मार्क 10:26-45
मार्क 10:26-45 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ते यापेक्षाही अधिक आचर्यचकित झाले आणि एकमेकाला म्हणाले, “तर मग कोणाचे तारण होणे शक्य आहे?” त्यांच्याकडे पाहून येशू म्हणाला, “मनुष्यांना हे अशक्य आहे पण देवाला नाही, कारण देवाला सर्व गोष्टी शक्य आहेत.” पेत्र त्यास म्हणू लागला, “पाहा, आम्ही सर्व सोडले आहे आणि आपल्यामागे आलो आहोत.” येशू म्हणाला, “मी तुम्हास खरे सांगतो, ज्याने ज्याने माझ्याकरिता व सुवार्तेकरता घरदार, बहिण, भाऊ, आईवडील, मुलेबाळे किंवा शेतीवाडी सोडली आहे, अशा प्रत्येकाला शेवटच्या काळी छळणुकीबरोबर शंभरपटीने घरे, भाऊ, बहिणी, आया, मुले, शेते आणि येणाऱ्या युगात सार्वकालिक जीवन मिळाल्याशिवाय राहणार नाही. तरी पहिले ते शेवटचे व शेवटचे ते पहिले, असे पुष्कळ जणांचे होईल.” मग ते वर यरूशलेम शहराच्या वाटेने जात असता येशू त्यांच्यापुढे चालला होता. त्याचे शिष्य विस्मित झाले आणि त्याच्यामागून येणारे घाबरले होते. नंतर येशूने त्या बारा शिष्यांना पुन्हा एकाबाजूला घेतले आणि स्वतःच्या बाबतीत काय घडणार आहे हे त्यांना सांगू लागला. “पाहा! आपण वर यरूशलेम शहरास जात आहोत आणि मनुष्याचा पुत्र धरून मुख्य याजक लोक आणि नियमशास्त्राचे शिक्षक यांच्या हाती दिला जाईल. ते त्यास मरणाची शिक्षा देतील आणि ते त्यास परराष्ट्रीय लोकांच्या हाती देतील. ते त्याची थट्टा करतील, त्याच्यावर थुंकतील, त्यास फटके मारतील, ठार करतील आणि तीन दिवसानी तो पुन्हा उठेल.” याकोब व योहान हे जब्दीचे पुत्र त्याच्याकडे आले आणि त्यास म्हणाले, “गुरुजी, आम्ही आपणाजवळ जे मागू ते आपण आमच्यासाठी करावे अशी आमची इच्छा आहे.” येशू त्यांना म्हणाला, “मी तुमच्यासाठी काय करावे अशी तुमची इच्छा आहे?” ते म्हणाले, “आपल्या वैभवात आमच्यापैकी एकाला तुमच्या उजवीकडे व दुसऱ्याला डावीकडे बसण्याचा अधिकार द्यावा.” येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही काय मागत आहात हे तुम्हास कळत नाही. मी जो प्याला पिणार आहे, तो तुमच्याने पिणे शक्य आहे काय? किंवा मी जो बाप्तिस्मा घेणार आहे तो तुमच्याने घेणे शक्य आहे काय?” ते त्यास म्हणाले, “आम्हास शक्य आहे.” मग येशू त्यांना म्हणाला, “मी जो प्याला पिणार आहे तो तुम्ही प्याल आणि जो बाप्तिस्मा घेईन तो तुम्ही घ्याल, परंतु माझ्या उजवीकडे किंवा डावीकडे बसू देणे माझ्या हाती नाही. ज्यांच्यासाठी त्या जागा तयार केल्या आहेत, त्यांच्यासाठीच त्या राखून ठेवल्या आहेत.” दहा शिष्यांनी या विनंतीविषयी ऐकले तेव्हा ते याकोब व योहानावर फार रागावले. येशूने त्यांना जवळ बोलावले आणि म्हटले, “तुम्हास माहीत आहे की, परराष्ट्री जे सत्ताधारी आहेत ते त्यांच्यावर स्वामित्व गाजवतात आणि त्यांचे पुढारी त्यांच्यावर अधिकार गाजवतात. परंतु तुमच्याबाबतीत तसे नाही. तुमच्यातील जो कोणी मोठा होऊ पाहतो त्याने तुमचा सेवक झाले पाहिजे. आणि जो कोणी पाहिला होऊ इच्छितो त्याने सर्वांचा सेवक झाले पाहिजे. कारण मनुष्याचा पुत्रही सेवा करून घ्यावयास नाही तर तो सेवा करावयास आला आहे, पुष्कळांच्या खंडणीकरिता आपला जीव देण्यासाठी आला आहे.”
