YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 119:129-144

स्तोत्रसंहिता 119:129-144 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

तुझे कराराचे निर्बंध आश्चर्यकारक आहेत; म्हणूनच मी ते पाळतो. तुझ्या वचनाच्या उलगड्याने प्रकाश प्राप्त होतो; त्याने अशिक्षितास ज्ञान प्राप्त होते. मी आपले तोंड उघडले आणि धापा टाकल्या, कारण मी तुझ्या आज्ञेची उत्कंठा धरली. तू माझ्याकडे वळ आणि माझ्यावर दया कर, जशी तुझ्या नावावर प्रीती करणाऱ्यावर तू दया करतोस. तुझ्या वचनाप्रमाणे मला मार्गदर्शन कर; माझ्यावर कोणत्याही पापाची सत्ता चालू देऊ नको. मनुष्याच्या जाचजुलमापासून मला मुक्त कर याकरिता की, मी तुझे विधी पाळीन. तू आपला मुखप्रकाश आपल्या सेवकावर पाड, आणि तुझे नियम मला शिकव. माझ्या डोळ्यातून अश्रूंचे प्रवाह खाली वाहतात; कारण लोक तुझे नियमशास्त्र पाळत नाहीत. हे परमेश्वरा, तू न्यायी आहेस, आणि तुझे निर्णय योग्य आहेत. तू आपले निर्बंध न्याय्य व पूर्ण विश्वसनीय असे लावून दिले आहेत. रागाने माझा नाश केला आहे, कारण माझे शत्रू तुझे वचन विसरले आहेत. तुझ्या वचनाची खूपच पारख झाली आहे, आणि ते तुझ्या सेवकाला प्रिय आहे. मी उपेक्षणीय आणि तुच्छ मानलेला आहे, तरी मी तुझे विधी विसरत नाही. तुझे न्याय्यत्व हे सर्वकाळ योग्य आहे, आणि नियमशास्त्र सत्य आहे. मला खूप संकट आणि क्लेशांनी घेरिले आहे, तरी तुझ्या आज्ञांत मला आनंद आहे. तुझ्या कराराचे निर्बंध सर्वकाळ न्याय्य आहेत; मला बुद्धी दे म्हणजे मी जगेन.

स्तोत्रसंहिता 119:129-144 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

तुमचे नियम अद्भुत आहेत; म्हणून मी त्यांचे पालन करतो. तुमचे वचन उलगडल्याने प्रकाश मिळतो; ते साध्याभोळ्यांना शहाणपण देते. माझे मुख उघडून मी धापा टाकल्या, कारण तुमच्या आदेशाची मला आस लागली होती. मजकडे वळा आणि माझ्यावर दया करा, जशी तुमच्या नामावर प्रीती करणार्‍यांवर तुम्ही नेहमी करता, तशी करा. तुमच्या वचनानुसार माझ्या पावलांचे मार्गदर्शन करा, म्हणजे पाप मजवर सत्ता गाजविणार नाही. मनुष्याच्या अत्याचारापासून मला सोडवा, म्हणजे मला तुमच्या आज्ञा पाळता येतील. तुमच्या सेवकावर आपला मुखप्रकाश पडू द्या, आणि तुमचे सर्व नियम मला शिकवा. माझ्या डोळ्यांतून अश्रूंचे ओघ वाहतात, कारण तुमच्या नियमांचे उल्लंघन करण्यात येत आहे. हे याहवेह, तुम्ही न्यायी आहात, आणि तुमचे नियमही अचूक आहेत. तुम्ही योजलेले अधिनियम अत्यंत नीतियुक्त आहेत; ते पूर्णपणे विश्वसनीय होत. माझा आवेश मला पार झिजवित आहे, कारण माझे शत्रू तुमचे नियम उपेक्षितात. तुमची अभिवचने पूर्णपणे पारखली गेली आहेत, म्हणूनच तुमच्या सेवकाला ती अतिशय प्रिय आहेत. मी स्वतः महत्त्वहीन व तिरस्कृत असलो, तरी तुमचे नियम मी विसरत नाही. तुमची धार्मिकता सार्वकालिक आहे, आणि तुमचे नियम सत्य आहेत. संकट आणि क्लेशाने मला घेरले आहे, परंतु तुमच्या आज्ञा मला सुखावतात. तुमचे नियम सर्वदा न्याय्य असतात; ते समजण्यास मला साहाय्य करा म्हणजे मी जगेन.

स्तोत्रसंहिता 119:129-144 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

तुझे निर्बंध आश्‍चर्यकारक आहेत, म्हणून माझा जीव ते पाळतो. तुझ्या वचनांच्या उलगड्याने प्रकाश प्राप्त होतो; त्याने भोळ्यांना ज्ञान प्राप्त होते. मी तोंड उघडून धापा टाकल्या, कारण मला तुझ्या आज्ञांचा ध्यास लागला. तू माझ्याकडे वळ आणि आपल्या नावाची आवड धरणार्‍यांवर करतोस तशी कृपा माझ्यावर कर. तुझ्या वचनाच्या द्वारे माझी पावले स्थिर कर, आणि कसल्याही दुष्टाईची सत्ता माझ्यावर चालू देऊ नकोस. मनुष्याच्या जुलमापासून मला मुक्त कर, म्हणजे मी तुझे विधी पाळीन. तू आपला मुखप्रकाश आपल्या दासावर पाड; आणि तुझे नियम मला शिकव. लोक तुझे नियमशास्त्र पाळत नाहीत, म्हणून माझ्या डोळ्यांतून अश्रूंचे प्रवाह वाहतात. हे परमेश्वरा, तू न्यायी आहेस; तुझे निर्णय सरळ आहेत. तू आपले निर्बंध न्याय्य व पूर्ण विश्वसनीय असे लावून दिले आहेत. माझ्या आवेशाने मला ग्रासून टाकले आहे, कारण माझे शत्रू तुझी वचने विसरले आहेत. तुझे वचन अगदी शुद्ध आहे; ते तुझ्या दासाला प्रिय आहे; मी क्षुद्र व तुच्छ मानलेला आहे, तरी मी तुझे विधी विसरत नाही. तुझे न्याय्यत्व हे सनातन न्याय्यत्व आहे, आणि तुझे नियमशास्त्र सत्य आहे. संकट व क्लेश ह्यांनी मला घेरले आहे, तरी तुझ्या आज्ञांत मला आनंद आहे. तुझे निर्बंध निरंतर न्याय्य आहेत; मला बुद्धी दे म्हणजे मी जगेन.