मार्क 14:12-72
मार्क 14:12-72 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी जेव्हा वल्हांडण सणाचा कोकरा बळी करत असत तेव्हा येशूचे शिष्य त्यास म्हणाले, “आम्ही जातो आणि वल्हांडण सणाच्या भोजनाची तयारी करतो. आम्ही कोठे जाऊन तयारी करावी अशी आपली इच्छा आहे?” येशूने आपल्या दोघा शिष्यांना पाठवले आणि त्यांना सांगितले, “शहरात जा आणि पाण्याचे भांडे घेऊन जाणारा मनुष्य तुम्हास भेटेल, त्याच्यामागे जा. आणि जेथे तो आत जाईल त्या घराच्या मालकास सांगा, ‘गुरुजी म्हणतात, जेथे मला माझ्या शिष्यांबरोबर वल्हांडण सणाचे भोजन करणे शक्य होईल अशी खोली कोठे आहे?’ आणि तो तुम्हास माडीवरची एक मोठी नीटनेटकी केलेली खोली दाखवील, तेथे आपल्यासाठी तयारी करा.” शिष्य निघाले आणि ते शहरात गेले आणि येशूने सांगितल्याप्रमाणे त्यांना सर्व आढळले. मग त्यांनी वल्हांडण सणाच्या भोजनाची तयारी केली. संध्याकाळ झाली तेव्हा येशू बारा शिष्यांसह आला. मेजावर बसून ते जेवीत असता येशू म्हणाला, “मी तुम्हास खरे सांगतो, तुमच्यापैकी जो एकजण मला शत्रूच्या स्वाधीन करून देईल, तो माझ्याबरोबर येथे जेवण करीत आहे.” शिष्य अतिशय खिन्न झाले व प्रत्येकजण त्यास म्हणू लागला, “तो मी आहे का?” तो त्यांना म्हणाला, “बारा जणांपैकी एक जो माझ्याबरोबर ताटात भाकर बुडवत आहे तोच. त्याच्याविषयी पवित्र शास्त्रात जसे लिहिले आहे, तसा मनुष्याचा पुत्र जाईल, परंतु ज्याच्याकडून मनुष्याचा पुत्र धरून दिला जाईल, त्याची केवढी दुर्दशा होणार. तो जन्मला नसता तर ते त्याच्यासाठी बरे झाले असते.” ते भोजन करीत असता येशूने भाकर घेतली, उपकारस्तुती केली, ती मोडली आणि त्यांना दिली. तो म्हणाला, “घ्या, हे माझे शरीर आहे.” नंतर येशूने प्याला घेतला, उपकारस्तुती केली. तो प्याला त्यांना दिला आणि सर्व त्यातून प्याले. मग येशू म्हणाला, “हे माझे नव्या कराराचे रक्त आहे. पुष्कळांसाठी ते ओतले जात आहे. मी तुम्हास खरे सांगतो की, देवाच्या राज्यात मी नवा द्राक्षरस पिईन त्या दिवसापर्यंत मी यापुढे द्राक्षाचा उपज पिणार नाही.” नंतर त्यांनी उपकारस्तुतीचे गीत गाईले व ते जैतुनाच्या डोंगराकडे निघून गेले. येशू शिष्यांना म्हणाला, “तुम्ही सर्व अडखळून पडाल कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘मी मेंढपाळास मारीन आणि मेंढरांची दाणादाण होईल.’ परंतु माझे पुनरुत्थान झाल्यावर मी तुमच्यापुढे गालील प्रांतात जाईन.” पेत्र म्हणाला, जरी सर्व अडखळले तरी मी अडखळणार नाही. मग येशू त्यास म्हणाला, “मी तुला खरे सांगतो, आज रात्री दोनदा कोंबडा आरवण्यापूर्वी तू तीन वेळा मला नाकारशील.” तरीही पेत्र अधिक आवेशाने म्हणाला, “जरी मला आपणाबरोबर मरावे लागले तरीसुद्धा मी आपणाला नाकारणार नाही.” आणि इतर सर्वजण तसेच म्हणाले. नंतर ते गेथशेमाने म्हटलेल्या जागी आले, तेव्हा येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला, “मी प्रार्थना करीपर्यंत येथे बसा.” येशूने आपल्याबरोबर पेत्र, याकोब व योहान यांना घेतले. दुःख व वेदनांनी त्याचे मन भरून आले. तो त्यांना म्हणाला, “माझा जीव मरण्याइतका वेदना सोशीत आहे. येथे राहा व जागृत असा.” त्यांच्यापासून थोडे दूर अंतरावर जाऊन तो जमिनीवर पडला आणि त्याने प्रार्थना केली की, “शक्य असेल तर ही घटका मजपासून टळून जावो.” तो म्हणाला, “अब्बा-पिता, तुला सर्वकाही शक्य आहे. हा प्याला मजपासून दूर कर तरी माझ्या इच्छेप्रमाणे नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे कर.” नंतर येशू आला आणि त्यांना झोपलेले पाहिले. तो पेत्राला म्हणाला, “शिमोना, तू झोपी गेलास काय? तासभर तुझ्याच्याने जागे राहवत नाही काय? जागृत राहा आणि प्रार्थना करा म्हणजे तुम्ही परीक्षेत पडणार नाही. आत्मा उत्सुक आहे पण देह अशक्त आहे.” पुन्हा येशू दूर गेला आणि त्याच गोष्टी उच्चारून त्याने प्रार्थना केली. नंतर तो परत आला व त्यास ते झोपलेले आढळले कारण त्यांचे डोळे जड झाले होते आणि त्यास काय उत्तर द्यावे हे त्यांना कळेना. तो पुन्हा तिसऱ्या वेळेस आला आणि त्यांना म्हणाला, “तुम्ही अजूनही झोपलेले आणि विश्रांती घेत आहात काय? पुरे झाले! आता