YouVersion लोगो
सर्च आयकॉन

फिलिप्पैकरांस पत्र 3:3-9

फिलिप्पैकरांस पत्र 3:3-9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

कारण आपण जे देवाच्या आत्म्याने देवाची उपासना करतो, जे ख्रिस्त येशूविषयी अभिमान बाळगणारे आणि देहावर विश्वास न ठेवणारे ते आपण सुंता झालेलेच आहोत. तरी देहावरही भरंवसा ठेवण्यास मला जागा आहे. आपल्याला देहावर भरंवसा ठेवता येईल असे जर दुसऱ्या कोणाला वाटत असेल तर मला तसे अधिक वाटणार. मी तर आठव्या दिवशी सुंता झालेला, इस्राएल लोकातला, बन्यामीन वंशातला, इब्य्रांचा इब्री, नियमशास्त्रदृष्टीने परूशी; आस्थेविषयी म्हणाल तर मंडळीचा छळ करणारा आणि नियमशास्त्रातील नीतिमत्त्वाविषयी निर्दोष ठरलेला असा आहे. तरी मला ज्या गोष्टी लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा समजलो आहे. इतकेच नाही, तर ख्रिस्त येशू माझा प्रभू ह्याच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्वकाही हानी समजतो. त्याच्यासाठी मी सर्व गोष्टींची हानी सोसली आणि मी त्या केरकचरा लेखतो, ह्यासाठी की, मला ख्रिस्त येशू हा लाभ प्राप्त व्हावा. आणि मी त्याच्याठायी आढळावे आणि माझे नीतिमत्त्व माझे स्वतःचे नव्हे म्हणजे नियमशास्त्राच्या योगे मिळणारे नीतिमत्त्व नव्हे तर ते ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे, म्हणजे देवाकडून विश्वासाद्वारे मिळणारे नीतिमत्त्व असे असावे.

फिलिप्पैकरांस पत्र 3:3-9 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

कारण वास्तविक सुंता झालेले आपणच आहोत आणि जे आपणही आत्म्याद्वारे परमेश्वराची सेवा करतो व ख्रिस्त येशूंमध्ये अभिमान बाळगतो आणि देहावर भरवसा ठेवत नाही. तरीदेखील मला देहावर भरवसा ठेवण्यास कारणे आहेत. जर काहींना वाटते की त्यांना देहावर भरवसा ठेवण्यास कारणे आहेत, तर मला अधिक आहेत. मी आठव्या दिवशी सुंता झालेला, इस्राएली लोकातला, बन्यामीन वंशातला, इब्र्यांचा इब्री; नियमशास्त्रानुसार परूशी असा होतो; आणि आवेशाविषयी म्हणाल तर मंडळीचा छळ करणारा; नियमशास्त्रातील नीतिमत्वाविषयी दोषरहित होतो. परंतु जो काही मला लाभ होतो, तो सर्व मी ख्रिस्तासाठी हानी समजलो आहे. यापेक्षाही अधिक, ख्रिस्त येशू माझे प्रभू, यांच्या सर्वश्रेष्ठ ज्ञानासाठी मी सर्वकाही हानी असे समजतो व त्यासाठी मी सर्वगोष्टी गमावल्या आहेत व मी त्या कचर्‍यासमान लेखतो यासाठी की ख्रिस्त मला प्राप्त व्हावे. आणि मी त्यांच्यामध्ये सापडावे आणि नियमांद्वारे प्राप्त होणारी नीतिमत्व नव्हे, परंतु ख्रिस्तामधील विश्वासाने प्राप्त होणारी नीतिमत्व ती परमेश्वरावरील विश्वासाने प्राप्त होते.

फिलिप्पैकरांस पत्र 3:3-9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

कारण जे आपण देवाच्या आत्म्याने सेवा करणारे, ख्रिस्त येशूविषयी अभिमान बाळगणारे व देहावर भरवसा न ठेवणारे, ते आपण सुंता झालेलेच आहोत. तरी देहावरही भरवसा ठेवण्यास मला जागा आहे. जर दुसर्‍या कोणाला देहावर भरवसा ठेवावा असे वाटते तर मला अधिक वाटणार. मी तर आठव्या दिवशी सुंता झालेला, इस्राएल लोकांतला, बन्यामीन वंशातला, इब्र्यांचा इब्री; नियमशास्त्रदृष्टीने परूशी; आस्थेविषयी म्हणाल तर मंडळीचा छळ करणारा; नियमशास्त्रातील नीतिमत्त्वाविषयी निर्दोष ठरलेला असा आहे. तरी ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा समजलो आहे; इतकेच नाही, तर ख्रिस्त येशू माझा प्रभू, ह्याच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्वकाही हानी असे समजतो; त्याच्यामुळे मी सर्व गोष्टींना मुकलो, आणि त्या केरकचरा अशा लेखतो; ह्यासाठी की, मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा, आणि मी त्याच्या ठायी आढळावे आणि माझे नीतिमत्त्व — माझे स्वतःचे नव्हे म्हणजे नियमशास्त्राच्या योगे प्राप्त होणारे नीतिमत्त्व नव्हे — तर ते ख्रिस्तावरील विश्वासाने प्राप्त होणारे नीतिमत्त्व असे असावे.

फिलिप्पैकरांस पत्र 3:3-9 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

आपण खऱ्या अर्थाने सुंता झालेले, आत्म्याच्या प्रेरणेने देवाची आराधना करणारे, ख्रिस्त येशूमध्ये आनंद मानणारे व बाह्य गोष्टींवर भरवसा न ठेवणारे आहोत. अर्थात, बाह्य गोष्टींवर भरवसा ठेवण्यास मला जागा आहे. जर दुसऱ्या कोणाला देहावर भरवसा ठेवावा, असे वाटते तर मला अधिक वाटणार. मी तर आठव्या दिवशी सुंता झालेला, इस्राएली लोकांतल्या बन्यामीन वंशातला, शुद्ध हिब्रू रक्ताचा व नियमशास्त्रानुसार परुशी आहे. आवेशाविषयी म्हणाल तर ख्रिस्तमंडळीचा छळ करणारा व नियमशास्त्रातील नीतिमत्त्वाविषयी निर्दोष ठरलेला असा आहे. परंतु ज्या गोष्टी मला लाभदायक होत्या, त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा मानतो. इतकेच नाही, तर ख्रिस्त येशू माझा प्रभू, ह्याच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वापुढे मी सर्व काही निरर्थक समजतो, त्यामुळे मी ज्या गोष्टींना मुकलो त्यांना हानी लेखतो. ह्यासाठी की, मला ख्रिस्त हा लाभ व्हावा, मी त्याच्यामध्ये आढळावे आणि माझे नीतिमत्त्व माझे स्वतःचे नव्हे म्हणजे नियमशास्त्राच्या योगे प्राप्त होणारे नीतिमत्त्व नव्हे तर ते ख्रिस्तावरील विश्वासाने प्राप्त होणारे म्हणजे विश्वासावर आधारित व देवाकडून मिळणारे असे नीतिमत्त्व असावे.