YouVersion लोगो
सर्च आयकॉन

फिलिप्पैकरांस पत्र 1:12-29

फिलिप्पैकरांस पत्र 1:12-29 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

माझ्या बंधूंनो, माझ्याविषयी ज्या गोष्टी घडल्या त्यांच्यापासून शुभवर्तमानाला अडथळा न होता त्या तिच्या प्रगतीला साधनीभूत झाल्या हे तुम्ही समजावे अशी माझी इच्छा आहे. म्हणजे कैसराच्या हुजुरातीच्या राजवाड्याचे रक्षक व इतर सर्व जणांत, त्यामुळे माझे बंधने ख्रिस्तासंबंधाने आहेत हे सर्वांना प्रसिद्ध झाले; आणि माझ्या बंधनामुळे प्रभूमधील पुष्कळ बंधूंची खातरी होऊन, ते निर्भयपणे वचन सांगण्यात अधिक धीट झाले आहेत. कित्येक मत्सराने व वैरभावानेही ख्रिस्ताची घोषणा करीत आहेत; आणि काही खरोखर सदिच्छेने करीत आहेत. मी शुभवर्तमानासंबंधी प्रत्युत्तर देण्यास नेमलेला आहे हे ओळखून ते ती प्रीतीने करतात. पण इतर आहेत ते माझी बंधने अधिक संकटाची व्हावी अशा इच्छेने तट पाडण्याकरिता दुजाभावाने ख्रिस्ताची घोषणा करतात. ह्यापासून काय झाले? निमित्ताने असो किंवा खरेपणाने, सर्व प्रकारे ख्रिस्ताची घोषणा होते हेच, ह्यात मी आनंद करतो व करणारच. कारण मी जाणतो की हे, तुमच्या प्रार्थनेने व येशू ख्रिस्ताच्या आत्म्याच्या पुरवठ्याने माझ्या उद्धारास कारण होईल. कारण माझी उत्कट अपेक्षा व आशा आहे की, मी कशानेही लाजणार नाही तर पूर्ण धैर्याने, नेहमीप्रमाणे आतादेखील जगण्याने किंवा मरण्याने माझ्या शरीराद्वारे ख्रिस्ताचा महिमा होईल. कारण मला तर जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हे लाभ आहे. पण जर मी देहात जगणे हे माझ्या कामाचे फळ आहे; तर, कोणते निवडावे हे मला समजत नाही. कारण मी दोघासंबंधाने पेचात आहे; येथून सुटून जाऊन ख्रिस्ताजवळ असण्याची मला उत्कंठा आहे कारण देहात राहण्यापेक्षा हे अधिक चांगले आहे; तरीही, मला देहात राहणे हे तुमच्यासाठी अधिक आवश्यक आहे. मला अशी खातरी वाटत असल्यामुळे मी राहणार आहे आणि विश्वासात तुमची प्रगती व आनंद व्हावा म्हणून मी तुम्हा सर्वांजवळ राहणार हे मला ठाऊक आहे. हे अशासाठी की तुम्हाकडे माझे पुन्हा येणे झाल्याने माझ्यामुळे ख्रिस्त येशूच्या ठायी अभिमान बाळगण्याचे तुम्हास अधिक कारण व्हावे. सांगावयाचे ते इतकेच की ख्रिस्ताच्या शुभवर्तमानास शोभेल असे आचरण ठेवा; म्हणजे मी येऊन तुम्हास भेटलो किंवा मी दूर असलो, तरी मला तुमच्याबाबतीत हे ऐकता यावे की, तुम्ही एकजिवाने राहून शुभवर्तमानाच्या विश्वासासाठी, एकजुटीने लढत स्थिर राहता. आणि विरोध करणार्‍या लोकांकडून कशाविषयीही भयभीत झाला नाही, हे त्यांना त्यांच्या नाशाचे पण तुमच्या तारणाचे प्रमाण आहे व हे देवापासून आहे. कारण त्याच्यावर विश्वास ठेवावा इतकेच केवळ नव्हे, तर ख्रिस्ताच्या वतीने त्याच्याकरता तुम्हास दुःख ही सोसावे अशी कृपा तुमच्यावर झाली आहे.

