मार्क 14:1-21
मार्क 14:1-21 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
वल्हांडण व बेखमीर भाकरीच्या सणाच्या दोन दिवस अगोदर मुख्य याजक लोक आणि नियमशास्त्राचे शिक्षक कपटाने त्यास धरून जिवे मारण्याचा मार्ग शोधीत होते. कारण ते म्हणत होते “आपण ते सणात करू नये नाही तर लोक दंगा करतील.” येशू बेथानी येथे शिमोन कुष्ठरोगी याच्या घरी मेजावर जेवायला बसला असता कोणीएक स्त्री वनस्पतीपासून बनवलेल्या शुद्ध सुगंधी तेलाची फार मौल्यवान अलाबास्त्र कुपी घेऊन आली. तिने अलाबास्त्र कुपी फोडली आणि सुगंधी तेल येशूच्या डोक्यावर ओतले. तेथे असलेले काही लोक रागावले, ते एकमेकांना म्हणाले, “सुगंधी तेलाचा असा नाश व्हावा हे बरे नाही. कारण हे सुगंधी तेल तीनशे सोन्याच्या नाण्यापेक्षा अधिक किंमतीला विकता आले असते आणि ते पैसे गरीबांना देता आले असते.” असे म्हणून त्यांनी तिच्याविरुद्ध कुरकुर केली. पण येशू म्हणाला, “तिला एकटे सोडा. तिला का त्रास देता? तिने माझ्यासाठी एक सुंदर कृत्य केले आहे. गरीब तर नेहमी तुमच्याजवळ असतील आणि पाहिजे तेव्हा त्यांना मदत करणे तुम्हास शक्य आहे. परंतु मी नेहमीच तुमच्याबरोबर असेन असे नाही. तिला शक्य झाले ते तिने केले. तिने दफनविधीच्या तयारीच्या काळाअगोदरच माझ्या शरीरावर सुगंधी तेल ओतले आहे. मी तुम्हास खरे सांगतो, सर्व जगात जेथे कोठे सुवार्तेची घोषणा केली जाईल तेथे तिची आठवण म्हणून तिने जे केले ते नेहमीच सांगितले जाईल.” नंतर बारा शिष्यांपैकी एक, यहूदा इस्कर्योत येशूला विश्वासघाताने धरून देण्यासाठी मुख्य याजकांकडे गेला. जेव्हा याजकांनी हे ऐकले तेव्हा त्यांना फार आनंद झाला आणि त्यांनी त्यास पैसे देण्याचे वचन दिले. मग यहूदा येशूला धरून त्यांच्या हातात देण्याची संधी पाहू लागला. बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी जेव्हा वल्हांडण सणाचा कोकरा बळी करत असत तेव्हा येशूचे शिष्य त्यास म्हणाले, “आम्ही जातो आणि वल्हांडण सणाच्या भोजनाची तयारी करतो. आम्ही कोठे जाऊन तयारी करावी अशी आपली इच्छा आहे?” येशूने आपल्या दोघा शिष्यांना पाठवले आणि त्यांना सांगितले, “शहरात जा आणि पाण्याचे भांडे घेऊन जाणारा मनुष्य तुम्हास भेटेल, त्याच्यामागे जा. आणि जेथे तो आत जाईल त्या घराच्या मालकास सांगा, ‘गुरुजी म्हणतात, जेथे मला माझ्या शिष्यांबरोबर वल्हांडण सणाचे भोजन करणे शक्य होईल अशी खोली कोठे आहे?’ आणि तो तुम्हास माडीवरची एक मोठी नीटनेटकी केलेली खोली दाखवील, तेथे आपल्यासाठी तयारी करा.” शिष्य निघाले आणि ते शहरात गेले आणि येशूने सांगितल्याप्रमाणे त्यांना सर्व आढळले. मग त्यांनी वल्हांडण सणाच्या भोजनाची तयारी केली. संध्याकाळ झाली तेव्हा येशू बारा शिष्यांसह आला. मेजावर बसून ते जेवीत असता येशू म्हणाला, “मी तुम्हास खरे सांगतो, तुमच्यापैकी जो एकजण मला शत्रूच्या स्वाधीन करून देईल, तो माझ्याबरोबर येथे जेवण करीत आहे.” शिष्य अतिशय खिन्न झाले व प्रत्येकजण त्यास म्हणू लागला, “तो मी आहे का?” तो त्यांना म्हणाला, “बारा जणांपैकी एक जो माझ्याबरोबर ताटात भाकर बुडवत आहे तोच. त्याच्याविषयी पवित्र शास्त्रात जसे लिहिले आहे, तसा मनुष्याचा पुत्र जाईल, परंतु ज्याच्याकडून मनुष्याचा पुत्र धरून दिला जाईल, त्याची केवढी दुर्दशा होणार. तो जन्मला नसता तर ते त्याच्यासाठी बरे झाले असते.”
