स्तोत्रसंहिता 103:2-12
स्तोत्रसंहिता 103:2-12 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
हे माझ्या जिवा, परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नकोस; तो तुझ्या सर्व दुष्कर्मांची क्षमा करतो; तो तुझे सर्व रोग बरे करतो; तो तुझा जीव विनाशगर्तेतून उद्धरतो; तो तुला दया व करुणा ह्यांचा मुकुट घालतो; तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करतो; म्हणून तुझे तारुण्य गरुडासारखे नवे होते. जाचलेल्या सर्वांसाठी परमेश्वर नीतीची व न्यायाची कृत्ये करतो; त्याने आपले मार्ग मोशेला आणि आपली कृत्ये इस्राएलाच्या वंशजांना विदित केली. परमेश्वर दयाळू व कृपाळू आहे, तो मंदक्रोध व दयामय आहे. तो सर्वदाच दोष देत राहणार नाही; तो आपला क्रोध सर्वकाळ राहू देणार नाही. आमच्या पातकांच्या मानाने त्याने आम्हांला शासन केले नाही, त्याने आमच्या दुष्कृत्यांच्या मानाने आम्हांला प्रतिफळ दिले नाही. कारण जसे पृथ्वीच्या वर आकाश उंच आहे, तशी त्याची दया त्यांचे भय धरणार्यांवर विपुल आहे. पश्चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे, तितके त्याने आमचे अपराध आमच्यापासून दूर केले आहेत.
स्तोत्रसंहिता 103:2-12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
हे माझ्या जीवा, परमेश्वराचा धन्यवाद कर, आणि त्याचे सर्व उपकार विसरू नकोस. तो तुझ्या सर्व पापांची क्षमा करतो; तो तुझे सर्व आजार बरे करतो. तो तुझे आयुष्य नाशापासून खंडून घेतो; तो तुला आपल्या विश्वासाच्या कराराने आणि करुणेच्या कृतीने मुकुट घालतो. तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करतो, म्हणून तुझे तारुण्य गरुडासारखे पुन्हा नवे होते. जे सर्व अन्यायाने पीडलेले आहेत; त्यांच्यासाठी परमेश्वर नितीचे आणि न्यायाची कृत्ये करतो. त्याने मोशेला आपले मार्ग, इस्राएल वंशजांना आपल्या कृत्यांची ओळख करून दिली. परमेश्वर दयाळू आणि कृपाळू आहे; तो सहनशील आहे; त्याच्यामध्ये महान कराराची विश्वासयोग्यता आहे. तो नेहमीच शिक्षा करणार नाही; तो नेहमीच रागावणार नाही. तो आम्हाशी आमच्या पापास अनुरूप असे वागला नाही किंवा आमच्या पापाला साजेसे प्रतिफळ दिले नाही. कारण जसे पृथ्वीच्या वरती आकाश आहे, तसे त्याचे जे भय धरतात त्यांच्यावर त्याची दया आहे. जसे पूर्वेपासून पश्चिम जितकी दूर आहे, तसे त्याने आमच्या पापाचे दोष आम्हापासून काढून टाकले आहेत.