फिलिप्पैकरांस पत्र 2:1-10
फिलिप्पैकरांस पत्र 2:1-10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ह्यावरून ख्रिस्ताच्या ठायी काही आश्वासन, प्रीतीचे काही सांत्वन, आत्म्याची काही सहभागिता, काही कळवळा व करूणा ही जर आहेत, तर तुम्ही समचित्त व्हा, एकमेकांवर सारखीच प्रीती करा आणि एकजीव होऊन एकमनाचे व्हा. अशाप्रकारे माझा आनंद पूर्ण करा. आणि तुम्ही विरोधाने किंवा पोकळ अभिमानाने काही करू नका, पण मनाच्या लीनतेने आपल्यापेक्षा एकमेकांना मोठे मानावे. तुम्ही कोणीही आपलेच हित पाहू नका, तर दुसर्यांचेहि पाहा. अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्याठायीही असो. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही, त्याने आपण देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, तर स्वतःला रिकामे केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले, आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने स्वतःला लीन केले आणि त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले; येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. ह्यामुळे देवाने त्यास सर्वांहून उंच केले आहे आणि सर्व नावांहून श्रेष्ठ नाव ते त्यास दिले आहे. ह्यात हेतू हा की, स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा
फिलिप्पैकरांस पत्र 2:1-10 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
यास्तव ख्रिस्ताच्या ठायी ऐक्यता असल्यामुळे काही उत्तेजन, त्यांच्या प्रीतीचे काही सांत्वन, आत्म्याची काही सहभागिता, जर काही करुणा व कळवळा आहे, तर तुम्ही एकमेकांशी सहमत होणारे, सारखीच प्रीती करणारे आणि एका आत्म्याचे व एकमनाचे होऊन माझा आनंद परिपूर्ण करा. स्वार्थी महत्त्वाकांक्षा, किंवा बढाई मारण्याच्या हेतूंनी तुम्ही काहीही करू नये, तर प्रत्येकाने नम्रतेने इतरांना आपल्यापेक्षा अधिक श्रेष्ठ मानावे. तुम्ही केवळ स्वतःचेच हित नव्हे, तर इतरांचेही हित पाहावे. ख्रिस्त येशूंमध्ये जी मनोवृत्ती होती, तीच वृत्ती तुम्ही एकमेकांच्या संबंधात बाळगा: ते खुद्द परमेश्वराच्या स्वरुपाचे असूनही त्यांनी स्वतःस परमेश्वरासमान केले नाही व परमेश्वरासम असण्याचा लाभ त्यांनी घेतला नाही; उलट, त्यांनी स्वतःला रिक्त केले आणि दासाचे स्वरूप घेऊन, मनुष्यांच्या प्रतिरूपाचे झाले. मानवी रूप धारण करून त्यांनी स्वतःस लीन केले, येथपर्यंत की आज्ञापालन करून ते मरावयास, आणि तेही क्रूसावरील मरण पत्करण्यास तयार झाले. म्हणून परमेश्वराने त्यांना अत्युच्च स्थानी ठेवले आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्यांना दिले; यासाठी की येशूंच्या नावाने प्रत्येक गुडघा टेकला जावा, स्वर्गात, पृथ्वीवर आणि पृथ्वीच्या खाली
फिलिप्पैकरांस पत्र 2:1-10 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ह्यावरून ख्रिस्ताच्या ठायी काही आश्वासन, प्रीतीचे काही सांत्वन, आत्म्याची काही सहभागिता, काही कळवळा व करुणा ही जर आहेत, तर तुम्ही समचित्त व्हा, म्हणजे एकमेकांवर सारखीच प्रीती करा आणि एकजीव होऊन एकचित्त व्हा; अशा प्रकारे माझा आनंद पूर्ण करा. तट पाडण्याच्या अथवा पोकळ डौल मिरवण्याच्या बुद्धीने काहीही करू नका, तर लीनतेने एकमेकांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ माना. तुम्ही कोणीही आपलेच हित पाहू नका, तर दुसर्यांचेही पाहा. अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्या ठायीही असो; तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले. आणि मनुष्यप्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने मरण, आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले; येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. ह्यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले, आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले; ह्यात हेतू हा की, स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा
फिलिप्पैकरांस पत्र 2:1-10 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
ह्यावरून ख्रिस्तामध्ये काही प्रोत्साहन, प्रीतीचे काही सांत्वन, पवित्र आत्म्याची काही सहभागिता, काही करुणा व सहानुभूती, ही जर आहेत. तर तुम्ही समचित्त व्हा, म्हणजे एकमेकांवर सारखीच प्रीती करा आणि एकात्मतेने व एकमनाने रहा. अशा प्रकारे माझा आनंद पूर्ण करा. स्वार्थी महत्त्वाकांक्षेने अथवा पोकळ डौल मिरवण्याच्या बुद्धीने काहीही करू नका, परत स्वतःपेक्षा दुसऱ्यांना लीनतेने श्रेष्ठ माना. तुम्ही कोणीही फक्त आपलेच हित पाहू नका, तर दुसऱ्यांचेही पाहा. जी मनोवृत्ती ख्रिस्त येशूच्यामध्ये होती, ती तुमच्यामध्येही असो: तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे, असे त्याने मानले नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले. आणि मनष्यरूपात प्रकट होऊन त्याने स्वतःला नम्र केले आणि तो मरणापर्यंत आज्ञाधारक झाला, अगदी क्रुसावरील मरणापर्यंत. ह्यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले आणि सर्व नावांपेक्षा श्रेष्ठ नाव त्याला दिले. ह्यात हेतू हा की, स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने वाकला जावा