मीखा 6:1-16
मीखा 6:1-16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आता परमेश्वर जे म्हणतो, ते ऐक. मीखा त्यास म्हणाला, ऊठ व पर्वतांसमोर तुझी बाजू मांड आणि डोंगर तुझा शब्द ऐकोत. पर्वतांनो व पृथ्वीच्या टिकाऊ पायांनो, परमेश्वराचा वाद ऐका, कारण परमेश्वरास आपल्या लोकांशी वाद करायचा आहे, आणि तो इस्राएलाशी वाद करणार आहे. “माझ्या लोकांनो, मी काय केले? मी तुम्हास कशाने कंटाळविले ते सांगा? माझ्या विरुद्ध साक्ष दे. कारण मी मिसर देशातून तुम्हास बाहेर काढले आणि दास्यत्वाच्या घरातून तुला सोडवीले, मी मोशे, अहरोन व मिर्यामला तुझ्याकडे पाठवले. माझ्या लोकांनो, मवाबचा राजा बालाक याने काय योजिले होते ते आठवा आणि बौराचा मुलगा बलाम, काय म्हणाला त्याची आठवण करा, त्याने शिट्टीमपासून गिलगालपर्यंत येऊन त्यास कसे उत्तर दिले, त्याचे स्मरण करा, हे अशासाठी की परमेश्वराचे न्यायीपण तुमच्या लक्षात यावे.” मी परमेश्वरास काय देऊ? आणि काय घेऊन परात्पर देवासमोर नमन करू? मी होमार्पणे व एक वर्षाचे वासरू घेऊन त्याच्या पुढे यावे का? हजार मेंढ्यांनी किंवा दहा हजार तेलाच्या नद्यांनी परमेश्वर प्रसन्न होईल का? माझ्या पापांची किंमत म्हणून मी माझे पहिले अपत्य द्यावे का? माझ्या देहाच्या पापाबद्दल माझ्या देहाचे फळ देऊ काय? हे मनुष्या, चांगले ते त्याने तुला सांगितले आहे. आणि न्यायीपणाने वागने, दया व निष्ठा ह्यावर प्रेम करणे आणि आपल्या परमेश्वरासोबत नम्रपणे चालने. यांखेरीज परमेश्वर तुझ्याजवळ काय मागतो? परमेश्वराची वाणी नगरात घोषणा करते. जो सुज्ञ आहे तो तुझे नाव ओळखतो, म्हणून काठीकडे आणि ज्याने ती नेमली आहे त्याच्याकडे लक्ष द्या. अजूनपण वाईटाचा पैसा आणि उणे धिक्कारलेले माप ही दुष्टांच्या घरांत आहेत. मी असा एक मनुष्य निर्दोष असल्याचा विचार करावा का, जो दुष्टतेची तागडी आणि कपटाच्या वजनांची पिशवी बळगतो? त्या नगरीतील श्रीमंत जुलमाने भरलेले आहेत, त्यामध्ये राहणारे खोटे बोलले आहेत. त्यांची जीभ त्यांच्या मुखात कपटी बोलते. म्हणून मी तुम्हास गंभीर अशा जखमांनी मारले आहे, तुझ्या पापांमुळे मी तुझी अधोगती केली आहे. तू खाशील पण तृप्त होणार नाही, तुझे रितेपण तुझ्यामध्ये राहील, तू चांगले ते साठवून ठेवशील पण ते रक्षण होणार नाही, आणि ज्याचे तू रक्षण करशील ते मी तलवारीला देईन. तू पेरशील, पण कापणी करणार नाही; तू जैतूनांपासून तेल काढण्यासाठी ते तुडवशील, पण त्याचे तेल स्वत:ला लावणार नाही; तू द्राक्ष तुडवशील, पण त्याचा रस पिणार नाही. कारण अम्रीचे नियम पाळले जातात आणि अहाबाच्या घराण्याची सर्व कार्ये करण्यात येतात. तुम्ही त्यांच्या मसलती प्रमाणे चालता, म्हणून मी तुझा व तुझ्या शहराचा नाश करीन व त्याच्या रहिवाशांचा उपहास होईल आणि माझ्या लोकांची अप्रतिष्ठा तुम्हास सोसावी लागेल.
