YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नहेम्या 2:1-10

नहेम्या 2:1-10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

अर्तहशश्त राजाच्या कारकिर्दीच्या विसाव्या वर्षी नीसान महिन्यात त्याने द्राक्षरस निवडला होता आणि मी द्राक्षरस घेतला आणि तो राजाला दिला. यापूर्वी मी कधी त्याच्या उपस्थितीत असताना उदास झालो नव्हतो. म्हणून राजाने मला विचारले, “तुझा चेहरा असा उदास का दिसतो? तू आजारी दिसत नाहीस. तू तर मनातून दु:खी दिसतोस.” मग मी फार घाबरलो. मी राजाला म्हणालो, “राजा चिरायु होवो! माझ्या पूर्वजांच्या जेथे कबरी आहेत ते नगर उद्ध्वस्त झाले आहे, नगराच्या वेशीसुध्दा आगीत भस्म झाल्या आहेत, तर माझा चेहरा उदास का होणार नाही?” यावर राजा मला म्हणाला, “तुझ्यासाठी मी काय करावे असे तुला वाटते?” मी स्वर्गातील देवाची प्रार्थना केली. मग मी राजाला उत्तर दिले, “महाराजांची मर्जी असेल आणि आपल्या दासावर आपली कृपादृष्टी झाली असेल तर मला माझ्या पूर्वजांच्या कबरी जेथे आहेत त्या यहूदातील यरूशलेमास जाऊन नगराची पुन्हा बांधणी करण्यास पाठवा.” (राणीसुद्धा त्याच्याजवळच बसलेली होती) राजाने मला विचारले, “तुला या कामासाठी जाऊन यायला किती दिवस लागतील? तू परत केव्हा येशील?” राजा मला आनंदाने पाठविण्यास तयार झाला जेव्हा मी त्यास वेळ ठरवून दिली. मग मी राजाला असेही म्हणालो, “राजाची माझ्यावर मर्जी असेल तर माझी आणखी एक विनंती आहे. मी यहूदा देशी पोहचेपर्यंत नदीच्या पश्चिमेकडील प्रदेशातून जाऊ देण्याविषयी तेथल्या अधिकाऱ्यांच्या नावानिशी पत्रे द्यावीत. प्रार्थनामंदिराच्या भोवतालच्या व नगराच्या भिंती आणि माझे घर यांच्यासाठी मला मजबूत लाकूड लागणार आहे. त्यासाठी राजाचा वनाधिकारी आसाफ याला पत्र द्यावे.” राजाने मला तशी पत्रे आणि मी मागितले ते सर्वकाही दिले. देवाची माझ्यावर कृपा असल्यामुळे राजाने हे दिले. मग मी नदीच्या पश्चिमेकडे असलेल्या, प्रदेशाच्या अधिकाऱ्यांकडे गेलो आणि त्यांना राजाने दिलेली पत्रे दिली. राजाने माझ्यासोबत सैन्यातले अधिकारी आणि घोडेस्वारही पाठवले होते. होरोनी शहराचा सनबल्लट आणि अम्मोनी तोबीया यांना माझा बेत ऐकून माहीत होता, इस्राएलींच्या मदत शोधण्यासाठी कोणी एकजण आला आहे म्हणून ते खूप नाराज झाले.