वेळ आली आहे. मनुष्याचा पुत्र पाप्यांच्या हाती धरून दिला जात आहे. उठा, आपण जाऊ या. पाहा, मला धरून देणारा मनुष्य इकडे येत आहे.” आणि येशू बोलत आहे तोपर्यंत बारा जणांपैकी एक यहूदा तेथे आला. त्याच्याबरोबर मुख्य याजक लोक व नियमशास्त्राचे शिक्षक आणि वडील यांनी पाठवलेले अनेक लोक तलवारी व सोटे घेऊन आले. घात करून देणाऱ्याने त्यांना अशी खूण दिली होती की, “मी ज्या कोणाचे चुंबन घेईन तोच तो आहे, त्यास धरा आणि सांभाळून न्या.” मग यहूदा आल्याबरोबर तो येशूकडे गेला आणि म्हणाला, “रब्बी!” आणि असे म्हणून यहूदाने येशूचे चुंबन घेतले. नंतर त्यांनी त्याच्यावर हात टाकले आणि त्यास अटक केली. तेथे जवळ उभे असलेल्यांपैकी एकाने आपली तलवार काढली आणि महायाजकाच्या नोकरावर वार करून त्याचा कान कापून टाकला. नंतर येशू त्यांना म्हणाला, “मी लुटारू असल्याप्रमाणे तुम्ही तलवारी आणि सोटे घेऊन मला पकडायला बाहेर पडलात काय? मी दररोज परमेश्वराच्या भवनात शिकवीत असता तुम्हाबरोबर होतो आणि तुम्ही मला अटक केली नाही. परंतु शास्त्रलेख पूर्ण झालाच पाहिजे.” सर्व शिष्य त्यास सोडून पळून गेले. एक तरूण मनुष्य अंगावर तागाचे वस्त्र पांघरून त्याच्यामागे चालत होता. त्यांनी त्यास धरले, परंतु तो तागाचे वस्त्र टाकून उघडाच पळून गेला. नंतर त्यांनी येशूला तेथून महायाजकाकडे नेले आणि सर्व मुख्य याजक लोक, वडील व नियमशास्त्राचे शिक्षक जमा झाले. थोडे अंतर ठेवून पेत्र येशूच्या मागे सरळ महायाजकाच्या वाड्यात गेला. तेथे पेत्र कामदारांबरोबर विस्तवाजवळ शेकत बसला. मुख्य याजक लोक आणि सर्व यहूदी सभा येशूला जिवे मारण्यासाठी पुरावा गोळा करण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु त्यांना काही मिळेना. पुष्कळांनी त्याच्याविरुध्द खोटी साक्ष दिली. परंतु त्यांची साक्ष सारखी नव्हती. नंतर काहीजण उभे राहीले आणि त्याच्याविरुध्द साक्ष देऊन म्हणाले, आम्ही त्यास असे म्हणताना ऐकले की, “हाताने बांधलेले परमेश्वराचे भवन मी पाडून टाकीन आणि हातांनी न बांधलेले असे दुसरे भवन तीन दिवसात उभारीन.” परंतु तरीही याबाबतीत त्यांच्या साक्षीत मेळ नव्हता. नंतर महायाजक त्यांच्यापुढे उभा राहिले आणि त्याने येशूला विचारले, “तू उत्तर देणार नाहीस काय? हे लोक तुझ्याविरुद्ध आरोप करताहेत हे कसे?” परंतु येशू गप्प राहिला. त्याने उत्तर दिले नाही. नंतर महायाजकाने पुन्हा विचारले, “धन्यवादिताचा पुत्र ख्रिस्त तो तू आहेस काय?” येशू म्हणाला, “मी आहे, आणि तुम्ही मनुष्याच्या पुत्राला सर्वसमर्थ देवाच्या उजवीकडे बसलेले व आकाशातील मेघांसह येताना पाहाल.” महायाजकाने आपले कपडे फाडले आणि म्हणाला, “आपणाला अधिक साक्षीदारांची काय गरज आहे? तुम्ही निंदा ऐकली आहे. तुम्हास काय वाटते?” सर्वांनी त्यास मरणदंड योग्य आहे अशी शिक्षा फर्मावली. काहीजण त्याच्यावर थुंकू लागले. त्याचे तोंड झाकून बुक्क्या मारू लागले व त्यास म्हणू लागले, “ओळख बरे, तुला कोणी मारले?” कामदारांनी त्यास ताब्यात घेतले आणि मारले. पेत्र अंगणात असतानाच महायाजकाच्या दासीपैकी एक तेथे आली. आणि तिने पेत्राला शेकताना पाहिले. तेव्हा तिने त्याच्याकडे निरखून पाहिले व म्हणाली, “तू सुद्धा नासरेथकर येशूबरोबर होतास ना?” परंतु पेत्राने ते नाकारले आणि म्हणाला, “तू काय म्हणतेस हे मला कळत नाही व समजतही नाही.” पेत्र अंगणाच्या दरवाजाच्या देवडीवर गेला आणि कोंबडा आरवला. जेव्हा दासीने त्यास पाहिले तेव्हा जे लोक तेथे होते त्यांना ती म्हणू लागली की, “हा मनुष्य त्यांच्यापैकीच एक आहे.” पेत्राने पुन्हा ते नाकारले. नंतर थोड्या वेळाने तेथे उभे असलेले लोक पेत्राला म्हणाले, “खात्रीने तू त्यांच्यापैकी एक आहेस, कारण तू सुद्धा गालीली आहेस.” पेत्र निर्भत्सना करीत व शपथ वाहून म्हणाला, “तुम्ही ज्या मनुष्याविषयी बोलत आहात त्यास मी ओळखत नाही!” आणि लगेच दुसऱ्यांदा कोंबडा आरवला, “दोन वेळा कोंबडा आरवण्यापूर्वी तू मला तीन वेळा नाकारशील,” असे येशू म्हणाला होता याची पेत्राला आठवण झाली व तो अतिशय दुःखी झाला व मोठ्याने रडला.
