नहेम्या 6:1-16
नहेम्या 6:1-16 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मी कोट बांधण्याचे संपवले आणि कोटाला कोठे तुटफूट राहू दिली नाही. वेशीचे दरवाजे मात्र अद्यापि लावले नव्हते; हे सनबल्लट, तोबीया, गेशेम अरबी व आमचे वरकड शत्रू ह्यांनी ऐकले. तेव्हा सनबल्लट व गेशेम ह्यांनी मला सांगून पाठवले की, “चल, आपण ओनोच्या मैदानातील एखाद्या खेड्यात एकमेकांना भेटू;” पण मला काहीतरी दगा करण्याचा त्यांचा हेतू होता. हे पाहून मी जासूद पाठवून त्यांना कळवले की, “मी मोठ्या कामात गुंतलो आहे; मला यायला सवड नाही; मी काम सोडून तुमच्याकडे का यावे, काम का बंद पाडावे?” त्यांनी चार वेळा माझ्याकडे हाच निरोप पाठवला आणि मीही त्यांना असेच उत्तर दिले. पाचव्या वेळी सनबल्लटाने आपल्या चाकराच्या हाती खुली चिठ्ठी देऊन त्याला माझ्याकडे पाठवले. त्या चिठ्ठीत असे लिहिले होते की, “निरनिराळ्या राष्ट्रांत अशी बातमी उठली आहे आणि गेशेमही असेच म्हणत आहे की तुझा व यहूदी लोकांचा बंड करण्याचा विचार आहे म्हणून तू हा कोट बांधत आहेस; ह्या अफवेवरून असे दिसते की, तू त्यांचा राजा होऊ पाहत आहेस. ‘तू यहूदा देशात राजा आहेस’ असे स्वतःविषयी यरुशलेमेत जाहीर करावे म्हणून तू संदेष्टेही नेमले आहेस; हे वर्तमान राजाच्या कानी जाणार; ह्यासाठी आता आपण एकत्र जमून वाटाघाट करू.” मी त्याला सांगून पाठवले की, “तू म्हणतोस तसा प्रकार काही घडलेला नाही. ही तुझ्या मनाची कल्पना आहे.” आमचे हात दुर्बळ होऊन आमचे काम बंद पडावे म्हणून हे सर्व लोक आम्हांला घाबरवू पाहत होते. हे देवा, माझा हात दृढ कर. मग मी शमाया बिन दलाया बिन महेटाबेल ह्याच्या घरी आलो. तो दार लावून घेऊन आत बसला होता; त्याने म्हटले, “चल, आपण देवाच्या मंदिरातील आतल्या गाभार्यात जमून मंदिराची दारे बंद करून घेऊ; कारण ते लोक तुझा घात करण्यास येतील; ते रात्रीचे तुझा घात करण्यास येतील.” मी म्हणालो, “माझ्यासारख्या माणसाने पळून जावे काय? मंदिरात जाऊन आपला जीव वाचवावा असा माझ्यासारखा कोण आहे? मी मंदिरात जाणारच नाही.” विचार करता मला असे दिसून आले की, देवाने त्याला पाठवले नाही; तरी ही भविष्यवाणी त्याने माझ्याविरुद्ध सांगितली; तोबिया व सनबल्लट ह्यांनी त्याला मोल देऊन ठेवले होते. मी घाबरावे व असले काम करून पापी ठरावे आणि माझी अपकीर्ती पसरण्यास त्याला काही निमित्त सापडावे म्हणून त्याला त्यांनी मोल देऊन ठेवले होते. हे माझ्या देवा, तोबिया, सनबल्लट, नोवद्या संदेष्ट्री आणि वरकड संदेष्टे मला घाबरवू पाहत होते; त्या सर्वांची ही कृती ध्यानात ठेव. अलूल महिन्याच्या पंचविसाव्या दिवशी म्हणजे बावन्न दिवसांच्या आत कोट बांधून झाला. आमच्या सर्व शत्रूंनी हे ऐकले तेव्हा आमच्या सभोवताली राहणार्या विदेशी लोकांना भीती व लाज वाटली, कारण हे काम आमच्या देवाकडून घडले असे त्यांना दिसून आले.
