YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मार्क 14:32-42

मार्क 14:32-42 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

नंतर ते गेथशेमाने म्हटलेल्या जागी आले, तेव्हा येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला, “मी प्रार्थना करीपर्यंत येथे बसा.” येशूने आपल्याबरोबर पेत्र, याकोब व योहान यांना घेतले. दुःख व वेदनांनी त्याचे मन भरून आले. तो त्यांना म्हणाला, “माझा जीव मरण्याइतका वेदना सोशीत आहे. येथे राहा व जागृत असा.” त्यांच्यापासून थोडे दूर अंतरावर जाऊन तो जमिनीवर पडला आणि त्याने प्रार्थना केली की, “शक्य असेल तर ही घटका मजपासून टळून जावो.” तो म्हणाला, “अब्बा-पिता, तुला सर्वकाही शक्य आहे. हा प्याला मजपासून दूर कर तरी माझ्या इच्छेप्रमाणे नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे कर.” नंतर येशू आला आणि त्यांना झोपलेले पाहिले. तो पेत्राला म्हणाला, “शिमोना, तू झोपी गेलास काय? तासभर तुझ्याच्याने जागे राहवत नाही काय? जागृत राहा आणि प्रार्थना करा म्हणजे तुम्ही परीक्षेत पडणार नाही. आत्मा उत्सुक आहे पण देह अशक्त आहे.” पुन्हा येशू दूर गेला आणि त्याच गोष्टी उच्चारून त्याने प्रार्थना केली. नंतर तो परत आला व त्यास ते झोपलेले आढळले कारण त्यांचे डोळे जड झाले होते आणि त्यास काय उत्तर द्यावे हे त्यांना कळेना. तो पुन्हा तिसऱ्या वेळेस आला आणि त्यांना म्हणाला, “तुम्ही अजूनही झोपलेले आणि विश्रांती घेत आहात काय? पुरे झाले! आता वेळ आली आहे. मनुष्याचा पुत्र पाप्यांच्या हाती धरून दिला जात आहे. उठा, आपण जाऊ या. पाहा, मला धरून देणारा मनुष्य इकडे येत आहे.”

सामायिक करा
मार्क 14 वाचा

मार्क 14:32-42 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

आता ते गेथशेमाने नावाच्या ठिकाणी आले. येशूंनी शिष्यांना बसण्यास सांगितले व म्हणाले, “मी प्रार्थना करेपर्यंत येथे थांबा.” त्यांनी पेत्र, याकोब आणि योहान यांना बरोबर घेतले आणि ते अत्यंत अस्वस्थ आणि व्याकुळ होऊ लागले. ते त्यांना म्हणाले, “मरणप्राय दुःखाने माझा आत्मा अतिशय व्याकुळ झाला आहे. तुम्ही येथेच थांबा आणि जागे राहा.” थोडे पुढे जाऊन ते भूमीवर पालथे पडले आणि त्यांनी प्रार्थना केली की शक्य असल्यास ही घटका त्यांच्यापासून टळून जावी. “अब्बा! पित्या!” ते म्हणाले, “आपल्याला शक्य असल्यास, हा प्याला दूर करा. तरीपण माझ्या इच्छेप्रमाणे नव्हे, तर आपल्या इच्छेप्रमाणे होवो.” नंतर ते शिष्यांकडे परत आले, तेव्हा ते झोपी गेले आहेत, असे त्यांना आढळले. “शिमोना,” ते पेत्राला म्हणाले, “तू झोपी गेला आहेस काय? एक तासभरही तुला जागे राहता आले नाही का? तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून सावध राहा आणि प्रार्थना करा. आत्मा उत्सुक आहे, परंतु देह अशक्त आहे.” येशू पुन्हा गेले आणि त्यांनी तीच प्रार्थना केली. नंतर ते परत त्यांच्याकडे आले, त्यावेळीही ते झोपी गेलेलेच आढळले, कारण त्यांचे डोळे जड झाले होते आणि त्यांना काय उत्तर द्यावे, हे समजले नाही. मग ते तिसर्‍या वेळेस परत आले आणि त्यांना म्हणाले, “तुम्ही अजूनही झोप व विसावा घेत आहात काय? पुरे झाले! पाहा वेळ आली आहे आणि मानवपुत्र पापी लोकांच्या हाती धरून दिला जात आहे. उठा, आपण जाऊ! माझा विश्वासघात करणारा आला आहे.”