मार्क 14:12-72 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी, म्हणजे रितीप्रमाणे वल्हांडणाच्या कोकर्याचा यज्ञ करत असत, येशूंच्या शिष्यांनी त्यांना विचारले, “वल्हांडणाच्या भोजनाची तयारी आम्ही कोठे करावी अशी आपली इच्छा आहे?” तेव्हा येशूंनी त्यांच्या शिष्यांपैकी दोघांना पाठविले आणि सांगितले की, “तुम्ही शहरात जा आणि एक मनुष्य पाण्याने भरलेली मोठी घागर घेऊन जात असलेला तुम्हाला भेटेल. त्याच्यामागे जा. तो ज्या घरात जाईल त्या घराच्या मालकाला सांगा, ‘गुरुजी विचारत आहेत की, ज्या खोलीत मला माझ्या शिष्यांबरोबर वल्हांडणाचे भोजन करता येईल, ती पाहुण्यांची खोली कुठे आहे?’ तो तुम्हाला माडीवरील मोठी तयार व सुसज्ज असलेली एक खोली दाखवेल. तेथेच आपल्यासाठी तयारी करा.” ते शिष्य नगरात गेले, आणि येशूंनी सांगितल्याप्रमाणे सर्वकाही असल्याचे त्यांना आढळून आले. मग त्यांनी वल्हांडणाच्या भोजनाची तयारी केली. संध्याकाळ झाल्यावर येशू आपल्या बारा शिष्यांबरोबर तेथे आले, ते सर्व मेजाभोवती बसून भोजन करीत असताना येशू म्हणाले, “मी तुम्हाला निश्चित सांगतो की, तुमच्यापैकी एकजण माझा विश्वासघात करेल—तो माझ्याबरोबर पंक्तीला बसून जेवत आहे.” ते दुःखाने भरून गेले आणि एकामागून एक त्यांना विचारू लागले, “खरोखर तो मी तर नाही ना?” “तो तुम्हा बाराजणांपैकी एक आहे.” त्यांनी उत्तर दिले, “जो माझ्याबरोबर ताटात भाकर बुडवीत आहे. कारण त्यांच्याबद्दल लिहिले होते त्याप्रमाणे मानवपुत्र जातो खरा. परंतु जो मानवपुत्राला विश्वासघाताने धरून देतो, त्याचा धिक्कार असो. तो जन्मलाच नसता, तर ते त्याला अधिक हिताचे झाले असते.” भोजन करीत असताना, येशूंनी भाकर घेतली, तिच्यावर आशीर्वाद मागितल्यावर, ती मोडली आणि आपल्या शिष्यांना देत ते म्हणाले, “ही घ्या, हे माझे शरीर आहे.” त्यांनी द्राक्षारसाचा प्याला हाती घेतला, व त्याबद्दल आभार मानले आणि मग तो प्याला त्यांना दिला आणि मग ते सर्व त्यातून प्याले. मग येशू त्यांना म्हणाले, “हे माझ्या कराराचे रक्त आहे, व ते पुष्कळांसाठी ओतले जात आहे मी तुम्हाला निश्चित सांगतो की, परमेश्वराच्या राज्यात मी नवा द्राक्षारस पिईन त्या दिवसापर्यंत द्राक्षवेलीचा उपज मी पिणार नाही.” मग त्या सर्वांनी मिळून एक गीत गाईले आणि ते जैतुनाच्या डोंगराकडे गेले. “तुम्ही सर्वजण मला सोडून जाल,” येशू शिष्यांना सांगू लागले, “कारण असे लिहिले आहे की: “मी मेंढपाळावर प्रहार करीन आणि मेंढरांची पांगापांग होईल. परंतु मी पुन्हा जिवंत झाल्यावर, तुमच्या अगोदर गालीलात जाईन आणि तेथे तुम्हाला भेटेन.” पेत्र जाहीरपणे म्हणाला, “जरी सर्वांनी सोडले, तरी मी जाणार नाही.” “पेत्रा,” येशू म्हणाले, “मी तुला निश्चित सांगतो की, आज—होय, आजच रात्री दोन वेळा कोंबडा आरवण्यापूर्वी, तू मला तीन वेळा नाकारशील.” परंतु पेत्र ठामपणे म्हणाला, “मला तुमच्याबरोबर मरावे लागले, तरी मी तुम्हाला नाकारणार नाही.” आणि बाकीचे सर्व असेच म्हणाले. आता ते गेथशेमाने नावाच्या ठिकाणी आले. येशूंनी शिष्यांना बसण्यास सांगितले व म्हणाले, “मी प्रार्थना करेपर्यंत येथे थांबा.” त्यांनी पेत्र, याकोब आणि योहान यांना बरोबर घेतले आणि ते अत्यंत अस्वस्थ आणि व्याकुळ होऊ लागले. ते त्यांना म्हणाले, “मरणप्राय दुःखाने माझा आत्मा अतिशय व्याकुळ झाला आहे. तुम्ही येथेच थांबा आणि जागे राहा.” थोडे पुढे जाऊन ते भूमीवर पालथे पडले आणि त्यांनी प्रार्थना केली की शक्य असल्यास ही घटका त्यांच्यापासून टळून जावी. “अब्बा! पित्या!” ते म्हणाले, “आपल्याला शक्य असल्यास, हा प्याला दूर करा. तरीपण माझ्या इच्छेप्रमाणे नव्हे, तर आपल्या इच्छेप्रमाणे होवो.” नंतर ते शिष्यांकडे परत आले, तेव्हा ते झोपी गेले आहेत, असे त्यांना आढळले. “शिमोना,” ते पेत्राला म्हणाले, “तू झोपी गेला आहेस काय? एक तासभरही तुला जागे राहता आले नाही का? तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून सावध राहा आणि प्रार्थना करा. आत्मा उत्सुक आहे, परंतु देह अशक्त आहे.” येशू पुन्हा गेले आणि त्यांनी तीच प्रार्थना केली. नंतर ते परत त्यांच्याकडे आले, त्यावेळीही ते झोपी गेलेलेच आढळले, कारण त्यांचे डोळे जड झाले होते आणि त्यांना काय उत्तर