नीतिसूत्रे 10:17-32
नीतिसूत्रे 10:17-32 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
बोधाकडे लक्ष पुरवणारा जीवनाच्या मार्गात असतो, परंतु शिक्षण सोडणारा भ्रांत होतो. गुप्तपणे द्वेष करणार्याची वाणी असत्य असते, आणि चहाडी करणारा मूर्ख असतो. फार वाचाळता असली म्हणजे पापाला तोटा नाही, पण जो आपली वाणी स्वाधीन ठेवतो तो शहाणा. नीतिमानाची जिव्हा उत्कृष्ट रुप्यासारखी आहे; दुर्जनांचे हृदय कवडीमोल आहे. नीतिमानाची वाणी बहुतांचे पोषण करते, परंतु मूर्ख अक्कल नसल्यामुळे मरतात. परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धी देतो, तिच्याबरोबर तो आणखी कष्ट देत नाही. मूर्खाला दुष्कर्म करण्यात मौज वाटते, तशी सुज्ञाला ज्ञानात वाटते. दुर्जन ज्याला भितो ते त्याच्यावर येईल, आणि नीतिमानाची इच्छा पूर्ण होते. वावटळीच्या सपाट्याने दुर्जन नाहीसा होतो, पण नीतिमान सर्वकाळ टिकणार्या पायासारखा आहे. जशी आंब दातांना, जसा धूर डोळ्यांना, तसा आळशी मनुष्य त्याला पाठवणार्यांना आहे. परमेश्वराचे भय आयुष्य वाढवते, पण दुर्जनांची वर्षे कमी होतात. नीतिमानाची आशा आनंदप्रद होईल, पण दुर्जनांची अपेक्षा नष्ट होईल. परमेश्वराचा मार्ग सात्त्विकाला दुर्गरूप आहे, पण दुष्कर्म करणार्यांना तो नाशकारक आहे, नीतिमान कधीही ढळणार नाही, पण दुर्जन देशात वसणार नाहीत. नीतिमानाच्या मुखावाटे ज्ञान निघते, पण उन्मत्त जिव्हा छाटली जाईल. नीतिमानाच्या वाणीला जे काही ग्राह्य आहे तेच कळते, पण दुर्जनांचे मुख उन्मत्तपणा वदते.
नीतिसूत्रे 10:17-32 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जो कोणी शिस्तीचे अनुसरण करतो तो जीवनाच्या मार्गात आहे, पण जो दोषारोपाला नकार देतो तो चुकीच्या मार्गाने जातो. जो कोणी द्वेष लपवून ठेवतो तो लबाड ओठांचा आहे, आणि जो कोणी निंदा पसरवतो तो मूर्ख आहे. जेव्हा पुष्कळ वाचाळता असते, तेथे पापाला कमतरता नाही, परंतु तो जे काही बोलतो ते काळजीपूर्वक आहे, तो सुज्ञ आहे. जो कोणी चांगले करतो त्याची जिव्हा शुध्द रुप्यासारखी आहे; पण तेथे दुष्टाच्या हृदयात कवडी किंमत आहे. नीतिमानाचे ओठ पुष्कळांचे पोषण करतात, पण मूर्ख मरतात कारण त्यांच्यात बुद्धीचा अभाव असतो. परमेश्वराचे आशीर्वाद चांगली संपत्ती आणते, आणि त्यामध्ये तो अधिक दुःख देत नाही. दुष्कर्म करणे मूर्खाला खेळ असे आहे, परंतु सुज्ञ मनुष्यास ज्ञानात आनंद आहे. दुष्ट ज्याला भितो ते त्याच्यावर येईल, पण नीतिमानाची इच्छा मान्य होईल. दुष्ट वावटळीसारखे आहेत ती येऊन जाते आणि तसा तो नाहीसा होतो, पण जो चांगले करतो तो सर्वकाळ टिकणाऱ्या पायासारखा आहे. जशी आंब दातांना आणि जसा धूर डोळ्यांना, तसा आळशी त्यास पाठवणाऱ्यांना आहे. परमेश्वराचे भय आयुष्याचे दिवस वाढवते, पण दुष्टाचे वर्ष कमी होतील. नीतिमानाची आशा त्यांचा आनंद होईल, पण दुष्टाची वर्षे कमी होतील. जो कोणी प्रामाणिक आहे परमेश्वर त्याचे रक्षण करील, दुष्कर्म करणाऱ्यांना तो नाशकारक आहे. नीतिमान कधीही उलथून टाकले जाणार नाहीत, परंतु दुष्ट देशात राहणार नाहीत. नीतिमानाच्या मुखातून ज्ञानाचे फळ निघते, पण कपटी जीभ कापली जाईल. नीतिमानाला जे काही स्वीकारणीय ते त्यांच्या ओठास कळते, पण दुष्टाच्या मुखास, जे कुटिल बोलणे आहे ते समजते.
नीतिसूत्रे 10:17-32 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जो शिस्तीचे पालन करतो तो जीवनाचा मार्ग दाखवितो परंतु जो सुधारणा नाकारतो, तो दुसर्यांची दिशाभूल करतो. जो लबाडीच्या ओठांनी आपला द्वेष गुप्त ठेवितो, आणि चहाडी करीत फिरतो, तो मूर्ख होय. शब्द बहुगुणित करून पापाचा अंत होत नसतो; पण सुज्ञ लोक त्यांच्या जिभेवर ताबा ठेवतात. नीतिमान मनुष्याची जिव्हा उत्तम चांदीप्रमाणे असते; परंतु दुष्टाच्या अंतःकरणास क्षुल्लक किंमत असते. नीतिमान मनुष्याचे ओठ अनेकांचे पोषण करतात; परंतु मूर्ख लोक विवेकाच्या अभावी नाश पावतात. याहवेहच्या आशीर्वादाने धनसंपत्ती मिळते, त्यासाठी दुःखद परिश्रम करावे लागत नाहीत. दुष्कर्म करण्यात मूर्खाला मौज वाटते, परंतु सुज्ञ मनुष्य सुज्ञानात आनंदित होतो. दुष्ट ज्याला भितो, तेच त्याच्यावर येईल; नीतिमान मनुष्याच्या इच्छा फलद्रूप होतील. वावटळ येते आणि निघून जाते, तसा दुष्ट नाहीसा होतो, परंतु नीतिमान सर्वकाळ स्थिर उभा राहतो. जशी आंब दातांस आणि धूर डोळ्यास, तसा आळशी मनुष्य त्याला पाठविणाऱ्यास आहे. याहवेहचे भय बाळगल्याने मनुष्याचे आयुष्य वाढते, परंतु दुष्टांच्या आयुष्याची वर्षे कमी केली जातील. नीतिमानाची अपेक्षा त्याला आनंद देते, परंतु दुष्टाची आशा फोल ठरते. याहवेहचा मार्ग निर्दोष मनुष्याचे आश्रयस्थान आहे, परंतु जे दुष्कर्म करतात त्यांच्यासाठी तो नाश आहे. नीतिमान लोक कधीही उपटून टाकले जाणार नाहीत, परंतु दुष्ट लोक भूमीवर राहणार नाहीत. धार्मिक मनुष्याच्या मुखाद्वारे सुज्ञानाचे फळ निघते; परंतु विकृत जिभेला शांत केले जाईल. नीतिमानांच्या ओठास कृपा कशी मिळवावी हे कळते, परंतु दुष्ट लोकांचे मुख फक्त विकृतीच जाणते.