YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मार्क 7:1-23

मार्क 7:1-23 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

काही परूशी आणि नियमशास्त्राचे शिक्षक जे यरूशलेम शहराहून आले होते, ते येशूभोवती जमले. आणि त्यांनी त्याच्या काही शिष्यांना अशुद्ध, म्हणजे विधीग्रंथ हात न धुता जेवताना पाहिले. कारण परूशी व इतर सर्व यहूदी वाडवडिलांचे नियम पाळून विशिष्ट रीतीने नीट हात धुतल्याशिवाय जेवत नाहीत. बाजारातून आणलेली कुठलीही वस्तू धुतल्याशिवाय ते खात नाहीत. त्यांच्या पूर्वजांच्या इतर अनेक चालारीती ते पाळतात आणि प्याले, घागरी, तांब्याची भांडी धुणे अशा दुसरे इतर नियमही पाळतात. मग परूशी व नियमशास्त्राचे शिक्षक यांनी येशूला विचारले, “तुझे शिष्य वाडवडिलांच्या नियम प्रमाणे का जगत नाहीत? हात न धुता का जेवतात?” येशू त्यांना म्हणाला, “यशयाने जेव्हा तुम्हा ढोंगी लोकांविषयी भविष्य केले तेव्हा त्याचे बरोबरच होते. यशया लिहितो, ‘हे लोक ओठांनी माझा सन्मान करतात परंतु त्याची अंतःकरणे माझ्यापासून दूर आहेत. ते व्यर्थ माझी उपासना करतात कारण ते लोकांस शास्त्र म्हणून जे शिकवतात ते मनुष्यांनी केलेले नियम असतात.’ तुम्ही देवाच्या आज्ञांचा त्याग केला असून, आता तुम्ही मनुष्याची परंपरा पाळत आहात.” आणखी तो त्यांना म्हणाला, “तुम्ही आपल्या परंपरा पाळण्याकरता देवाची आज्ञा मोडण्यासाठी सोयीस्कर पद्धत शोधून काढली आहे. मोशेने सांगितले आहे की, ‘तू आपल्या आई-वडीलांचा सन्मान कर आणि जो मनुष्य आपल्या वडिलांबद्दल किंवा आईबद्दल वाईट बोलतो, त्यास ठार मारलेच पाहिजे.’ परंतु तुम्ही शिकविता, एखादा मनुष्य आपल्या वडिलांना व आईला असे म्हणू शकतो की, ‘तुम्हास मदत करण्यासाठी माझ्याकडे थोडे फार आहे, परंतु तुम्हास मदत करण्यासाठी मी ते वापरणार नाही, मी ते देवाला अर्पण करण्याचे ठरवले आहे.’ तर तुम्ही त्यास त्याच्या वडिलांसाठी किंवा आईसाठी पुढे काहीच करू देत नाही. अशाप्रकारे तुम्ही आपला संप्रदाय चालू ठेवून देवाचे वचन रद्द करता आणि यासारख्या पुष्कळ गोष्टी करता.” तेव्हा येशूने लोकसमुदायाला पुन्हा बोलावून म्हटले, “प्रत्येकाने माझे ऐका व हे समजून घ्या. बाहेरून मनुष्याच्या आत जाऊन त्यास अपवित्र करील असे काही नाही, तर मनुष्याच्या आतून जे निघते तेच त्यास अपवित्र करते. ज्या कोणाला ऐकण्यास कान आहेत तो ऐको.” लोकसमुदायाला सोडून येशू घरात गेला तेव्हा शिष्यांनी त्यास या दाखल्याविषयी विचारले, तो त्यांना म्हणाला, “तुम्हास देखील हे समजत नाही काय? जे बाहेरून मनुष्याच्या आत जाते ते त्यास अपवित्र करीत नाही हे तुम्हास समजत नाही का? कारण ते त्याच्या अंतःकरणात जात नाही तर त्याच्या पोटात जाते नंतर ते विष्ठेद्वारे शरीराबाहेर पडते.” असे सांगून सर्वप्रकारचे अन्न त्याने शुद्ध घोषित केले. आणखी तो म्हणाला, “जे मनुष्याच्या अंतःकरणातून बाहेर पडते ते मनुष्यास अपवित्र करते. कारण आतून म्हणजे अंतःकरणातून वाईट विचार बाहेर पडतात. जारकर्म, चोरी, खून, व्यभिचार, लोभ, वाईटपणा, कपट, असभ्यता, मत्सर, शिव्यागाळी, अहंकार आणि मूर्खपणा, या सर्व वाईट गोष्टी आतून बाहेर पडतात आणि मनुष्यास अपवित्र करतात.”

