स्तोत्रसंहिता 10:1-11
स्तोत्रसंहिता 10:1-11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
हे परमेश्वरा, तू दूर का उभा आहेस? संकटकाळी तू स्वत:ला का लपवतोस? कारण दुष्ट आपल्या गर्विष्ठपणामुळे पीडलेल्यांचा पाठलाग करतो, परंतु कृपया असे होवो की दुष्टांनी जे संकल्प योजिले आहेत, त्यामध्ये ते सापडो. कारण दुष्ट आपल्या हृदयाच्या इच्छेचा अभिमान बाळगतो; दुष्ट लोभी व्यक्तीस धन्य म्हणतो व परमेश्वरास तुच्छ मानतो आणि नाकारतो. दुष्ट मनुष्य गर्विष्ठ असतो, ह्यास्तव तो देवाला शोधत नाही. कारण देवाबद्दल त्यास काही काळजी नाही, म्हणून तो देवाचा विचार करत नाही. त्याचे मार्ग उन्नतीचे असतात, परंतु तुझे धार्मिक नियम त्याच्या आवाक्याबाहेरचे आहेत, तो आपल्या सर्व शत्रूंवर फुत्कारतो. तो आपल्या हृदयात असे म्हणतो, मी कधीच चुकणार नाही; संपूर्ण पिढ्यांत माझ्यावर आपत्ती येणारच नाही. त्याचे मुख शाप, कपट, जुलूम, हानिकारक शब्दांनी भरलेले आहेत. त्यांची जीभ जखमी व नाश करते. तो गावाजवळ टपून बसतो, गुप्त ठिकाणात तो निर्दोष्याला ठार मारतो; त्याचे डोळे लाचारावर टपून असतात. जसा सिंह गर्द झाडात लपतो, तसाच तो दडून बसतो. तो दीनाला धरायला टपून बसतो. तो दीनाला आपल्या जाळ्यात ओढून धरून घेतो. त्याचे बळी पडणारे ठेचले आणि झोडले जातात. ते त्याच्या बळकट जाळ्यात पडतात. तो आपल्या हृदयात असे बोलतो, देव आपल्याला विसरला आहे, त्याने आपले मुख झाकले आहे, तो पाहण्याचा त्रास करून घेणार नाही.
स्तोत्रसंहिता 10:1-11 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
याहवेह, तुम्ही दूर का उभे आहात? संकटसमयी तुम्ही स्वतःला का लपविता? दुष्ट मनुष्य आपल्या उद्धटपणात दुर्बलांचा छळ करतो, त्याने योजलेल्या दुष्ट योजनांमध्ये असहाय अडकले जातात. कारण हा दुष्ट मनुष्य स्वतःच्या दुष्ट वासनांची बढाई मारतो; तो लोभी लोकांना आशीर्वाद देतो व याहवेहची निंदा करतो. दुष्ट त्याच्या गर्विष्ठपणामुळे परमेश्वराचा घेतच नाहीत; परमेश्वराचा विचारही त्याच्या मनात येत नाही. दुष्टाला प्रत्येक प्रयत्नात यश मिळते; तुमच्या नियमांचा तो तिरस्कार करतो. त्याच्या विरोधकांकडे तो तुच्छतेने बघतो. तो स्वतःशीच म्हणतो, “मला कधीही काही हलवू शकणार नाही.” “मला कोणीही काही इजा करणार नाही,” अशी फुशारकी तो मारतो. लबाडी व धमक्यांनी त्याचे मुख भरलेले आहे; त्याच्या जिभेखाली उपद्रव आणि दुष्टता आहे. गावात तो दबा धरून बसतो; गुप्तस्थळी तो निर्दोषाचे रक्त पाडतो. त्याची नजर असहाय्याची शिकार करण्यासाठी टपलेली असते; तो सिंहासारखा दबा धरून बसतो; तो लाचार लोकांना पकडण्याच्या प्रतिक्षेत असतो; तो दीनांना पकडून आपल्या जाळ्यात ओढत नेतो. बळी पडलेले लोक त्याच्या प्रबळ शक्तीखाली दडपले जातात, त्याच्या प्रहारांनी चिरडले जातात. तो स्वतःशी बोलतो, “परमेश्वराच्या लक्षात हे कधीही येणार नाही, त्यांनी आपले मुख लपविले आहे, ते हे पाहात नाहीत.”
स्तोत्रसंहिता 10:1-11 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
हे परमेश्वरा, तू दूर का उभा राहतोस? संकटसमयी दृष्टिआड का होतोस? दुर्जनांच्या गर्वामुळे दीन दुःखाने होरपळून जातो; ज्या क्लृप्त्या ते योजतात त्यांतच ते सापडोत. कारण दुर्जन आपल्या मनातील हावेची शेखी मिरवतो; लोभिष्ट मनुष्य परमेश्वराचा त्याग करून त्याला तुच्छ मानतो. दुर्जन नाक वर करून म्हणतो, “तो झडती घेणार नाही;” “देव नाही” असेच त्याचे सर्व विचार असतात. त्याच्या युक्त्या सर्वदा सिद्धीस जातात; तुझे निर्णय त्याच्या अगदी दृष्टीपलीकडे उच्च असे असतात; तो आपल्या सर्व शत्रूंवर फूत्कार टाकतो. तो आपल्या मनात म्हणतो की, “मी ढळणार नाही, मी पिढ्यानपिढ्याही विपत्तीत पडणार नाही.” त्याच्या तोंडी शाप, कपट व जुलूम सदैव आहेत; त्याच्या जिभेवर उपद्रव व दुष्टाई आहेत. गावातील दडण्याच्या ठिकाणी तो दबा धरून बसतो; गुप्त स्थळी तो निरपराध्याचा घात करतो; त्याचे डोळे लाचारासाठी टपलेले असतात. जाळीत जसा सिंह तसा तो गुप्त स्थळी टपून बसतो; दीनाला आपल्या जाळ्यात ओढतो आणि धरतो. लाचाराचा चुराडा होऊन तो वाकून जातो, आणि त्याच्या बळकट पंजांत तो सापडतो. तो आपल्या मनात म्हणतो की, “देवाला विसर पडला आहे, त्याने आपले तोंड लपवले आहे, तो हे कधीच पाहणार नाही.”