गणना 13:1-31
गणना 13:1-31 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
नंतर परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला, “कनान देश हेरण्यासाठी काही लोकांस पाठव. हाच देश मी इस्राएल लोकांस देणार आहे. त्यांच्या बारा वंशानुसार प्रत्येकी एका सरदाराला पाठव.” तेव्हा मोशेने परमेश्वराची आज्ञा मानून, लोक पारानाच्या रानात असताना हे सरदार पाठवले. ते सर्व इस्राएलाच्या वंशातील होते. त्यांची नांवे अशी आहेत:रऊबेन वंशातला जक्कुराचा मुलगा शम्मुवा. शिमोन वंशातला होरीचा मुलगा शाफाट. यहूदा वंशातला यफुन्नेचा मुलगा कालेब. इस्साखार वंशातला योसेफाचा मुलगा इगाल. एफ्राईम वंशातला नूनाचा मुलगा होशा. बन्यामीन वंशातला राफूचा मुलगा पलटी, जबुलून वंशातला सोदीचा मुलगा गद्दीयेल, योसेफ वंशातला (मनश्शे) सूसीचा मुलगा गद्दी, दान वंशातला गमल्लीचा मुलगा अम्मीयेल. आशेर वंशातला मीकाएलाचा मुलगा सतूर, नफताली वंशातला बाप्सीचा मुलगा नहब्बी. आणि गाद वंशातला माकीचा मुलगा गऊवेल. मोशेने देश हेरावयास पाठवलेल्या लोकांची ही नांवे होती. (मोशेने नूनाचा मुलगा होशा ह्याचे नांव यहोशवा असे ठेवले.) मोशेने कनान देश हेरण्यास पाठवताना लोकांस सांगितले की तुम्ही येथून नेगेब प्रांतामधून निघा आणि मग डोंगराळ प्रदेशात जा. देश कसा आहे? तेथील लोक कसे आहेत! ते बलवान आहेत किंवा दुबळे आहेत? ते थोडे आहेत किंवा फार आहेत? ते पाहा व समजून घ्या. ते राहतात तो देश कसा आहे? तो चांगला आहे किंवा वाईट आहे? ते लोक कशा प्रकारच्या नगरात राहतात? संरक्षणासाठी त्या नगरांभोवती कोट आहेत का? त्या नगरांची संरक्षण व्यवस्था बलवान आहे का? या सर्व गोष्टी पाहा व समजून घ्या. तेथील जमीन पीक घेण्यास योग्य आहे का? त्या प्रदेशात झाडे आहेत का? तेथील काही फळे बरोबर घेऊन या. ते दिवस द्राक्षाच्या पहिल्या बहराचे होते. म्हणून ते तो प्रदेश शोधायला निघाले. त्यांनी सीन रानापासून रहोब आणि लेबो हमाथपर्यंतच्या प्रदेशात शोध घेतला. त्यांनी नेगेबमधून त्या प्रदेशात प्रवेश केला आणि ते हेब्रोनला गेले. हेब्रोन शहर मिसर देशातल्या सोअन शहराच्या सात वर्षे आधी बांधले होते. अहीमान शेशय आणि तलमय हे अनाकाचे वंशज तेथे राहत होते. नंतर ते लोक अष्कोलच्या खोऱ्यात गेले. तेथे त्यांनी द्राक्षाच्या वेलीची एक फांदी तोडली. त्या फांदीला द्राक्षाचा घोसासहीत त्यांनी ती फांदी एका खांबावर ठेवली आणि दोघेजण ती आपल्या मधोमध ठेवून घेऊन गेले. त्यांनी बरोबर काही डाळिंबे व अंजीर ही घेतली. त्या जागेला अष्कोल खोरे असे म्हणतात कारण तिथे इस्राएल लोकांनी द्राक्षाचा घड तोडला होता. त्या लोकांनी त्या प्रदेशाचा चाळीस दिवस शोध घेतला. नंतर ते आपल्या छावणीत परत गेले. इस्राएल लोकांची छावणी पारानाच्या वाळवंटात कादेशजवळ होती ते लोक मोशे, अहरोन आणि इस्राएलाच्या सर्व मंडळीजवळ गेले. त्यांनी मोशे, अहरोन आणि इतर लोकांस त्यांनी पाहिलेल्या गोष्टीविषयी सांगितले आणि त्या प्रदेशातली फळे त्यांना दाखवली. ते लोक मोशेला म्हणाले, “तू आम्हास ज्या देशात पाठवले आणि आम्ही तेथे पोहचलो. आणि खचीत दूध व मध वाहणारा तो देश आहे आणि ही त्यातली काही फळे आहेत. पण तेथे राहणारे लोक खूप शक्तीशाली आहेत. शहरे खूप मोठी आणि तटबंदीची आहेत. शहरांचे रक्षण चांगल्या प्रकारे होते. काही अनाकांच्या वंशाजानाही आम्ही पाहिले. अमालेकी लोक नेगेबमध्ये राहतात. हित्ती, यबूसी आणि अमोरी डोंगराळ भागात राहतात. आणि कनानी लोक समुद्राजवळ आणि यार्देन नदीच्या काठावर राहतात.” मोशेजवळच्या लोकांस गप्प बसण्यास सांगून कालेब म्हणाला, “परत जाऊन तो प्रदेश आपण घ्यायला पाहिजे. आपण तो प्रदेश सहज घेऊ शकू.” पण जे लोक त्याच्याबरोबर तेथे गेले होते ते म्हणाले, “आपण त्यांच्याशी लढू शकणार नाही. ते आपल्यापेक्षा खूप शक्तीशाली आहेत.”