मीखा 6:1-16 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
याहवेह काय म्हणतात ते ऐका: “उभे राहा, पर्वतांसमोर माझ्या दावा मांडा; आणि तुला काय बोलायचे आहे ते टेकड्या ऐको. “हे पर्वतांनो, याहवेहने केलेल्या आरोपाकडे लक्ष द्या; हे पृथ्वीच्या अढळ पाया, तूही ऐक. कारण याहवेहचा त्यांच्या लोकांविरुद्ध एक दावा आहे. ते इस्राएली लोकांविरुद्ध वाद दाखल करीत आहेत. “हे माझ्या लोकांनो, मी तुम्हाला काय केले आहे? मी तुमच्यावर कोणते ओझे टाकले आहे? मला उत्तर द्या. मी तुम्हाला इजिप्त देशातून बाहेर काढले आणि तुम्हाला गुलामगिरीतून देशातून मुक्त केले. मी मोशेला तुमचे नेतृत्व करण्यास पाठवले, अहरोन आणि मिर्यामलाही पाठवले. माझ्या लोकांनो, मोआबाचा राजा बालाक याने काय कट केला आणि बौराचा पुत्र बलाम याने काय उत्तर दिले ते स्मरणात ठेवा. शिट्टीम ते गिलगालपर्यंतचा तुमचा प्रवास स्मरणात ठेवा, म्हणजे याहवेहच्या न्यायीपणाच्या कृती तुम्हाला कळतील.” मी याहवेहसमोर काय आणावे आणि स्तुतीस पात्र असलेल्या परमेश्वरासमोर मी नमन करावे? होमार्पणासाठी मी एक वर्षाचे वासरू घेऊन त्यांच्यासमोर येऊ का? एक हजार मेंढे किंवा जैतून तेलाच्या दहा हजार नद्यांनी याहवेह संतुष्ट होतील काय? माझ्या अपराधाचे प्रायश्चित्त म्हणून मी माझा ज्येष्ठपुत्र अर्पावा काय, माझ्या आत्म्याच्या पापासाठी माझ्या शरीराचे फळ द्यावे काय? हे मनुष्या, त्यांनी तुला चांगले काय ते दाखविले आहे. आणि याहवेह तुझ्याकडून काय अपेक्षा करतात? नीतीने वागणे आणि दयेने प्रीती करणे आणि तुझ्या परमेश्वराबरोबर नम्रपणे चालणे. ऐका! याहवेह नगराला हाक मारीत आहेत— आणि तुमच्या नावाचे भय बाळगणे हे ज्ञान आहे— “काठी आणि त्यास नियुक्त करणाऱ्याचे ऐका. हे दुष्ट घरा, अजूनही तुझी अन्यायाने मिळवलेली संपत्ती, आणि उणे एफा माप जे शापित आहे त्यास विसरेन काय? चुकीच्या वजनाच्या पिशवीने, कपटाच्या वजनांनी मी कोणाची सुटका करू काय? तुमचे श्रीमंत लोक हिंसा करतात; तुमचे रहिवासी लबाड आहेत आणि त्यांची जीभ कपटी गोष्ट बोलते. म्हणून तुमच्या पातकांमुळे तुमचा नायनाट व नाश करण्यास मी सुरुवात केली आहे. तू खाशील तृप्त होणार नाही; खाल्ल्यानंतरही तुझे पोट रिकामे राहील. तू साठवून ठेवशील, पण काहीही उरणार नाही, कारण मी तुझी बचत तलवारीला देईन. तू पेरणी करशील पण कापणी करणार नाही; तुम्ही जैतून फळे तुडवाल, पण ते तेल वापरणार नाही, तू द्राक्षे चिरडशील, पण त्याचा द्राक्षारस पिणार नाही. तू ओमरीचे नियम आणि अहाबाच्या घराण्याच्या सर्व चालीरीती पाळल्या आहेत; तुम्हीही त्यांच्या रूढी पाळल्या आहेत. म्हणून मी तुझा नाश करेन व तुझ्या प्रजेची थट्टा करेन; तू राष्ट्रांची निंदा सहन करशील.”