फिलिप्पैकरांस पत्र 1:12-29 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

आता प्रिय बंधू भगिनींनो, जे माझ्याबाबतीत घडले त्यामुळे प्रत्यक्ष शुभवार्तेच्या कार्यात वाढ झाली आहे हे तुम्हाला समजावे अशी माझी इच्छा आहे. याचा परिणाम असा झाला की, राजवाड्यामध्ये असलेले पहारेकरी आणि प्रत्येकास हे स्पष्टपणे माहीत झाले आहे की मी ख्रिस्तासाठी बंधनात आहे. आणि माझ्या या बंधनामुळे, येथील बहुतेक बंधू व भगिनींना प्रभुमध्ये धैर्य प्राप्त झाले आहे आणि ते पहिल्यापेक्षा धैर्याने शुभवार्ता अधिक निर्भयपणे जाहीर करत आहेत. हे सत्य आहे की, काहीजण हेव्याने आणि वैरभावाने ख्रिस्ताचा प्रचार करतात, परंतु अन्य काही चांगल्या उद्देशाने करतात. दुसरे जे आहेत ते प्रीतिमुळे करतात, कारण शुभवार्तेचे समर्थन करण्यासाठी मी येथे आहे, हे त्यांना ठाऊक आहे. पण पूर्वीचे जे आहेत ते काहीजण ख्रिस्ताचा प्रचार स्वार्थी महत्वाकांक्षेने व अप्रामाणिकपणे करतात, यामुळे येथे मी बंधनात असताना ते माझ्या दुःखात भर घालतात. परंतु यापासून काय होते? त्यांचे हेतू खरे असो किंवा खोटे असो, एक महत्वाची गोष्ट म्हणजे सर्वप्रकारे ख्रिस्ताचा प्रचार होत आहे आणि त्यातच मी आनंद करणार. होय, त्यातच मी आनंद करीत राहीन. कारण जे काही मला झाले त्यातून, तुमच्या प्रार्थनेद्वारे आणि येशू ख्रिस्ताच्या पवित्र आत्म्याच्या पुरवठ्याने माझी सुटका होईल हे मला माहीत आहे. याची मला खात्री व अपेक्षा आहे की मी यामुळे लज्जित होऊ नये, तर मला पुरेसे धैर्य प्राप्त व्हावे यासाठी की जगण्याने किंवा मरणाने, आता आणि सर्वदा, ख्रिस्त माझ्या शरीरात उंच केला जावा. कारण मला, जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हे लाभ आहे! जर मला हे दैहिक जीवन जगायचे आहे, तर ते माझ्यासाठी श्रमाचे फळ ठरेल. मी काय निवडू? हे मला कळत नाही! मी दोन्ही गोष्टीसंबंधाने पेचात आहे: कारण येथून जाऊन ख्रिस्तासोबत असावे, अशी मला तीव्र इच्छा आहे. तेथे असणे अधिक उत्तम आहे! परंतु मी शरीरात असणे हे तुमच्यासाठी अधिक आवश्यक आहे. मला माहीत आहे की, तुमची प्रगती आणि विश्वासातील तुमच्या आनंदासाठी मी येथे तुम्हाजवळ राहीन. मी तुम्हाला भेटण्यासाठी पुन्हा परत आलो म्हणजे ख्रिस्त येशूंमधील तुमचा माझ्यासंबंधीचा अभिमान भरून वाहू लागेल. पण काहीही झाले, तरी ख्रिस्ताच्या शुभवार्तेला साजेल असे तुमचे आचरण ठेवा, म्हणजे मी तुम्हाला पुन्हा येऊन भेटलो अथवा माझ्या अनुपस्थितीत मला तुमच्याबद्दल असे ऐकावयास यावे की तुम्ही एका आत्म्यामध्ये एका मनाने स्थिर आहात व विश्वासाच्या शुभवार्तेमध्ये एकत्र झटत आहात, पण तुमचे जे विरोधी आहेत त्यांना न घाबरता तुम्ही उभे आहात. कारण त्यांचा नाश हे त्यांना चिन्ह आहे, परंतु तुमचा उद्धार होईल व तोही परमेश्वराद्वारे होईल. केवळ ख्रिस्तावर विश्वास ठेवावा, एवढेच नव्हे, तर त्यांच्यासाठी दुःखही सहन करावे हे दान तुम्हाला देण्यात आले आहे.

