मार्क 2:22-28
मार्क 2:22-28 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तसेच नवा द्राक्षरस कोणीही द्राक्षरसाच्या जुन्या कातडी पिशवीत घालीत नाही. जर तो असे करतो तर द्राक्षरस कातडी पिशवीला फोडील आणि द्राक्षरस नासेल व द्राक्षरसाची कातडी पिशवी यांचा नाश होईल. म्हणून नवा द्राक्षरस नव्या कातडी पिशवीतच घालतात.” नंतर असे झाले की, येशू शब्बाथ दिवशी शेतातून जात असता, त्याचे शिष्य कणसे मोडू लागले. तेव्हा परूशी येशूला म्हणाले, “पाहा, शब्बाथ दिवशी जे करू नये ते हे का करतात?” येशू त्यांना म्हणाला, “जेव्हा दावीद व त्याच्याबरोबर असलेल्या लोकांस भूक लागली व त्यांना खावयाला हवे होते. तेव्हा त्यांनी काय केले याविषयी तुम्ही वाचले नाही काय? अब्याथार महायाजक असताना, तो देवाच्या भवनात कसा गेला आणि देवाला समर्पित केलेल्या भाकरी, ज्या नियमशास्त्राप्रमाणे याजकाशिवाय कोणीही खाऊ नयेत त्या कशा खाल्ल्या व जे त्याच्याबरोबर होते त्यांनाही कशा दिल्या, याविषयी तुम्ही वाचले नाही काय?” तो त्यास सांगत होता, “शब्बाथ मनुष्यांसाठी करण्यात आला. मनुष्य शब्बाथासाठी करण्यात आला नाही. म्हणून मनुष्याचा पुत्र शब्बाथाचा देखील प्रभू आहे.”
मार्क 2:22-28 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आणि कोणीही नवा द्राक्षारस जुन्या बुधल्यांमध्ये ओतीत नाही. नाही तर, नवीन द्राक्षारसामुळे बुधले फुटून जातील; द्राक्षारस वाहून जाईल आणि दोन्ही द्राक्षारस व बुधल्याचा नाश होईल. नाही, तसे होऊ नये म्हणून ते नवा द्राक्षारस नवीन बुधल्यांमध्ये ओततात.” एका शब्बाथ दिवशी येशू धान्याच्या शेतामधून जात होते आणि त्यांचे शिष्य त्यांच्याबरोबर चालत असताना, ते गव्हाचे काही कणसे तोडू लागले. ते पाहून परूशी त्यांना म्हणाले, “पाहा, शब्बाथ दिवशी जे नियमशास्त्राविरुद्ध आहे ते का करतात?” येशूंनी उत्तर दिले, “दावीद राजा आणि त्याचे सोबती यांना भूक लागली असता व त्यांना गरज असताना दावीदाने काय केले हे तुम्ही कधी वाचले नाही का? प्रमुख याजक अब्याथार यांच्या दिवसात तो परमेश्वराच्या मंदिरात गेला आणि त्याने त्या समर्पित भाकरी खाल्या, ज्या भाकरी फक्त याजकांनीच खाव्यात असा नियम होता आणि त्याने त्याच्यातून काही त्याच्या सोबत्यांना सुद्धा दिल्या.” मग येशूंनी त्यांना म्हटले, “शब्बाथ मनुष्यासाठी निर्माण केला आहे, मनुष्य शब्बाथासाठी नाही. म्हणून मानवपुत्र हा शब्बाथाचाही प्रभू आहे.”
मार्क 2:22-28 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
कोणी नवा द्राक्षारस जुन्या बुधल्यांत घालत नाही; घातला तर नव्या द्राक्षारसाने बुधले फुटतात, द्राक्षारस सांडतो व बुधलेही निकामी होतात; म्हणून नवा द्राक्षारस नव्याच बुधल्यांत घालतात.” मग असे झाले की तो शब्बाथ दिवशी शेतांमधून जाताना त्याचे शिष्य वाटेने कणसे मोडू लागले. तेव्हा परूशी त्याला म्हणाले, “पाहा, शब्बाथ दिवशी करू नये ते हे का करतात?” तो त्यांना म्हणाला, “दाविदाला गरज पडली, म्हणजे त्याला व त्याच्याबरोबरच्यांना भूक लागली तेव्हा त्याने काय केले, अब्याथार प्रमुख याजक असता तो देवाच्या मंदिरात कसा गेला व याजकांशिवाय कोणीही खाऊ नयेत त्या ‘समर्पित भाकरी’ त्याने कशा खाल्ल्या व आपल्याबरोबरच्यांनाही कशा खाण्यास दिल्या हे तुम्ही कधी वाचले नाही काय?” आणखी तो त्यांना म्हणाला, “शब्बाथ मनुष्यासाठी झालेला आहे, मनुष्य शब्बाथासाठी झालेला नाही; म्हणून मनुष्याचा पुत्र शब्बाथाचाही प्रभू आहे.”
मार्क 2:22-28 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
नवा द्राक्षारस कोणी जुन्या बुधल्यांत भरत नाही, भरला तर नव्या द्राक्षारसाने बुधले फुटतात, द्राक्षारस वाया जातो व बुधले निकामी होतात, म्हणून नवा द्राक्षारस नव्या बुधल्यांत भरला पाहिजे.” एकदा येशू साबाथ दिवशी शेतांमधून जात असताना त्याचे शिष्य वाटेत कणसे तोडू लागले. तेव्हा परुशी त्याला म्हणाले, “पाहा, साबाथ दिवशी जे करू नये ते हे का करतात?” तो त्यांना म्हणाला, “तुम्ही हे कधी वाचले नाही का की, दावीदला जेव्हा गरज पडली, म्हणजे त्याला व त्याच्याबरोबर जे होते त्यांना भूक लागली, तेव्हा त्याने काय केले? आणि अब्याथार उच्च याजक असता, तो देवाच्या मंदिरात कसा गेला व याजकाशिवाय कोणीही खाऊ नयेत त्या समर्पित भाकरी त्याने कशा खाल्ल्या व त्याच्याबरोबर जे होते त्यांनाही कशा दिल्या?” नंतर तो त्यांना म्हणाला, “साबाथ मनुष्यासाठी केला गेला; मनुष्य साबाथसाठी नव्हे. म्हणून मनुष्याचा पुत्र साबाथचाही प्रभू आहे.”