मार्क 6:33-56
मार्क 6:33-56 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
लोकांनी त्यांना निघताना पाहिले व पुष्कळ जणांनी त्यांना ओळखले; आणि तेथल्या सर्व गावांतून लोक पायीच निघाले व धावत जाऊन त्यांच्याअगोदर तिकडे पोहचले. येशू मचव्यातून उतरला तेव्हा त्याने लोकांचा मोठा समुदाय पाहिला; ते तर ‘मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे’ होते, म्हणून त्याला त्यांचा कळवळा आला; आणि तो त्यांना बर्याच गोष्टींविषयी शिक्षण देऊ लागला. दिवस बराच उतरल्यावर त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, “ही अरण्यातली जागा आहे व आता दिवस फार उतरला आहे; तेव्हा लोकांनी भोवतालच्या खेड्यापाड्यांत जाऊन स्वतःकरता खायला काही विकत घ्यावे म्हणून त्यांना निरोप द्या. [कारण त्यांच्याजवळ खायला काही नाही.”] त्याने त्यांना उत्तर दिले, “तुम्हीच त्यांना खायला द्या.” ते त्याला म्हणाले, “काय, आम्ही जाऊन दोनशे रुपयांच्या भाकरी विकत घेऊन त्यांना खायला द्याव्यात?” तो त्यांना म्हणाला, “तुमच्याजवळ किती भाकरी आहेत? जाऊन पाहा.” पाहिल्यावर ते म्हणाले, “पाच, व दोन मासे.” नंतर त्याने त्या सर्व लोकांना हिरवळीवर गटागटाने बसायला सांगितले. तेव्हा ते शंभरशंभर व पन्नासपन्नास असे पंक्तीपंक्तीने बसले. मग त्याने त्या पाच भाकरी व ते दोन मासे घेऊन वर स्वर्गाकडे पाहून आशीर्वाद दिला आणि भाकरी मोडल्या व त्या त्यांना वाढण्यास आपल्या शिष्यांजवळ दिल्या. ते दोन मासेही सर्वांना वाटून दिले. मग सर्व जण जेवून तृप्त झाले. आणि त्यांनी उरलेल्या तुकड्यांच्या बारा टोपल्या भरून घेतल्या आणि माशांचेही तुकडे नेले. भाकरी खाणारे [सुमारे] पाच हजार पुरुष होते. नंतर, ‘मी लोकसमुदायाला निरोप देतो आणि तुम्ही मचव्यात बसून पलीकडे बेथसैदा येथे जा,’ असे सांगून त्याने लगेचच शिष्यांना लावून दिले. मग लोकांना निरोप देऊन तो प्रार्थना करायला डोंगरावर गेला. आणि रात्र झाली तेव्हा तो मचवा समुद्राच्या मध्यभागी होता व तो (येशू) एकटाच जमिनीवर होता. त्याला ते वल्ही मारता मारता हैराण झालेले दिसले कारण वारा तोंडचा होता. नंतर रात्री चौथ्या प्रहराच्या सुमारास तो समुद्रावरून चालत त्यांच्याकडे आला. त्यांच्याजवळून पुढे जाण्याचा त्याचा बेत होता; पण त्याला समुद्रावरून चालताना पाहून, हे भूत आहे असे त्यांना वाटले व ते ओरडले; कारण त्याला पाहून ते सर्व घाबरून गेले होते. तेव्हा तो लगेच त्यांच्याबरोबर बोलू लागला व त्यांना म्हणाला, “धीर धरा; मी आहे; भिऊ नका.” आणि तो त्यांच्याकडे मचव्यात चढून गेला; तेव्हा वारा पडला; मग ते मनातल्या मनात फारच आश्चर्यचकित झाले. कारण भाकरींची गोष्ट त्यांना उमगली नव्हती, त्यांचे अंतःकरण कठीण झाले होते. नंतर ते पलीकडे जाऊन गनेसरेताच्या किनार्यास पोहचले व त्यांनी मचवा बांधून ठेवला. ते मचव्यातून उतरताच लोकांनी त्याला ओळखले. आणि ते आसपासच्या सर्व भागांत चोहोकडे धावपळ करत फिरले व जेथे कोठे तो आहे म्हणून त्यांच्या कानी आले, तेथे तेथे ते दुखणेकर्यांना बाजेवर घालून नेऊ लागले. तो खेड्यापाड्यांत, नगरांत किंवा शेतामळ्यांत कोठेही जावो, तेथे ते दुखणेकर्यांना भर बाजारात आणून ठेवत आणि आपल्या वस्त्राच्या गोंड्याला तरी स्पर्श करू द्या अशी त्याला विनंती करीत; आणि जितके त्याला स्पर्श करीत तितके बरे होत.
