YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मार्क 6:1-20

मार्क 6:1-20 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

नंतर येशू तेथून नासोरी या त्याच्या नगरात आला आणि त्याचे शिष्य त्याच्यामागे आले. शब्बाथ दिवशी तो सभास्थानात शिकवीत होता. पुष्कळ लोकांनी त्याची शिकवण ऐकली तेव्हा ते थक्क झाले. ते म्हणाले, “या मनुष्यास ही शिकवण कोठून मिळाली? त्यास देवाने कोणते ज्ञान दिले आहे आणि याच्या हातून हे केवढे चमत्कार होतात? जो सुतार, मरीयेचा मुलगा आणि याकोब, योसे, यहूदा व शिमोन यांचा जो भाऊ तोच हा आहे ना?” आणि या आपल्याबरोबर आहेत त्या याच्या बहिणी नव्हेत काय? त्याचा स्वीकार करण्याविषयी त्यांना प्रश्न पडला. मग येशू त्यांना म्हणाला, “संदेष्ट्याचा सन्मान होत नाही असे नाही; मात्र त्याच्या नगरात, त्याच्या नातेवाईकात आणि त्याच्या कुटुंबात त्याचा सन्मान होत नसतो.” थोड्याशाच रोग्यांवर हात ठेवून त्याने त्यास बरे केले, याशिवाय दुसरे कोणतेही महत्कृत्य त्यास तेथे करता आले नाही. त्यांच्या अविश्वासामुळे त्यास आश्चर्य वाटले. नंतर येशू शिक्षण देत जवळपासच्या गावोगावी फिरला. नंतर येशूने बारा शिष्यांना आपणाकडे बोलावून घेतले व त्यांना जोडीजोडीने पाठवू लागला, त्याने त्यास अशुद्ध आत्म्यावरचा अधिकार दिला. आणि त्यास आज्ञा केली की, “काठीशिवाय प्रवासासाठी दुसरे काही घेऊ नका. भाकरी, झोळी किंवा कमरकशात पैसे घेऊ नका. तरी चपला घालून चाला; दोन अंगरखे घालू नका.” आणखी तो त्यास म्हणाला, “ज्या कुठल्याही घरात तुम्ही जाल तेथे तुम्ही ते शहर सोडीपर्यंत राहा. आणि ज्याठिकाणी तुमचे स्वागत होणार नाही किंवा तुमचे ऐकणार नाहीत तेथून निघताना, त्यांना साक्ष व्हावी म्हणून आपल्या तळ पायाची धूळ तेथेच झाडून टाका.” मग शिष्य तेथून निघाले आणि लोकांनी पश्चात्ताप करावा म्हणून त्यांनी घोषणा केली. त्यांनी पुष्कळ भूते काढली आणि अनेक रोग्यांना तैलाभ्यंग करून त्यांना बरे केले. हेरोद राजाने येशूविषयी ऐकले कारण येशूचे नाव सगळीकडे गाजले होते. काही लोक म्हणत होते, “बाप्तिस्मा करणारा योहान मरण पावलेल्यातून उठला आहे, म्हणून त्याच्याठायी चमत्कार करण्याचे सामर्थ्य आहे.” इतर लोक म्हणत, “येशू एलीया आहे.” तर काहीजण म्हणत, “हा संदेष्टा फार पूर्वीच्या संदेष्ट्यापैकी एक आहे.” परंतु हेरोदाने जेव्हा ऐकले तेव्हा तो म्हणाला, “ज्या योहानाचा मी शिरच्छेद केला तोच उठला आहे.” हेरोदाने स्वतः योहानाला पकडून तुरूंगात टाकण्याची आज्ञा दिली होती कारण त्याचा भाऊ फिलिप्प याची पत्नी हेरोदीया हिच्याबरोबर हेरोदाने लग्न केले होते. व योहान हेरोदाला सांगत असे की, “तू आपल्या भावाची पत्नी ठेवावीस हे शास्त्रानुसार नाही.” याकरिता हेरोदीयेने योहानाविरूद्ध मनात अढी धरली. ती त्यास ठार मारण्याची संधी पाहत होती. परंतु ती त्यास मारू शकली नाही, कारण योहान नीतिमान आणि पवित्र मनुष्य आहे हे जाणून हेरोद त्याचे भय धरीत असे व त्याचे संरक्षण करी. हेरोद योहानाचे बोलणे ऐके तेव्हा, फार गोंधळून जाई, तरी तो त्याचे म्हणणे आनंदाने ऐकून घेत असे.