नहेम्या 6:1-16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आता जेव्हा मी भिंत बांधल्याचे सनबल्लट, तोबीया, गेशेम हा अरब आणि आमचे इतर शत्रू यांनी असे ऐकले की, भिंतीतली भगदाडे मी बुजवली पण वेशीचे दरवाजे अजून बसवले गेले नव्हते, तेव्हा सनबल्लट आणि गेशेम यांनी मला असा निरोप पाठवला की, “नहेम्या, ये. आपण एकमेकांना ओनोच्या मैदानातल्या एखाद्या गावात एकत्र भेटू.” पण त्यांचा हेतू मला इजा करण्याचा होता. तेव्हा मी माझ्या निरोप्यांमार्फत असा निरोप पाठवला की, “एका महत्वाच्या कामात असल्यामुळे मी खाली येऊ शकत नाही. तुम्हास भेटायला आल्यामुळे काम थांबावे असे मला वाटत नाही.” सनबल्लट आणि गेशेम यांनी हाच निरोप माझ्याकडे चार वेळा पाठवला. आणि मी ही त्यांना प्रत्येक वेळी हेच उत्तर पाठवले. मग, पाचव्या वेळी सनबल्लटाने आपल्या मदतनीसाकरवी हाच निरोप मला दिला. यावेळी त्याच्याकडे उघडे पत्र होते. त्यामध्ये असे लिहीले होते. राष्ट्रांमध्ये एक अफवा पसरली आहे आणि गेशेमही हेच म्हणत आहे की, तू आणि यहूदी मिळून राजाविरुध्द बंड करायच्या बेतात आहात. म्हणूनच तुम्ही यरूशलेमेच्या तटबंदीची बांधकामे करत आहात. तू यहूदी लोकांचा नवा राजा होणार अशी अफवा आहे. “यहूदात राजा आहे, असे स्वत:बद्दल घोषित करायला तू यरूशलेमामध्ये संदेष्टे नेमले आहेस. नहेम्या, राजा अर्तहशश्तच्या हे सगळे कानावर जाईल हे मी तुला बजावून ठेवतो. तेव्हा, ये आपण एकदा भेटून त्याबद्दल बोलू.” तेव्हा मी सनबल्लटाला उलट उत्तर पाठवले की, “तू म्हणतोस तसे काही चाललेले नाही. या केवळ तुझ्याच मनातल्या कल्पना आहेत.” आमचे शत्रू आम्हास भीती दाखवायचा प्रयत्न करत होते. ते मनात म्हणत होते, “यहूदी घाबरतील आणि काम चालू ठेवण्याची उमेद त्यांच्यात राहणार नाही आणि भिंतीचे काम पुरे होणार नाही.” मग मी प्रार्थना केली, “देवा, मला बळ दे.” मी एकदा दलायाचा पुत्र शमाया याच्या घरी गेलो. दलाया हा महेतबेलचा पुत्र. शमायाला आपल्या घरीच थांबून रहावे लागले होते. तो म्हणाला “आपण देवाच्या मंदिरात भेटू. आत पवित्र जागेत जाऊन आपण दरवाजे बंद करु, कारण ते तुला ठार मारायला येत आहेत. ते आज रात्रीच तुला ठार मारायला येतील.” पण मी शमायाला म्हणालो, “माझ्यासारख्याने पळून का जावे? जीव वाचविण्यासाठी माझ्यासारख्या मनुष्याने मंदिरात का जावे? मी जाणार नाही.” शमायाला देवाने पाठवले नव्हते हे मला माहीत होते, पण तरीही त्याने माझ्याविरुध्द भाकीत केले कारण तोबीया आणि सनबल्लटाने त्यास त्याबद्दल पैसे चारले होते. मला हैराण करून घाबरवावे यासाठी शमायाला पैसे दिले जात होते. घाबरुन जाऊन लपून बसण्यासाठी मंदिरात जाण्याचे पाप माझ्या हातून व्हावे अशी त्यांची इच्छा होती. तसे झाले असते तर माझी अप्रतिष्ठा करायला आणि माझी अपकीर्ती करायला माझ्या शत्रूंना ते एक कारण मिळाले असते. देवा, कृपाकरून तोबीया आणि सनबल्लट यांची आठवण ठेव आणि त्यांनी केलेली दृष्कृत्ये आठव. मला भय दाखवणारी नोवद्या ही संदेष्टी आणि इतर संदेष्टे यांचेही स्मरण असू दे. मग अलूल महिन्याच्या पंचविसाव्या दिवशी यरूशलेमेच्या भिंतीचे काम बावन्न दिवसानी समाप्त झाले. हे आमच्या सर्व शत्रूंनी व आमच्या भोवतींच्या सर्व राष्ट्रांनी पाहिले तेव्हा त्यांना भीती व लाज वाटली. कारण आमच्या देवाच्या मदतीने हे काम झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