मार्क 10:26-45 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
शिष्य आणखी चकित झाले व ते एकमेकास म्हणू लागले, “मग कोणाचे तारण होऊ शकेल?” येशूंनी त्यांच्याकडे निरखून पाहिले आणि म्हटले, “मानवाला हे अशक्य आहे, परंतु परमेश्वराला नाही; परमेश्वराला सर्वगोष्टी शक्य आहेत.” पेत्र बोलला, “आपल्याला अनुसरण्यासाठी आम्ही सर्वकाही सोडून दिले आहे!” येशूंनी उत्तर दिले, “मी तुम्हाला निश्चित सांगतो की, ज्यांनी मला अनुसरण्यासाठी व शुभवार्तेसाठी आपले घर, भाऊ, बहीण, आई, पिता, मुले आणि जमिनीचा त्याग केला आहे. या वर्तमान युगात त्याला शंभरपट मोबदला तर मिळेलच, घरे, भाऊ बहीण, आई, मुले आणि जमीन आणि याबरोबरच छळ आणि येणार्या युगात त्याला सार्वकालिक जीवनही मिळाल्याशिवाय राहणार नाही. पण अनेकजण जे पहिले आहेत, ते शेवटचे होतील आणि जे शेवटचे आहेत ते पहिले होतील.” ते आता यरुशलेमच्या वाटेला लागले असताना, येशू पुढे चालले होते, शिष्य आश्चर्यचकित झाले होते, तर त्यांच्यामागे चालणारे जे इतर लोक होते, ते भयभीत झाले होते. पुन्हा एकदा येशूंनी आपल्या बारा शिष्यांना एका बाजूला नेले आणि त्यांच्या बाबतीत काय घडणार हे त्यांना सांगू लागले. “आपण यरुशलेमात जात आहोत” ते म्हणाले, “तिथे मानवपुत्राला प्रमुख याजक व नियमशास्त्र शिक्षक यांच्या हवाली करण्यात येईल. ते त्याच्यावर आरोप करून त्याला मृत्युदंड देतील आणि गैरयहूदी लोकांच्या स्वाधीन करतील. ते त्याची थट्टा करतील, त्याच्यावर थुंकतील, त्याला फटके मारतील आणि त्याचा जीव घेतील; परंतु तीन दिवसानंतर तो पुन्हा उठेल.” नंतर जब्दीचे पुत्र याकोब आणि योहान येशूंकडे आले. “गुरुजी,” ते म्हणाले, “आम्ही आपल्याजवळ जे काही मागतो, ते आपण आमच्यासाठी करावे.” “मी तुमच्यासाठी काय करावे, अशी तुमची इच्छा आहे?” येशूंनी विचारले. ते म्हणाले, “आपण आपल्या वैभवात आमच्यापैकी एकाला आपल्या उजवीकडे व एकाला डावीकडे बसू द्यावे.” “तुम्ही काय मागता हे तुम्हाला समजत नाही,” येशू म्हणाले, “जो प्याला मी पिणार आहे तो तुम्ही पिऊ शकाल काय किंवा ज्या बाप्तिस्माने मी बाप्तिस्मा पावलो आहे तो बाप्तिस्मा तुम्ही घेऊ शकाल का?” ते उत्तरले, “आम्ही तो पिऊ शकू.” येशूंनी त्यांना म्हटले, “मी जो प्याला पिणार आहे तो तुम्ही प्याल खरा आणि जो बाप्तिस्मा मला दिला आहे तो बाप्तिस्मा तुम्हीही घ्याल. परंतु माझ्या उजवीकडे किंवा डावीकडे कोणी बसावे, हे ठरविण्याचा अधिकार मला नाही. या जागा ज्यांच्यासाठी तयार करण्यात आल्या आहेत, त्यांनाच त्या मिळतील.” हे बाकीच्या दहा शिष्यांनी ऐकले, तेव्हा ते याकोब आणि योहानवर रागावले. येशूंनी त्यांना एकत्र बोलावून म्हटले, “गैरयहूदीयांवर शासन करणारे त्यांच्यावर हुकमत चालवितात आणि त्यांचे उच्चाधिकारी त्यांच्यावर अधिकार गाजविणारे हे तुम्हाला माहीत आहे. पण तुम्हामध्ये तसे नसावे. तुमच्यामध्ये जो कोणी श्रेष्ठ होऊ पाहतो, त्याने तुमचा सेवक झाले पाहिजे. आणि जो कोणी प्रथम होऊ पाहतो, तो सर्वांचा गुलाम झाला पाहिजे. मी मानवपुत्र, सेवा करवून घ्यावयास नाही, तर सेवा करावयास आणि पुष्कळांच्या उद्धारासाठी आपला जीव खंडणी म्हणून द्यावयास आलो आहे.”