सामायिक करा
मार्क 6 वाचा

मार्क 6:1-20 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

येशू तिथून निघाले व त्यांच्या शिष्यांसह स्वतःच्या गावी परतले. शब्बाथ आला त्यावेळी त्यांनी तेथील सभागृहामध्ये असलेल्या लोकांना शिक्षण देण्यास सुरुवात केली आणि ज्या सर्वांनी त्यांचे शिक्षण ऐकले ते आश्चर्यचकित झाले. त्यांनी विचारले, “या मनुष्याला हे कुठून प्राप्त झाले? कशाप्रकारचे हे सुज्ञान त्यांना देण्यात आले आहे? हा अद्भुत चमत्कारसुद्धा कसे करतो? हा एक सुतार नाही का? याची आई मरीया आणि याकोब, योसेफ, शिमोन, यहूदाह हे त्याचे भाऊ आहे ना? आणि याच्या बहिणी तर आपल्यातच आहेत ना” आणि ते त्याच्यावर संतापले. मग येशू त्यांना म्हणाले, “संदेष्टा सन्मानित होत नाही असे नाही; फक्त आपले गाव आणि आपले घर व नातेवाईक यांच्यात तो मान्यता पावत नाही.” काही आजार्‍यांवर हात ठेवून त्यांना बरे करण्याशिवाय तिथे त्यांनी काही चमत्कार केले नाहीत. त्यांच्या अविश्वासाबद्धल येशूंना नवल वाटले. मग येशू गावोगावी शिक्षण देत फिरले. त्यांनी बारा प्रेषितांना आपल्याकडे बोलाविले आणि त्यांना जोडीजोडीने बाहेर पाठविण्यास सुरुवात केली आणि त्यांना अशुद्ध आत्म्यांवर अधिकार दिला. त्यांनी त्यास सूचना दिली: “प्रवासाला जाताना काठीशिवाय तुमच्यासोबत अन्न, झोळी, कमरपट्ट्यात पैसे असे काहीही घेऊ नका. जोडे घाला, पण अतिरिक्त अंगरखा घेऊ नका. ज्यावेळी तुम्ही एखाद्या घरामध्ये प्रवेश कराल, त्यावेळी त्या गावातून निघेपर्यंत तिथेच राहा. एखाद्या ठिकाणी तुमचे स्वागत झाले नाही किंवा तुमचे ऐकले नाही, तर ते ठिकाण सोडून द्या व तुमच्या पायांची धूळ तिथेच झटकून टाका, ही त्यांच्याविरुद्ध साक्ष राहील.” त्याप्रमाणे शिष्य बाहेर पडले आणि लोकांनी पश्चात्ताप करावा असा त्यांनी संदेश दिला. त्यांनी पुष्कळ भुते काढली, अनेक आजार्‍यांना तैलाभ्यंग केले आणि त्यांना बरे केले. हेरोद राजाने याबद्दल ऐकले, कारण येशूंचे नाव सर्वठिकाणी प्रसिद्ध झाले होते. काहीजण म्हणत होते, “बाप्तिस्मा करणारा योहान मरणातून उठला आहे आणि म्हणूनच आश्चर्यकर्म करण्याचे सामर्थ्य त्यांच्यामध्ये दिसत आहे.” आणखी दुसरे म्हणाले, “हा एलीयाह आहे.” तर आणखी काही लोकांनी असा दावा मांडला, “तो प्राचीन संदेष्ट्यांसारखा एक संदेष्टा आहे.” परंतु हेरोदाने हे ऐकले, तेव्हा तो म्हणाला, “ज्या योहानाचा मी शिरच्छेद केला, तोच पुनः जिवंत झाला आहे!” कारण हेरोदाने योहानाला बांधून तुरुंगात टाकण्यासाठी हुकूम दिला होता. हेरोदाने हे यासाठी केले, की त्याचा भाऊ फिलिप्पाची पत्नी हेरोदिया हिच्याशी त्याने विवाह केला होता. कारण योहान हेरोदाला म्हणत असे, “आपला भाऊ फिलिप्पाची पत्नी हेरोदिया हिला तू ठेवावे हे नियमाने अयोग्य आहे.” यामुळे हेरोदियाने योहानाविरुद्ध डाव धरला होता आणि ती योहानाचा जीव घेण्यास पाहत होती. परंतु ती काही करू शकत नव्हती, कारण हेरोद योहानाला भीत असे आणि तो नीतिमान व पवित्र मनुष्य आहे म्हणून त्याचे संरक्षण करत असे. हेरोद योहानाचे बोलणे ऐकून गोंधळात पडत असे; तरी त्याचे ऐकून घ्यावयास त्याला आवडे असे.