फिलिप्पैकरांस पत्र 1:12-29 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

बंधूंनो, मला ज्या गोष्टी घडल्या त्यांच्यापासून सुवार्तेला अडथळा न होता त्या तिच्या वृद्धीला साधनीभूत झाल्या हे तुम्ही समजावे अशी माझी इच्छा आहे; म्हणजे कैसराच्या हुजरातीच्या सर्व सैनिकांत व इतर सर्व जणांत, माझी बंधने ख्रिस्तासंबंधाने आहेत अशी त्यांची प्रसिद्धी झाली; आणि त्यांची खातरी पटून प्रभूमधील बहुतेक बंधू माझ्या बंधनांमुळे उत्तेजित होऊन देवाचे वचन निर्भयपणे सांगण्यास अधिक धीट झाले आहेत. कित्येक हेव्याने व वैरभावाने ख्रिस्ताची घोषणा करतात; आणि कित्येक सद्भावाने करतात. मी सुवार्तेसंबंधी प्रत्युत्तर देण्यास नेमलेला आहे हे ओळखून ते ती प्रीतीने करतात; पण इतर आहेत ते माझी बंधने अधिक संकटाची व्हावीत अशा इच्छेने तट पाडण्याकरता दुजाभावाने ख्रिस्ताची घोषणा करतात. ह्यापासून काय होते? निमित्ताने असो किंवा खरेपणाने असो, सर्व प्रकारे ख्रिस्ताची घोषणा होते; आणि ह्यात मी आनंद करतो व करणारच. कारण मी कशानेही लाजणार नाही, तर पूर्ण धैर्याने नेहमीप्रमाणे आताही, जगण्याने किंवा मरण्याने, माझ्या शरीराच्या द्वारे ख्रिस्ताचा महिमा होईल ही जी माझी अपेक्षा व आशा तिच्याप्रमाणे, ते तुमच्या प्रार्थनेने व येशू ख्रिस्ताच्या आत्म्याच्या पुरवठ्याने माझ्या उद्धारास कारण होईल, हे मला ठाऊक आहे. कारण मला तर जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हा लाभ आहे. पण जर देहात जगणे हे माझ्या कामाचे फळ आहे तर कोणते निवडावे हे मला समजत नाही. मी ह्या दोहोसंबंधाने पेचात आहे; येथून सुटून जाऊन ख्रिस्ताजवळ असण्याची मला उत्कंठा आहे; कारण देहात राहण्यापेक्षा हे फारच चांगले आहे. तरी मी देहात राहणे हे तुमच्याकरता अधिक गरजेचे आहे. मला अशी खातरी वाटत असल्यामुळे मी राहणार; आणि विश्वासात तुम्हांला वृद्धी व आनंद व्हावा म्हणून मी तुम्हा सर्वांजवळ राहणार हे मला ठाऊक आहे; हे अशासाठी की, तुमच्याकडे माझे पुन्हा येणे झाल्याने, माझ्यामुळे ख्रिस्त येशूच्या ठायी अभिमान बाळगण्याचे तुम्हांला अधिक कारण व्हावे. सांगायचे ते इतकेच की, ख्रिस्ताच्या सुवार्तेस शोभेल असे आचरण ठेवा. मी येऊन तुम्हांला भेटलो किंवा तुमच्याकडे आलो नाही तरी तुमच्यासंबंधाने माझ्या ऐकण्यात असे यावे की, तुम्ही एकजिवाने सुवार्तेच्या विश्वासासाठी एकत्र लढत एकचित्ताने स्थिर राहता; आणि विरोध करणार्‍या लोकांकडून कशाविषयीही भयभीत झाला नाहीत; हे त्यांना त्यांच्या नाशाचे पण तुमच्या तारणाचे प्रमाण आहे, आणि ते देवापासून आहे. कारण त्याच्यावर विश्वास ठेवावा इतकेच केवळ नव्हे, तर ख्रिस्ताच्या वतीने त्याच्याकरता दुःखही सोसावे अशी कृपा तुमच्यावर झाली आहे.

