YouVersion लोगो
सर्च आयकॉन

गणना 22:22-41

गणना 22:22-41 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

बलाम त्याच्या गाढवीवर बसला होता. त्याचे दोन नोकर त्याच्याबरोबर होते. बलाम प्रवास करीत होता तेव्हा देव त्याच्यावर रागावला. परमेश्वराचा दूत रस्त्यावर बलामापुढे येऊन उभा राहिला. देवदूत बलामास थांबवणार होता. बलामाच्या गाढवीने परमेश्वराच्या दूताला रस्त्यात उभे असलेले पाहिले. देवदूताने हातात तलवार घेतली होती. म्हणून गाढवी रस्ता सोडून शेतात गेली. बलामास देवदूत दिसू शकला नाही. म्हणून तो गाढवीवर खूप रागावला. त्याने गाढवीला मारले आणि जबरदस्तीने रस्त्यावर आणले. नंतर परमेश्वराचा दूत रस्ता जिथे अरुंद होता तिथे थांबला. हा दोन द्राक्षांच्या मव्व्यांच्या मधला भाग होता. रस्ताच्या दोन्ही बाजूला भिंती होत्या. गाढवीने पुन्हा परमेश्वराच्या दूताला पाहिले म्हणून ती एका भिंतीला चिकटून चालू लागली त्यामुळे बलामाचा पाय भिंतीला लागून चिरडला गेला. म्हणून बलामने गाढवीला पुन्हा मारले. नंतर परमेश्वराचा दूत दुसऱ्या ठिकाणी उभा राहिला. अरुंद रस्ता असलेले हे दुसरे ठिकाण होते. येथे वळायला सुद्धा मुळीच जागा नव्हती गाढवीला त्यास वळसा घालून जाणे शक्य नव्हते. गाढवीने परमेश्वराच्या दूताला पाहिले म्हणून बलाम तिच्यावर बसला असतानाच ती खाली बसली त्यामुळे बलाम खूप रागावला आणि त्याने गाढवीला त्याच्या काठीने मारायला सुरुवात केली. नंतर परमेश्वराने गाढवीला बोलते केले. गाढवी बलामास म्हणाली, तू माझ्यावर का रागावला आहेस? मी तुला काय केले आहे? तू मला तीन वेळा मारलेस. बलामने गाढवीला उत्तर दिले, तू मला मूर्ख बनवलेस. जर माझ्या हातात तलवार असती तर मी तुला मारुन टाकले असते. पण गाढवी बलामास म्हणाली, बघ मी तुझीच गाढवी आहे. खूप वर्षे तू माझ्यावर बसत आला आहेस. आणि यापूर्वी मी असे काही केले नाही हे तुला माहीत आहे. बलाम म्हणाला, नाही. नंतर परमेश्वराने बलामाचे डोळे उघडले, तेव्हा त्यास परमेश्वराचा दूत दिसला. तो रस्त्यात तलवार घेऊन उभा होता. त्याने परमेश्वराच्या दूताला रस्त्यात जमिनीपर्यंत वाकून नमस्कार केला. परमेश्वराच्या दूताने बलामास विचारले, तू तुझ्या गाढवीला तीनदा का मारलेस? तुला थांबवण्यासाठी मी आलो आहे. पण अगदी ऐनवेळी तुझ्या गाढवीने मला पाहिले आणि ती दूर गेली. असे तीन वेळा घडले. जर गाढवी वळली नसती तर आतापर्यंत मी तुला मारले असते आणि तुझ्या गाढवीला जिवंत राहू दिले असते. तेव्हा बलाम परमेश्वराच्या दूताला म्हणाला, मी पाप केले आहे. तू रस्त्यात उभा आहेस हे मला माहीत नव्हते. मी जर चूक करीत असेन तर मी घरी परत जाईन. तेव्हा परमेश्वराचा दूत बलामास म्हणाला, नाही! तू या लोकांबरोबर जाऊ शकतोस. पण सावध रहा. मी जे सांगेन तेच शब्द बोल. म्हणून बलाम बालाकाने पाठवलेल्या पुढाऱ्यांबरोबर गेला. बलाम येत असल्याचे बालाकाला समजले. म्हणून तो बलामास भेटायला आर्णोन नदीजवळच्या मवाबाच्या शहरात गेला. ते त्याच्या देशाच्या उत्तर सरहद्दीवर होते. जेव्हा बालाकाने बलामास पाहिले तेव्हा तो त्यास म्हणाला, मी तुला आधीच यायला सांगितले होते. तुला साजेसा सन्मान करण्यास मी समर्थ नव्हतो काय? बलामाने बालाकाला उत्तर दिले, पण आताच मी येथे आलो आहे. मी आलो आहे पण तू सांगितलेल्या गोष्टी मला कदाचित करता येणार नाहीत. परमेश्वर देव जेवढे सांगेल तेवढेच मी बोलू शकतो. नंतर बलाम बालाकाबरोबर किर्याथ-हसोथ येथे गेला. बालाकाने काही गुरे व मेंढ्या बली म्हणून मारल्या. त्याने थोडे मांस बलामास दिले आणि थोडे त्याच्याबरोबर असलेल्या पुढाऱ्यांना दिले. दुसऱ्या दिवशी सकाळी बालाक बलामास घेऊन बामोथ-बआल शहरी गेला. तेथून त्यांना इस्राएल लोकांच्या तळाचा शेवटचा भाग दिसू शकत होता.

