YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मार्क 15:21-39

मार्क 15:21-39 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

वाटेत त्यांना कुरेनेकर शिमोन नावाचा एक मनुष्य दिसला. तो आलेक्सांद्र व रूफ यांचा पिता होता व आपल्या रानातून घरी परत चालला होता. मग सैनिकांनी त्यास जबरदस्तीने येशूचा वधस्तंभ वहावयास लावले. आणि त्यांनी येशूला गुलगुथा म्हणजे कवटीची जागा म्हटलेल्या ठिकाणी आणले. त्यांनी त्यास बोळ मिसळलेला द्राक्षरस दिला परंतु त्याने तो घेतला नाही. त्यांनी त्यास वधस्तंभावर खिळले, कोणी कोणते कपडे घ्यावे यासाठी त्यांनी चिठठ्या टाकल्या व त्याचे कपडे वाटून घेतले. त्यांनी त्यास वधस्तंभावर खिळले तेव्हा दिवसाचा तिसरा तास झाला होता. आणि त्याच्यावर त्याच्या दोषारोपाचा लेख, “यहूद्यांचा राजा” असा लिहिला होता. त्यांनी त्याच्याबरोबर दोन लुटारूंना एकाला त्याच्या उजवीकडे व दुसऱ्याला त्याच्या डावीकडे वधस्तंभावर खिळले होते. जवळून जाणारे लोक त्याची निंदा करीत होते. ते आपली डोकी हलवून म्हणाले, अरे! परमेश्वराचे भवन पाडून ते तीन दिवासात बांधणारा तो तूच ना! वधस्तंभावरुन खाली ये आणि स्वतःला वाचव. तसेच मुख्य याजकांनी, नियमशास्त्राच्या शिक्षकांनी येशूची थट्टा केली आणि एकमेकास म्हणाले, त्याने दुसऱ्यांचे तारण केले पण त्यास स्वतःचा बचाव करता येत नाही! या इस्राएलाचा राजा ख्रिस्त याला वधस्तंभावरुन खाली येऊ द्या मग आम्ही ते पाहू आणि त्याच्यावर विश्वास ठेवू आणि जे त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळले होते त्यांनी देखील त्याचा अपमान केला. दुपारची वेळ झाली. सगळ्या देशभर अंधार पडला, तो अंधार दुपारी तीन वाजेपर्यंत राहिला. मग तीन वाजता येशू मोठ्याने आरोळी मारून म्हणाला, “एलोई, एलोई, लमा सबकथनी, म्हणजे, माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास?” जवळ उभे असलेल्या काहीजणांनी हे ऐकले तेव्हा ते म्हणाले, ऐका, तो एलीयाला बोलवत आहे. एकजण धावत गेला. त्याने स्पंज आंबेत बुडवून भरला. वेताच्या काठीवर ठेवला व तो येशूला पिण्यास दिला आणि म्हणाला, थांबा! एलीया येऊन त्यास खाली उतरवायला येतो की काय हे आपण पाहू. मग मोठ्याने आरोळी मारून येशूने प्राण सोडला. तेव्हा परमेश्वराच्या भवनातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटला व त्याचे दोन भाग झाले. येशूच्या पुढे उभे आलेल्या अधिकाऱ्याने जेव्हा त्याची आरोळी ऐकली आणि तो कसा मरण पावला हे पाहिले तेव्हा तो म्हणाला, खरोखर हा मनुष्य देवाचा पुत्र होता.

