गणना 14:20-38
गणना 14:20-38 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तेव्हा परमेश्वर म्हणाला, “तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी त्यांना क्षमा केली आहे. वास्तविक, मी जिवंत आहे आणि सारी पृथ्वी परमेश्वराच्या महिम्याने भरलेली आहे; आणि ह्या सर्व लोकांनी माझा महिमा आणि मिसर देशात व रानात मी केलेली चिन्हे पाहूनही दहादा माझी परीक्षा पाहिली आणि माझे सांगणे ऐकले नाही; म्हणून जो देश मी त्यांच्या पूर्वजांना शपथपूर्वक देऊ केला आहे तो खरोखर त्यांच्या दृष्टीस पडायचा नाही; ज्यांनी मला तुच्छ लेखले त्यांतले कोणीही तो देश पाहणार नाहीत. तथापि माझा सेवक कालेब ह्याची वृत्ती निराळी आहे आणि मला तो पूर्णपणे अनुसरला आहे, म्हणून ज्या देशात तो गेला होता त्या देशात मी त्याला नेईन व तो देश त्याच्या वंशजांचे वतन होईल. अमालेकी व कनानी ह्यांची वस्ती तळवटीत असल्यामुळे उद्या वळसा घेऊन कूच करा आणि तांबड्या समुद्राच्या मार्गाने रानात जा.” परमेश्वर मोशे व अहरोन ह्यांना म्हणाला, “ही दुष्ट मंडळी कोठवर माझ्याविरुद्ध कुरकुर करीत राहणार? हे जे इस्राएल लोक माझ्याविरुद्ध कुरकुर करीत आहेत त्यांची कुरकुर माझ्या कानावर आली आहे; म्हणून तू त्यांना सांग, परमेश्वर म्हणतो : ‘माझी शपथ, तुमचे म्हणणे माझ्या कानी आले आहे त्याप्रमाणेच मी तुमचे खरोखर करीन; तुमची प्रेते ह्या रानात पडतील, आणि तुमच्यापैकी ज्यांची गणना झाली त्यांच्या पूर्ण संख्येतील वीस वर्षे व त्यांहून अधिक वयाच्या ज्या लोकांनी माझ्याविरुद्ध कुरकुर केली आहे त्यांपैकी कोणीही ज्या देशात तुम्हांला घेऊन जाण्याची मी शपथ वाहिली आहे त्यात जाणारच नाही; पण यफुन्नेचा मुलगा कालेब व नूनाचा मुलगा यहोशवा हे मात्र जातील. ज्या तुमच्या मुलाबाळांविषयी तुम्ही म्हणालात की, ह्यांची लूट होईल, त्यांना मी त्या देशास नेईन आणि जो देश तुम्ही तुच्छ मानला आहे तो देश ते भोगतील; पण तुमची स्वत:ची प्रेते ह्या रानात पडतील. तुमची प्रेते ह्या रानात नष्ट होईपर्यंत चाळीस वर्षे तुमची मुलेबाळे तुम्ही केलेल्या विश्वासघाताची शिक्षा भोगत रानात भटकणार्या मेंढपाळासारखी होतील. देश हेरायला जे चाळीस दिवस लागले त्यांतील प्रत्येक दिवसामागे एक वर्ष ह्या हिशेबाने चाळीस वर्षे तुम्ही आपल्या दुष्कर्माचा भार वाहाल, आणि माझा विरोध तुम्हांला भोवेल.’ मी परमेश्वर हे बोललो आहे. ही जी सर्व दुष्ट मंडळी माझ्याविरुद्ध जमली आहे तिचे मी असे खरोखर करीन; त्यांचा ह्या रानात विध्वंस होईल; ते तेथे मरून जातील.” नंतर मोशेने देश हेरायला पाठवलेल्या ज्या पुरुषांनी परत येऊन त्या देशाविषयी अनिष्ट बातमी सांगितली होती आणि सर्व मंडळीला परमेश्वराविरुद्ध कुरकुर करायला चिथावले होते, ते देशाची अनिष्ट बातमी देणारे पुरुष परमेश्वरासमोर मरीने मृत्यू पावले. तथापि देश हेरायला गेलेल्या पुरुषांपैकी नूनाचा मुलगा यहोशवा आणि यफुन्नेचा मुलगा कालेब हे जिवंत राहिले.
