नीतिसूत्रे 14:19-35
नीतिसूत्रे 14:19-35 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
दुर्जन सज्जनापुढे नमतात, आणि नीतिमानाच्या दारापुढे दुष्ट नमतील. गरीब मनुष्याचे स्वतःचे सोबतीसुद्धा द्वेष करतात, पण श्रीमंताला खूप मित्र असतात. जो कोणी आपल्या शेजाऱ्याचा तिरस्कार करतो तो पापी आहे, परंतु जो कोणी गरीबावर दया दाखवतो तो आनंदी आहे. जो दुष्ट योजना आखतो तो चुकीच्या मार्गाने जात नाही का? पण जो कोणी चांगले करण्याची योजना करतो, तो कराराचा विश्वास आणि विश्वसनियता स्वीकारतो. सर्व कष्टात फायदा आहे, पण जेव्हा तेथे फक्त बोलतच राहिलात, ते दारिद्र्याकडे घेऊन जाईल. शहाण्याची संपत्ती त्याचा मुकुट आहे, पण मूर्खांची मूर्खता केवळ मूर्खताच आणते. खरा साक्षी जीव वाचवतो, पण खोटा साक्षीदार लबाड्या करतो तो दगलबाज आहे. परमेश्वराच्या भयात दृढ विश्वास आहे, आणि त्याच्या मुलांसाठी ती आश्रयस्थान आहेत. परमेश्वराचे भय जीवनाचा झरा आहे, याकरिता त्यांनी मरणाच्या जाळ्यापासून दूर रहावे. प्रजावृद्धित राजाचे गौरव सापडते, पण प्रजेशिवाय राजपुत्राचा नाश आहे. सहनशील मनुष्य खूप समजदार असतो, पण शीघ्रकोपी मूर्खता उंचावतो. शांत अंतःकरण देहाचे जीवन आहे, पण मत्सराने हाडे कुजतात. जो मनुष्य गरीबांवर जुलूम करतो तो त्याच्या निर्माणकर्त्याला शाप देतो, परंतु जो गरजवंतावर दया करतो तो त्याचा सन्मान करतो. दुष्ट आपल्या वाईट कृतीने खाली आणला जातो, पण नीतिमानाला मरणाच्या वेळेसही आश्रय मिळतो. बुद्धिमानाच्या अंतःकरणात ज्ञान स्थिर असते, पण मूर्खाच्या अंतर्यामात जे असते ते कळून येते. योग्य ते केल्याने राष्ट्राची उन्नती होते, पण पाप लोकांस कलंक आहे. शहाणपणाने वागणाऱ्या सेवकावर राजाची मर्जी असते, पण जो लज्जास्पद कृत्य करतो त्याच्यासाठी त्याचा राग आहे.
नीतिसूत्रे 14:19-35 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
दुष्ट माणसे चांगल्या माणसांसमोर, आणि पापी माणसे नीतिमानांच्या द्वारासमोर शरणागती पत्करतील. गरिबांना त्यांचे शेजारीसुद्धा टाळतात, परंतु श्रीमंतांना मात्र खूप मित्र असतात. शेजार्यांचा द्वेष करणे पाप आहे; परंतु जे गरजवंतावर दया करतात ते धन्य! वाईट योजना करणारे मार्ग चुकत नाहीत काय? परंतु चांगल्या योजना करणार्यांना प्रीती आणि विश्वासूपणा मिळतो. सर्व कष्टाच्या कामाने नफा मिळतो, पण व्यर्थ बडबड भिकेला लावते. सुज्ञांची संपत्ती त्यांचा मुकुट असतो, परंतु मूर्खांची मूर्खता केवळ मूर्खताच उत्पन्न करते. सत्य सांगणारा साक्षीदार प्राण वाचवितो, परंतु खोटा साक्षीदार विश्वासघातकी आहे. याहवेहचा आदर मनुष्याचा