सामायिक करा
मार्क 15 वाचा

मार्क 15:21-39 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

आलेक्सांद्र व रूफ यांचा पिता, कुरेने गावचा कोणी एक शिमोन रानातून परत येत होता व जवळून जात असता, त्यांनी त्याला जबरदस्तीने क्रूस वाहण्यास भाग पाडले. मग त्यांनी येशूंना गुलगुथा या नावाने ओळखल्या जाणार्‍या भागात आणले. गुलगुथा याचा अर्थ “कवटीची जागा” असा आहे. त्यांनी येशूंना गंधरस मिसळलेला द्राक्षारस दिला, परंतु त्यांनी त्याचा स्वीकार केला नाही. मग त्यांनी त्याला क्रूसावर खिळल्यानंतर, त्यांची वस्त्रे वाटून, प्रत्येकाला काय मिळेल हे पाहण्यासाठी त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या. त्यांना क्रूसावर खिळले त्यावेळी सकाळचे नऊ वाजले होते. एक दोषपत्राचा लेख वर लावण्यात आला होता: “यहूद्यांचा राजा.” त्यांनी दोन बंडखोरांना त्यांच्याबरोबर क्रूसावर खिळले, एक उजवीकडे आणि दुसरा त्यांच्या डावीकडे होता. अशा रीतीने, “दुष्ट लोकांत त्याची गणना झाली,” हा शास्त्रलेख पूर्ण झाला. जे जवळून जात होते त्यांनी त्यांचा अपमान केला, डोकी हालवीत, म्हणाले, “तू मंदिर उध्वस्त करून तीन दिवसात पुन्हा बांधणार आहे ना, तर क्रूसावरून खाली ये आणि स्वतःचा बचाव कर!” त्याचप्रमाणे प्रमुख याजकवर्ग आणि नियमशास्त्र शिक्षक यांनीही त्यांची थट्टा केली, “त्याने दुसर्‍यांचे तारण केले,” ते म्हणाले, “पण त्याला स्वतःचा बचाव करता येत नाही तो इस्राएलाचा राजा व ख्रिस्त आहे, त्याला आता क्रूसावरून खाली उतरून येऊ दे, म्हणजे आम्ही पाहू आणि विश्वास ठेवू.” त्यांच्याबरोबर क्रूसावर खिळलेल्यांनीही त्यांच्यावर अपमानाची रास केली. संपूर्ण देशावर दुपारच्या तीन वाजेपर्यंत अंधार पडला. आणि तीन वाजता दुपारी, येशूंनी मोठ्याने आरोळी मारली, “एलोई, एलोई, लमा सबकतनी,” म्हणजे “माझ्या परमेश्वरा माझ्या परमेश्वरा, तुम्ही माझा त्याग का केला?” तेथे जवळ उभे असलेल्या काही लोकांनी हे ऐकले, व ते म्हणाले, “पाहा, तो एलीयाला बोलावित आहे.” कोणी एक धावला, शिरक्यात भिजविलेला, एक स्पंज वेतावर ठेवून येशूंना प्यावयास दिला. ते म्हणाले, “त्याला एकटे सोडा. एलीया त्याला खाली उतरविण्यास येतो की काय, हे आपण पाहू!” मग येशूंनी मोठी आरोळी मारून, शेवटचा श्वास घेतला. तेव्हा मंदिराच्या पवित्रस्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत दोन भागात फाटला, जेव्हा शताधिपतीने, जो येशूंच्या समोर उभा होता, त्याने ते कसे मरण पावले हे पाहिले, तेव्हा तो म्हणाला, “खरोखरच हा मनुष्य परमेश्वराचा पुत्र होता!”

सामायिक करा
मार्क 15 वाचा

मार्क 15:21-39 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

तेव्हा शिमोन नावाचा कोणीएक कुरेनेकर, म्हणजे आलेक्सांद्र व रूफ ह्यांचा बाप, हा रानातून येऊन जवळून जात असता त्याला त्यांनी त्याचा वधस्तंभ वाहण्याकरता वेठीस धरले. मग त्यांनी त्याला गुलगुथा म्हणजे कवटीची जागा येथे आणले. आणि त्याला बोळ मिसळलेला द्राक्षारस पिण्यास दिला, परंतु त्याने तो घेतला नाही. तेव्हा त्यांनी त्याला वधस्तंभावर खिळले, आणि त्याच्या कपड्यांपैकी कोणता कपडा कोणी घ्यावा ह्यासाठी ‘त्यांवर चिठ्ठ्या टाकून ते वाटून घेतले.’ त्यांनी त्याला वधस्तंभावर खिळले तेव्हा दिवसाचा तिसरा तास झाला होता. ‘यहूद्यांचा राजा’ असा त्याच्यावरील दोषारोपाचा लेख वर लावला होता. त्यांनी त्याच्याबरोबर दोन लुटारू, एक उजवीकडे व एक डावीकडे असे वधस्तंभावर खिळले. [‘आणि अपराध्यांत तो गणलेला होता’ हा शास्त्रलेख पूर्ण झाला.] मग जवळून जाणार्‍यायेणार्‍यांनी ‘डोकी डोलवत’ त्याची अशी निंदा केली की, “अरे मंदिर मोडून तीन दिवसांत बांधणार्‍या, आपला बचाव कर, वधस्तंभावरून खाली ये.” तसेच मुख्य याजकही शास्त्र्यांसह आपसांत थट्टा करत म्हणाले, “त्याने दुसर्‍यांचे तारण केले, त्याला स्वत:चा बचाव करता येत नाही. इस्राएलाचा राजा ख्रिस्त ह्याने आता वधस्तंभावरून खाली यावे म्हणजे ते पाहून आम्ही विश्वास धरू.” त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळलेली माणसेही त्याची निंदा करत होती. सहाव्या तासापासून नवव्या तासापर्यंत देशभर अंधार पडला. नवव्या तासाला येशू मोठ्याने आरोळी मारून बोलला, “एलोई, एलोई, लमा सबक्थनी?” म्हणजे “माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास?” तेव्हा जवळ उभे राहणार्‍यांपैकी कित्येक जण हे ऐकून म्हणू लागले, “पाहा, तो एलीयाला हाक मारतो आहे.” आणि कोणीएकाने धावत जाऊन स्पंज ‘आंबेने’ भरला आणि बोरूच्या टोकावर ठेवून त्याला ‘चोखण्यास दिला’, आणि म्हटले, “असू द्या, एलीया ह्याला खाली उतरवायला येतो की काय हे पाहू.” मग येशूने मोठ्याने आरोळी मारून प्राण सोडला. तेव्हा पवित्रस्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटून दुभागला. मग त्याने अशा प्रकारे प्राण सोडला हे त्याच्यासमोर जवळच उभे राहिलेल्या शताधिपतीने पाहून म्हटले, “खरोखर हा माणूस देवाचा पुत्र होता.”