गणना 14:20-38 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परमेश्वर म्हणाला, “तू विनंती केल्याप्रमाणे मी त्यांना क्षमा केली आहे.” पण खचित जसा मी जिवंत आहे आणि सारी पृथ्वी परमेश्वराच्या वैभवाने भरलेली आहे. ज्या सर्व लोकांनी माझे वैभव आणि मिसर देशात व रानात सामर्थ्याची चिन्हे पाहिले. तरी दहादा त्यांनी माझी परीक्षा पाहिली आणि माझी वाणी ऐकली नाही. मी जो देश त्यांच्या पूर्वजांना शपथपूर्वक देऊ केला तो ते खचित पाहणार नाहीत. ज्यांनी मला तुच्छ मानले त्यांच्यापैकी तो कोणीही पाहणार नाही. पण माझा सेवक कालेब याच्यासोबत वेगळा आत्मा होता. तो माझे अनुकरण पूर्णपणे करतो. म्हणून ज्या देशात तो गेला होता त्या देशात मी त्यास नेईल. आणि त्याच्या वंशजांना तो देश वतन होईल. अमालेकी आणि कनानी लोक खोऱ्यात राहत आहेत. म्हणून उद्या तुम्हीही जागा सोडली पाहिजे. तांबड्या समुद्राकडे रस्त्यावरच्या रानात परत जा. परमेश्वर मोशे आणि अहरोनाशी बोलला. तो म्हणाला, ही दुष्ट मंडळी माझ्याविरूद्ध टिका करते त्यांचे मी किती काळ सहन करू? इस्राएली लोक माझ्याविरूद्ध तक्रार करतात त्या मी ऐकल्या आहेत. तू त्यांना सांग, परमेश्वर म्हणतो, मी जिवंत आहे. जसे तुम्ही माझ्या कानात बोलला तसे मी करीन. तुमची प्रेते या रानात पडतील. तुमच्यापैकी ज्यांची गणना झाली त्यांच्या पूर्ण संख्येतील वीस वर्षांचा किंवा त्याहून अधिक वयाचे ज्यांनी माझ्याविरूद्ध कुरकुरले, ज्या देशात तुमचे घर देण्याचे वचन मी तुम्हास दिले त्यामध्ये तुमच्यापैकी कोणीही जाणार नाही. फक्त यफुन्नेचा मुलगा कालेब आणि नूनाचा मुलगा यहोशवा जातील. ज्या तुमच्या मुलाबाळाविषयी तुम्ही म्हणाला की, त्यांची लूट होईल. मी त्यांना त्या देशात नेईल. तुम्ही जो देश नाकारला तो देश ते अनुभवतील. आणि तुमच्याविषयी तर तुमची प्रेते या रानात पडतील. तुमची प्रेते या रानात नष्ट होईपर्यंत चाळीस वर्षे तुमची मुलेबाळे तुम्ही केलेल्या विश्वासघाताची शिक्षा भोगीत रानात भटकणारी होतील. तुम्हास तुमच्या पापाबद्दल चाळीस वर्षे दु:ख भोगावे लागेल. त्या मनुष्यांना तो प्रदेश शोधायला चाळीस दिवस लागले. त्या प्रत्येक दिवसासाठी एक वर्ष मी तुमच्या विरोधात असणे ही किती भयानक गोष्ट आहे हे तुम्हास समजेल. “मी परमेश्वर आहे आणि मी बोललो आहे. मी वचन देतो की या दुष्ट मनुष्यांना मी या सर्व गोष्टी करीन. माझ्याविरूद्ध जाण्यासाठी ते लोक एकत्र आले म्हणून ते सर्व या रानात मरतील.” मोशेने ज्या लोकांस नवीन प्रदेश शोधण्यासाठी पाठवले होते त्याच लोकांनी परत येऊन इस्राएल लोकांमध्ये तक्रारी पसरावयाला सुरुवात केली. ते लोक म्हणाले की त्या प्रदेशात जाण्याइतके आपले लोक शक्तीवान नाहीत. ज्यांनी वाईट वर्तमान आणले ते पुरुष जबाबदार होते ते परमेश्वरासमोर मरीने मरण पावले. यफुन्नेचा मुलगा कालेब आणि नूनाचा मुलगा यहोशवा हे ही तो देश शोधायला पाठवलेल्या लोकात होते परंतु परमेश्वराने त्या दोघांना वाचवले.