नहेम्या 6:1-16 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
सनबल्लट, तोबीयाह, गेशेम अरबी आणि आमच्या इतर शत्रूंना समजले की मी तट बांधण्याचे काम अंदाजे पूर्ण केले आहे व एकही भेग बाकी राहिली नाही—खरेतर वेशींना दरवाजे लावण्याचेच काम राहिलेले होते, तेव्हा सनबल्लट व गेशेम यांनी मला असा निरोप पाठविला, “ये, आपण ओनोच्या मैदानातील एका खेडेगावात भेटू या.” पण ते मला दुखापत करण्याचा कट करीत असल्याचे मला समजले, म्हणून मी त्यांच्याकडे उलट हा निरोप पाठविला: “मी एक महान कार्य करीत आहे; ते कार्य थांबवून मी तुमच्या भेटीला का यावे?” त्यांनी चार वेळा मला तो निरोप पाठविला आणि प्रत्येक वेळी मी तेच उत्तर दिले. पाचव्या वेळेला सनबल्लटाचा सेवक हातात तोच निरोप असलेले एक खुले पत्रे घेऊन आला. त्या पत्रात असा मजकूर होता: “देशादेशात असे ऐकिवात येत आहे की—गेशेमचे म्हणणे आहे की हे सत्य आहे की, यहूदी लोक बंड करण्याची योजना आखीत आहेत आणि त्यासाठीच तू हा तट बांधत आहेस. असेही म्हटले जाते की तू त्यांचा राजा बनणार आहेस, आणि अशी घोषणा करण्यासाठी तू यरुशलेममध्ये संदेष्ट्याची नेमणूक केली आहेस की: ‘यहूदीयामध्ये आता एक राजा आहे!’ ही बातमी राजाकडे जाणार आहे; म्हणून इकडे येऊन या गोष्टी आमच्याशी बोल.” तेव्हा मी त्याला असे उत्तर पाठविले, “तू जे काही बोलत आहेस त्यातील काहीही घडणार नाही; या सर्व तुझ्या कल्पनेतील गोष्टी आहेत.” “यामुळे त्यांच्या हातातील शक्ती गळून पडेल व ते त्यांचे काम पूर्ण करू शकणार नाहीत” असा विचार करून ते आम्हाला भीती दाखविण्याचा प्रयत्न करीत होते. पण मी प्रार्थना केली, “आता माझे बाहू बळकट करा.” एक दिवस मी महेटाबेलाचा पुत्र दलायाहचा पुत्र शमायाह याच्या घरी गेलो, जो त्याच्या घराबाहेर पडत नसे. तो म्हणाला, “आपण परमेश्वराच्या भवनात भेटू या, मंदिराची दारे व कड्या लावून घेऊ, कारण तुला ठार मारण्यास माणसे येत आहेत—आज रात्री ते तुला ठार करण्यासाठी येतील.” पण मी म्हणालो, “माझ्यासारख्या मनुष्याने पळून जावे काय? अथवा माझ्यासारख्याने स्वतःचा प्राण वाचविण्याकरिता मंदिरात लपून बसावे? मी मुळीच जाणार नाही!” नंतर मला समजले की परमेश्वराने त्याला पाठविले नव्हते, परंतु तोबीयाह व सनबल्लट यांनी माझ्याविरुद्ध भविष्यवाणी करण्यासाठी त्याला लाच दिली होती. मी घाबरून माझ्याकडून असे पाप घडावे व त्यांना मजवर दोषारोप करावा, मग मी निंदेस पात्र व्हावे, अशा उद्देशानेच त्यांनी शमायाहला या कामासाठी घेतले होते. हे माझ्या परमेश्वरा, तोबीयाह, सनबल्लट हे माझ्याशी कसे वागले हे विसरू नका. नोअद्याह संदेष्टी व इतर संदेष्टे ज्यांनी मला भीती घालण्याचा प्रयत्न केला, त्यांनाही तुम्ही विसरू नका. शेवटी बावन्न दिवसांच्या अवधीत, एलूल महिन्याच्या पंचविसाव्या दिवशी तट बांधून तयार झाला. आमच्या शत्रूंनी व आजूबाजूच्या देशांनी याबद्दल ऐकले, तेव्हा ते घाबरले आणि त्यांचा आत्मविश्वास ढासाळला, कारण हे कार्य आमच्या परमेश्वराच्या मदतीनेच झाले आहे, याची त्यांना जाणीव झाली.