YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नीतिसूत्रे 15:18-33

नीतिसूत्रे 15:18-33 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

रागीट मनुष्य भांडण उपस्थित करतो, पण जो रागास मंद आहे तो मनुष्य भांडण शांत करतो. आळशाची वाट काटेरी कुंपणासारखी आहे, पण सरळांची वाट राजमार्ग बनते. शहाणा मुलगा आपल्या वडिलांना आनंदीत करतो. पण मूर्ख मनुष्य आपल्या आईला तुच्छ मानतो. बुद्धिहीन मनुष्य मूर्खपणात आनंद मानतो. पण जो समंजस आहे तो सरळ मार्गाने जातो. जेथे सल्ला नसतो तेथे योजना बिघडतात, पण पुष्कळ सल्ला देणाऱ्यांबरोबर ते यशस्वी होतात. मनुष्यास आपल्या तोंडच्या समर्पक उत्तराने आनंद होतो; आणि योग्यसमयीचे शब्द किती चांगले आहे! सुज्ञाने खाली अधोलोकास जाऊ नये म्हणून त्याचा जीवनमार्ग वर जातो. परमेश्वर गर्विष्ठांची मालमत्ता फाडून काढेल, परंतु तो विधवेच्या मालमत्तेचे रक्षण करतो. परमेश्वर पाप्यांच्या विचारांचा द्वेष करतो, पण दयेची वचने त्याच्या दुष्टीने शुद्ध आहेत. चोरी करणारा आपल्या कुटुंबावर संकटे आणतो, पण जो लाचेचा तिटकारा करतो तो जगेल. नीतिमान उत्तर देण्याआधी विचार करतो, पण दुष्टाचे मुख सर्व वाईट ओतून बाहेर टाकते. परमेश्वर दुष्टांपासून खूप दूर आहे, पण तो नीतिमानांच्या प्रार्थना नेहमी ऐकतो. नेत्राचा प्रकाश अंतःकरणाला आनंद देतो, आणि चांगली बातमी शरीराला निरोगी आहे. जर कोणीतरी तुम्हास जीवन कसे जगावे म्हणून सुधारतो त्याकडे लक्ष द्या, तुम्ही ज्ञानामध्ये रहाल. जो कोणी शिक्षण नाकारतो तो आपल्या स्वत:लाच तुच्छ लेखतो, परंतु जो कोणी शासन ऐकून घेतो तो ज्ञान मिळवतो. परमेश्वराचे भय हे सुज्ञतेचे शिक्षण देते, आणि आदरापूर्वी नम्रता येते.

सामायिक करा
नीतिसूत्रे 15 वाचा

नीतिसूत्रे 15:18-33 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

तापट मनुष्य कलह उत्पन्न करतो, तर शांत स्वभावाचा मनुष्य तंटा मिटवितो. आळशी माणसाच्या वाटेवर काटेरी कुंपणासारखे अडथळे असतात, परंतु नीतिमानाची वाट राजमार्ग असतो. समंजस पुत्र आपल्या वडिलांना आनंद देतो, परंतु मूर्ख मनुष्य आईला तुच्छ लेखतो. मूर्खपणा विवेकहीन मनुष्यास आनंदित करतो, पण विवेकशील मनुष्य सरळ मार्ग धरून राहतो. उपयुक्त सल्लागार नसले की योजना विफल होतात; परंतु अनेक सल्लागारांमुळे योजना यशस्वी होतात. समर्पक उत्तर देण्यात प्रत्येकाला आनंद वाटतो— योग्य वेळी उपयुक्त सल्ला मिळणे किती महत्त्वाचे आहे! सुज्ञासाठी जीवनाचा मार्ग वर चढविणारा असतो तो त्याला खाली मृतलोकात जाण्यापासून रोखतो. गर्विष्ठांच्या घराचा याहवेह नाश करतात, परंतु ते विधवांची दगडी सीमा सुरक्षित ठेवतात. दुष्टाच्या विचारांचा याहवेह द्वेष करतात, परंतु प्रेमळ शब्द त्यांच्या दृष्टीने निर्मळ असतात. लोभी माणसे त्यांच्या परिवारांवर विनाश आणतात, परंतु जो लाच घेणे घृणित मानतो, तो जगेल. नीतिमानाचे अंतःकरण विचारांती उत्तर देते, परंतु दुष्टाच्या मुखातून दुर्वचनाचा प्रवाह निघतो. याहवेह दुष्टांपासून फारच दूर असतात, पण धार्मिकांच्या प्रार्थना मात्र ते ऐकतात. निरोप्याच्या नजरेतील चमक हृदयाला आनंद देते, आणि शुभवार्ता हाडांना आरोग्य देते. जीवनदायी शिक्षणाकडे जो काळजीपूर्वक लक्ष देतो, तो सुज्ञांसह वास करेल. जे शिस्तीकडे दुर्लक्ष करतात ते स्वतःचा तिरस्कार करतात, परंतु जो सुधारणेकडे लक्ष लावतो तो समंजसपणा प्राप्त करतो. याहवेहचे भय धरणे हेच सुज्ञतेचे शिक्षण होय, आणि सन्मान मिळण्याआधी विनम्रता येते.

सामायिक करा
नीतिसूत्रे 15 वाचा

नीतिसूत्रे 15:18-33 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

तापट मनुष्य तंटा उपस्थित करतो; मंदक्रोध झगडा शमवतो; आळशाची वाट काटेरी कुंपणासारखी असते, पण सरळांची वाट राजमार्ग बनते. शहाणा मुलगा बापाला आनंद देतो; मूर्ख मनुष्य आपल्या आईला तुच्छ मानतो; बुद्धिहीन इसम मूर्खपणात आनंद मानतो. समंजस मनुष्य सरळ मार्गाने जातो. मसलत मिळाली नाही म्हणजे बेत निष्फळ होतात. मसलत देणारे पुष्कळ असले तर ते सिद्धीस जातात. मनुष्य आपल्या तोंडच्या समर्पक उत्तराने आनंद पावतो; समयोचित बोल किती उत्तम! सुज्ञ इसमाने खाली अधोलोकास जाऊ नये म्हणून त्याचा जीवनमार्ग वर जातो. परमेश्वर गर्विष्ठाचे घर जमीनदोस्त करतो, पण विधवेची मेर कायम राखतो. परमेश्वराला दुष्ट कल्पनांचा वीट आहे, पण ममतेची वचने त्याच्या दृष्टीने शुद्ध आहेत. धनलोभी आपल्या कुटुंबाला त्रास देतो, पण ज्याला लाचेचा तिटकारा असतो तो वाचतो. नीतिमान मनुष्य विचार करून उत्तर देतो. पण दुर्जनांचे मुख वाईट गोष्टी बाहेर टाकते. परमेश्वर दुर्जनांपासून दूर राहतो, पण तो नीतिमानांची प्रार्थना ऐकतो. नेत्रांचे तेज अंत:करणाला उल्लास देते; चांगले वर्तमान हाडे पुष्ट करते. जीवनाच्या शिक्षणाकडे जो कान देतो तो ज्ञान्यांमध्ये वस्ती करतो. जो शिक्षण अव्हेरतो तो आपल्या जिवाला तुच्छ लेखतो; जो वाग्दंड ऐकून घेतो तो ज्ञान मिळवतो. परमेश्वराचे भय हे सुज्ञतेचे शिक्षण होय; आधी नम्रता मग मान्यता.

सामायिक करा
नीतिसूत्रे 15 वाचा