मार्क 6:33-56 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परंतु पुष्कळ लोकांनी त्यांना जाताना पाहिले व ते कोण आहेत हे त्यांना कळाले तेव्हा सर्व गावांतील लोक पायीच धावत निघाले व त्याच्या येण्याअगोदरच ते तेथे पोहोचले. येशू किनाऱ्याला आल्यावर, त्याने मोठा लोकसमुदाय पाहिला; ते मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे होते, म्हणून त्यास त्यांचा कळवळा आला; म्हणून तो त्यांना बऱ्याच गोष्टीविषयी शिक्षण देऊ लागला. दिवस बराच उतरल्यावर त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, “ही अरण्यातली जागा आहे व आता दिवस फार उतरला आहे. लोकांस जाऊ द्या म्हणजे ते भोवतालच्या शेतात व खेड्यात जाऊन त्यांच्यासाठी काहीतरी खायला विकत आणतील.” परंतु त्याने त्यास उत्तर दिले, “तुम्हीच त्यांना काहीतरी खावयास द्या.” ते त्यास म्हणाले, “आम्ही जाऊन त्यांना खाण्यासाठी दोनशे चांदीच्या नाण्याच्या भाकरी विकत आणाव्या काय?” तो त्यांना म्हणाला, “जा आणि पाहा की तुमच्याजवळ किती भाकरी आहेत?” पाहिल्यावर ते म्हणाले, “आमच्याजवळ पाच भाकरी आणि दोन मासे आहेत.” येशूने सर्व लोकांस आज्ञा केली की गटागटाने हिरवळीवर बसावे. तेव्हा ते शंभर शंभर व पन्नास पन्नास असे पंक्तीपंक्तीने बसले. येशूने पाच भाकरी आणि दोन मासे घेऊन वर स्वर्गाकडे पाहून, आशीर्वाद दिला आणि भाकरी मोडल्या व त्या लोकांस वाढण्यासाठी आपल्या शिष्यांजवळ दिल्या आणि दोन मासेसुद्धा वाटून दिले. मग ते सर्व जेवन करून तृप्त झाले. आणि त्यांनी उरलेल्या तुकड्यांच्या बारा टोपल्या भरून घेतल्या आणि माशांचेही तुकडे नेले. भाकरी खाणारे पाच हजार पुरूष होते. नंतर मी लोकसमुदायाला निरोप देतो आणि तुम्ही तारवात बसून पलीकडे बेथसैदा येथे जा, असे सांगून येशूने लगेचच शिष्यांना त्याच्यापुढे जाण्यास सांगितले. लोकांस निरोप देऊन तो प्रार्थना करण्यास डोंगरावर गेला. संध्याकाळ झाली तेव्हा तारू सरोवराच्या मध्यभागी होता आणि येशू एकटाच जमिनीवर होता. मग त्यांना वल्ही मारणे अवघड जात आहे असे त्यास दिसले, कारण वारा त्यांच्या विरुद्धचा होता. नंतर पहाटे तीन ते सहाच्या दरम्यान येशू सरोवरावरून चालत त्यांच्याकडे आला, त्यांच्याजवळून पुढे जाण्याचा त्याचा बेत होता. पण त्यास सरोवरातील पाण्यावरून चालतांना पाहिले, तेव्हा त्यांना ते भूत आहे असे वाटले व ते ओरडले. कारण त्या सर्वांनी त्यास पाहिले व ते घाबरून गेले. तो लगेच त्यांना म्हणाला, “धीर धरा, भिऊ नका, मी आहे.” नंतर तो त्यांच्याकडे तारवात गेला तेव्हा वारा शांत झाला. ते अतिशय आश्चर्यचकित झाले. कारण त्यांना भाकरीची गोष्ट समजली नव्हती आणि त्यांची मने कठीण झाली होती. त्यांनी सरोवर ओलांडल्यावर ते गनेसरेतला आले व तारु बांधून टाकले. ते तारवातून उतरताच लोकांनी येशूला ओळखले. आणि ते आसपासच्या सर्व भागात चोहोकडे धावपळ करीत फिरले व जेथे कोठे तो आहे म्हणून त्यांच्या कानी आले, तेथे तेथे लोक दुखणेकऱ्यांना बाजेवर घालून नेऊ लागले. तो गावात किंवा शेतमळ्यात कोठेही जावो, तेथे लोक दुखणेकऱ्यांना भर बाजारात आणून ठेवत आणि आपल्या वस्त्राच्या गोंड्याला तरी स्पर्श करू द्या अशी त्यास विनंती करीत आणि जितक्यांनी त्यास स्पर्श केला तितके बरे झाले.