द्यावे, हे समजले नाही. मग ते तिसर्या वेळेस परत आले आणि त्यांना म्हणाले, “तुम्ही अजूनही झोप व विसावा घेत आहात काय? पुरे झाले! पाहा वेळ आली आहे आणि मानवपुत्र पापी लोकांच्या हाती धरून दिला जात आहे. उठा, आपण जाऊ! माझा विश्वासघात करणारा आला आहे.” ते बोलत आहे तेव्हाच, यहूदा, त्यांच्या बारा शिष्यांपैकी एक, प्रमुख याजकांनी आणि वडीलजनांनी पाठविलेल्या, तरवारी आणि सोटे धारण करणार्या जमावाला बरोबर घेऊन पुढे आला. आता त्या विश्वासघातक्याने जमावाला खूण देऊन ठेवली होती की, “ज्या मनुष्याचे मी चुंबन घेईन त्याला अटक करा आणि शिपायांच्या बंदोबस्तात घेऊन जा.” तत्क्षणी यहूदा येशूंच्या जवळ गेला, “गुरुजी!” त्याने उद्गार काढले आणि त्यांचे चुंबन घेतले. नंतर लोकांनी येशूंना धरले आणि अटक केले. पण तेवढ्यात जे उभे होते त्यांच्यातील एकाने तरवार उपसून प्रमुख याजकाच्या दासावर वार करून त्याचा कान कापून टाकला. येशूंनी विचारले, “मी बंडखोरांचा नेता आहे काय, की तुम्ही तलवार आणि लाठ्या घेऊन मला धरावयास आला आहात? मी दररोज तुमच्याबरोबर होतो, मंदिराच्या परिसरात शिकवीत असे, पण तुम्ही मला अटक केली नाही. परंतु धर्मशास्त्रात लिहिलेली भविष्यवाणी पूर्ण झाली पाहिजे.” मग सर्वजण त्यांना सोडून पळून गेले. मात्र, तागाच्या वस्त्राशिवाय अंगावर काहीही न पांघरलेला एक तरुण येशूंच्या मागे चालला होता. जमावाने त्यालाही धरण्याचा प्रयत्न केला, परंतु आपले वस्त्र सोडून तो तसाच उघडा पळून गेला. येशूंना महायाजक कयफा याच्याकडे नेण्यात आले. लवकरच दुसरे सर्व मुख्य याजक व वडीलजन आणि नियमशास्त्र शिक्षक गोळा झाले होते. पेत्र काही अंतरावरुन, त्यांच्यामागे चालत आला आणि महायाजकाच्या अंगणात आला आणि पहारेकर्यांमध्ये जाऊन काय होते ते पाहत बसला. मुख्य याजक, किंबहुना, सर्व यहूदी न्यायसभा येशूंना जिवे मारण्यासाठी पुरावे शोधण्याचा प्रयत्न करीत होते, परंतु ते त्यांना सापडले नाही. नंतर अनेकांनी त्यांच्याविरुद्ध खोटी साक्ष दिली, परंतु त्यांच्या बोलण्यात ताळमेळ बसत नव्हता. नंतर काहींनी उठून त्याच्याविरुद्ध ही खोटी साक्ष दिली: आम्ही त्याला बोलताना ऐकले, “मनुष्यांनी बांधलेले हे परमेश्वराचे मंदिर मी उध्वस्त करेन आणि तीन दिवसात हातांनी न बांधलेले असे दुसरे मंदिर पुन्हा उभे करीन.” तरीपण त्यांच्या साक्षीमध्येही काही ताळमेळ नव्हता. हे ऐकून महायाजक त्यांच्यापुढे उभा राहिला आणि त्याने येशूंना विचारले, “या आरोपांना तू उत्तर देणार नाही काय?” हे लोक जी साक्ष तुझ्याविरुद्ध सांगत आहेत ती काय आहे? पण ख्रिस्त शांत राहिले आणि त्यांनी काही उत्तर दिले नाही. नंतर महायाजकाने त्यांना पुन्हा विचारले, “तू धन्यवादित परमेश्वराचा पुत्र मसीहा आहेस का?” “मी आहे,” येशूंनी उत्तर दिले, “आणि मानवपुत्राला सर्वसमर्थाच्या उजवीकडे बसलेले आणि आकाशातून मेघारूढ होऊन परत येत असलेले पाहाल.” महायाजकाने आपली वस्त्रे फाडली आणि तो म्हणाला, “आता आणखी साक्षीदारांची आपल्याला काय गरज आहे? तुम्ही ईश्वरनिंदा ऐकली आहे आता तुम्हाला काय वाटते?” तो मृत्युदंडास पात्र आहे असा सर्वांनी त्यांच्यावर आरोप केला. त्यांच्यापैकी काहीजण येशूंवर थुंकू लागले. त्यांनी त्यांचे डोळे बांधले, त्यांना बुक्क्या मारल्या आणि म्हटले, “भविष्यवाणी करा!” मग पहारेकर्यांनी त्यांना चपराका मारून आपल्या ताब्यात घेतले. हे सर्व होत असताना, पेत्र खाली अंगणातच होता, तेथे प्रमुख याजकाची एक दासी आली. तिने पेत्राला शेकोटीसमोर शेकताना पाहिले, तिने त्याच्याकडे निरखून पाहिले. “तू नासरेथकर येशूंबरोबर होतास.” पण पेत्र नकार देत म्हणाला, “तू कशासंबंधी बोलतेस हे मला समजत नाही.” मग तो द्वाराकडे गेला. त्याला तेथे उभे असलेल्या एका दासीने पाहिले आणि ती पुन्हा म्हणाली, “हा माणूस त्यांच्यापैकी एक आहे!” पेत्राने ते पुन्हा नाकारले. थोड्या वेळाने जी माणसे तेथे उभी होती. त्यातील काहीजण पेत्राला म्हणाले, “तू खरोखर त्यांच्यापैकीच आहेस, कारण तू गालील प्रांताचा आहेस!” हे ऐकून पेत्र शाप देऊ लागला व शपथ घेऊन त्यांना म्हणू लागला, “ज्या माणसाविषयी तुम्ही बोलत आहा, त्या माणसाला मी ओळखत सुद्धा नाही.” तेवढ्यात कोंबडा दुसर्या वेळेला आरवला. त्याबरोबर पेत्राला येशूंचे शब्द आठवले, “कोंबडा दोन वेळा आरवण्यापूर्वी तू मला तीन वेळा नाकारशील.” तेव्हा पेत्र दूर निघून गेला आणि अतिशय दुःखाने रडला.