सामायिक करा
गणना 22 वाचा

गणना 22:22-41 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

पण तो गेल्यामुळे देवाचा कोप भडकला आणि त्याला अडवण्यासाठी परमेश्वराचा दूत वाटेत त्याला आडवा आला. बलाम गाढवीवर बसलेला होता आणि बरोबर त्याचे दोन सेवक होते. परमेश्वराचा दूत उपसलेली तलवार हाती घेऊन वाटेत उभा असल्याचे त्या गाढवीने पाहिले, तेव्हा ती वाट सोडून शेतात शिरली; तिला पुन्हा वाटेवर आणण्यासाठी बलामाने तिला मारले. मग द्राक्षमळ्यांच्या मधल्या अरूंद वाटेवर परमेश्वराचा दूत उभा राहिला. तिच्या दोन्ही बाजूंना कुंपणाच्या भिंती होत्या. परमेश्वराच्या दूताला पाहून ती गाढवी भिंतीला अशी लगटली की, बलामाचा पाय भिंतीशी चेंगरला, म्हणून त्याने तिला पुन्हा मारले. मग परमेश्वराचा दूत आणखी पुढे गेला आणि जेथे उजवीकडे किंवा डावीकडे वळायला मुळीच जागा नव्हती अशा अरुंद ठिकाणी उभा राहिला. तेथे परमेश्वराच्या दूताला पाहून ती गाढवी बलामासकट खाली बसली म्हणून बलामाने रागाने पेटून आपल्या काठीने तिला झोडपले. तेव्हा परमेश्वराने त्या गाढवीला वाचा दिली. ती बलामाला म्हणाली, “मी तुझे काय केले म्हणून तू तीनदा मला मारलेस?” बलाम गाढवीला म्हणाला, “तू माझी चेष्टा केलीस; माझ्या हाती तलवार असती तर मी आताच तुला छाटून टाकले असते.” गाढवी बलामाला म्हणाली, “तू सुरुवातीपासून जिच्यावर बसत आलास तीच मी तुझी गाढवी आहे ना? तुझ्याशी मी कधी अशी वागले काय?” तो म्हणाला, “नाही.” तेव्हा परमेश्वराने बलामाचे डोळे उघडले, आणि परमेश्वराचा दूत उपसलेली तलवार हाती घेऊन वाटेत उभा आहे हे पाहून बलामाने नमन करून लोटांगण घातले. परमेश्वराचा दूत त्याला म्हणाला, “तू तीन वेळा आपल्या गाढवीला का मारलेस? पाहा, तुला अडवण्यासाठी मी पुढे सरसावलो आहे, कारण तुझे आचरण मला विपरीत दिसते; आणि मला पाहून ती गाढवी माझ्यासमोरून तीनदा बाजूला हटली; ती बाजूला हटली नसती तर खात्रीने आताच मी तुला मारून टाकले असते व तिला जिवंत ठेवले असते.” बलाम परमेश्वराच्या दूताला म्हणाला, “मी पाप केले आहे; तू माझ्याविरुद्ध वाटेत उभा आहेस हे मला ठाऊक नव्हते; तुला हे वाईट दिसत असेल तर मी आपला परत जातो.” परमेश्वराचा दूत बलामाला म्हणाला, “ह्या मनुष्यांबरोबर जा, मात्र जे शब्द मी तुला सांगेन तेवढेच बोल.” मग बलाम बालाकाच्या सरदारांबरोबर गेला. बलाम आल्याचे ऐकून बालाक त्याचे स्वागत करण्यासाठी आर्णोन नदीतीरी देशाच्या अगदी सीमेवर असलेल्या मवाब नगराकडे गेला. बालाक बलामाला म्हणाला, “मी तुला मोठ्या निकडीचे बोलावणे पाठवले होते ना? माझ्याकडे का नाही आलास? तुला साजेसा सन्मान करण्यास मी समर्थ नाही काय?” बलाम बालाकाला म्हणाला, “पाहा, मी तुझ्याकडे आलो आहे खरा; पण मला स्वतःला काही बोलण्याचे सामर्थ्य आहे काय? जे वचन देव माझ्या तोंडी घालील तेच मी बोलेन.” मग बलाम बालाकाबरोबर गेला व ते किर्याथ-हसोथ येथे आले. तेथे बालाकाने गुरामेंढरांचे बळी अर्पण केले आणि बलाम व त्याच्याबरोबर असलेल्या सरदारांकडे वाटे पाठवले. सकाळी बालाक बलामाला बामोथ-बआलाच्या उंच स्थानी घेऊन गेला व तेथून त्याने इस्राएल लोकांचा जवळचा पसारा पाहिला.

सामायिक करा
गणना 22 वाचा