मार्क 6:33-56 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
अनेकांनी त्यांना जाताना पाहिले व त्यांना ओळखले. तेव्हा नगरातील लोक त्यांच्याकडे पायी आले आणि त्यांच्या अगोदर तेथे पोहोचले. जेव्हा येशू होडीतून उतरले आणि त्यांनी मोठा समुदाय लोटला आहे हे पाहिले तेव्हा त्यांना त्यांचा कळवळा आला, कारण ते मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे होते. येशूंनी त्यांना पुष्कळ गोष्टी शिकविण्यास सुरुवात केली. दिवस मावळण्याच्या सुमारास, त्यांचे शिष्य त्यांच्याकडे आले आणि त्यांना म्हणाले, “ही ओसाड जागा आहे,” शिवाय “उशीरही होत चालला आहे. या लोकांना आसपासच्या खेड्यात आणि गावात जाऊन खाण्यासाठी अन्न विकत घ्यावे म्हणून निरोप द्या.” यावर येशू म्हणाले, “तुम्ही त्यांना काहीतरी खावयास द्या.” त्यांनी विचारले, “इतक्या लोकांना जेवू घालावयाचे म्हणजे अर्ध्या वर्षाच्या मजुरी पेक्षा अधिक रक्कम खर्च करावी काय?” ते म्हणाले, “तुमच्याजवळ किती भाकरी आहेत? जा आणि पाहा.” त्यांना कळाले तेव्हा ते म्हणाले, “पाच भाकरी आणि दोन मासे आहेत.” मग येशूंनी लोकांना गवतावर गटागटाने बसावयास सांगितले. त्याप्रमाणे लोक पन्नास आणि शंभर अशा गटांनी बसले. मग येशूंनी त्या पाच भाकरी व दोन मासे घेतले, स्वर्गाकडे पाहून त्याबद्दल आभार मानले आणि मग त्या भाकरीचे तुकडे करून ते शिष्यांजवळ लोकांना वाढण्यासाठी दिले आणि दोन मासळ्यांचेही असेच वाटप केले. ते सर्वजण पोटभर जेवले व समाधान पावले, आणि शिष्यांनी जेवणानंतर उरलेले भाकरीचे तुकडे व मासे गोळा केले त्यावेळी बारा टोपल्या भरल्या. तेथे जेवणार्या पुरुषांची संख्या सुमारे पाच हजार होती. लगेच येशूंनी आपल्या शिष्यांना होडीत बसून पलीकडे असलेल्या बेथसैदा या ठिकाणी त्यांच्यापुढे जाण्यास सांगितले आणि ते स्वतः लोकांना निरोप देण्यासाठी मागे राहिले. त्यांना निरोप दिल्यानंतर, येशू प्रार्थना करण्यासाठी डोंगरावर गेले. रात्र झाली, तेव्हा होडी सरोवराच्या मध्यावर गेली होती आणि ते एकटेच जमिनीवर होते. तेथून त्यांनी आपल्या शिष्यांना वल्ही मारणे कठीण जात आहे असे पाहिले, कारण वारा त्यांच्याविरुद्ध दिशेने वाहत होता. पहाटेच्या सुमारास येशू पाण्यावरून चालत त्यांच्याकडे आले. ते त्यांना ओलांडून पुढे जाऊ लागले, परंतु त्यांनी येशूंना सरोवरावरून चालत जाताना पाहिले, तेव्हा ते भूतच असले पाहिजे असे त्यांना वाटले व ते ओरडले, कारण त्या सर्वांनीच त्यांना पाहिले आणि ते फार घाबरले. पण तत्काळ येशू त्यांना म्हणाले, “धीर धरा, मी आहे! भिऊ नका.” मग ते होडीत चढले आणि वादळ शांत झाले. शिष्य आश्चर्याने थक्क झाले. कारण भाकरी संबंधात त्यांना समजले नव्हते आणि त्यांची हृदये कठीण झाली होती. ते पलीकडे गेल्यावर गनेसरेत येथे उतरले व त्यांनी होडी तेथे लावली, ते होडीतून उतरले न उतरले तोच, लोकांनी येशूंना ओळखले; लोक त्या संपूर्ण परिसरात धावत गेले आणि आजारग्रस्त लोकांना अंथरुणावर घालून ते जेथे कोठे आहे असे त्यांनी ऐकले तेथे त्यांच्याकडे घेऊन गेले. आणि जेथे कुठेही येशू गेले—खेडयापाडयात, शहरांत—बाजारपेठेत लोक आजार्यांना घेऊन जात आणि तुमच्या झग्याच्या काठाला तरी स्पर्श करू द्या अशी त्यांना विनंती करत आणि जितक्यांनी त्यांना स्पर्श केला तितके सर्व बरे झाले.