मार्क 14:12-72 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी वल्हांडणाचा यज्ञपशू मारत असत; त्या दिवशी त्याचे शिष्य त्याला म्हणाले, “आपण वल्हांडणाचे भोजन करावे म्हणून आम्ही कोठे जाऊन तयारी करावी अशी आपली इच्छा आहे?” मग त्याने आपल्या शिष्यांपैकी दोघांना पाठवताना सांगितले, “नगरात जा, म्हणजे कोणीएक माणूस पाण्याचे मडके घेऊन जाताना तुम्हांला भेटेल; त्याच्यामागून जा. तो आत जाईल तेथल्या घरधन्याला असे सांगा : ‘गुरूजी विचारतात मी आपल्या शिष्यांसह वल्हांडणाचे भोजन करावे अशी माझी उतरण्याची जागा कोठे आहे?’ मग तो सजवून तयार केलेली एक माडीवरची मोठी खोली तुम्हांला दाखवील; तेथे आपल्यासाठी तयारी करा.” मग शिष्य निघून गेले, तेव्हा त्याने सांगितल्याप्रमाणेच त्यांना आढळले आणि त्यांनी वल्हांडणाची तयारी केली. मग संध्याकाळ झाल्यावर तो बारा जणांबरोबर आला. आणि ते बसून भोजन करत असता येशू म्हणाला, “मी तुम्हांला खचीत सांगतो, तुमच्यापैकी एक जण मला धरून देईल, तो माझ्याबरोबर जेवणारा आहे.” ते खिन्न होऊ लागले व एकामागून एक त्याला विचारू लागले, “मी आहे काय तो?” तो त्यांना म्हणाला, “बारा जणांपैकी एक जण म्हणजे जो माझ्याबरोबर ताटात हात घालत आहे तोच. मनुष्याचा पुत्र तर त्याच्याविषयी शास्त्रात जसे लिहिले आहे त्याप्रमाणे जातो खरा; परंतु ज्या माणसाच्या हातून मनुष्याचा पुत्र धरून दिला जातो, त्याची केवढी दुर्दशा होणार! तो माणूस जन्मला नसता तर ते त्याला बरे झाले असते.” ते भोजन करत असता येशूने भाकर घेऊन व आशीर्वाद देऊन ती मोडली आणि त्यांना देऊन म्हटले, “घ्या, खा, हे माझे शरीर आहे.” आणि त्याने प्याला घेतला व उपकारस्तुती करून त्यांना तो दिला; आणि ते सर्व जण त्यातून प्याले. तो त्यांना म्हणाला, “हे ‘[नवीन] करार’ प्रस्थापित करणारे माझे रक्त आहे, हे पुष्कळांकरता ओतले जात आहे. मी तुम्हांला खचीत सांगतो की, मी देवाच्या राज्यात नवा द्राक्षारस पिईन त्या दिवसापर्यंत आतापासून द्राक्षवेलाचा उपज पिणारच नाही.” मग एक स्तोत्र गाऊन ते तेथून जैतुनांच्या डोंगराकडे निघून गेले. नंतर येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही सर्व जण आज रात्री माझ्यामुळे अडखळून पडाल; कारण असे लिहिले आहे की, ‘मी मेंढपाळाला मारीन आणि मेंढरांची दाणादाण होईल.’ तरी माझे पुनरुत्थान झाल्यावर तुमच्यापुढे मी गालीलात जाईन.” पेत्र त्याला म्हणाला, “जरी सर्व अडखळले तरी मी अडखळणार नाही.” येशू त्याला म्हणाला, “मी तुला खचीत सांगतो, आज म्हणजे ह्याच रात्री, कोंबडा दोन वेळा आरवण्यापूर्वी तू तीन वेळा मला नाकारशील.” तरी तो फार आवेशाने बोलत राहिला, “आपणाबरोबर मला मरावे लागले तरी मी आपल्याला नाकारणार नाही.” सर्व जणही तसेच म्हणत होते. नंतर ते गेथशेमाने नावाच्या ठिकाणी आले तेव्हा तो आपल्या शिष्यांना म्हणाला, “मी प्रार्थना करीपर्यंत येथे बसा.” त्याने पेत्र, याकोब व योहान ह्यांना बरोबर घेतले आणि तो व्याकूळ व अस्वस्थ होऊ लागला. तो त्यांना म्हणाला, ‘माझ्या जिवाला’ मरणप्राय ‘अति खेद झाला आहे;’ तुम्ही येथे राहा व जागृत असा. मग तो काहीसा पुढे जाऊन भूमीवर पडला व त्याने अशी प्रार्थना केली की, ‘शक्य असेल तर ही घटका माझ्यावरून टळून जावो.’ आणि तो म्हणत होता, “अब्बा, बापा, तुला सर्वकाही शक्य आहे; हा प्याला माझ्यापासून दूर कर; तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.” मग तो येऊन पाहतो तर ते झोपी गेले आहेत; तेव्हा तो पेत्राला म्हणाला, “शिमोना, झोपी गेलास काय? घटकाभरही तुझ्याने जागे राहवले नाही काय? तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा; आत्मा उत्सुक आहे खरा, तरी देह अशक्त आहे.” त्याने पुन्हा जाऊन तेच शब्द उच्चारून प्रार्थना केली. मग पुन्हा येऊन पाहतो तर ते झोपी गेले आहेत; त्यांचे डोळे फार जड झाले होते आणि त्याला काय उत्तर द्यावे हे त्यांना