दृढ गड आहे, आणि त्याच्या मुलाबाळांना सुरक्षित आश्रयस्थान लाभते. याहवेहचे भय म्हणजे जीवनाचा झरा आहे, ते मृत्यूच्या पाशांपासून त्याला वाचवते. वाढती लोकसंख्या राजाचे वैभव आहे; पण लोकच नसले तर अधिपती नष्ट होतो! जो सहनशील आहे, तो मोठा शहाणा आहे; पण उतावळ्या स्वभावाचा मनुष्य मूर्खता प्रकट करतो. शांत हृदय शरीर निरोगी ठेवते; परंतु ईर्षा हाडे कुजविते. गरिबांवर जुलूम करणारा आपल्या उत्पन्नकर्त्याचा अपमान करतो; पण ज्यांना गरजवंताची दया येते, ते परमेश्वराचा सन्मान करतात. नीतिमान माणसे मृत्युक्षणीही परमेश्वरात आश्रयस्थान शोधतात. पण जेव्हा संकट येते तेव्हा दुर्जन चिरडले जातात. सुज्ञता विवेकी माणसाच्या हृदयास विश्रांती आणते; पण मूर्खासही ती स्वतःची ओळख करून देते. नीतिमत्ता राष्ट्राची उन्नती करते. पण पाप कोणत्याही लोकास निंदनीय ठरविते. सुज्ञ सेवक राजाला प्रसन्न करतो, परंतु निर्लज्ज सेवक राजास क्रोधिष्ट करतो.
नीतिसूत्रे 14:19-35 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
दुर्जन सज्जनांपुढे नमतात, दुष्ट लोक नीतिमानाच्या दारापुढे नमतात. गरिबाचा द्वेष त्याचा शेजारीही करतो, पण श्रीमंताला चाहणारे बहुत असतात. जो आपल्या शेजार्याचा तिरस्कार करतो तो पापी होय, पण गरिबांवर दया करतो तो धन्य होय. दुष्टपणाची मसलत करणारे भ्रांत नव्हत काय? चांगल्याची मसलत करणार्यांना दया व सत्य ही प्राप्त होतात. सर्व श्रमात लाभ आहे, पण तोंडाच्या वटवटीने दारिद्र्य येते. सुज्ञांचे धन त्यांचा मुकुट आहे; मूर्खांची मूर्खता केवळ मूर्खताच राहते. खरा साक्षी लोकांचे प्राण सोडवतो; पण जो आपल्या मुखावाटे लबाडी उच्चारतो तो दगलबाजी करतो. परमेश्वराचे भय धरल्याने श्रद्धा दृढ होते; आणि ज्याच्या ठायी श्रद्धा असते त्याच्या मुलांना ती आश्रयस्थान होते. परमेश्वराचे भय जीवनाचा झरा होय, ते मृत्युपाश चुकवते. प्रजावृद्धीत राजाचे वैभव असते; प्रजा नसल्याने अधिपतीचा नाश होतो. ज्याला लवकर क्रोध येत नाही तो महाबुद्धिवान होय; उतावळ्या स्वभावाचा माणूस मूर्खता प्रकट करतो. शांत अंत:करण देहाचे जीवन आहे, पण मत्सराने हाडे कुजतात. जो गरिबाला छळतो तो आपल्या उत्पन्नकर्त्याचा अवमान करतो; पण जो गरजवंतावर दया करतो तो त्याचा सन्मान करतो. विपत्ती आली असता दुर्जन चीत होतो, पण नीतिमानास मरणसमयीही उमेद असते. बुद्धिमानाच्या अंत:करणात ज्ञान स्थिर असते, पण मूर्खाच्या अंतर्यामीची गोष्ट तेव्हाच कळते. नीतिमत्ता राष्ट्राची उन्नती करते; पापाने प्रजेची अप्रतिष्ठा होते. शहाण्या सेवकावर राजाचा प्रसाद होतो, पण निर्लज्जपणे वागणार्यांवर तो रुष्ट होतो.