YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नीतिसूत्रे 25:1-14

नीतिसूत्रे 25:1-14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

ही शलमोनाची आणखी काही नीतिसूत्रे आहेत. यहूदाचा राजा हिज्कीया याच्या मनुष्यांनी याचा नक्कल केली. काही गोष्टी गुपित ठेवणे यामध्ये देवाचे गौरव आहे, पण त्या गोष्टी शोधून काढणे यामध्ये राजाचे गौरव आहे. जसे उंचीमुळे आकाशाचा आणि खोलीमुळे पृथ्वीचा, तसे राजाचे मन गूढ आहे. रुप्यातला गाळ काढून टाक, आणि धातू कामगार रुप्याचा उपयोग त्याच्या कामासाठी करू शकेल. त्याचप्रमाणे राजाच्या सानिध्यापासून दुष्टांना दूर कर म्हणजे त्याचे राजासन जे काही चांगले आहे त्यांनी भक्कम होईल. राजासमोर स्वत:ची प्रतिष्ठा मिरवू नको. आणि थोर अधिकाऱ्यांच्या जागी उभा राहू नको. कारण तुझ्यासमोर येणाऱ्या अधिपतीपुढे तुझा पाणउतारा करण्यापेक्षा, “वर येऊन बस” असे तुला म्हणावे हे अधिक चांगले आहे. फिर्याद करायला जाण्याची घाई करू नको. ती तू केलीस तर शेवटी तुझ्या शेजाऱ्याने तुला लज्जित केले तर परिणामी काय करू असे तुला होऊन जाईल. तुमचे आणि तुमच्या शेजाऱ्याचे वाद आपसात चर्चा करून मिटव, आणि दुसऱ्याच्या गुप्त गोष्टी उघड करू नको. केली तर कदाचित ऐकणारा तुझी अप्रतिष्ठा करील, व हे दूषण तुला लागून राहील. जसे रुपेरी तबकात सोन्याचे सफरचंद, तसे निवडक चांगले शब्द बोलणे. जसे सोन्याची अंगठी किंवा दागिना शुद्ध सोन्यापासून करतात, तसाच दोष देणारा सुज्ञ ऐकणाऱ्याच्या कानांना आहे. कापणीच्या समयी जसे बर्फाचे पेय, तसा विश्वासू दूत त्यास पाठवणाऱ्याला आहे कारण तो आपल्या धन्याचा जीव गार करतो. जे लोक भेटी देण्याचे वचन देतात पण देत मात्र कधीच नाहीत, ते पाऊस न आणणारे ढग आणि वारा यांसारखे आहेत.