सामायिक करा
मार्क 7 वाचा

मार्क 7:1-23 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

परूशी आणि यरुशलेम नगरातून आलेले नियमशास्त्राचे काही शिक्षक येशूंच्या भोवती गोळा झाले. येशूंचे काही शिष्य अशुद्ध हाताने, म्हणजे हात न धुताच जेवतात, असे त्यांनी पाहिले होते. परूशी आणि सर्व यहूदी लोक, वाडवडिलांच्या परंपरेस अनुसरून आपले हात विधिपूर्वक धुतल्याशिवाय कधीही जेवत नसत. ज्यावेळी ते बाजारातून घरी येत, त्या त्यावेळेस हात धुतल्याशिवाय ते जेवत नसत. भांडी, पातेली, ताटे वगैरे धुण्यासंबंधीच्या अनेक रूढी ते पाळीत असत. या कारणामुळे परूशी आणि नियमशास्त्राच्या शिक्षकांनी येशूंना विचारले, “तुमचे शिष्य आपल्या वाडवडिलांच्या परंपरा प्रमाणे का वागत नाहीत व ते आपले हात अशुद्ध असताना का जेवतात?” यावर येशूंनी उत्तर दिले, “यशया संदेष्ट्याने तुमच्या ढोंगीपणाचे अचूक वर्णन केले आहे; तो म्हणतो: “ ‘हे लोक त्यांच्या ओठांनी माझा सन्मान करतात, पण त्यांची हृदये माझ्यापासून फार दूर आहेत. माझी उपासना ते व्यर्थपणे करतात; त्यांची शिकवण हे केवळ मनुष्यांनी केलेले नियमच असतात.’ तुम्ही परमेश्वराने दिलेल्या आज्ञा टाळता आणि मनुष्याच्या परंपरेला चिटकून बसता.” आणि पुढे ते म्हणाले, “तुमच्या रीती पाळण्यासाठी, परमेश्वराच्या आज्ञा टाळण्याचा सुलभ मार्ग तुम्हाला माहीत आहे! मोशे म्हणाला, ‘तुझ्या आईवडिलांचा मान राख,’ आणि ‘जो कोणी त्यांच्या आई किंवा वडिलांना शाप देतो तो मरणदंडास पात्र व्हावा.’ परंतु तुम्ही म्हणता, जर कोणी असे घोषित करतो की, आईवडिलांना करत असलेली मदत, ही ‘परमेश्वराला समर्पित’ आहे ते अर्पण आहे— त्यामुळे तुम्ही त्यांना आई वडिलांसाठी काहीही करण्यास मनाई करता. या ज्या तुमच्या परंपरा पूर्वजांपासून चालत आलेल्या आहेत, त्यासाठी तुम्ही परमेश्वराचे वचन रद्द करता आणि अशा प्रकारच्या पुष्कळच गोष्टी तुम्ही करता.” मग येशूंनी समुदायाला आपल्याकडे बोलावले व त्यांना म्हणाले, “तुम्ही सर्वजण ऐका आणि हे समजून घ्या. अशी कोणतीच गोष्ट नाही की जी बाहेरून मनुष्यामध्ये प्रवेश करून त्याला अशुद्ध करू शकेल. वास्तविक मनुष्यामधून जे बाहेर पडते, तेच त्याला अशुद्ध करते. ज्याला ऐकावयास कान आहेत, तो ऐको.” गर्दीतून निघून घरी गेल्यावर, शिष्यांनी त्यांना दाखल्याचा अर्थ विचारला. “तुम्ही इतके मतिमंद आहात काय?” त्यांनी विचारले, “जे काही मनुष्यामध्ये बाहेरून शिरते ते त्याला अशुद्ध करू शकत नाही, हे तुम्ही पाहू शकत नाही काय? ते त्यांच्या हृदयात जात नाही पण पोटात उतरते आणि नंतर शरीरातून बाहेर पडते.” या म्हणण्यावरून सर्व अन्न शुद्ध आहे, असे येशूंनी जाहीर केले. ते पुढे म्हणाले, “मनुष्यामधून जे बाहेर पडते तेच मनुष्याला अशुद्ध करते. कारण आतून, मनुष्याच्या हृदयातून, दुष्ट विचार, खून, जारकर्म, व्यभिचार, चोरी, लैंगिक पापे, बदफैलीपणा, दुष्कृत्ये, फसवेगिरी, कामातुरपणा, मत्सर, निंदा, गर्विष्ठपणा आणि मूर्खपणा या सर्व अमंगळ गोष्टी आतून निघतात आणि मनुष्याला अशुद्ध करतात.”