गणना 13:1-31 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
परमेश्वर मोशेला म्हणाला, “मी इस्राएल लोकांना कनान देश देत आहे, तो हेरण्यासाठी माणसे पाठव; त्यांच्या वाडवडिलांच्या प्रत्येक वंशातला एकेक पुरुष पाठव; प्रत्येक जण त्यांच्यातला सरदार असावा. परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे मोशेने पारान रानातून त्यांना पाठवले; ते सगळे पुरुष इस्राएल लोकांचे प्रमुख होते. त्यांची नावे ही : रऊबेन वंशातला जक्कूराचा मुलगा शम्मूवा; शिमोन वंशातला होरीचा मुलगा शाफाट, यहूदा वंशातला यफुन्नेचा मुलगा कालेब, इस्साखार वंशातला योसेफाचा मुलगा इगाल, एफ्राईम वंशातला नूनाचा मुलगा होशा, बन्यामीन वंशातला राफूचा मुलगा पलटी, जबुलून वंशातला सोदीचा मुलगा गाद्दीयेल, योसेफ वंशातला, अर्थात मनश्शे वंशातला सूसीचा मुलगा गाद्दी, दान वंशातला गमल्लीचा मुलगा अम्मीयेल. आशेर वंशातला मीखाएलाचा मुलगा सतूर, नफताली वंशातला वाप्सीचा मुलगा नहब्बी, आणि गाद वंशातला माकीचा मुलगा गऊवेल. देश हेरायला मोशेने जे पुरुष पाठवले त्यांची नावे ही होती. नूनाचा मुलगा होशा ह्याचे नाव मोशेने यहोशवा असे ठेवले. मोशेने त्यांना कनान देश हेरायला पाठवताना सांगितले की, “येथून नेगेब प्रांतावरून डोंगराळ प्रदेशात जा; आणि देश कसा आहे, देशातील रहिवासी सबळ आहेत की दुर्बळ आहेत, ते थोडे आहेत की पुष्कळ आहेत, ते राहतात तो देश चांगला आहे की वाईट आहे आणि त्यांच्या वस्तीची नगरे छावणीवजा आहेत की तटबंदीची आहेत, तसेच तेथील जमीन सुपीक आहे की नापीक आहे, त्यात झाडेझुडपे आहेत की नाहीत हे पाहून या. हिम्मत धरा, व त्या देशातली काही फळे घेऊन या.” ते दिवस द्राक्षांच्या पहिल्या बहराचे होते. मग त्यांनी जाऊन सीन रानापासून हमाथाच्या वाटेवरील रहोबापर्यंत देश हेरला. ते नेगेब प्रांतातून हेब्रोनास गेले; तेथे अहीमान, शेशय आणि तलमय हे अनाकाचे वंशज राहत होते; हे हेब्रोन मिसरातील सोअनापूर्वी सात वर्षे आधी बांधले होते. तेथून ते अष्कोल नाल्यापर्यंत आले; तेथे त्यांनी द्राक्षांच्या एका घोसासहित एक फांदी तोडून घेतली व ती दोघा माणसांनी काठीवर घालून नेली; त्याचप्रमाणे त्यांनी काही डाळिंबे व अंजीरेही घेतली. इस्राएल लोकांनी त्या ठिकाणचा द्राक्षांचा घोस तोडला म्हणून त्याचे नाव ‘अष्कोल (म्हणजे घोस) नाला’ असे पडले. देश हेरून ते चाळीस दिवसांनी परत आले. ते हेर पारान रानातील कादेश येथे मोशे, अहरोन व इस्राएलाची सर्व मंडळी ह्यांच्याकडे आले आणि त्यांनी त्यांना व सर्व मंडळीला सर्व हकिकत सांगितली आणि त्या देशाची फळे दाखवली. ते मोशेला म्हणाले की, “ज्या देशात तू आम्हांला पाठवले त्या देशात आम्ही गेलो; त्यात खरोखरच दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत; तेथली ही फळे पाहा. त्या देशाचे रहिवासी मात्र बलवान आहेत आणि तेथील नगरे तटबंदीची असून फार मोठी आहेत; तेथे अनाकाचे वंशजही आम्ही पाहिले. नेगेब प्रांतात अमालेकी राहतात; डोंगराळ प्रदेशात हित्ती, यबूसी आणि अमोरी हे राहतात; आणि समुद्रकिनार्यावर व यार्देनेच्या तीरावर कनानी लोकांची वस्ती आहे.” तेव्हा मोशेसमोर लोकांना शांत करून कालेब म्हणाला, “आपण त्या देशावर आताच्या आता हिम्मत धरून चढाई करून जाऊ आणि तो घेऊ; कारण तो जिंकण्यास आपण पूर्णपणे समर्थ आहोत.” पण जे पुरुष त्याच्याबरोबर गेले होते ते म्हणाले, “त्या लोकांवर स्वारी करण्यास आपण मुळीच समर्थ नाही, कारण ते आपल्याहून बलाढ्य आहेत.”