सामायिक करा
नीतिसूत्रे 25 वाचा

नीतिसूत्रे 25:1-14 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

यहूदीयाचा राजा हिज्कीयाहच्या सहकार्‍यांनी संग्रहित केलेली, शलोमोन राजाची ही आणखी काही नीतिवचने आहेत: रहस्य गुप्त ठेवणे हे परमेश्वराचे गौरव आहे; आणि गुप्त गोष्टींचा शोध लावणे हे राजाचे गौरव आहे. जसे आकाशाची उंची आणि पृथ्वीची खोली, तसेच राजांच्या मनाचाही थांग लागत नाही. चांदीतील मळ काढला म्हणजे रौप्यकार पात्र तयार करू शकतो; राजाच्या दरबारातील भ्रष्ट अधिकारी काढून टाका आणि मग त्याचे राज्य न्यायीपणामुळे स्थिर राहील. राजाच्या समक्षतेत प्रौढी मिरवू करू नकोस, आणि त्याच्या प्रतिष्ठित व्यक्तीमध्ये स्थान ग्रहण करण्याचा दावा करू नकोस; त्याच्या प्रतिष्ठित लोकांसमोर त्याने तुझा अपमान करावा, यापेक्षा “इकडे वर ये” असे तुला बोलणे अधिक रास्त वाटेल. तुझ्या डोळ्यांनी जे काही पाहिले आहे ते न्यायालयात नेण्याची घाई करू नकोस, कारण जर तुझा शेजारी तुला फजीत करेल, तर शेवटी तू काय करशील? जर तू तुझ्या शेजार्‍याला न्यायालयात घेऊन जातोस तर, दुसर्‍याच्या विश्वासाला धोका देऊ नकोस, नाहीतर तो ऐकणारा तुला निर्लज्ज ठरवेल आणि तुझ्याविरुद्ध तो दावा दाखल करेल. योग्य वेळेवर दिलेला सल्ला हा चांदीच्या करंड्यात ठेवलेल्या सोन्याच्या सफरचंदासारखा आहे. न्यायाधीशाने केलेली कान उघाडणी, ऐकणार्‍या कानासाठी सुज्ञ म्हणजे सोन्याचे कर्णफूल किंवा उत्तम सोन्याचा दागिना यासारखी आहे. ज्याने विश्वासू सेवकाला पाठविले त्याच्यासाठी तो उन्हाळ्यातील शीतल पेयासारखा आहे; तो त्याच्या मालकाला ताजेतवाने करतो. कधीही न दिलेल्या देणगीबद्दल जो घमेंड करतो, तो वृष्टिहीन मेघ आणि वारा यासारखा आहे.

सामायिक करा
नीतिसूत्रे 25 वाचा

नीतिसूत्रे 25:1-14 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

हीही शलमोनाची नीतिसूत्रे आहेत; यहूदाचा राजा हिज्कीया ह्याच्या माणसांनी ह्यांचा संग्रह केला. एखादी गोष्ट गुप्त ठेवणे ह्यात देवाचे गौरव आहे; पण एखाद्याचा शोध लावणे ह्यात राजांचा गौरव आहे. उंचीमुळे आकाशाचा, खोलीमुळे पृथ्वीचा, व राजांच्या मनाचा थांग लागत नाही. रुप्यातला गाळ काढून टाक, म्हणजे धातू गाळणार्‍यासाठी त्याचे चांगले पात्र बनते. राजासमोरून दुर्जनाला घालवून दे, म्हणजे त्याचे सिंहासन नीतिमत्तेच्या ठायी स्थापित होईल. राजासमोर आपली प्रतिष्ठा मिरवू नकोस; थोर लोकांच्या जागी उभा राहू नकोस; कारण कोणा सरदारास येताना पाहून त्याच्यासमोर तुला खालच्या जागी बसवण्यात यावे, त्यापेक्षा “वर येऊन बस” असे तुला म्हणावे हे बरे. फिर्याद करायला जाण्याची उतावळी करू नकोस, ती तू केलीस आणि तुझ्या शेजार्‍याने तुझी फजिती केली तर परिणामी काय करू असे तुला होऊन जाईल. तुझा व तुझ्या शेजार्‍याचा वाद असला तर तो चालव, पण इतरांच्या गुप्त गोष्टी बाहेर फोडू नकोस; फोडल्यास तर ऐकणारा तुझी निर्भर्त्सना करील, आणि हे दूषण तुला लागून राहील. रुपेरी करंड्यात सोन्याची फळे, तसे समयोचित भाषण होय. सोन्याचे कर्णभूषण आणि उत्कृष्ट सोन्याचा दागिना, तसा सुज्ञ उपदेशक लक्ष देणार्‍या कानाला आहे. कापणीच्या समयी जसे बर्फाचे पेय, तसा विश्वासू जासूद त्याला पाठवणार्‍याला आहे, कारण तो आपल्या धन्याचा जीव गार करतो. मेघ व वारा असून वृष्टी नाही, त्याप्रमाणे आपल्या देणग्यांची खोटी आढ्यता मिरवणारा आहे.

सामायिक करा
नीतिसूत्रे 25 वाचा