मीखा 6:1-16 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
आता परमेश्वर काय म्हणतो ते ऐका : ऊठ, पर्वतांसमोर वाद कर, डोंगरांना तुझा शब्द ऐकू दे. पर्वतांनो, परमेश्वराचा वाद ऐका; पृथ्वीच्या अचल पायांनो, तुम्हीही ऐका; परमेश्वराचा त्याच्या लोकांबरोबर वाद आहे; तो इस्राएलाबरोबर वाद करणार आहे. “हे माझ्या प्रजे, मी तुझे काय केले? मी तुला कशाने कंटाळवले? मला उत्तर दे. मी तर तुला मिसर देशातून बाहेर आणले, दास्यगृहातून तुला सोडवून घेतले; मी तुझ्यापुढे मोशे, अहरोन व मिर्याम ह्यांना पाठवले. माझ्या प्रजे, मवाबाचा राजा बालाक ह्याने काय मसलत केली, बौराचा पुत्र बलाम ह्याने त्याला काय उत्तर केले आणि शिट्टीम व गिल्गाल ह्यांच्या दरम्यान काय झाले ह्याचे स्मरण कर, म्हणजे परमेश्वराची न्यायकृत्ये तुला समजतील.” परमेश्वराला काय हवे? “मी काय घेऊन परमेश्वरासमोर येऊ? परात्पर देवासमोर नमस्कार कसा घालू? होमबली, एका वर्षाची वासरे घेऊन त्याच्यापुढे येऊ काय? हजारो एडके, तेलाच्या दशसहस्र नद्या ह्यांनी परमेश्वराला संतोष होईल काय? माझ्या पातकाबद्दल मी आपला ज्येष्ठ पुत्र देऊ काय? माझ्या जिवाने केलेल्या पापाबद्दल मी आपल्या पोटचे फळ देऊ काय?” हे मनुष्या, बरे काय ते त्याने तुला दाखवले आहे; नीतीने वागणे, आवडीने दया करणे व आपल्या देवासमागमे राहून नम्रपणे चालणे ह्यांवाचून परमेश्वर तुझ्याजवळ काय मागतो? परमेश्वर ह्या नगरास हाक मारीत आहे; जो शहाणा आहे तो तुझे नाम ओळखतो - “तुम्ही दंडाचे व तो नेमणार्याचे ऐका. अजून दुष्टाच्या घरात अन्यायाने मिळवलेले धन आहे काय? दोषास्पद असे उणे माप त्याच्या घरात असते काय? दगलबाजीची तागडी ठेवून, खोट्या वजनांची थैली बाळगून मी शुद्ध ठरणार काय? तेथील श्रीमंत दुष्टतेने भरले आहेत, तेथील रहिवासी खोटे बोलतात; त्यांची जीभ त्यांच्या मुखात साक्षात कपटरूप आहे; म्हणून मी तुला हाणून भारी जखम करतो, तुझ्या पातकांमुळे मी तुला उजाड करतो. तू खाशील, पण तृप्त होणार नाहीस; तुझ्या ठायी कंगालपणा राहील; तू धनाची सारासार करशील, पण ते तुला वाचवता येणार नाही व तू काही वाचवलेस तर मी ते तलवारीच्या हवाली करीन. तू पेरशील, पण कापणी करणार नाहीस; तू जैतून वृक्षाची फळे तुडवशील, पण त्याच्या तेलाने अभ्यंग करणार नाहीस; द्राक्षीचा उपज तुडवशील, पण तू द्राक्षारस पिणार नाहीस. अम्रीचे कायदे तुम्ही पाळता, अहाबाच्या घराण्याच्या चालीरीती तुम्ही पाळता, व त्यांच्या तत्त्वांप्रमाणे तुम्ही चालता, म्हणून तुमचा नाश होईल, त्याच्या रहिवाशांची निर्भर्त्सना होईल असे मी करीन; माझ्या लोकांची अप्रतिष्ठा तुम्हांला सोसावी लागेल.”