सामायिक करा
मार्क 6 वाचा

मार्क 6:1-20 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

नंतर तो तेथून आपल्या गावी आला व त्याचे शिष्य त्याच्यामागे आले. मग शब्बाथ दिवशी तो सभास्थानात शिकवू लागला आणि पुष्कळ लोक त्याचे भाषण ऐकून थक्क झाले व म्हणाले, “ह्याला हे सर्व कोठून प्राप्त झाले? काय हे ज्ञान ह्याला देण्यात आले आहे आणि ह्याच्या हातून केवढी ही महत्कृत्ये होतात! जो सुतार, जो मरीयेचा मुलगा आणि याकोब, योसे, यहूदा व शिमोन ह्यांचा जो भाऊ तोच हा आहे ना? आणि ह्याच्या बहिणी येथे आपल्याबरोबर आहेत ना?” असे ते त्याच्याविषयी अडखळले. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “संदेष्ट्याचा सन्मान होत नाही असे नाही; मात्र त्याच्या देशात, त्याच्या आप्तेष्टांत अथवा घरच्या मंडळीत त्याचा सन्मान होत नसतो.” त्याने थोड्याच रोग्यांवर हात ठेवून त्यांना बरे केले, ह्याशिवाय दुसरे कोणतेही महत्कृत्य त्याला तेथे करता आले नाही. त्यांच्या अविश्वासामुळे त्याला आश्‍चर्य वाटले. मग तो शिक्षण देत गावोगाव फिरला. नंतर त्या बारा जणांना आपल्या जवळ बोलावून तो त्यांना जोडीजोडीने पाठवू लागला; त्याने त्यांना अशुद्ध आत्म्यांवरचा अधिकार दिला. आणि त्यांना आज्ञा केली की, ‘वाटेसाठी काठीवाचून दुसरे काही घेऊ नका; भाकरी, झोळणा, किंवा कमरकशात पैसे घेऊ नका. तरी वहाणा घालून चाला; दोन अंगरखे घालू नका.’ आणखी तो त्यांना म्हणाला, “तुम्ही कोठेही एखाद्याच्या घरी उतराल तेव्हा ते ठिकाण सोडीपर्यंत तेथेच राहा. आणि ज्या ठिकाणी तुमचे स्वागत होणार नाही व जेथील लोक तुमचे ऐकणार नाहीत, तेथून निघताना, त्यांना साक्ष व्हावी म्हणून आपल्या तळपायांची धूळ तेथेच झाडून टाका. [मी तुम्हांला खचीत सांगतो की, न्यायाच्या दिवशी त्या नगरापेक्षा सदोम व गमोरा ह्यांना सोपे जाईल].” ते तेथून निघाले व लोकांनी पश्‍चात्ताप करावा अशी त्यांनी घोषणा केली, पुष्कळ भुते काढली आणि अनेक रोग्यांना तैलाभ्यंग करून बरे केले. हेरोद राजाने त्याच्याविषयी ऐकले, कारण त्याचे नाव गाजले होते. लोक म्हणत होते, “बाप्तिस्मा करणारा योहान मेलेल्यांतून उठला आहे, म्हणून त्याच्या अंगी ही महत्कृत्ये दिसून येत आहेत.” कोणी म्हणत, “हा एलीया आहे.” कोणी म्हणत, “हा संदेष्टा म्हणजे संदेष्ट्यांपैकीच एक आहे.” परंतु हे ऐकून हेरोद म्हणाला, “ज्या योहानाचा मी शिरच्छेद केला तोच मेलेल्यांतून उठला आहे.” आपला भाऊ फिलिप्प ह्याची बायको हेरोदिया हिच्यामुळे हेरोदाने स्वतः माणसे पाठवून योहानाला पकडून कैदेत जखडून ठेवले होते; कारण हेरोदाने तिच्याबरोबर लग्न केले होते, व योहान त्याला म्हणत असे, “तू आपल्या भावाची बायको ठेवावीस हे सशास्त्र नाही.” ह्याकरता हेरोदिया त्याच्यावर डाव धरून त्याचा वध करण्यास पाहत होती, परंतु तिचे काही चालेना; कारण योहान नीतिमान व पवित्र पुरुष आहे हे जाणून हेरोद त्याचे भय धरी व त्याचे संरक्षण करी. तो त्याचे बोलणे ऐके तेव्हा फार गोंधळून जाई, तरी त्याचे म्हणणे आनंदाने ऐकून घेई.