सुचेना. पुन्हा तिसर्या खेपेस येऊन तो त्यांना म्हणाला, “तुम्ही अजूनही झोप व विसावा घेत आहात का? पुरे झाले; घटका आली आहे; पाहा, मनुष्याचा पुत्र पापी माणसांच्या हाती धरून दिला जात आहे. उठा, आपण जाऊ; पाहा, मला धरून देणारा जवळ आला आहे.” तो बोलत आहे इतक्यात बारा जणांपैकी एक म्हणजे यहूदा तेथे आला आणि त्याच्याबरोबर मुख्य याजक, शास्त्री व वडील ह्यांच्याकडची एक टोळी तलवारी व सोटे घेऊन आली. त्याला धरून देणार्याने तर त्यांना अशी खूण सांगून ठेवली होती की, “मी ज्याचे चुंबन घेई तोच तो आहे; त्याला धरा व नीट बंदोबस्ताने घेऊन जा.” तो आल्यावर लगेचच त्याच्याकडे गेला आणि “गुरूजी,” असे म्हणून त्याने त्याचे चुंबन घेतले. तेव्हा त्या लोकांनी येशूवर हात टाकून त्याला अटक केली. त्याच्याशेजारी जे उभे होते त्यांच्यापैकी एकाने तलवार उपसली आणि प्रमुख याजकाच्या चाकरावर वार करून त्याचा कान छाटून टाकला. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “एखाद्या लुटारूवर तलवारी व सोटे घेऊन जावे तसे तुम्ही मला धरण्यास बाहेर पडला आहात काय? मी दररोज मंदिरात शिकवत असता तुमच्याबरोबर असे, पण तुम्ही मला धरले नाही; परंतु शास्त्रलेख पूर्ण व्हावेत म्हणून हे असे घडत आहे.” तेव्हा ते सर्व त्याला सोडून पळून गेले. तेव्हा कोणीएक तरुण उघड्या अंगावर तागाचे वस्त्र पांघरून त्याच्यामागून चालला होता, त्याला त्यांनी धरले; परंतु तो ते तागाचे वस्त्र टाकून त्यांच्यापासून उघडाच पळून गेला. नंतर त्यांनी येशूला प्रमुख याजकाकडे नेले; आणि सर्व मुख्य याजक, वडील व शास्त्री एकत्र जमले. पेत्र दुरून त्याच्यामागून चालत आत म्हणजे प्रमुख याजकाच्या वाड्यातील अंगणात गेला आणि कामदारांबरोबर विस्तवाजवळ शेकत बसला. मुख्य याजक व सर्व न्यायसभा ह्यांनी येशूला जिवे मारण्याकरता त्याच्याविरुद्ध साक्षीचा शोध केला पण ती त्यांना मिळेना. बर्याच जणांनी त्याच्याविरुद्ध खोटी साक्ष दिली, परंतु त्यांच्या साक्षीत मेळ बसेना. काही जण उभे राहून त्याच्याविरुद्ध खोटी साक्ष देऊन म्हणाले, “हातांनी बांधलेले हे मंदिर मी मोडून टाकीन व हातांनी न बांधलेले असे दुसरे तीन दिवसांत उभारीन, असे आम्ही ह्याला बोलताना ऐकले.” परंतु त्यांच्या ह्याही साक्षीत मेळ नव्हता. तेव्हा प्रमुख याजकाने मध्ये उभे राहून येशूला विचारले, “तू काहीच उत्तर देत नाहीस काय? हे तुझ्याविरुद्ध साक्ष देतात हे काय?” तथापि तो उगाच राहिला; त्याने काही उत्तर दिले नाही. पुन्हा प्रमुख याजकाने त्याला विचारले, “धन्यवादिताचा पुत्र जो ख्रिस्त तो तू आहेस काय?” येशू म्हणाला, “मी आहे; आणि तुम्ही ‘मनुष्याचा पुत्र सर्वसामर्थ्याच्या उजवीकडे बसलेला’ व ‘आकाशातील मेघांसह येत असेलला’ असा पाहाल.” तेव्हा प्रमुख याजक आपले कपडे फाडून म्हणाला, “आपणांला साक्षीदारांची आणखी काय गरज? हे दुर्भाषण तुम्ही ऐकले आहे; तुम्हांला कसे वाटते?” तेव्हा तो मरणदंडास पात्र आहे असे सर्वांनी मिळून ठरवले. मग कित्येक जण त्याच्यावर थुंकू लागले, त्याचे तोंड झाकून व त्याला बुक्क्या मारून म्हणू लागले, “आता दाखव आपले अंतर्ज्ञान!” आणि कामदारांनी त्याला चपराका मारून आपल्या ताब्यात घेतले. इकडे पेत्र खाली अंगणात असता प्रमुख याजकाच्या दासींपैकी एक तेथे आली; आणि पेत्राला शेकत असताना पाहून त्याच्याकडे तिने दृष्टी लावून म्हटले, “तूही त्या नासरेथकर येशूबरोबर होतास.” परंतु तो नाकारून बोलला, “तू काय म्हणतेस ते मला ठाऊक नाही व समजतही नाही.” ह्यावर तो बाहेर देवडीवर गेला; इतक्यात कोंबडा आरवला. मग त्या दासीने त्याला तेथेही पाहिले आणि जे लोक जवळ उभे होते, त्यांना ती पुन्हा सांगू लागली, “हा त्यांच्यापैकीच आहे.” तरी त्याने पुन्हा नाकारले; मग काही वेळाने जवळ उभे राहणारे लोक पेत्राला पुन्हा म्हणाले, “तू खरोखरच त्यांच्यापैकीच आहेस, कारण तू गालीली आहेस [व तुझी बोलीही तशीच आहे.]” परंतु तो शापोच्चारण करून व शपथा वाहून म्हणू लागला, “ज्या माणसाविषयी तुम्ही बोलत आहात त्याला मी ओळखत नाही.” तत्क्षणी दुसर्यांदा कोंबडा आरवला. तेव्हा ‘कोंबडा दोन वेळा आरवण्यापूर्वी तू तीन वेळा मला नाकारशील,’ असे जे येशू पेत्राला म्हणाला होता, ते त्याला आठवले; तेव्हा त्याचे अवसान सुटले व संकोच न करता मोठा गळा काढून तो रडू लागला.
