स्तोत्रसंहिता 115:1-18
स्तोत्रसंहिता 115:1-18 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
हे परमेश्वरा, आमचे नको. आमचे नको, तर आपल्या नावाचा सन्मान कर, कारण तू दयाळू आणि सत्य आहेस. ह्यांचा देव कोठे आहे, असे राष्ट्रांनी का म्हणावे? आमचा देव स्वर्गात आहे; त्यास जे आवडते ते तो करतो. राष्ट्रांच्या मूर्ती सोन्याच्या व रुप्याच्या आहेत. त्या मनुष्यांच्या हातचे काम आहेत. त्या मूर्त्यांना तोंड आहे, पण बोलता येत नाही; त्यांना डोळे आहेत, पण त्यांना बघता येत नाही. त्यांना कान आहेत, पण त्यांना ऐकू येत नाही, त्यांना नाक आहे, पण त्यांना वास घेता येत नाही. त्यांना हात आहेत, पण त्यांना स्पर्श करता येत नाही. त्यांना पाय आहेत पण त्या चालू शकत नाही; किंवा त्यांच्या मुखाने त्यांना बोलता येत नाही. जे त्यांना बनवितात त्यांच्याप्रमाणेच, त्यांच्यावर भरवसा ठेवणारा प्रत्येकजन आहे. हे इस्राएला, परमेश्वरावर विश्वास ठेव. तो त्यांचे सहाय्य आणि ढाल आहे. हे अहरोनाच्या घराण्या, परमेश्वरावर विश्वास ठेव; तोच त्याचे सहाय्य आणि ढाल आहे. अहो परमेश्वराचा आदर करणाऱ्यांनो, परमेश्वरावर विश्वास ठेवा; तोच त्यांचे सहाय्य आणि ढाल आहे. परमेश्वराने आमची दखल घेतली आहे आणि आम्हास आशीर्वाद देईल. तो इस्राएलाच्या कुटुंबाला आशीर्वाद देईल. तो अहरोनाच्या कुटुंबाला आशीर्वाद देईल. जे परमेश्वराचा आदर करतात, त्या तरुण आणि वृद्ध या दोघांना तो आशीर्वाद देईल. परमेश्वर तुम्हास अधिकाधिक वाढवो, तो तुमची आणि तुमच्या वंशजांची वाढ करो. आकाश व पृथ्वी ही निर्माण करणाऱ्या परमेश्वराचा तुम्हास आशीर्वाद असो. स्वर्ग तर परमेश्वराचा आहे; पण त्यांने मानवजातीला पृथ्वी दिली आहे. मरण पावलेले म्हणजे निवांतस्थानी उतरलेले कोणीहि परमेश्वराची स्तुती करीत नाहीत. पण आम्ही आता आणि सदासर्वकाळ परमेश्वरास धन्यवाद देत राहू. परमेश्वराची स्तुती करा.
स्तोत्रसंहिता 115:1-18 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
हे परमेश्वरा, आमचे नको, आमचे नको, तर आपल्या नावाचा गौरव कर, कारण तू दयाळू व सत्य आहेस. “ह्यांचा देव कोठे आहे;” असे राष्ट्रांनी का म्हणावे? आमचा देव स्वर्गात आहे; त्याला योग्य दिसते ते सर्व तो करतो. त्यांच्या मूर्ती केवळ सोनेरुपे आहेत; त्या मनुष्यांच्या हातच्या कृती आहेत. त्यांना तोंड आहे पण बोलता येत नाही; त्यांना डोळे आहेत पण दिसत नाही; त्यांना कान आहेत पण ऐकू येत नाही; त्यांना नाक आहे पण वास येत नाही; त्यांना हात आहेत पण स्पर्श करता येत नाही; पाय आहेत पण चालता येत नाही; त्यांच्या कंठांतून शब्द निघत नाही. त्या बनवणारे व त्यांच्यावर भाव ठेवणारे सर्व त्यांच्यासारखे बनतात. हे इस्राएला, परमेश्वरावर भाव ठेव; तोच त्यांचा साहाय्यकर्ता व त्यांची ढाल आहे. हे अहरोनाच्या घराण्या, परमेश्वरावर भाव ठेव; तोच त्यांचा साहाय्यकर्ता व त्यांची ढाल आहे. अहो परमेश्वराचे भय धरणार्यांनो, परमेश्वरावर भाव ठेवा, तोच त्यांचा साहाय्यकर्ता व त्यांची ढाल आहे. परमेश्वराने आमची आठवण केली आहे; तो आशीर्वाद देईल, इस्राएलाच्या घराण्याला आशीर्वाद देईल, अहरोनाच्या घराण्याला आशीर्वाद देईल. परमेश्वराचे भय धरणार्या लहानथोरांना तो आशीर्वाद देईल. परमेश्वर तुमची अधिकाधिक वाढ करो, तुमची व तुमच्या मुलांची वाढ करो. आकाश व पृथ्वी ही निर्माण करणार्या परमेश्वराचा तुमच्यावर आशीर्वाद असो. स्वर्ग तर परमेश्वराचा आहे; पण पृथ्वी त्याने मानवजातीला दिली आहे. मेलेले म्हणजे निःशब्दस्थानी उतरलेले कोणीही परमेशाचे स्तवन करीत नाहीत; पण आम्ही येथून पुढे सर्वकाळ परमेशाचा धन्यवाद करीत राहू. परमेशाचे स्तवन करा!1