासून तुझा धावा करतो; हे परमेश्वरा, माझे ऐक; मी तुझे नियम पाळीन. मी तुझा धावा करतो; तू मला तार, म्हणजे मी तुझे निर्बंध पाळीन. उजाडण्यापूर्वी उठून मी आरोळी मारतो; मी तुझ्या वचनांची आशा धरतो. तुझ्या वचनाचे चिंतन करायला रात्रीच्या प्रत्येक प्रहरापूर्वी माझे डोळे उघडे असतात. तू आपल्या वात्सल्यास अनुसरून माझी वाणी ऐक; हे परमेश्वरा, तू आपल्या निर्णयांना अनुसरून मला नवजीवन दे. दुष्कर्म योजणारे माझ्याजवळ आले आहेत; ते तुझ्या नियमशास्त्रापासून दूर आहेत. हे परमेश्वरा, तू जवळ आहेस; तुझ्या सर्व आज्ञा सत्य आहेत. तुझ्या निर्बंधांवरून मला पूर्वीपासून ठाऊक आहे की, ते तू सर्वकाळासाठी स्थापले आहेत. माझे दुःख पाहा, त्यापासून मला सोडव; कारण मी तुझे नियमशास्त्र विसरलो नाही. माझा वाद तू चालव, मला मुक्त कर; तू आपल्या वचनाप्रमाणे मला नवजीवन दे. तारण दुर्जनांपासून दूर आहे; कारण ते तुझ्या नियमांचा आश्रय करीत नाहीत. हे परमेश्वरा, तुझी करुणा थोर आहे; तू आपल्या निर्णयांना अनुसरून मला नवजीवन दे. माझ्या पाठीस लागणारे व माझे शत्रू पुष्कळ आहेत. तरी मी तुझ्या निर्बंधांपासून ढळलो नाही. विश्वासघातक्यांना पाहून मला वीट आला आहे, कारण ते तुझे वचन पाळत नाहीत. तुझे विधी मी किती प्रिय मानतो ते पाहा; हे परमेश्वरा, तू आपल्या वात्सल्याने मला नवजीवन दे. तुझे वचन संपूर्णपणे सत्य आहे; तुझे सर्व न्याय्य निर्णय सनातन आहेत.