मार्क 14:12-72 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
बेखमीर भाकरींच्या सणाच्या पहिल्या दिवशी ओलांडण सणाचा यज्ञपशू मारत असत. त्या दिवशी येशूचे शिष्य त्याला म्हणाले, “आपण ओलांडण सणाचे भोजन करावे म्हणून आम्ही कुठे जाऊन तयारी करावी, अशी आपली इच्छा आहे?” त्याने आपल्या शिष्यांपैकी दोघांना पाठवताना सांगितले, “शहरात जा म्हणजे एक माणूस पाण्याचे मडके घेऊन जाताना तुम्हांला भेटेल. त्याच्यामागून जा. घरात गेल्यावर तेथल्या घरधन्याला असे सांगा की, गुरुजी विचारतात, ‘माझ्या शिष्यांसह ओलांडण सणाचे भोजन करू शकेन, अशी जागा कोठे आहे?’ सजवून तयार केलेली माडीवरची एक प्रशस्त खोली तो तुम्हांला दाखवील, तेथे आपल्यासाठी सर्व तयारी करा.” शिष्य निघून शहरात गेले. येशूने सांगितल्याप्रमाणे त्यांना आढळले, त्यांनी ओलांडण सणाची तयारी केली. संध्याकाळ झाल्यावर येशूचे बारा जणांबरोबर आगमन झाले. ते बसून भोजन करत असता येशू म्हणाला, “मी तुम्हांला ठामपणे सांगतो, तुमच्यापैकी एक जण मला धरून देईल. तो माझ्याबरोबर जेवणात भाग घेत आहे.” ते अस्वस्थ झाले व एकामागून एक त्याला विचारू लागले, “तो मी आहे का?” तो त्यांना म्हणाला, “तुम्हां बारा जणांपैकी एक जण म्हणजे जो माझ्याबरोबर वाटीत भाकरीचा तुकडा बुडवत आहे तो. मनुष्याचा पुत्र तर त्याच्याविषयी धर्मशास्त्रात जसे लिहिले आहे, त्याप्रमाणे जातो खरा, परंतु ज्या माणसाच्या हातून मनुष्याचा पुत्र धरून दिला जातो, त्याची केवढी दुर्दशा होणार! तो माणूस जन्माला आला नसता तर ते त्याच्या भल्याचे असते!” ते भोजन करत असता, येशूने भाकर घेतली, आशीर्वाद देऊन ती मोडली आणि त्यांना देऊन म्हटले, “घ्या, हे माझे शरीर आहे.” त्यानंतर त्याने प्याला घेतला व परमेश्वराचे आभार मानून त्यांना तो दिला. ते सर्व जण त्यातून प्याले. येशू त्यांना म्हणाला, “हे माझे कराराचे रक्त आहे, हे पुष्कळांकरता ओतले आहे. मी तुम्हांला निश्चितपणे सांगतो, मी देवाच्या राज्यात नवा द्राक्षारस पिईन त्या दिवसापर्यंत द्राक्षवेलीचा उपज पुन्हा कधीच पिणार नाही.” त्यानंतर एक स्तोत्र गाऊन ते तेथून ऑलिव्ह डोंगराकडे निघून गेले. येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही सर्व जण माझ्यामुऴे अडखळणार आहात, कारण असे लिहिले आहे, ‘मी मेंढपाळाला मारीन आणि मेंढरांची दाणादाण होईल.’ पण माझे पुनरुत्थान झाल्यावर तुमच्यापुढे मी गालीलमध्ये जाईन.” पेत्र त्याला म्हणाला, “सगळे जरी आपल्याला सोडून गेले, तरी मी आपल्याला कधीच सोडणार नाही.” येशू त्याला म्हणाला, “मी तुला खातरीपूर्वक सांगतो, आज रात्री कोंबडा दोन वेळा आरवण्यापूर्वी तू तीन वेळा मला नाकारशील.” पेत्र आवेशाने बोलला, “आपल्याबरोबर मला मरावे लागले तरीदेखील मी आपल्याला नाकारणार नाही!” इतर सर्व जणही तेच म्हणत होते. ते गेथशेमाने नावाच्या ठिकाणी आले तेव्हा येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “मी प्रार्थना करीपर्यंत येथे बसा.” त्याने पेत्र, याकोब व योहान ह्यांना बरोबर घेतले आणि तो व्याकूळ होऊ लागला. तो त्यांना म्हणाला, “माझ्या जिवाला मरणप्राय वेदना होत आहेत. तुम्ही येथे थांबून जागे राहा.” काहीसे पुढे जाऊन त्याने जमिनीवर लोटांगण घातले व अशी प्रार्थना केली, “शक्य असेल तर ही घटका माझ्यावरून टळून जावो.” तो म्हणत होता, “पित्या, माझ्या पित्या, तुला सर्व काही शक्य आहे, हा प्याला माझ्यापासून दूर कर. तरीदेखील माझ्या इच्छेप्रमाणे नव्हे तर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.” तो येऊन पाहतो तर ते झोपी गेले होते. येशू पेत्राला म्हणाला, “शिमोन, झोपी गेलास का? घटकाभरही तुझ्याने जागे राहवले नाही काय? तुम्ही मोहात पडू नये म्हणून जागे राहा व प्रार्थना करा, आत्मा उत्सुक आहे खरा, परंतु देह दुर्बल आहे.” त्याने पुन्हा जाऊन तेच शब्द उच्चारून प्रार्थना केली. तो पुन्हा येऊन पाहतो तर ते झोपी गेले आहेत, त्यांचे डोळे फार जड झाले होते. त्याला काय उत्तर द्यावे, हे त्यांना सुचेना. तिसऱ्या