मार्क 14:1-21 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
वल्हांडण आणि बेखमीर भाकरीचा सण यांना दोनच दिवसांचा अवधी होता आणि प्रमुख याजकवर्ग आणि नियमशास्त्र शिक्षक, येशूंना गुप्तपणे धरून जिवे मारावे म्हणून संधी शोधत होते. ते म्हणाले, “आपण हे सणाच्या समयी करू नये, कारण तसे केले तर लोक कदाचित दंगल करतील.” येशू बेथानी येथे असताना, “कुष्ठरोगी शिमोन,” याच्या घरी भोजनास बसले होते, त्यावेळी एक स्त्री, शुद्ध जटामांसीपासून बनविलेले अतिशय मोलवान सुगंधी तेल असलेली एक अलाबास्त्र कुपी घेऊन आत आली आणि तिने ती कुपी फोडून येशूंच्या मस्तकावर ओतली. तिथे हजर असलेल्यांपैकी काहीजण एकमेकांना संतापाने म्हणत होते, “तेलाची ही नासाडी कशाला? एका वर्षाच्या मजुरीपेक्षाही अधिक किमतीस विकून ते पैसे गोरगरिबांना देता आले असते.” आणि त्यांनी कठोरपणे तिचा निषेध केला. “तिच्या वाटेस जाऊ नका,” येशू त्यांना म्हणाले, “तुम्ही तिला त्रास का देता? तिने माझ्यासाठी एक सुंदर कृत्य केले आहे. गरीब लोक तर नेहमीच तुमच्याबरोबर असतील. तुम्हाला पाहिजे तेव्हा त्यांना मदत करता येईल. पण मी तुमच्याबरोबर नेहमीच असणार नाही. तिला जे करता आले, ते तिने केले. माझ्या अंत्यसंस्कारासाठी तिने माझ्या शरीरावर आधी सुगंधी तेल ओतले आहे. मी तुम्हाला निश्चित सांगतो की, जगात जिथे कुठे शुभवार्ता गाजविण्यात येईल, तिथे हिने केलेले हे सत्कार्य हिच्या आठवणीसाठी सांगितले जाईल.” नंतर बारा शिष्यांपैकी एक, यहूदाह इस्कर्योत येशूंना विश्वासघाताने धरून देण्यास महायाजकांकडे गेला. तेव्हा त्यांना आनंद झाला आणि त्याला मोबदला देण्याचे त्यांनी वचन दिले. मग तो येशूंना त्यांच्या हातात धरून देण्याची योग्य संधी शोधू लागला. बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी, म्हणजे रीतीप्रमाणे ज्या दिवशी वल्हांडणाच्या कोकर्याचा यज्ञ करत असत, येशूंच्या शिष्यांनी त्यांना विचारले, “वल्हांडणाच्या भोजनाची तयारी आम्ही कुठे करावी अशी आपली इच्छा आहे?” तेव्हा येशूंनी त्यांच्या शिष्यांपैकी दोघांना पाठविले आणि सांगितले, “तुम्ही शहरात जा आणि एक मनुष्य पाण्याने भरलेली मोठी घागर घेऊन जात असलेला तुम्हाला भेटेल, त्याच्यामागे जा. तो ज्या घरात जाईल त्या घराच्या मालकाला सांगा, ‘गुरुजी विचारत आहेत की, ज्या खोलीत मला माझ्या शिष्यांबरोबर वल्हांडणाचे भोजन करता येईल, ती पाहुण्यांची खोली कुठे आहे?’ तो तुम्हाला माडीवरील मोठी तयार व सुसज्ज असलेली एक खोली दाखवेल. तिथे आपल्यासाठी तयारी करा.” ते शिष्य नगरात गेले आणि येशूंनी सांगितल्याप्रमाणे त्यांना आढळून आले. तेव्हा त्यांनी वल्हांडणाच्या भोजनाची तयारी केली. संध्याकाळ झाल्यावर येशू आपल्या बारा शिष्यांबरोबर तिथे आले, ते सर्व मेजाभोवती बसून भोजन करीत असताना येशू म्हणाले, “मी तुम्हाला निश्चित सांगतो की, तुमच्यापैकी एकजण माझा विश्वासघात करेल—तो माझ्याबरोबर पंक्तीला बसून जेवत आहे.” ते दुःखाने भरून गेले आणि एकामागून एक त्यांना विचारू लागले, “खरोखर तो मी तर नाही ना?” “तो तुम्हा बाराजणांपैकी एक आहे.” त्यांनी उत्तर दिले, “जो माझ्याबरोबर ताटात भाकर बुडवीत आहे. कारण त्यांच्याबद्दल लिहिले होते त्याप्रमाणे मानवपुत्र जातो खरा. परंतु जो मानवपुत्राला विश्वासघाताने धरून देतो, त्याचा धिक्कार असो. तो जन्मलाच नसता, तर ते त्याला अधिक हिताचे झाले असते.”
