मार्क 3:1-6
मार्क 3:1-6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग येशू पुन्हा एका सभास्थानात गेला, तेथे वाळलेल्या हाताचा एक मनुष्य होता. येशूवर आरोप करण्यासाठी कारण मिळावे म्हणून तो शब्बाथ दिवशी त्या मनुष्यास बरे करतो की काय हे पाहण्यासाठी ते त्याच्यावर बारकाईने नजर ठेवून होते. येशू वाळलेल्या हाताच्या मनुष्यास म्हणाला, “ऊठ आणि लोकांच्या समोर उभा राहा.” नंतर तो त्यांना म्हणाला, “शब्बाथ दिवशी चांगले करणे किंवा वाईट करणे, जीव वाचवणे किंवा जीवे मारणे यांतील कोणते योग्य आहे?” पण ते गप्प राहीले. मग त्याने त्यांच्या मनाच्या कठीणपणामुळे खिन्न होऊन त्या सर्वांकडे रागाने पहिले व त्या मनुष्यास म्हणाला, “तुझा हात लांब कर,” त्याने हात लांब केला आणि तो बरा झाला. नंतर परूशी निघून गेले आणि लगेच त्यास जीवे मारणे कसे शक्य होईल याविषयी हेरोदीयांबरोबर येशूविरूद्ध कट करीत बसले.
मार्क 3:1-6 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आणखी एका वेळेला येशू सभागृहामध्ये गेले आणि तेथे हात वाळलेला एक मनुष्य होता. काही लोक त्यांच्यावर आरोप ठेवण्यास कारण पाहत होते, शब्बाथ दिवशी येशू त्याला बरे करतात की काय हे पाहण्यासाठी बारकाईने नजर ठेवून होते. येशू त्या वाळलेल्या हाताच्या मनुष्याला म्हणाले, “असा सर्वांसमोर उभा राहा.” नंतर येशू त्यांना म्हणाले, “शब्बाथ दिवशी नियमानुसार कोणती गोष्ट योग्य आहे: चांगली कामे करणे किंवा वाईट कामे करणे, जीव वाचवणे किंवा जीव घेणे?” परंतु ते शांत बसले. त्यांनी सभोवार जमलेल्यांकडे रागाने आपली नजर फिरवली आणि त्यांची कठीण हृदये पाहून ते अत्यंत अस्वस्थ झाले, व त्या मनुष्याला म्हणाले, “तुझा हात लांब कर.” त्याने हात लांब केला आणि त्याचा हात पहिल्यासारखा बरा झाला. यानंतर परूश्यांनी जाऊन येशूंना जिवे कसे मारता येईल याविषयी हेरोदियांबरोबर योजना केली.
मार्क 3:1-6 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग तो पुन्हा एका सभास्थानात गेला; तेथे वाळलेल्या हाताचा एक माणूस होता. आणि त्याच्यावर दोष ठेवावा म्हणून शब्बाथ दिवशी तो त्याला बरे करतो की काय हे पाहण्यास ते टपून बसले होते. तेव्हा त्याने हात वाळलेल्या माणसाला म्हटले, “ऊठ, मध्ये उभा राहा.” मग तो त्यांना म्हणाला, “शब्बाथ दिवशी बरे करणे किंवा वाईट करणे, जीव वाचवणे किंवा जीव घेणे, ह्यांतून कोणते सशास्त्र आहे?” पण ते उगेच राहिले. मग त्याने त्यांच्या मनाच्या कठीणपणामुळे खिन्न होऊन त्या सर्वांकडे रागाने पाहिले व त्या माणसाला म्हटले, “हात लांब कर.” त्याने हात लांब केला आणि तो बरा झाला. मग परूशी बाहेर जाऊन त्याचा (येशूचा) घात कसा करावा ह्याविषयी लगेचच हेरोदीयांबरोबर त्याच्याविरुद्ध मसलत करीत बसले.
मार्क 3:1-6 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
येशू पुन्हा एकदा सभास्थानात गेला. तेथे वाळलेल्या हाताचा एक माणूस होता. येशूवर दोष ठेवावा म्हणून साबाथ दिवशी तो त्याला बरे करतो का, हे पाहायला काही लोक टपून बसले होते. त्याने हात वाळलेल्या माणसाला म्हटले, “ऊठ, समोर उभा राहा.” नंतर त्याने लोकांना विचारले, “साबाथ दिवशी बरे करणे किंवा वाईट करणे, जीव वाचवणे किंवा जीव घेणे, ह्यांतून कोणते धर्मशास्त्रानुसार आहे?” पण ते गप्प राहिले. त्यांच्या अंतःकरणाच्या कठोरपणामुळे खिन्न होऊन त्याने त्या सर्वांकडे रागाने पाहिले व त्या माणसाला म्हटले, “हात पुढे कर.” त्याने हात पुढे केला आणि तो बरा झाला. मग परुशी लगेच बाहेर जाऊन येशूचा घात कसा करावा, ह्याविषयी हेरोदच्या पक्षातील काही लोकांबरोबर मसलत करू लागले.