सामायिक करा
मार्क 14 वाचा

मार्क 14:32-42 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

नंतर ते गेथशेमाने नावाच्या ठिकाणी आले तेव्हा तो आपल्या शिष्यांना म्हणाला, “मी प्रार्थना करीपर्यंत येथे बसा.” त्याने पेत्र, याकोब व योहान ह्यांना बरोबर घेतले आणि तो व्याकूळ व अस्वस्थ होऊ लागला. तो त्यांना म्हणाला, ‘माझ्या जिवाला’ मरणप्राय ‘अति खेद झाला आहे;’ तुम्ही येथे राहा व जागृत असा. मग तो काहीसा पुढे जाऊन भूमीवर पडला व त्याने अशी प्रार्थना केली की, ‘शक्य असेल तर ही घटका माझ्यावरून टळून जावो.’ आणि तो म्हणत होता, “अब्बा, बापा, तुला सर्वकाही शक्य आहे; हा प्याला माझ्यापासून दूर कर; तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.” मग तो येऊन पाहतो तर ते झोपी गेले आहेत; तेव्हा तो पेत्राला म्हणाला, “शिमोना, झोपी गेलास काय? घटकाभरही तुझ्याने जागे राहवले नाही काय? तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा; आत्मा उत्सुक आहे खरा, तरी देह अशक्त आहे.” त्याने पुन्हा जाऊन तेच शब्द उच्चारून प्रार्थना केली. मग पुन्हा येऊन पाहतो तर ते झोपी गेले आहेत; त्यांचे डोळे फार जड झाले होते आणि त्याला काय उत्तर द्यावे हे त्यांना सुचेना. पुन्हा तिसर्‍या खेपेस येऊन तो त्यांना म्हणाला, “तुम्ही अजूनही झोप व विसावा घेत आहात का? पुरे झाले; घटका आली आहे; पाहा, मनुष्याचा पुत्र पापी माणसांच्या हाती धरून दिला जात आहे. उठा, आपण जाऊ; पाहा, मला धरून देणारा जवळ आला आहे.”

सामायिक करा
मार्क 14 वाचा

मार्क 14:32-42 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

ते गेथशेमाने नावाच्या ठिकाणी आले तेव्हा येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “मी प्रार्थना करीपर्यंत येथे बसा.” त्याने पेत्र, याकोब व योहान ह्यांना बरोबर घेतले आणि तो व्याकूळ होऊ लागला. तो त्यांना म्हणाला, “माझ्या जिवाला मरणप्राय वेदना होत आहेत. तुम्ही येथे थांबून जागे राहा.” काहीसे पुढे जाऊन त्याने जमिनीवर लोटांगण घातले व अशी प्रार्थना केली, “शक्य असेल तर ही घटका माझ्यावरून टळून जावो.” तो म्हणत होता, “पित्या, माझ्या पित्या, तुला सर्व काही शक्य आहे, हा प्याला माझ्यापासून दूर कर. तरीदेखील माझ्या इच्छेप्रमाणे नव्हे तर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.” तो येऊन पाहतो तर ते झोपी गेले होते. येशू पेत्राला म्हणाला, “शिमोन, झोपी गेलास का? घटकाभरही तुझ्याने जागे राहवले नाही काय? तुम्ही मोहात पडू नये म्हणून जागे राहा व प्रार्थना करा, आत्मा उत्सुक आहे खरा, परंतु देह दुर्बल आहे.” त्याने पुन्हा जाऊन तेच शब्द उच्चारून प्रार्थना केली. तो पुन्हा येऊन पाहतो तर ते झोपी गेले आहेत, त्यांचे डोळे फार जड झाले होते. त्याला काय उत्तर द्यावे, हे त्यांना सुचेना. तिसऱ्या वेळी येऊन तो त्यांना म्हणाला, “झोपा आणि विसावा घ्या, पुरे झाले! घटका आली आहे! मनुष्याचा पुत्र पापी माणसांच्या हाती धरून दिला जात आहे. उठा, आपण जाऊ या, पाहा, मला धरून देणारा जवळ येत आहे.”

सामायिक करा
मार्क 14 वाचा