मार्क 14:1-21 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग दोन दिवसांनंतर ‘वल्हांडण व बेखमीर भाकरी’चा सण होता आणि त्याला कपटाने कसे धरावे व जिवे मारावे हे मुख्य याजक व शास्त्री पाहत होते; कारण ते म्हणत होते, “आपण हे सणात करू नये, केले तर कदाचित लोकांत दंगल होईल.” तो बेथानी येथे कुष्ठरोगी शिमोन ह्याच्या घरी जेवायला बसला असता कोणीएक स्त्री जटामांसीच्या फार मौल्यवान सुगंधी तेलाने भरलेली अलाबास्त्र कुपी घेऊन आली; तिने ती कुपी फोडून त्याच्या मस्तकावर ओतली. तेव्हा कित्येक जण आपसांत चडफडून म्हणाले, “ह्या सुगंधी तेलाची अशी नासाडी कशासाठी केली?” कारण “हे सुगंधी तेल तीनशेपेक्षा अधिक रुपयांना विकून ते गोरगरिबांना देता आले असते.” अशी ते तिच्याविषयी कुरकुर करत होते. परंतु येशू म्हणाला, “हिच्या वाटेस जाऊ नका, हिला त्रास का देता? हिने माझ्यासाठी एक सत्कृत्य केले आहे. गोरगरीब नेहमीच तुमच्याबरोबर असतात व पाहिजे तेव्हा तुम्हांला त्यांचे बरे करता येते; परंतु मी तुमच्याबरोबर नेहमीच आहे असे नाही. हिला जे काही करता आले ते हिने केले आहे. हिने उत्तरकार्यासाठी माझ्या शरीराला अगोदरच सुगंधद्रव्य लावले आहे. मी तुम्हांला खचीत सांगतो की, सर्व जगात जेथे जेथे सुवार्तेची घोषणा करण्यात येईल तेथे तेथे हिने जे केले आहे तेही हिच्या स्मरणार्थ सांगण्यात येईल.” नंतर त्या बारा जणांपैकी एक म्हणजे यहूदा इस्कर्योत हा त्याला मुख्य याजकांच्या स्वाधीन करून देण्याच्या विचाराने त्यांच्याकडे निघून गेला. त्याचे म्हणणे ऐकून त्यांना आनंद झाला आणि त्यांनी त्याला पैसे देऊ केले; तेव्हा तो त्याला धरून देण्याची सोईस्कर संधी पाहू लागला. बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी वल्हांडणाचा यज्ञपशू मारत असत; त्या दिवशी त्याचे शिष्य त्याला म्हणाले, “आपण वल्हांडणाचे भोजन करावे म्हणून आम्ही कोठे जाऊन तयारी करावी अशी आपली इच्छा आहे?” मग त्याने आपल्या शिष्यांपैकी दोघांना पाठवताना सांगितले, “नगरात जा, म्हणजे कोणीएक माणूस पाण्याचे मडके घेऊन जाताना तुम्हांला भेटेल; त्याच्यामागून जा. तो आत जाईल तेथल्या घरधन्याला असे सांगा : ‘गुरूजी विचारतात मी आपल्या शिष्यांसह वल्हांडणाचे भोजन करावे अशी माझी उतरण्याची जागा कोठे आहे?’ मग तो सजवून तयार केलेली एक माडीवरची मोठी खोली तुम्हांला दाखवील; तेथे आपल्यासाठी तयारी करा.” मग शिष्य निघून गेले, तेव्हा त्याने सांगितल्याप्रमाणेच त्यांना आढळले आणि त्यांनी वल्हांडणाची तयारी केली. मग संध्याकाळ झाल्यावर तो बारा जणांबरोबर आला. आणि ते बसून भोजन करत असता येशू म्हणाला, “मी तुम्हांला खचीत सांगतो, तुमच्यापैकी एक जण मला धरून देईल, तो माझ्याबरोबर जेवणारा आहे.” ते खिन्न होऊ लागले व एकामागून एक त्याला विचारू लागले, “मी आहे काय तो?” तो त्यांना म्हणाला, “बारा जणांपैकी एक जण म्हणजे जो माझ्याबरोबर ताटात हात घालत आहे तोच. मनुष्याचा पुत्र तर त्याच्याविषयी शास्त्रात जसे लिहिले आहे त्याप्रमाणे जातो खरा; परंतु ज्या माणसाच्या हातून मनुष्याचा पुत्र धरून दिला जातो, त्याची केवढी दुर्दशा होणार! तो माणूस जन्मला नसता तर ते त्याला बरे झाले असते.”