फिलिप्पैकरांस पत्र 1:12-29 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

बंधूंनो, माझ्या बाबतीत ज्या गोष्टी घडल्या त्या शुभवर्तमानाच्या वृद्धीला कारणीभूत झाल्या, हे तुम्ही समजावे, अशी माझी इच्छा आहे. म्हणजे कैसराच्या राजवाड्यातील सर्व सैनिकांना व इतर सर्व लोकांना माझा तुरुंगवास ख्रिस्तासंबंधाने आहे, हे समजले आहे. माझ्या तुरुंगवासामुळे पुष्कळ बंधुजनांचा प्रभूवरील भरवसा वाढला असून देवाचे वचन निर्भयपणे सांगावयास त्यांना धैर्य मिळत आहे. कित्येक हेव्याने व वैरभावाने ख्रिस्ताची घोषणा करतात आणि कित्येक सद्भावनेने करतात. मी शुभवर्तमानासंबंधी प्रत्युतर देण्यास नेमलेला आहे, हे ओळखून काही जण प्रेमाने घोषणा करतात. मात्र इतर काही जण ख्रिस्ताची घोषणा प्रामाणिकपणे करीत नाहीत. तुरुंगवासात माझ्या यातना वाढाव्यातम्हणून ते स्वार्थी महत्त्वाकांक्षेने प्रेरित होऊन करीत आहेत. मला काही फरक पडत नाही. अयोग्य हेतूने असो किंवा योग्य हेतूने असो, सर्व प्रकारे ख्रिस्ताची घोषणा होते, ह्यात मी आनंद मानतो व मानत राहीन; कारण तुमच्या प्रार्थनेने व येशू ख्रिस्ताच्या आत्म्याच्या साहाय्याने मला तुरुंगातून मुक्त होता येईल, हे मला ठाऊक आहे. माझी प्रबळ अपेक्षा व आशा ही आहे की, मी माझ्या जबाबदारीत उणा न पडता सर्व समयी आणि विशेषतः आता परिपूर्ण धैर्याने सर्वस्व पणास लावून जगण्याने अथवा मरण्याने ख्रिस्ताचा महिमा वाढवीत राहावे. मला तर जगणे ख्रिस्त आणि मरणे लाभ आहे. पण देहात जगण्यामुळे मला अधिक चांगले काम करता येणार असले, तर कोणते निवडावे हे मला समजत नाही. मी ह्या दोहोसंबंधाने पेचात आहे. येथून सुटून जाऊन ख्रिस्ताजवळ असण्याची मला उत्कंठा आहे कारण देहात राहण्यापेक्षा हे फार चांगले आहे. मात्र मी देहात राहणे हे तुमच्याकरता अधिक गरजेचे आहे. मला अशी खातरी वाटत असल्यामुळे मी राहणार आणि श्रद्धेमधील तुमची प्रगती व आनंद वाढत जावा म्हणून मी तुम्हां सर्वांजवळ राहणार, हे मला ठाऊक आहे. जेव्हा मी तुमच्याकडे पुन्हा येईन, तेव्हा ख्रिस्त येशूविषयीच्या तुमच्या अभिमानात अधिक परिपूर्णपणे सहभागी होईन. सांगायचे ते इतकेच की, ख्रिस्ताच्या शुभवर्तमानास शोभेल असे आचरण ठेवा. मी येऊन तुम्हांला भेटलो किंवा तुमच्याकडे आलो नाही, तरी तुमच्यासंबंधाने माझ्या ऐकण्यात असे यावे की, तुम्ही एकात्मतेने शुभवर्तमानावरील विश्वासासाठी एकत्र लढत एकचित्ताने स्थिर आहात. विरोधकांना घाबरू नका; नेहमी धैर्य बाळगा. हे त्यांना त्यांच्या नाशाचे पण तुमच्या तारणाचे प्रमाण आहे आणि ते परमेश्वराने केले आहे. कारण त्याच्यावर विश्वास ठेवावा इतकेच केवळ नव्हे, तर ख्रिस्ताच्या वतीने दुःखही सोसावे अशी संधी तुम्हांला कृपा म्हणून देण्यात आली आहे.