सामायिक करा
मार्क 7 वाचा

मार्क 7:1-23 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

तेव्हा परूशी व यरुशलेमेहून आलेले कित्येक शास्त्री एकत्र जमून त्याच्याकडे आले. त्यांनी त्याच्या काही शिष्यांना अशुद्ध म्हणजे न धुतलेल्या हातांनी जेवताना पाहिले होते. परूशी व इतर सर्व यहूदी वाडवडिलांच्या संप्रदायाला अनुसरून हात नीट धुतल्यावाचून जेवत नाहीत; बाजारातून आल्यावर पाणी शिंपडल्याशिवाय ते जेवत नाहीत; आणि प्याले, घागरी, पितळेची भांडी धुणे व असल्या बर्‍याच दुसर्‍या रूढी ते पाळतात. ह्यावरून परूश्यांनी व शास्त्र्यांनी त्याला विचारले, “आपले शिष्य हात न धुता जेवतात, वाडवडिलांच्या संप्रदायाप्रमाणे ते का चालत नाहीत?” त्याने त्यांना उत्तर दिले, “तुम्हा ढोंग्यांविषयी यशयाने चांगलाच संदेश देऊन ठेवला आहे. त्याचा लेख असा : ‘हे लोक ओठांनी माझा सन्मान करतात, परंतु त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे. ते व्यर्थ माझी उपासना करतात, कारण ते शास्त्र म्हणून जे शिकवतात, ते असतात मनुष्यांचे नियम.’ तुम्ही देवाची आज्ञा बाजूला सारून देता व माणसांच्या संप्रदायाला चिकटून राहता. [म्हणजे घागरी व प्याले धुणे व ह्यांसारखीच इतर अनेक कामे करता.]” आणखी तो त्यांना म्हणाला, “तुम्ही आपला संप्रदाय पाळण्याकरता देवाची आज्ञा मोडण्याचा छान मार्ग शोधून काढला आहे! कारण मोशेने सांगितले आहे की, ‘तू आपला बाप व आपली आई ह्यांचा मान राख’ आणि ‘जो कोणी आपल्या बापाची किंवा आईची निंदा करतो त्याला देहान्त शिक्षा व्हावी.’ परंतु तुम्ही म्हणता जर एखादा आपल्या बापाला अथवा आईला म्हणाला की, ‘जे मी तुम्हांला पोषणासाठी द्यायचे ते कुर्बान म्हणजे अर्पण केले आहे,’ तर तुम्ही त्याला आपल्या बापासाठी किंवा आईसाठी पुढे काही करू देत नाही; अशा प्रकारे तुम्ही आपला संप्रदाय चालू ठेवून देवाचे वचन रद्द करता आणि ह्यासारख्या आणखी पुष्कळ गोष्टी करता.” तेव्हा त्याने लोकसमुदायाला पुन्हा बोलावून म्हटले, “तुम्ही सर्व जण माझे ऐका व समजून घ्या; बाहेरून माणसाच्या आत जाऊन त्याला भ्रष्ट करील असे काही नाही; तर माणसाच्या आतून जे निघते तेच त्याला भ्रष्ट करते. ज्या कोणाला ऐकण्यास कान आहेत तो ऐको.” तो लोकसमुदायातून निघून घरी गेल्यावर त्याच्या शिष्यांनी त्याला त्या दाखल्याविषयी विचारले. तो त्यांना म्हणाला, “तुम्हीदेखील इतके अज्ञानी आहात की काय? जे काही बाहेरून माणसाच्या आत जाते ते त्याला भ्रष्ट करू शकत नाही, हे तुम्हांला समजत नाही काय? कारण ते त्याच्या अंतःकरणात नव्हे तर त्याच्या पोटात जाते व शौचकूपात बाहेर पडते.” अशा रीतीने त्याने सर्व प्रकारचे अन्न शुद्ध ठरवले. आणखी तो म्हणाला, “जे माणसातून बाहेर निघते तेच माणसाला भ्रष्ट करते. कारण आतून म्हणजे माणसाच्या अंतःकरणातून वाईट विचार निघतात; जारकर्मे, चोर्‍या, खून, व्यभिचार, लोभ, दुष्टपणा, कपट, कामातुरपणा, हेवा, शिवीगाळ, अहंकार, मूर्खपणा. ह्या सर्व वाईट गोष्टी आतून बाहेर निघतात व माणसाला भ्रष्ट करतात.”