सामायिक करा
मार्क 6 वाचा

मार्क 6:1-20 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

येशू तेथून स्वतःच्या गावात आला आणि त्याचे शिष्य त्याच्यामागे आले. साबाथ दिवशी तो सभास्थानात शिकवू लागला. पुष्कळ लोक त्याचे प्रबोधन ऐकून थक्क झाले व म्हणाले, “ह्याला हे सर्व कोठून प्राप्त झाले? काय हे ज्ञान ह्याला देण्यात आले आहे? आणि ह्याच्या हातून काय ही सामर्थ्यशाली कृत्ये घडतात? मरियेचा मुलगा आणि याकोब, योसे, यहुदा व शिमोन ह्यांचा भाऊ, तो हा सुतार ना? ह्याच्या बहिणी येथे आपल्याबरोबर आहेत ना?” असे म्हणत त्यांनी त्याचा अव्हेर केला. येशू त्यांना म्हणाला, “संदेष्ट्याचा सन्मान होत नाही असे नाही, मात्र त्याच्या स्वतःच्या देशात, त्याच्या आप्तेष्टांत अथवा त्याच्या कुटुंबीयांत त्याचा सन्मान होत नसतो.” काही रोग्यांवर हात ठेवून त्याने त्यांना बरे केले. ह्याशिवाय त्याला तेथे काही करता आले नाही. त्यांच्या अविश्वासाचे त्याला आश्‍चर्य वाटले. त्यानंतर तो प्रबोधन करीत गावोगावी फिरला. बारा जणांना स्वतःच्या जवळ बोलावून त्यांना जोडीजोडीने पाठवताना येशूने त्यांना भुतांवर अधिकार दिला. त्याने त्यांना आदेश दिला, “प्रवासासाठी काठीवाचून दुसरे काही घेऊ नका. भाकर, झोळी किंवा कमरकशात पैसे घेऊ नका. चपला घालून चाला, दुसरा अंगरखा घालू नका.” आणखी तो त्यांना म्हणाला, “जेथे तुमचे स्वागत केले जाईल, त्या घरी ते ठिकाण सोडेपर्यंत राहा. ज्या ठिकाणी तुमचे स्वागत होणार नाही व जेथील लोक तुमचे ऐकणार नाहीत, तेथून निघताना त्यांना इशारा देण्याच्या उद्देशाने आपल्या तळपायांची धूळ तेथेच झटकून टाका.” ते तेथून निघाले व लोकांनी पापांपासून परावृत्त व्हावे, असा त्यांनी उपदेश केला. त्यांनी अनेक भुते काढली आणि अनेक रोग्यांना तेल लावून बरे केले. हेरोद राजाने येशूविषयी ऐकले, कारण त्याचे नाव गाजले होते. काही लोक म्हणत होते, “बाप्तिस्मा देणारा योहान मेलेल्यांतून उठला आहे म्हणून तो महत्कृत्ये करत आहे.” तर काही लोक म्हणत, “हा एलिया आहे”; आणखी काही जण म्हणत, “हा संदेष्टा, म्हणजे पूर्वीच्या संदेष्ट्यांपैकी एक आहे.” हे ऐकून हेरोद म्हणाला, “ज्या योहानचा मी शिरच्छेद केला, तो मरणातून उठला आहे.” हेरोदचा भाऊ फिलिप ह्याची बायको हेरोदिया हिच्यामुळे हेरोदने स्वतः माणसे पाठवून योहानला पकडून कैदेत जखडून ठेवले होते, कारण हेरोदने तिच्याबरोबर लग्न केले होते व योहान त्याला सांगत असे, “तू तुझ्या भावाची बायको ठेवावीस, हे धर्मशास्त्राला धरून नाही.” ह्यासाठी हेरोदिया त्याच्यावर डाव धरून त्याचा वध करायला पाहत होती. परंतु तिचे काही चालेना. योहान नीतिमान व पवित्र पुरुष आहे, हे जाणून हेरोद त्याचे भय धरी व त्याचे संरक्षण करी. तो त्याचे बोलणे ऐकायचा, तेव्हा फार अस्वस्थ व्हायचा, तरीही त्याचे म्हणणे ऐकायला त्याला आवडत असे.

सामायिक करा
मार्क 6 वाचा