मार्क 10:26-45 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तेव्हा ते अत्यंत विस्मित होऊन एकमेकांना म्हणू लागले, “तर मग कोणाचे तारण होणे शक्य आहे?” येशूने त्यांच्याकडे निरखून पाहून म्हटले, “मनुष्यांना हे अशक्य आहे, परंतु देवाला नाही; ‘देवाला सर्वकाही शक्य आहे.”’ पेत्र त्याला म्हणू लागला, “पाहा, आम्ही सर्वकाही सोडून आपल्यामागे आलो आहोत.” येशूने उत्तर दिले, “मी तुम्हांला खचीत सांगतो, ज्याने ज्याने माझ्याकरता व सुवार्तेकरता घरदार, बहीणभाऊ, आईबाप, मुलेबाळे किंवा शेतीवाडी सोडली आहे, अशा प्रत्येकाला सांप्रतकाळी छळणुकीबरोबर शंभरपटीने घरे, भाऊ, बहिणी, आया, मुले, शेते आणि येणार्या युगात सार्वकालिक जीवन मिळाल्याशिवाय राहणार नाही. तरी पहिले ते शेवटले व शेवटले ते पहिले, असे पुष्कळ जणांचे होईल.” मग ते वर यरुशलेमेस जात असताना वाटेने येशू त्यांच्यापुढे चालला होता; तेव्हा ते विस्मित झाले आणि मागोमाग येणारे घाबरले. तेव्हा तो पुन्हा त्या बारा जणांस जवळ बोलावून घेऊन आपल्याला काय होणार ते त्यांना सांगू लागला, “पाहा, आपण वर यरुशलेमेस जात आहोत; तेथे मनुष्याच्या पुत्राला मुख्य याजक व शास्त्री ह्यांच्या स्वाधीन करण्यात येईल; ते त्याला देहान्त शिक्षा ठरवतील आणि परराष्ट्रीयांच्या स्वाधीन करतील; आणि ते त्याची थट्टा करतील, त्याच्यावर थुंकतील, त्याला फटके मारतील व त्याचा जीव घेतील; आणि तीन दिवसांनी तो पुन्हा उठेल.” जब्दीचे दोघे मुलगे याकोब व योहान त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाले, “गुरूजी, आम्ही आपल्याजवळ जे काही मागू त्याप्रमाणे आपण आमच्यासाठी करावे अशी आमची इच्छा आहे.” तो त्यांना म्हणाला, “मी तुमच्यासाठी काय करावे अशी तुमची इच्छा आहे?” ते त्याला म्हणाले, “आपल्या वैभवात आमच्यापैकी एकाला आपल्या उजवीकडे व एकाला आपल्या डावीकडे बसू द्यावे.” येशूने त्यांना म्हटले, “तुम्ही काय मागत आहात हे तुम्हांला समजत नाही; जो प्याला मी पिणार आहे तो तुमच्याने पिववेल काय? व जो बाप्तिस्मा मी घेणार आहे तो तुमच्याने घेववेल काय?” ते त्याला म्हणाले, “घेववेल.” येशूने त्यांना म्हटले, “जो प्याला मी पिणार आहे तो तुम्ही प्याल व जो बाप्तिस्मा मी घेणार आहे तो तुम्ही घ्याल हे खरे; पण माझ्या उजवीकडे व डावीकडे कोणाला बसू द्यायचे हे माझ्या हाती नाही. त्या जागा ज्यांच्यासाठी सिद्ध केल्या आहेत त्यांनाच त्या मिळणार.” हे ऐकून बाकीचे दहा जण याकोब व योहान ह्यांच्यावर संतापले. तेव्हा त्यांना जवळ बोलावून घेऊन येशू त्यांना म्हणाला, “परराष्ट्रीयांत सत्ताधारी म्हणून जे मानलेले आहेत ते त्यांच्यावर जुलूम करतात व त्यांचे वरिष्ठ लोक त्यांच्यावर अधिकार चालवतात, हे तुम्हांला ठाऊक आहे. परंतु तुमची गोष्ट तशी नाही; तर जो तुमच्यामध्ये मोठा होऊ पाहतो त्याने तुमचा सेवक झाले पाहिजे; आणि जो कोणी तुमच्यामध्ये पहिला होऊ पाहतो त्याने सर्वांचा सेवक झाले पाहिजे. कारण मनुष्याचा पुत्रही सेवा करून घेण्यास नाही, तर सेवा करण्यास व पुष्कळांच्या मुक्तीसाठी आपला जीव खंडणी म्हणून अर्पण करण्यास आला आहे.”
