YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मार्क 11:11-21

मार्क 11:11-21 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

नंतर येशूने यरूशलेम शहरात प्रवेश केल्यावर तो परमेश्वराच्या भवनात गेला व सभोवतालचे सर्व पाहिले. त्या सुमारास संध्याकाळ झाली होती म्हणून तो आपल्या बारा शिष्यांसह बेथानीस निघून गेला. दुसऱ्या दिवशी, ते बेथानीहून निघाल्यानंतर येशूला भूक लागली. त्यास पानांनी भरलेले अंजिराचे एक झाड दुरून दिसले. त्यावर काही मिळेल या आशेने तो पाहावयास गेला पण तेथे त्यास पानांशिवाय काही आढळले नाही कारण तो अंजिराचा हंगाम नव्हता. नंतर तो त्यास म्हणाला, “यापुढे सर्वकाळ तुझे फळ कोणीही खाणार नाही.” त्याच्या शिष्यांनी हे ऐकले. नंतर ते यरूशलेम शहरात गेले आणि येशू परमेश्वराच्या भवनात गेला तेव्हा भवनात जे खरेदी विक्रीचा व्यवहार करीत होते त्यांना येशू बाहेर घालवू लागला. त्याने सराफांचे चौरंग व जे कबुतरे विकत होते त्यांची बैठक उलथून टाकली. त्याने कोणालाही कसल्याच वस्तूंची परमेश्वराच्या भवनामधून नेआण करू दिली नाही. मग येशू शिकवू लागला. तो त्यांना म्हणाला, “माझ्या घराला सर्व राष्ट्रांचे प्रार्थनाभवन म्हणतील, असे पवित्र शास्त्रात लिहिले नाही काय? परंतु तुम्ही त्यास लुटारूंची गुहा बनवली आहे.” मुख्य याजकांनी आणि नियमशास्त्राच्या शिक्षकांनी हे ऐकले आणि ते त्यास ठार मारण्याचा मार्ग शोधू लागले कारण सर्व लोक त्याच्या शिक्षणाने थक्क झाल्याने ते त्यास भीत होते. त्या रात्री येशू व त्याचे शिष्य शहराबाहेर गेले. सकाळी येशू आणि त्याचे शिष्य जात असता त्यांनी ते अंजिराचे झाड मुळापासून वाळून गेलेले पाहिले. पेत्राला आठवण झाली. तो येशूला म्हणाला, “रब्बी, पाहा! ज्या अंजिराच्या झाडाला आपण शाप दिला ते वाळून गेले आहे.”

सामायिक करा
मार्क 11 वाचा

मार्क 11:11-21 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

येशूंनी यरुशलेममध्ये प्रवेश केला आणि ते मंदिराच्या अंगणात गेले. त्यांनी सर्व गोष्टींचे बारकाईने निरीक्षण केले, कारण आता उशीर झाला होता, म्हणून आपल्या बारा शिष्यांबरोबर ते बेथानीस गेले. दुसर्‍या दिवशी ते बेथानी सोडत असताना, येशूंना भूक लागली. काही अंतरावर पानांनी बहरलेले एक अंजिराचे झाड त्यांच्या दृष्टीस पडले, त्यावर काही फळे सापडतील या शोधार्थ ते तिथे गेले. तिथे पोहोचल्यावर, त्यांना फक्त पानांशिवाय काही आढळले नाही, कारण तो अंजिरांचा हंगाम नव्हता. तेव्हा येशू झाडाला म्हणाले, “तुझे फळ कोणीही कधीही न खावो.” त्यांचे हे बोलणे शिष्य ऐकत होते. यरुशलेमला पोहोचल्यावर, येशू मंदिराच्या अंगणात गेले आणि तिथे खरेदीविक्री करणार्‍या सर्वांना ते बाहेर घालवून देऊ लागले. पैशाची अदलाबदल करणार्‍यांचे मेज आणि कबुतरे विकणार्‍यांची आसने त्यांनी उधळून लावली. त्याचप्रमाणे मंदिराच्या आवारातून विक्रीच्या मालाची नेआण करण्यासही त्यांनी मनाई केली. येशू त्यांना शिकवीत होते, ते म्हणाले, “असे लिहिले नाही का: माझ्या घराला ‘सर्व राष्ट्रांसाठी प्रार्थना घर म्हणतील,’ परंतु तुम्ही ती ‘लुटारूंची गुहा केली आहे.’ ” येशूंनी काय केले, हे प्रमुख याजकवर्ग आणि इतर नियमशास्त्र शिक्षकांनी ऐकले, तेव्हा त्यांना कसे ठार मारता येईल याचा मार्ग ते शोधू लागले. त्यांना येशूंची भीती वाटत होती. कारण त्यांच्या शिक्षणामुळे सर्व समुदाय आश्चर्यचकित झाला होता. संध्याकाळ झाली, तेव्हा येशू व त्यांचे शिष्य शहराच्या बाहेर गेले. सकाळी जात असताना अंजिराचे झाड मुळापासून सुकून गेले आहे असे त्यांना दिसले! पेत्राला आठवण आली आणि त्यांनी येशूंना म्हटले, “गुरुजी, पाहा! ज्याला आपण शाप दिला ते अंजिराचे झाड वाळून गेले आहे!”

