नीतिसूत्रे 21:17-31
नीतिसूत्रे 21:17-31 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ज्याला ख्यालीखुशाली प्रिय आहे तो दरिद्री होतो; ज्याला द्राक्षरस आणि तेल प्रिय आहे तो श्रीमंत होणार नाही. जो कोणी चांगले करतो त्याची खंडणी दुर्जन आहे, आणि सरळांचा मोबदला विश्वासघातकी असतो. भांडखोर आणि खूप तक्रार करून अशांती निर्माण करणाऱ्या पत्नीबरोबर राहाण्यापेक्षा वाळवंटात राहाणे अधिक चांगले. सुज्ञाच्या घरात मोलवान खजिना आणि तेल आहेत, पण मूर्ख मनुष्य ते वाया घालवतो. जो कोणी नीतिमत्ता आणि दया करतो, त्यास आयुष्य, उन्नती आणि मान मिळेल. सुज्ञ मनुष्य बलवानांच्या नगराविरूद्ध चढतो, आणि तो त्यांच्या संरक्षणाचा आश्रयदुर्ग पाडून टाकतो. जो कोणी आपले तोंड व जीभ सांभाळतो, तो संकटापासून आपला जीव वाचवतो. गर्विष्ठ व घमेंडखोर मनुष्यास उद्दाम असे नाव आहे. तो गर्वाने उद्धट कृती करतो. आळशाची वासना त्यास मारून टाकते; त्याचे हात काम करण्यास नकार देतात. तो सर्व दिवस हाव आणि अधिक हाव धरतो, परंतु नीतिमान देतो आणि मागे धरून ठेवत नाही. दुर्जनांचे यज्ञार्पण वीट आणणारे असते, तर मग तो यज्ञ दुष्ट हेतूने आणतो ते किती अधिक वीट असे आहे. खोटा साक्षीदार नाश पावेल, पण जो कोणी ऐकतो त्याप्रमाणे सर्व वेळ तसे बोलतो. दुष्ट मनुष्य आपले मुख धीट करतो, पण सरळ मनुष्य आपल्या मार्गाचा नीट विचार करतो. परमेश्वराविरूद्ध शहाणपण, बुद्धि किंवा युक्ती ही मुळीच उभी राहू शकत नाहीत. लढाईच्या दिवसासाठी घोडा तयार करतात, पण तारण परमेश्वराकडून आहे.
नीतिसूत्रे 21:17-31 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
भोग विलासाची आवड असणारा गरीब होतो; मद्यपान व सुगंधी तेलाची आवड धरणारा कधीही श्रीमंत होत नाही. दुष्ट नीतिमानांसाठी, आणि विश्वासघातकी सरळ लोकांसाठी खंडणी असतो. भांडकुदळ व सतत टोचून बोलणार्या पत्नीबरोबर राहण्यापेक्षा वाळवंटात राहिलेले बरे! शहाणा मनुष्य उत्कृष्ट भोजन आणि जैतून तेलाचा साठा करतो, पण मूर्ख मिळेल ते सर्व गिळून टाकतो. जो कोणी नीतिमत्व आणि प्रीती मिळविण्याचा प्रयत्न करतो, त्याला जीवन, समृद्धी व सन्मान यांचा लाभ होतो. सुज्ञ मनुष्य बलवानाच्या शहराविरुद्ध जाऊ शकतो आणि ज्या किल्ल्यावर ते भरवसा ठेवतात ते तो उद्ध्वस्त करतो. जे कोणी त्यांच्या तोंडावर आणि त्यांच्या जिभेवर नियंत्रण ठेवतात, ते संकटापासून दूर राहतात. गर्विष्ठ, उद्धट ज्याचे नाव “टवाळखोर” आहे, तो तीव्र संतापाने वागतो. आळशी मनुष्याची आशा त्याच्यासाठी मृत्यू ठरेल, कारण त्याचे हात काम करण्यास नकार देतात. अधिक मिळावे यासाठी तो दिवसभर तीव्र इच्छा करतो, परंतु नीतिमान राखून न ठेवता दान देतात. दुष्टांच्या यज्ञार्पणांचा याहवेहला वीट आहे— तर मग जेव्हा वाईट हेतूने अर्पण आणले जाते ते किती तिरस्करणीय असेल! खोटा साक्षीदार नाश पावेल, परंतु काळजीपूर्वक ऐकणारा यशस्वी रीतीने साक्ष देईल. दुष्ट निर्भयतेचा आव आणतो, पण सरळ मनुष्य मात्र विचारपूर्वक मार्ग निवडतो. मनुष्याचे कोणतेही सुज्ञान, बुद्धिमत्ता, कोणत्याही योजना याहवेहविरुद्ध यशस्वी होऊ शकत नाहीत. लढाईसाठी घोड्याला तयार केले आहे, परंतु विजय देणे याहवेहच्याच हाती असते.
नीतिसूत्रे 21:17-31 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ज्याला ख्यालीखुशाली आवडते तो दरिद्री होतो; ज्याला द्राक्षारसाचा व सुगंधी तेलाचा शौक आहे तो धनवान होत नाही. नीतिमानाची खंडणी दुर्जन, आणि सरळांचा मोबदला विश्वासघातकी असतो. भांडखोर बायकोजवळ राहून संताप करून घ्यावा त्यापेक्षा अरण्यवास पुरवला. सुज्ञांच्या घरात मोलवान वस्तू व तेल ह्यांचा साठा असतो, पण मूर्ख मनुष्य त्यांचा फन्ना उडवतो. जो नीतिमत्ता व दया ह्यांना अनुसरून वर्ततो, त्याला जीवन, नीतिमत्ता व सन्मान प्राप्त होतात. सुज्ञ मनुष्य बलाढ्यांच्या नगराच्या तटावर चढून त्यांचा आश्रयदुर्ग पाडून टाकतो. जो आपले तोंड व जिव्हा सांभाळतो, तो संकटांपासून आपला जीव बचावतो. गर्विष्ठ व चढेल मनुष्याला ‘उद्दाम’ म्हणतात, तो गर्वाच्या ताठ्याने वागतो. आळश्याची वासना त्याला मारून टाकते; कारण त्याचे हात श्रम करण्यास कबूल नसतात. कोणी दिवसभर लाभाची हाव धरतात; पण नीतिमान देतो, हात आखडत नाही; दुर्जनांचे यज्ञार्पण वीट आणणारे असते; त्याने ते दुष्कर्माबद्दल प्रायश्चित्त म्हणून आणले तर मग ते किती अधिक वीट आणणारे असणार? खोटा साक्षी नाश पावतो, पण जो ऐकल्याप्रमाणे सांगतो त्याच्या सांगण्याला कोणी हरकत घेत नाही. दुर्जन आपला हट्ट आपल्या मुखचर्येवर व्यक्त करतो, पण सरळ मनुष्य आपल्या वर्तनक्रमाचा विचार करतो. परमेश्वरापुढे शहाणपण, बुद्धी व युक्ती ही मुळीच चालत नाहीत. लढाईच्या दिवसासाठी घोडा सज्ज करतात, पण यश देणे परमेश्वराकडे असते.