फिलिप्पैकरांस पत्र 3:10-16
फिलिप्पैकरांस पत्र 3:10-16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
हे अशासाठी आहे की, तो व त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्याचे व त्याच्या दुःखांची सहभागिता ह्यांची, त्याच्या मरणाशी एकरूप होऊन, मी ओळख करून घ्यावी. म्हणजे कसेही करून मी मृतांमधून पुनरुत्थान मिळवावे. मी आताच जणू मिळवले आहे किंवा मी आताच पूर्ण झालो आहे असे नाही. पण मी ज्यासाठी ख्रिस्त येशूने मला आपल्या ताब्यात घेतले ते मी आपल्या ताब्यात घ्यावे म्हणून मी त्याच्यामागे लागलो आहे. बंधूंनो, मी ते आपल्या ताब्यात घेतले असे मानीत नाही पण मी हीच एक गोष्ट करतो की, मागील गोष्टी विसरून जाऊन आणि पुढील गोष्टींवर लक्ष लावून, ख्रिस्त येशूच्या ठायी देवाचे जे वरील पाचारण त्या संबंधीचे बक्षिस मिळविण्यासाठी पुढच्या मर्यादेवरील खुणेकडे मी धावतो. हेच एक माझे काम. तर जेवढे आपण प्रौढ आहोत, तेवढ्यांनी हीच चित्तवृत्ती ठेवावी आणि तुम्ही एखाद्या गोष्टीविषयी निराळी चित्तवृत्ती ठेवली, तरी देव तेही तुम्हास प्रकट करील. तथापि आपण ज्या विचाराने येथवर मजल मारली तिच्याप्रमाणे पुढे चालावे.
फिलिप्पैकरांस पत्र 3:10-16 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मी ख्रिस्ताला आणि त्यांच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य, व त्यांच्या दुःखसहनाची सहभागिता जाणून त्यांच्या मृत्यूशी अनुरूप व्हावे. आणि कसेही करून मी मृतांमधून पुनरुत्थान प्राप्त करून घ्यावे. मी सर्वकाही मिळविले किंवा माझ्या ध्येयाप्रत पोहोचलो आहे असे नाही, परंतु ते आपलेसे करण्यासाठी व घट्ट धरून ठेवण्यासाठी मी नेटाने पुढे जात आहे. कारण मला ख्रिस्त येशूंनी पकडून ठेवले आहे. बंधू व भगिनींनो, मी अजूनही ते प्राप्त केलेले नाही, परंतु मी एक गोष्ट करतो: मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करून पुढील गोष्टींकडे नेटाने लक्ष लावतो. ख्रिस्त येशूंमध्ये परमेश्वराच्या स्वर्गीय पाचारणासंबंधीचे पारितोषिक जिंकण्यासाठी मी त्या लक्ष्याकडे धावत आहे. आपण जे सर्व परिपक्व आहोत त्यांनीही हाच भाव ठेवावा. जर एखाद्या गोष्टीसंबंधाने तुमचे विचार वेगळे असतील तर परमेश्वर ती गोष्ट तुम्हाला स्पष्ट करतील. जसे येथवर आपण पोहोचलो आहोत त्याप्रमाणे चालत राहावे.
फिलिप्पैकरांस पत्र 3:10-16 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
हे अशासाठी आहे की, तो व त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य व त्याच्या दुःखाची सहभागिता ह्यांची, त्याच्या मरणाला अनुरूप होऊन मी ओळख करून घ्यावी; म्हणजे कसेही करून मी मृतांमधून पुनरुत्थान मिळवावे. एवढ्यातच मी मिळवले, किंवा एवढ्यातच मी पूर्ण झालो आहे असे नाही, तर ज्यासाठी ख्रिस्त येशूने मला आपल्या कह्यात घेतले ते मी आपल्या कह्यात घ्यावे म्हणून मी त्याच्यामागे लागतो आहे. बंधूंनो, मी अद्यापि ते आपल्या कह्यात घेतले असे मानत नाही; तर मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करून व पुढील गोष्टींकडे लक्ष लावून, ख्रिस्त येशूच्या ठायी देवाचे जे वरील पाचारण त्यासंबंधीचे बक्षीस मिळवण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे मी धावतो; हेच एक माझे काम. तर जेवढे आपण पोक्त आहोत, तेवढ्यांनी हीच चित्तवृत्ती ठेवावी आणि तुम्ही एखाद्या गोष्टीविषयी निराळी चित्तवृत्ती ठेवली, तरी देव तीही तुम्हांला प्रकट करील. तथापि, आपण जी मजल मारली तिच्याप्रमाणे एकचित्ताने पुढे चालावे.
फिलिप्पैकरांस पत्र 3:10-16 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
माझी एकमेव इच्छा हीच आहे की, मला ख्रिस्ताची ओळख पटावी; त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य मला अनुभवावयास मिळावे, त्याच्या दुःखात मी सहभागी व्हावे व त्याच्या मृत्यूत मी त्याच्याशी एकरूप व्हावे. म्हणजे शक्य झाल्यास मृतांमधून मला पुनरुत्थान मिळावे. एवढ्यातच मी मिळवले आहे किंवा एवढ्यातच मी पूर्ण झालो आहे, असा दावा मी करीत नाही, तर ज्यासाठी ख्रिस्त येशूने मला त्याचे म्हणून स्वीकारले, ते मी माझे करून घ्यावे म्हणून मी झटत आहे. बंधूंनो, मी अद्यापि ते माझे करून घेतले, असे मानत नाही, तर मागील गोष्टीं विसरून व पुढील गोष्टींकडे लक्ष लावून, स्वर्गीय जीवनासाठी ख्रिस्ताद्वारे मिळणारे देवाचे उच्च पाचारण हे पारितोषिक प्राप्त करून घेण्यासाठी मी लक्ष्याकडे धावतो. जेवढे आपण प्रौढ आहोत, तेवढ्यांनी हीच चित्तवृत्ती ठेवावी परंतु तुमची एखाद्या गोष्टीविषयी निराळी चित्तवृत्ती असली, तर देव तेही तुम्हांला दाखवील. तथापि, आपण आत्तापर्यंत जी मजल मारली, त्याप्रमाणे पुढे जात राहू या.