सामायिक करा
मार्क 11 वाचा

मार्क 11:11-21 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

नंतर येशू यरुशलेमेत आल्यावर मंदिरात गेला आणि त्याने सभोवार सर्वकाही पाहिल्यावर संध्याकाळ झाली, म्हणून तो आपल्या बारा शिष्यांसह बेथानीस निघून गेला. दुसर्‍या दिवशी ते बेथानीहून निघाल्यानंतर त्याला भूक लागली. तेव्हा पानांनी डवरलेले एक अंजिराचे झाड त्याला दुरून दिसले, आणि कदाचित त्याच्यावर काही मिळेल ह्या अपेक्षेने तो तिकडे गेला; परंतु तेथे गेल्यावर पानांवाचून त्याला काही आढळले नाही; कारण अजून अंजिराचा हंगाम आला नव्हता. तेव्हा तो त्याला म्हणाला, “ह्यापुढे कोणीही तुझे फळ कधीही न खावो.” त्याचे शिष्य हे ऐकत होते. मग ते यरुशलेमेस येऊन पोहचल्यावर येशू मंदिरात गेला व मंदिरात क्रय-विक्रय करणार्‍यांना बाहेर घालवून देऊ लागला. त्याने सराफांचे चौरंग व कबुतरे विकणार्‍यांच्या बैठका उलथून टाकल्या; त्याने कोणालाही कसल्याच भांड्याची मंदिरामधून नेआण करू दिली नाही. मग तो त्यांना शिक्षण देऊ लागला व म्हणाला की, “‘माझ्या घराला सार्वराष्ट्रीय प्रार्थनामंदिर म्हणतील,’ असा शास्त्रलेख आहे ना? परंतु तुम्ही तर ही ‘लुटारूंची गुहा’ करून टाकली आहे.” मुख्य याजकांनी व शास्त्र्यांनी हे ऐकले आणि त्याचा घात कसा करावा ह्याविषयी ते युक्ती योजू लागले; कारण सर्व लोक त्याच्या शिक्षणावरून थक्क झाल्याकारणाने ते त्याला भीत होते. रोज संध्याकाळी ते शहराच्या बाहेर जात असत. मग सकाळी वाटेने जाताना त्यांना ते अंजिराचे झाड मुळापासून वाळून गेलेले दिसले. तेव्हा पेत्राला आठवण होऊन तो त्याला म्हणाला, “गुरूजी, आपण ज्या अंजिराच्या झाडाला शाप दिला ते वाळून गेले आहे पाहा.”

सामायिक करा
मार्क 11 वाचा

मार्क 11:11-21 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

येशू यरुशलेममध्ये आल्यावर मंदिरात गेला आणि त्याने सभोवार सर्व काही पाहून घेतले. परंतु दिवस मावळत आहे, हे पाहून तो बारा जणांबरोबर बेथानीस निघून गेला. दुसऱ्या दिवशी ते बेथानी येथून निघाल्यानंतर त्याला भूक लागली. पानांनी भरलेले एक अंजिराचे झाड त्याला दुरून दिसले. कदाचित झाडावर काही मिळेल, ह्या अपेक्षेने तो तिकडे गेला. परंतु तेथे गेल्यावर पानांवाचून त्याला काही आढळले नाही कारण तो अंजिरांचा हंगाम नव्हता. येशू त्या झाडाला म्हणाला, “कोणी ह्यापुढे तुझे फळ कधी न खावो.” त्याचे शिष्य हे ऐकत होते. ते यरुशलेम येथे पोहोचल्यावर येशू मंदिरात गेला व मंदिरात खरेदीविक्री करणाऱ्यांना तो बाहेर घालवून देऊ लागला. त्याने सराफांचे चौरंग व कबुतरे विकणाऱ्यांची आसने उलथून टाकली. त्याने कोणालाही मंदिराच्या आवारातून कसल्याही प्रकारची ने-आण करू दिली नाही. नंतर तो त्यांना शिकवू लागला व म्हणाला, “‘माझ्या मंदिराला सर्व राष्ट्रांसाठी प्रार्थनागृह म्हणतील’, असा धर्मशास्त्रलेख आहे ना! पण तुम्ही तर ही लुटारूंची गुहा करून टाकली आहे.” मुख्य याजकांनी व शास्त्र्यांनी हे ऐकले आणि येशूचा घात कसा करावा, ह्याविषयी ते योजना आखू लागले; कारण सर्व लोक त्याच्या प्रबोधनावरून थक्क झाल्यामुळे ते त्याला भीत होते. संध्याकाळी येशू व त्याचे शिष्य शहर सोडून गेले. दुसऱ्या दिवशी पहाटेस वाटेने जाताना त्यांना ते अंजिराचे झाड मुळापासून वाळून गेलेले दिसले. तेव्हा पेत्राला त्याची आठवण होऊन तो त्याला म्हणाला, “गुरुवर्य, पाहा, आपण ज्या अंजिराच्या झाडाला शाप दिला ते वाळून गेले आहे!”

सामायिक करा
मार्क 11 वाचा