स्तोत्रसंहिता 116:1-9
स्तोत्रसंहिता 116:1-9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मी परमेश्वरावर प्रेम करतो कारण तो माझी वाणी आणि माझ्या विनंत्या दयेसाठी ऐकतो. कारण तो माझे ऐकतो, म्हणून मी जिवंत आहे तोपर्यंत मी त्यास हाक मारीन. मृत्यूचे दोर माझ्याभोवती आवळले, आणि मला अधोलोकांच्या यातना झाल्या, संकट व क्लेश मला झाले. नंतर मी परमेश्वराच्या नावाचा धावा केला, “हे परमेश्वरा, मी तुला विनंती करतो, मला वाचव.” परमेश्वर कृपाळू आणि न्यायी आहे; आमचा देव कनवाळू आहे. परमेश्वर भोळ्यांचे रक्षण करतो; मी दीनावस्थेत होतो तेव्हा त्याने माझे तारण केले. हे माझ्या जिवा तू आपल्या विश्रामस्थानी परत ये; कारण परमेश्वराने तुझ्यावर पुष्कळ उपकार केले आहेत. तू माझा जीव मृत्यूपासून, माझे डोळे अश्रूपासून, आणि माझे पाय अडखळण्यापासून मुक्त केले आहेत. जीवंताच्या भूमित परमेश्वराची सेवा करणे मी चालूच ठेवीन.
स्तोत्रसंहिता 116:1-9 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मी याहवेहवर प्रीती करतो, कारण त्यांनी माझी वाणी ऐकली; माझी दयेची विनवणी ऐकली. कारण त्यांनी आपला कान माझ्या हाकेकडे लावला, म्हणून आजीवन मी त्यांचा धावा करीत राहीन. मृत्यूच्या बंधनांनी मला वेष्टिले होते; कबरेच्या भयाने मला ग्रासले, दुःख व क्लेशांनी माझ्यावर मात केली होती. तेव्हा मी याहवेहचा धावा करून म्हणालो: “हे याहवेह, मला वाचवा!” याहवेह कृपाळू आणि नीतिमान आहेत; आपले परमेश्वर करुणामय आहेत. याहवेह साध्याभोळ्या लोकांचे रक्षण करतात; मी गर्तेत ओढला गेलो असताना, त्यांनी मला वाचविले. हे माझ्या जिवा, पुन्हा एकदा शांतचित्त हो, कारण याहवेहने तुझे भले केले आहे. कारण हे याहवेह, तुम्ही मला मृत्यूपासून सोडविले, माझे डोळे अश्रूंपासून आणि माझे पाय अडखळण्यापासून रक्षिले आहेत. जेणेकरून मी जिवंत लोकांमध्ये राहून, याहवेहच्या समक्षतेत चालू शकेन.
स्तोत्रसंहिता 116:1-9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मी परमेश्वरावर प्रेम करतो कारण तो माझी विनवणी ऐकतो. त्याने आपला कान माझ्याकडे लावला आहे, म्हणून मी जन्मभर त्याचा धावा करीन. मृत्यूच्या बंधनांनी मला वेष्टले, मला अधोलोकाच्या यातना झाल्या, मला उपद्रव व क्लेश झाले, तेव्हा मी परमेश्वराच्या नावाचा धावा करून म्हणालो, “हे परमेश्वरा, तुला मी विनवतो की माझा जीव मुक्त कर.” परमेश्वर कृपाळू व न्यायी आहे; आमचा देव कनवाळू आहे. परमेश्वर भोळ्यांचे रक्षण करतो; मी दीनावस्थेत होतो तेव्हा त्याने माझा उद्धार केला. हे माझ्या जिवा, तू आपल्या विश्रामस्थानी परत ये, कारण परमेश्वराने तुझ्यावर पुष्कळ उपकार केले आहेत. तू माझा जीव मरणापासून, माझे डोळे अश्रूंपासून, माझे पाय ठेचाळण्यापासून वाचवले आहेत. जिवंतांच्या भूमीवर मी परमेश्वरासमोर चालेन.