सामायिक करा
मार्क 15 वाचा

मार्क 15:21-39 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

गावातून शहराकडे जायला निघालेला शिमोन नावाचा माणूस त्यांना वाटेत भेटला. शिपायांनी त्याच्यावर बळजबरी करून त्याला येशूचा क्रूस वाहण्यास भाग पाडले. शिमोन कुरेनेकर होता व आलेक्झांद्र व रूफ ह्यांचा तो बाप होता. त्यांनी येशूला गुलगुथा म्हणजे कवटीच्या जागेवर आणले. त्यानंतर त्यांनी येशूला गंधरस मिसळलेला द्राक्षारस प्यायला दिला, परंतु त्याने तो घेतला नाही. त्यानंतर त्यांनी त्याला क्रुसावर खिळले आणि त्याच्या कपड्यांपैकी कोणते कपडे कोणी घ्यावे ह्यासाठी चिठ्ठ्या टाकून ते वाटून घेतले. त्यांनी त्याला क्रुसावर खिळले, तेव्हा सकाळचे नऊ वाजले होते. ‘यहुदी लोकांचा राजा’, अशी त्याच्यावरील दोषारोपाची पाटी क्रुसावर लावली होती. त्यांनी त्याच्याबरोबर एक उजवीकडे व एक डावीकडे असे दोन लुटारूदेखील क्रुसावर खिळले. [‘तो अपराध्यांत गणला जाईल’, हा धर्मशास्त्रलेख त्या वेळी पूर्ण झाला.] जवळून जाणाऱ्या येणाऱ्यांनी डोकी हालवत त्याची निंदा केली, “अरे मंदिर मोडून तीन दिवसांत बांधणाऱ्या, स्वतःला वाचव, क्रुसावरून खाली ये!” तसेच मुख्य याजकही शास्त्र्यांसह येशूचा उपहास करीत आपसात म्हणाले, “त्याने दुसऱ्यांचे तारण केले; त्याला स्वतःला वाचवता येत नाही! इस्राएलचा राजा ख्रिस्त ह्याने आता क्रुसावरून खाली यावे, म्हणजे ते पाहून आमचा विश्वास बसेल.” येशूबरोबर क्रुसावर खिळलेलेसुद्धा त्याची निंदा करत होते. मध्यान्हीच्या वेळी देशभर तीन तास अंधार पडला. दुपारी तीन वाजता येशू आक्रोश करीत म्हणाला, “एलोई, एलोई, लमा सबखथनी?” म्हणजे “माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास?” हे ऐकून जवळ उभे राहणाऱ्यांपैंकी कित्येक जण म्हणू लागले, “पाहा, तो एलियाला हाक मारत आहे.” त्यांच्यापैकी एकाने धावत जाऊन आंबेत भिजवलेला स्पंज एका काठीच्या टोकावर ठेवून त्याला चोखायला दिला आणि म्हटले, “थांबा! एलिया त्याला क्रुसावरून खाली उतरून घ्यायला येतो की काय हे पाहू!” येशूने मोठ्याने आरोळी मारून प्राण सोडला. त्या वेळी मंदिरातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटून दुभागला. येशूने अशा प्रकारे प्राण सोडला, हे पाहून क्रुसासमोर उभ्या असलेल्या सैन्याधिकाऱ्याने म्हटले, “खरोखर हा माणूस देवाचा पुत्र होता.”

सामायिक करा
मार्क 15 वाचा