YouVersion लोगो
सर्च आयकॉन

गणना 27:12-23

गणना 27:12-23 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

परमेश्वर मोशेला म्हणाला, यार्देन नदीच्या पूर्वेकडील रानातील अबारीम डोंगरावर तू चढून जा. मी इस्राएल लोकांस जो देश देणार आहे तो तेथून पाहा. तो पाहिल्यानंतर तुझा भाऊ अहरोन जसा आपल्या पूर्वजांस जाऊन मिळाला तसा तू आपल्या पूर्वजांस जाऊन मिळशील. त्सीनच्या रानात मंडळीचे भांडण झाले त्यावेळी त्या झऱ्याजवळ त्यांच्यासमोर माझे पावित्र्य प्रगट करावे म्हणून जी आज्ञा होती तिच्याविरूद्ध तुम्ही दोघांनी बंड केले. हे त्सीनच्या रानात कादेश येथील मरीबा झऱ्याच्याजवळ घडले. मोशे परमेश्वराशी बोलला व म्हणाला, परमेश्वर सर्व मानवजातीच्या आत्म्यांचा देव याने एका मनुष्यास मंडळीवर नेमून ठेवावे. तो त्यांच्यापुढे बाहेर जाईल व त्यांच्यापुढे आत येईल. तो त्यांना बाहेर नेईल व आत आणील म्हणजे परमेश्वराची मंडळी मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखी होणार नाही. तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, नूनाचा मुलगा यहोशवा ह्याला घेऊन त्याच्यावर आपला हात ठेव, त्याच्याठायी माझा आत्मा राहतो. त्यास याजक एलाजार आणि सर्व मंडळीसमोर उभे करून आणि त्यास त्यांच्या समक्ष आज्ञा कर. तू आपला काही अधिकार त्यास दे. याकरिता की, इस्राएलाच्या सर्व मंडळीने त्याची आज्ञा मानावी. तो एलाजार याजकापुढे उभा राहील, तो त्याच्यावतीने उरीमाच्या निर्णयासाठी परमेश्वरास विचारील. त्याने व त्याच्याबरोबर इस्राएलाच्या सर्व लोकांनी त्याच्या सांगण्यावरून बाहेर जावे व आत यावे. मोशेने परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे केले. त्याने यहोशवाला एलाजार याजकाच्या आणि लोकांच्या पुढे उभे केले. परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे मोशेने त्याच्यावर हात ठेवले आणि त्याने त्यास नेतृत्व करण्याची आज्ञा दिली.

सामायिक करा
गणना 27 वाचा

गणना 27:12-23 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

नंतर याहवेह मोशेला म्हणाले, “या अबारीम डोंगरावर जा आणि जो देश मी इस्राएली लोकांना दिला आहे तो पाहा. तो पाहिल्यानंतर, जसा तुझा भाऊ अहरोन आपल्या लोकांत जाऊन मिळाला, त्याप्रमाणे तू सुद्धा आपल्या लोकांना जाऊन मिळशील. कारण सीन रानात पाण्याजवळ जेव्हा इस्राएली लोकांनी बंड केले, त्यावेळी त्यांच्या नजरेपुढे मला पवित्र म्हणून मानण्यास नाकारून तुम्ही दोघांनी माझ्या आज्ञेचा भंग केला.” (हेच सीन रानातील, कादेश येथील मरीबाहचे पाणी.) मोशे याहवेहला म्हणाला, “याहवेह परमेश्वर, जे सर्व जीवधार्‍यांना श्वास देतात, त्यांनी या समाजावर कोणा एकाची नेमणूक करावी की त्याने त्यांच्यापुढे बाहेर जावे व आत यावे, जो त्यांना बाहेर नेईल व आत आणेल, जेणेकरून याहवेहचे लोक मेंढपाळ नसलेल्या मेंढरांप्रमाणे होणार नाहीत.” तेव्हा याहवेह मोशेला म्हणाले, “नूनाचा पुत्र यहोशुआ, ज्या पुरुषामध्ये पुढारीपणाचा आत्मा वसतो, त्याला घे व त्याच्यावर आपला हात ठेव. एलअज़ार याजक व संपूर्ण मंडळीसमोर त्याला उभे करून त्यांच्या समक्षतेत त्याची नेमणूक कर. तुझे काही अधिकार त्याला दे म्हणजे सर्व इस्राएली समाज त्याचे आज्ञापालन करतील. त्याने एलअज़ार याजकापुढे उभे राहावे, जो याहवेहसमोर उरीमविषयी विचारेल. त्याच्या आज्ञेनुसार तो व सर्व इस्राएली समाज बाहेर जाईल व त्याच्या आज्ञेनुसार आत येतील.” याहवेहने त्याला आज्ञापिल्याप्रमाणे मोशेने केले. त्याने यहोशुआला एलअज़ार याजक व सर्व समाजापुढे उभे केले. आणि याहवेहने सूचना दिल्याप्रमाणे मोशेने आपले हात यहोशुआवर ठेवून त्याची नेमणूक केली.