वेळी येऊन तो त्यांना म्हणाला, “झोपा आणि विसावा घ्या, पुरे झाले! घटका आली आहे! मनुष्याचा पुत्र पापी माणसांच्या हाती धरून दिला जात आहे. उठा, आपण जाऊ या, पाहा, मला धरून देणारा जवळ येत आहे.” येशू बोलत असताना बारांपैकी एक जण म्हणजे यहुदा तेथे आला. त्याच्याबरोबर मुख्य याजक, शास्त्री व वडीलजन ह्यांच्याकडची एक टोळी तलवारी व सोटे घेऊन आली होती. त्याला धरून देणाऱ्याने तर त्यांना अशी खूण सांगून ठेवली होती, “मी ज्याचे चुंबन घेईन, तोच तो आहे, त्याला धरा व त्याला नीट बंदोबस्ताने घेऊन जा.” यहुदा आल्यावर लगेच येशूकडे गेला आणि, “गुरुवर्य”, असे म्हणून त्याने त्याचे चुंबन घेतले. तेव्हा त्या लोकांनी येशूला धरले व त्याला अटक केली. तेथे शेजारी जे उभे होते, त्यांच्यापैकी एकाने तलवार उपसली आणि उच्च याजकांच्या नोकरावर वार करून त्याचा कान कापून टाकला. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “एखाद्या लुटारूवर तलवारी व सोटे घेऊन जावे, तसे तुम्ही मला धरायला निघालात काय? मी दररोज मंदिरात शिकवत असता तुमच्याबरोबर असे आणि तुम्ही मला धरले नाही, परंतु धर्मशास्त्रलेख पूर्ण होणे आवश्यक आहे.” त्यानंतर त्याचे सर्व शिष्य त्याला सोडून पळून गेले. एक तरुण उघड्या अंगावर केवळ तागाचे कापड पांघरून येशूच्या मागून आला होता. त्याला त्यांनी अटक करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो ते तागाचे कापड टाकून तिथून उघडाच पळून गेला. नंतर त्यांनी येशूला उच्च याजकांच्या घरी नेले. तेथे सर्व मुख्य याजक, वडीलजन व शास्त्री एकत्र जमले. काही अंतर ठेवून मागे येत असलेला पेत्र रक्षकांबरोबर उच्च याजकांच्या वाड्यातील शेकोटीजवळ बसला. मुख्य याजक व न्यायसभेचे सर्व सदस्य येशूला ठार मारण्याकरता त्याच्याविरुद्ध पुरावा शोधत होते, परंतु त्यांना तो मिळेना. बऱ्याच जणांनी येशूविरुद्ध खोट्या साक्षी दिल्या, परंतु त्यांच्या साक्षींत मेळ बसेना. काही जण उभे राहून येशूविरुद्ध खोटी साक्ष देऊन म्हणाले, “‘हातांनी बांधलेले हे मंदिर मी मोडून टाकीन व हातांनी न बांधलेले असे दुसरे मंदिर तीन दिवसांत उभारीन’,असे आम्ही ह्याला बोलताना ऐकले.” परंतु त्यांच्या ह्या साक्षींतदेखील मेळ बसेना. उच्च याजकांनी मध्ये उभे राहून येशूला विचारले, “तू काहीच उत्तर देत नाहीस काय? हे तुझ्याविरुद्ध आरोप करत आहेत ना?” तरी पण येशू गप्प राहिला. त्याने काही उत्तर दिले नाही. पुन्हा उच्च याजकांनी त्याला विचारले, “धन्य देवाचा पुत्र जो ख्रिस्त, तो तू आहेस काय?” येशू म्हणाला, “मी आहे. तुम्ही मनुष्याचा पुत्र सर्वसमर्थ परमेश्वराच्या उजवीकडे बसलेला व आकाशातील मेघांवर आरूढ होऊन येत असलेला पाहाल.” तेव्हा उच्च याजक आपले कपडे फाडून म्हणाले, “आपल्याला आणखी साक्षीदारांची काही गरज नाही! हे दुर्भाषण तुम्ही ऐकले आहे, तुमचा निर्णय काय?” त्या वेळी तो मरणदंडाला पात्र आहे, असे सर्वांनी मिळून ठरवले. कित्येक जण त्याच्यावर थुंकू लागले, त्याचे डोळे झाकून व त्याला बुक्क्या मारून म्हणू लागले, “आता संदेष्टा म्हणून सांग.” रक्षकांनी त्याला आपल्या ताब्यात घेतले व चपराका मारल्या. इकडे पेत्र खाली अंगणात असता उच्च याजकांच्या दासींपैकी एक तेथे आली. पेत्राला शेकत असताना पाहून तिने त्याच्याकडे टक लावून म्हटले, “तूही त्या नासरेथकर येशूबरोबर होतास.” परंतु तो नाकारून म्हणाला, “तू काय म्हणतेस ते मला ठाऊक नाही व समजतही नाही.” त्यानंतर तो बाहेर देवडीवर गेला, [इतक्यात कोंबडा आरवला!] त्या दासीने त्याला तेथेही पाहिले. जे लोक जवळ उभे होते, त्यांना ती पुन्हा सांगू लागली, “हा त्यांच्यापैकीच आहे.” तरी त्याने पुन्हा नाकारले. काही वेळाने जवळ उभे राहणारे लोक पेत्राला पुन्हा म्हणाले, “तू खरोखर त्यांच्यापैकी आहेस कारण तू गालीली आहेस.” परंतु तो स्वतःला शाप देऊन शपथपूर्वक म्हणू लागला, “ज्या माणसाविषयी तुम्ही बोलत आहात, त्याला मी ओळखत नाही.” त्याच वेळी दुसऱ्यांदा कोंबडा आरवला. तेव्हा ‘कोंबडा दोन वेळा आरवण्यापूर्वी तू मला तीन वेळा नाकारशील’, असे जे येशू पेत्राला म्हणाला होता, ते त्याला आठवले आणि तो भावनाविवश होऊन रडला.