मार्क 6:33-56 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
पुष्कळ लोकांनी त्यांना निघताना पाहिले व लगेच त्यांना ओळखले. तेथल्या सर्व नगरांतून लोक त्वरेने पायीच निघाले व त्यांच्या आधी तिकडे पोहोचले. येशू मचव्यातून उतरला तेव्हा त्याने लोकांचा विशाल समुदाय पाहिला. ते तर मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे होते म्हणून त्याला त्यांचा कळवळा आला आणि तो त्यांना बऱ्याच गोष्टींविषयी प्रबोधन करू लागला. दिवस बराच उतरल्यावर त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, “ही एकाकी जागा आहे व आता दिवस मावळत आहे. लोकांनी भोवतालच्या खेड्यापाड्यांत जाऊन स्वतःकरता खायला काही विकत घ्यावे म्हणून त्यांना पाठवून द्या.” त्याने त्यांना उत्तर दिले, “तुम्हीच त्यांना खायला द्या.” ते त्याला म्हणाले, “काय, आम्ही जाऊन चांदीच्या दोनशे नाण्यांच्या भाकरी विकत घेऊन त्यांना खायला देऊ?” तो त्यांना म्हणाला, “तुमच्याजवळ किती भाकरी आहेत? जाऊन पाहा.” पाहिल्यावर ते म्हणाले, “पाच, शिवाय दोन मासे.” त्याने त्या सर्व लोकांना हिरवळीवर गटागटाने बसायला सांगितले. ते शंभरशंभर व पन्नासपन्नास असे पंक्तीपंक्तीने बसले, येशूने त्या पाच भाकरी व ते दोन मासे घेऊन स्वर्गाकडे पाहून परमेश्वराचे आभार मानले आणि भाकरी मोडल्या व त्या लोकांना वाढायला त्याच्या शिष्यांजवळ दिल्या. ते दोन मासेही सर्वांना वाटून दिले. सर्व जण जेवून तृप्त झाले. त्यानंतर त्यांनी भाकरीच्या व माशांच्या उरलेल्या तुकड्यांच्या बारा टोपल्या भरून घेतल्या. भोजन घेणाऱ्या पुरुषांची संख्या पाच हजार होती. ‘मी लोकसमुदायाला निरोप देतो. तुम्ही मचव्यातून सरोवरापलीकडे बेथसैदा येथे जा’, असे सांगून त्याने लगेच शिष्यांना पुढे पाठवले. लोकांना निरोप देऊन तो प्रार्थना करायला डोंगरावर गेला. सायंकाळ झाली, तेव्हा तो मचवा सरोवरात होता व येशू एकटाच जमिनीवर होता. शिष्य वल्ही मारतामारता हैराण झालेले त्याने पाहिले, कारण वारा विरुद्ध दिशेने वाहत होता. भल्या पहाटेस तीन ते सहाच्या दरम्यान येशू पाण्यावरून चालत त्यांच्याकडे आला. त्यांच्याजवळून पुढे जाण्याचा त्याचा रोख होता. त्याला जलाशयावरून चालताना पाहून, हे भूत आहे, असे त्यांना वाटले व ते ओरडले. त्याला पाहून ते सर्व घाबरून गेले होते. तो लगेच त्यांना म्हणाला, “धीर धरा, मी आहे, भिऊ नका.” तो त्यांच्याबरोबर मचव्यात चढला आणि वारा पडला. ते मनातल्या मनात खूपच आश्चर्यचकित झाले; कारण भाकरींविषयी त्यांना काही समजले नाही, अथवा खरे म्हणजे त्यांची अंतःकरणे कठीण झाली होती. त्यानंतर ते सरोवराच्या पलीकडे गनेसरेतच्या किनाऱ्यास पोहोचले व तेथे त्यांनी मचवा बांधून ठेवला. ते मचव्यातून उतरताच लोकांनी येशूला ओळखले. ते आसपासच्या परिसरात धावपळ करत फिरले व जेथे कोठे येशू आहे म्हणून त्यांच्या कानी आले, तेथे तेथे ते आजाऱ्यांना खाटेवर घालून आणू लागले. तो खेड्यापाड्यांत, नगरांत किंवा शेतामळ्यांत कोठेही जावो, ते रुग्णांना चौकात आणून ठेवत व “आपल्या वस्त्राच्या किनारीला तरी स्पर्श करू द्या”, अशी त्याला विनंती करत. जितक्यांनी त्याच्या वस्त्राच्या किनारीला स्पर्श केला तितके बरे झाले.