सामायिक करा
गणना 27 वाचा

गणना 27:12-23 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

परमेश्वर मोशेला म्हणाला, “ह्या अबारीम पर्वतावर तू चढून जा व जो देश मी इस्राएल लोकांना देऊ केलेला आहे तो तेथून पाहा. तो पाहिल्यावर तुझा भाऊ अहरोन जसा आपल्या पूर्वजांना जाऊन मिळाला, त्याप्रमाणे तूही आपल्या पूर्वजांना जाऊन मिळशील. कारण त्सीन रानात मंडळीचे भांडण झाले त्या वेळी त्या झर्‍याजवळ त्यांच्यासमोर माझे पावित्र्य प्रकट करावे म्हणून जी माझी आज्ञा होती तिच्याविरुद्ध तुम्ही बंड केले.” (त्सीन रानातील कादेश येथील मरीबा नावाचा हा झरा.) मोशे परमेश्वराला म्हणाला, “सर्व देहधारी आत्म्यांचा देव जो परमेश्वर त्याने ह्या मंडळीवर एका पुरुषाची नेमणूक करावी; तो त्यांच्यापुढे बाहेर जाईल व त्यांच्यापुढे आत येईल; तो त्यांना बाहेर नेईल व त्यांना आत आणील. असे केले तर परमेश्वराची मंडळी मेंढपाळ नसलेल्या शेरडा-मेंढरांप्रमाणे होणार नाही.” तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, “नूनाचा मुलगा यहोशवा ह्याला घेऊन त्याच्यावर आपला हात ठेव; त्याच्या ठायी माझा आत्मा वसत आहे. एलाजार याजक व सर्व मंडळी ह्यांच्यासमोर त्याला उभे करून त्यांच्यादेखत त्याला अधिकारारूढ कर. आपला काही अधिकार त्याला दे; म्हणजे इस्राएल लोकांची सारी मंडळी त्याचे मानील. तो एलाजार याजकापुढे उभा राहील आणि एलाजार त्याच्या वतीने उरीमाच्या निर्णयासाठी परमेश्वराला विचारील; यहोशवाच्या आज्ञेप्रमाणे सर्व मंडळी म्हणजे तो स्वतः व त्याच्यासहित सर्व इस्राएल लोक पुढे जातील आणि त्याच्या आज्ञेप्रमाणे मागे येतील.” परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे मोशेने केले; त्याने यहोशवाला घेऊन एलाजार याजक व सर्व मंडळी ह्यांच्यासमोर उभे केले; आणि परमेश्वराने मोशेच्या द्वारे आज्ञा केल्याप्रमाणे त्याने त्याच्यावर हात ठेवून त्याला अधिकारारूढ केले.

सामायिक करा
गणना 27 वाचा