मार्क 10:26-45 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
ते अत्यंत विस्मित होऊन एकमेकांना म्हणू लागले, “तर मग कोणाचे तारण होणे शक्य आहे?” येशूने त्यांच्याकडे निरखून पाहून म्हटले, “माणसाला हे अशक्य आहे परंतु देवाला नाही, देवाला सर्व काही शक्य आहे.” तेव्हा पेत्र त्याला म्हणाला, “आम्ही सर्व काही सोडून आपल्या मागे आलो आहोत.” येशूने उत्तर दिले, “मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, ज्याने ज्याने माझ्याकरता व शुभवर्तमानाकरता घरदार, बहीणभाऊ, आईवडील, मुलेबाळे किंवा शेतीवाडी सोडली आहे, अशा प्रत्येकाला आताच्या काळात छळवणुकीबरोबर शंभरपटीने घरे, भाऊ, बहिणी, माता, मुले, शेते आणि येणाऱ्या युगात शाश्वत जीवन हे सारे मिळेल. तरी आता जे पहिले आहेत त्यांच्यापैकी पुष्कळ शेवटचे व आता जे शेवटचे आहेत त्यांच्यापैकी पुष्कळ पहिले होतील.” येशू आणि त्याचे शिष्य यरुशलेमकडे जात असताना येशू शिष्यांच्यापुढे चालत होता. शिष्य विस्मित झाले होते आणि मागोमाग येणारे लोक घाबरले होते. तो पुन्हा त्या बारा जणांना जवळ बोलावून आपल्या बाबतीत काय होणार,ते त्यांना सांगू लागला, “ऐका, आपण यरुशलेमला जात आहोत, तेथे मनुष्याच्या पुत्राला मुख्य याजक व शास्त्री ह्यांच्या स्वाधीन करण्यात येईल. ते त्याला देहान्ताची शिक्षा देतील आणि नंतर परराष्ट्रीयांच्या स्वाधीन करतील. ते त्याची अवहेलना करतील. त्याच्यावर थुंकतील. त्याला फटके मारतील. त्याला ठार मारतील परंतु तीन दिवसांनी तो पुन्हा उठेल.” जब्दीचे दोन्ही मुलगे याकोब व योहान त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाले, “गुरुवर्य, आम्ही आपल्याकडे जे काही मागू, ते आपण आमच्यासाठी करावे, अशी आमची इच्छा आहे.” तो त्यांना म्हणाला, “मी तुमच्यासाठी काय करावे अशी तुमची इच्छा आहे?” ते त्याला म्हणाले, “आपल्या वैभवात आमच्यापैकी एकाला आपल्या उजवीकडे व दुसऱ्याला डावीकडे बसू द्यावे.” येशूने त्यांना म्हटले, “तुम्ही काय मागत आहात, हे तुम्हांला समजत नाही. जो प्याला मला प्राशन केला पाहिजे तो तुम्ही पिऊ शकाल का? जो बाप्तिस्मा मला घेतला पाहिजे तो तुम्ही घेऊ शकाल का?” ते त्याला म्हणाले, “आम्ही तसे करू शकू.” येशूने त्यांना म्हटले, “जो प्याला मला प्राशन केला पाहिजे तो तुम्ही प्याल व जो बाप्तिस्मा मला घेतला पाहिजे तो तुम्ही घ्याल, हे खरे, पण तुम्हांला माझ्या उजवीकडे व डावीकडे बसू देणे माझ्या हाती नाही. त्या जागा ज्यांच्यासाठी सिद्ध केल्या आहेत, त्यांना मिळतील.” हे ऐकून बाकीचे दहा जण याकोब व योहान ह्यांच्यावर संतापले. हे पाहून येशूने सर्वांना जवळ बोलावून म्हटले, “परराष्ट्रीयांत सत्ताधारी म्हणून जे मानलेले आहेत, ते लोकांवर सत्ता चालवतात व त्यांचे वरिष्ठ लोक त्यांच्यावर अधिकार गाजवतात, हे तुम्हांला ठाऊक आहे. परंतु तुमचे तसे नसावे. उलट, जो तुमच्यामध्ये मोठा होऊ पाहतो त्याने तुमचा सेवक झाले पाहिजे आणि जो कोणी तुमच्यामध्ये पहिला होऊ पाहतो, त्याने तुमचा सेवक झाले पाहिजे. कारण मनुष्याचा पुत्रही सेवा करून घ्यायला नव्हे तर सेवा करायला व पुष्कळांच्या मुक्तीसाठी आपला प्राण खंडणी म्हणून अर्पण करायला आला आहे.”