मार्क 14:1-21 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
ओलांडण सण व बेखमीर भाकरींच्या सणाला अजून दोन दिवसांचा अवधी होता आणि येशूला कपटाने कसे धरावे व ठार मारावे, हे मुख्य याजक व शास्त्री पाहत होते. ते म्हणत होते, “आपण हे सणाच्या दिवसांत करू नये, केले तर लोकांत दंगल होईल.” येशू बेथानी येथे कुष्ठरोगी शिमोनच्या घरी जेवायला बसला असता, एक स्त्री जटामांसीच्या फार मौल्यवान अत्तराने भरलेली संगमरवरी कुपी घेऊन आली. तिने ती फोडून त्याच्या मस्तकावर ओतली. कित्येक जण संतप्त होऊन आपसात म्हणाले, “ह्या अत्तराचा असा अपव्यय का केला? ते तीनशेपेक्षा अधिक चांदीच्या नाण्यांना विकून गोरगरिबांना मदत करता आली असती”, अशी ते तिच्यावर टीका करीत होते. परंतु येशू म्हणाला, “हिला राहू द्या. हिला त्रास का देता? हिने माझ्यासाठी एक सत्कृत्य केले आहे. गरीब नेहमीच तुमच्याबरोबर असतील व पाहिजे तेव्हा तुम्ही त्यांना साहाय्य करू शकता, परंतु मी तुमच्याबरोबर नेहमी असणार नाही. तिला जे काही करता आले, ते तिने केले; तिने माझ्या उत्तरकार्यासाठी माझ्या शरीराला अगोदरच सुगंधी द्रव्य लावले आहे. मी तुम्हांला निश्चितपणे सांगतो, सर्व जगात जेथे जेथे शुभवर्तमानाची घोषणा करण्यात येईल, तेथे तेथे हिने जे केले आहे, ते तिची आठवण म्हणून सांगण्यात येईल.” बारा जणांपैकी एक म्हणजे यहुदा इस्कर्योत हा येशूला मुख्य याजकांच्या स्वाधीन करून देण्याच्या हेतूने त्यांच्याकडे गेला. त्याचे म्हणणे ऐकून त्यांना आनंद झाला. त्यांनी त्याला पैसे देऊ केले म्हणून तो येशूला धरून देण्याची सोईस्कर संधी शोधू लागला. बेखमीर भाकरींच्या सणाच्या पहिल्या दिवशी ओलांडण सणाचा यज्ञपशू मारत असत. त्या दिवशी येशूचे शिष्य त्याला म्हणाले, “आपण ओलांडण सणाचे भोजन करावे म्हणून आम्ही कुठे जाऊन तयारी करावी, अशी आपली इच्छा आहे?” त्याने आपल्या शिष्यांपैकी दोघांना पाठवताना सांगितले, “शहरात जा म्हणजे एक माणूस पाण्याचे मडके घेऊन जाताना तुम्हांला भेटेल. त्याच्यामागून जा. घरात गेल्यावर तेथल्या घरधन्याला असे सांगा की, गुरुजी विचारतात, ‘माझ्या शिष्यांसह ओलांडण सणाचे भोजन करू शकेन, अशी जागा कोठे आहे?’ सजवून तयार केलेली माडीवरची एक प्रशस्त खोली तो तुम्हांला दाखवील, तेथे आपल्यासाठी सर्व तयारी करा.” शिष्य निघून शहरात गेले. येशूने सांगितल्याप्रमाणे त्यांना आढळले, त्यांनी ओलांडण सणाची तयारी केली. संध्याकाळ झाल्यावर येशूचे बारा जणांबरोबर आगमन झाले. ते बसून भोजन करत असता येशू म्हणाला, “मी तुम्हांला ठामपणे सांगतो, तुमच्यापैकी एक जण मला धरून देईल. तो माझ्याबरोबर जेवणात भाग घेत आहे.” ते अस्वस्थ झाले व एकामागून एक त्याला विचारू लागले, “तो मी आहे का?” तो त्यांना म्हणाला, “तुम्हां बारा जणांपैकी एक जण म्हणजे जो माझ्याबरोबर वाटीत भाकरीचा तुकडा बुडवत आहे तो. मनुष्याचा पुत्र तर त्याच्याविषयी धर्मशास्त्रात जसे लिहिले आहे, त्याप्रमाणे जातो खरा, परंतु ज्या माणसाच्या हातून मनुष्याचा पुत्र धरून दिला जातो, त्याची केवढी दुर्दशा होणार! तो माणूस जन्माला आला नसता तर ते त्याच्या भल्याचे असते!”