सामायिक करा
मार्क 7 वाचा

मार्क 7:1-23 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

त्यावेळी काही परुशी व यरुशलेमहून आलेले शास्त्री येशूभोवती एकत्र जमले. त्यांनी त्याच्या काही शिष्यांना अशुद्ध म्हणजे न धुतलेल्या हातांनी जेवताना पाहिले होते. परुशी व इतर सर्व यहुदी वाडवडिलांच्या रूढीला अनुसरून हात धुतल्यावाचून जेवत नसत. बाजारातून आणलेल्या वस्तू प्रथम धुतल्याशिवाय ते खात नसत. तसेच पेले, घागरी व पितळेची भांडी धुणे, अशा बऱ्याच इतर रूढी ते पाळत असत. म्हणूनच परुश्यांनी व शास्त्र्यांनी त्याला विचारले, “आपले शिष्य हात न धुता जेवतात, वाडवडिलांच्या रूढीप्रमाणे ते का चालत नाहीत?” त्याने त्यांना उत्तर दिले, “तुम्हां ढोंग्यांविषयी यशयाने योग्य भाकीत करून ठेवले आहे. त्याचा लेख असा: हे लोक ओठांनी माझा सन्मान करतात, परंतु त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे. ते माझी व्यर्थ उपासना करतात, कारण ते धर्मशास्त्र म्हणून मनुष्यांचे नियम शिकवतात. तुम्ही देवाची आज्ञा बाजूला सारून माणसांच्या परंपरेला चिकटून राहता.” नंतर तो त्यांना म्हणाला, “तुम्ही तुमची परंपरा पाळण्याकरता देवाची आज्ञा मोडता! कारण मोशेने सांगितले आहे, ‘तू आपले वडील व आपली आई ह्यांचा मान राख आणि जो कोणी आपल्या वडिलांची किंवा आईची निंदा करतो, त्याला देहान्त शिक्षा व्हावी.’ परंतु तुम्ही म्हणता, जर एखादा आपल्या वडिलांना अथवा आईला म्हणाला, ‘जे मी तुम्हांला पोषणासाठी द्यायचे ते कुर्बान म्हणजे देवाला अर्पण केले आहे’, तर तुम्ही त्याला आपल्या वडिलांसाठी किंवा आईसाठी पुढे काही करण्यापासून सूट देता. अशा प्रकारे, तुम्ही आपली परंपरा चालू ठेवून देवाचे वचन रद्द करता आणि ह्यासारख्या आणखी पुष्कळ गोष्टी करता.” त्यानंतर येशूने लोकसमुदायाला पुन्हा जवळ बोलावून म्हटले, “तुम्ही सर्व जण माझे ऐका व समजून घ्या. बाहेरून माणसाच्या आत जाऊन त्याला अशुद्ध करील असे काही नाही, तर माणसाच्या आतून जे निघते, तेच त्याला अशुद्ध करते. [ज्याला कान आहेत त्याने ऐकावे.”] तो लोकसमुदायातून निघून घरी गेल्यावर त्याच्या शिष्यांनी त्याला त्या विधानाचे स्पष्टीकरण विचारले. तो त्यांना म्हणाला, “तुम्हीदेखील इतके अज्ञानी आहात की काय? जे काही बाहेरून माणसाच्या आत जाते, ते त्याला अशुद्ध करू शकत नाही, हे तुम्हांला समजत नाही काय? कारण ते त्याच्या अंतःकरणात नव्हे तर त्याच्या पोटात जाते व नंतर शरीराबाहेर जाते.” [अशा रीतीने त्याने सर्व प्रकारचे अन्न शुद्ध ठरवले.] आणखी तो म्हणाला, “जे माणसातून बाहेर निघते, तेच माणसाला अशुद्ध करते, कारण आतून म्हणजे माणसाच्या अंतःकरणातून वाईट कल्पना निघतात. व्यभिचार, जारकर्मे, खून, चोऱ्या, लोभ, दुष्टपणा, कपट, कामातुरपणा, हेवा, निंदानालस्ती, अहंकार व मूर्खपणा, ह्या सर्व वाईट गोष्टी आतून बाहेर निघतात व माणसाला अशुद्ध करतात.”

सामायिक करा
मार्क 7 वाचा