YouVersion लोगो
सर्च आयकॉन

गणना 21:1-9

गणना 21:1-9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

अथारीमच्या वाटेने इस्राएल लोक येत आहेत असे नेगेब प्रदेशात राहणार्‍या अरादाच्या कनानी राजाने ऐकले, तेव्हा त्याने इस्राएलांशी युद्ध करून कित्येकांना कैद केले. तेव्हा इस्राएलाने परमेश्वराला असा नवस केला की, “जर तू खरोखर ह्या लोकांना माझ्या हाती देशील तर मी त्यांच्या नगरांचा समूळ नाश करीन.” इस्राएलाचे हे म्हणणे ऐकून परमेश्वराने कनानी लोकांना त्याच्या हाती दिले आणि त्याने त्यांचा व त्यांच्या नगरांचा समूळ नाश केला; म्हणून त्या ठिकाणाचे नाव हर्मा (म्हणजे विनाश) असे पडले. मग होर डोंगरापासून कूच करून अदोम देशाला वळसा घालून जाण्यासाठी त्यांनी तांबड्या समुद्राकडचा मार्ग धरला; त्या वाटेत लोकांचे मन अधीर झाले. ते परमेश्वराविरुद्ध व मोशेविरुद्ध असे बोलू लागले की, “तुम्ही आम्हांला मिसर देशातून काढून ह्या रानात मरायला कशाला आणले? येथे तर अन्न नाही व पाणीही नाही, आणि ह्या हलक्या अन्नाला आम्ही कंटाळलो आहोत.” तेव्हा परमेश्वराने लोकांमध्ये आग्ये साप पाठवले; त्यांच्या दंशाने इस्राएलातील बरेच लोक मेले. हे पाहून लोक मोशेकडे येऊन म्हणाले, “परमेश्वराविरुद्ध व तुझ्याविरुद्ध बोलण्याचे पाप आम्ही केले आहे; तेव्हा हे साप आमच्यामधून काढून टाकण्यासाठी परमेश्वराची प्रार्थना कर.” तेव्हा मोशेने लोकांसाठी प्रार्थना केली. परमेश्वर मोशेला म्हणाला, “आग्या सापाची एक प्रतिमा करून झेंड्याच्या खांबावर टांग म्हणजे सर्पदंश झालेल्या कोणा माणसाने त्याच्याकडे पाहिले तर तो जगेल.” मग मोशेने पितळेचा एक साप बनवून टांगला, तेव्हा सर्पदंश झालेल्या कोणी त्या पितळेच्या सापाकडे पाहिले म्हणजे तो जगे.

सामायिक करा
गणना 21 वाचा

गणना 21:1-9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

अरादाचा कनानी राजा नेगेबमध्ये राहत होता. इस्राएल लोक अथारीम वरून जात आहेत हे त्याने ऐकले. म्हणून राजा त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी बाहेर पडला आणि त्याने त्यांच्यातील काही लोकांस कैद केले. नंतर इस्राएल लोकांनी परमेश्वरास खास वचन दिले, परमेश्वरा या लोकांचा पराभव करायला आम्हास मदत कर. जर तू हे केले तर आम्ही तुला त्यांची शहरे देऊ. आम्ही त्यांचा संपूर्ण नाश करु. परमेश्वराने इस्राएल लोकांचे म्हणणे ऐकले आणि त्याने इस्राएल लोकांस कनानी लोकांचा पराभव करायला मदत केली. इस्राएल लोकांनी कनानी लोकांचा व त्यांच्या शहरांचा संपूर्ण नाश केला. म्हणून त्या प्रदेशाला हर्मा असे नाव पडले. इस्राएल लोकांनी होर पर्वत सोडला व ते तांबड्या समुद्राकडे जाणाऱ्या रस्त्याला लागले. अदोम देशाला वळसा घालून जाण्यासाठी त्यांनी असे केले. परंतु लोक अधीर झाले. त्यांनी मोशेविरूद्ध व देवाविरूद्ध तक्रार करायला सुरुवात केली. लोक म्हणाले, तू आम्हास या रानात मरण्यासाठी मिसर देशातून बाहेर का आणलेस? इथे भाकरी नाही, पाणी नाही आणि या हलक्या अन्नाला आम्ही कंटाळलो आहोत. तेव्हा परमेश्वराने लोकांमध्ये विषारी साप सोडले. साप लोकांस चावले आणि बरेच इस्राएल लोक मरण पावले. लोक मोशेकडे आले आणि म्हणाले, आम्ही तुझ्याविरूद्ध आणि परमेश्वराविरूद्ध बोललो तेव्हा आम्ही पाप केले हे आम्हास माहीत आहे. तू परमेश्वराची प्रार्थना कर. हे साप आमच्या मधून काढून टाक. तेव्हा मोशेने लोकांसाठी परमेश्वराची प्रार्थना केली. परमेश्वर मोशेला म्हणाला, एक पितळेचा साप कर आणि तो खांबावर ठेव. साप चावल्यानंतर जर एखाद्याने खांबावरच्या पितळेच्या सापाकडे पाहिले तर तो मनुष्य मरणार नाही. मोशेने परमेश्वराची आज्ञा पाळली त्याने पितळेचा साप बनवला व तो खांबावर ठेवला. नंतर जेव्हा जेव्हा एखाद्या साप चावलेल्या मनुष्याने त्या खांबावरच्या पितळेच्या सापाकडे पाहिले तेव्हा तो जिवंत राहिला.

सामायिक करा
गणना 21 वाचा