सामायिक करा
नहेम्या 2 वाचा

नहेम्या 2:1-10 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

पुढे अर्तहशश्तच्या राजवटीच्या विसाव्या वर्षी, निसान महिन्यामध्ये एके दिवशी, राजाला द्राक्षारस देण्यात आला, तेव्हा मी प्याला भरला व राजाला दिला. आजपर्यंत मी राजाच्या उपस्थितीत कधीही दुःखी असा दिसलो नव्हतो. म्हणून राजाने मला विचारले, “तू आजारी नसताना तुझा चेहरा एवढा खिन्न का दिसतो? तुझ्या मनात निराशा असल्याशिवाय असे होणार नाही.” मी घाबरलो, पण मी राजाला उत्तर दिले, “महाराज, अनंतकाळ चिरंजीव राहोत! माझा चेहरा दुःखी का असू नये, कारण ज्या नगरामध्ये माझ्या पूर्वजांना पुरले आहे, त्या नगराचा विध्वंस झाला आहे व त्याच्या वेशी जाळून टाकल्या आहेत.” राजाने मला विचारले, “तुझी काय इच्छा आहे?” स्वर्गातील परमेश्वराची मनात प्रार्थना करून मी उत्तर दिले, “महाराज प्रसन्न असतील आणि त्यांचा सेवक शाही मर्जीतील असेल, तर जिथे माझ्या पूर्वजांना दफन केले आहे त्या नगराची पुनर्बांधणी करण्यासाठी महाराजांनी मला यहूदीयाला पाठवावे.” नंतर राजाच्या शेजारी राणी बसलेली असताना, राजाने मला विचारले, “किती काळासाठी तुला जावे लागेल व तू केव्हा परत येशील?” मला पाठविण्याचे राजाच्या मर्जीस आले म्हणून मी माझ्या जाण्याची वेळ ठरविली. पुढील गोष्टींसाठी देखील मी विनंती केली, “महाराज, आपण माझ्यावर प्रसन्न असाल, तर कृपा करून फरात नदीच्या पश्चिमेकडील राज्यपालांसाठी मजजवळ पत्रे द्यावी, म्हणजे त्यांनी मला त्यांच्या प्रांतातून यहूदीयाला सुखरुपपणे प्रवास करू द्यावा. एक पत्र शाही जंगलाचा व्यवस्थापक आसाफ यांच्यासाठीही द्यावे. त्या पत्रामध्ये मंदिराशेजारी असलेल्या गढीच्या दरवाजांसाठी, शहराच्या कोटासाठी व माझ्या घराला लागणार्‍या तुळयांसाठी लाकूड देण्याबद्दल त्याला आज्ञा द्यावी.” माझ्यावर परमेश्वराची हस्तकृपा असल्यामुळे राजाने या विनंत्या मान्य केल्या. मी फरात नदीच्या पश्चिमेकडील प्रांतात पोहोचलो, तेव्हा मी राजाची पत्रे तेथील राज्यपालांना दिली. राजाने माझ्या संरक्षणासाठी लष्करी अधिकारी व घोडेस्वार सैनिक माझ्याबरोबर पाठविले होते. पण होरोनी सनबल्लट व अम्मोनी अधिकारी तोबीयाह यांना हे जेव्हा समजले तेव्हा ते फारच अस्वस्थ झाले, की कोणीतरी इस्राएलला मदत करण्यासाठी आले आहे.

सामायिक करा
नहेम्या 2 वाचा

नहेम्या 2:1-10 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

अर्तहशश्त राजाच्या कारकिर्दीच्या विसाव्या वर्षी नीसान महिन्यात राजापुढे द्राक्षारस ठेवलेला होता तो मी उचलून राजाला दिला. ह्यापूर्वी मी कधीही त्याच्यासमोर खिन्न दिसलो नव्हतो. राजा मला म्हणाला, “तू आजारी नसून तुझे तोंड का उतरले आहे? तुझ्या मनाला काहीतरी खेद होत असला पाहिजे.” तेव्हा मी फार भ्यालो. मी राजाला म्हणालो, “महाराज चिरायू होवोत; माझ्या वाडवडिलांच्या कबरा जेथे आहेत ते नगर उजाड पडले आहे, त्याच्या वेशी अग्नीने जळून गेल्या आहेत, तर माझे तोंड का उतरणार नाही?” राजाने मला विचारले, “तुझी विनंती काय आहे?” तेव्हा मी स्वर्गीच्या देवाची प्रार्थना केली, आणि राजाला म्हटले, “महाराजांची मर्जी असली आणि आपण आपल्या दासावर प्रसन्न असलात तर यहूदा देशात, माझ्या पूर्वजांच्या कबरा असलेल्या नगरास मला पाठवा म्हणजे मी ते बांधीन.” राजाजवळ राणी बसली असता तो मला म्हणाला, “तुझ्या प्रवासास किती दिवस लागतील व तू केव्हा परत येशील?” नंतर मला पाठवण्याचे राजाच्या मर्जीस आले व मी मुदत ठरवून त्याला कळवली. मग मी राजाला म्हणालो, “महाराजांच्या मर्जीस आल्यास मी यहूदा देशात पोहचेपर्यंत महानदाच्या पश्‍चिमेकडील प्रदेशातून जाऊ देण्याविषयी तेथल्या अधिपतींच्या नावांवर मला पत्रे द्यावीत; आणि महाराजांच्या जंगलाचा अधिपती आसाफ ह्याला असे पत्र द्यावे की मंदिराच्या गढीच्या दरवाजांसाठी तुळया काढण्यासाठी, शहराच्या कोटासाठी आणि मी जाऊन राहीन त्या घरासाठी त्याने मला लाकडे द्यावीत.” माझ्या देवाचा वरदहस्त माझ्यावर होता म्हणून राजाने माझी मागणी मान्य केली. मग मी महानदाच्या पश्‍चिमेकडील प्रांताधिपतींकडे जाऊन त्यांना राजाची फर्माने दिली. राजाने माझ्याबरोबर सेनानायक व घोडेस्वार पाठवले होते. कोणी मनुष्य इस्राएल वंशाचे कल्याण साध्य करण्यास आला आहे हे होरोनी सनबल्लट आणि अम्मोनी तोबीया नावाचा दास ह्या दोघांनी ऐकले, तेव्हा त्यांना फार वाईट वाटले.

सामायिक करा
नहेम्या 2 वाचा