YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 9:18-31

मत्तय 9:18-31 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

येशू या गोष्टी त्यांना सांगत असता यहूद्यांच्या सभास्थानाचा एक अधिकारी त्याच्याकडे आला व येशूच्या पाया पडून म्हणाला, “माझी मुलगी आताच मरण पावली आहे. परंतु आपण येऊन आपला हात तिच्यावर ठेव म्हणजे ती पुन्हा जिवंत होईल.” तेव्हा येशू उठून आपल्या शिष्यांबरोबर त्याच्यामागे जाऊ लागला. मग पाहा, वाटेत बारा वर्षापासून रक्तस्राव होत असलेली एक स्त्री येशूच्या मागे येऊन त्याच्या वस्त्राच्या काठाला शिवली. कारण ती आपल्या मनात म्हणत होती, “मी केवळ त्याच्या वस्त्राला शिवले तरी बरी होईन.” तेव्हा येशूने मागे वळून तिला पाहून म्हणाला, “मुली, धीर धर! तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.” आणि ती स्त्री त्याच क्षणी बरी झाली. मग येशू त्या यहूदी सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घरात आला. तेव्हा त्याने बासरी वाजविणाऱ्या व रडून गोंधळ करणाऱ्या जमावाला पाहीले, तो म्हणाला, “वाट सोडा, कारण मुलगी मरण पावलेली नाही; ती झोपेत आहे.” तेव्हा ते त्यास हसू लागले. मग त्या जमावाला बाहेर पाठवल्यावर त्याने आत जाऊन तिचा हात आपल्या हातात घेतला आणि ती मुलगी उठली. आणि ही बातमी त्या सर्व प्रांतात पसरली. तेव्हा येशू तेथून जात असता दोन आंधळे त्याच्यामागे ओरडत चालले. म्हणू लागले, “हे दाविदाच्या पुत्रा, आम्हावर दया कर.” येशू त्या घरात गेला तेव्हा ते आंधळेही त्याच्याकडे त्याच्यामागे आत आले. त्याने त्यांना विचारले, “मी तुम्हास दृष्टी देऊ शकेन असा तुमचा विश्वास आहे का?” “होय, प्रभू,” त्यांनी उत्तर दिले. मग त्याने त्यांच्या डोळ्यांना स्पर्श केला आणि म्हणाला, “तुमच्या विश्वासाप्रमाणे तुमच्यासोबत घडो.” आणि त्यांना पुन्हा दृष्टी आली. येशूने त्यांना सक्त ताकीद दिली, “पाहा, हे कोणाला कळू देऊ नका.” परंतु ते बाहेर गेले आणि त्यांनी त्या सर्व प्रदेशात त्याची किर्ती गाजवली.

सामायिक करा
मत्तय 9 वाचा

मत्तय 9:18-31 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

हे बोलत आहे तोच, सभागृहाचा पुढारी आला आणि त्यांच्यापुढे गुडघे टेकून म्हणाला, “माझी कन्या नुकतीच मरण पावली आहे, कृपा करून या व आपला हात तिच्यावर ठेवा म्हणजे ती पुन्हा जिवंत होईल!” येशू उठून त्याच्याबरोबर गेले आणि त्यांचे शिष्यही त्यांच्याबरोबर निघाले. तेव्हा जिला बारा वर्षे रक्तस्त्राव होत होता अशी एक स्त्री त्यांच्या पाठीमागे येऊन त्यांच्या झग्याच्या काठाला स्पर्श केला. कारण तिने आपल्या मनात म्हटले की, “मी त्यांच्या वस्त्राला नुसता स्पर्श जरी केला तरी बरी होईन.” येशू मागे वळून तिला म्हणाले, “मुली, धीर धर, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे” आणि त्याच क्षणाला ती स्त्री बरी झाली. येशू त्या सभागृह पुढार्‍याच्या घरी आले, तेव्हा त्यांनी आकांत करणारा मोठा जमाव तेथे पाहिला. लोक बासरी वाजवून शोक करीत होते. ते म्हणाले, “बाहेर जा. मुलगी मरण पावली नाही पण झोपली आहे!” हे ऐकून ते त्यांना हसू लागले. शेवटी सर्व जमाव बाहेर आल्यानंतर येशू त्या मुलीला ठेवले होते तेथे गेले; त्यांनी तिच्या हाताला धरून तिला उठविले आणि ती उठून बसली. याविषयीची बातमी त्या सर्व प्रदेशात पसरली. येशू तेथून पुढे निघाल्यावर, दोन आंधळे त्यांच्यामागे आले व मोठ्याने म्हणाले, “अहो, दावीदाचे पुत्र, आम्हावर दया करा.” जेव्हा ते घरात गेले त्यावेळी ते आंधळे त्यांच्याकडे आले आणि येशूंनी त्यांना विचारले, “मी हे करण्यास समर्थ आहे असा तुमचा विश्वास आहे काय?” “होय प्रभू,” त्यांनी उत्तर दिले. मग येशूंनी त्यांच्या डोळ्यांना स्पर्श केला आणि ते त्यांना म्हणाले, “तुमच्या विश्वासानुसार तुम्हासाठी केले जावो.” आणि त्याच क्षणाला त्यांना दिसू लागले. येशूंनी त्यांना सक्त ताकीद दिली, “याविषयी कोणालाही काहीही सांगू नका,” परंतु याउलट त्यांनी येशूंची किर्ती त्या सर्व भागात पसरविली.

सामायिक करा
मत्तय 9 वाचा

मत्तय 9:18-31 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

तो त्यांच्याबरोबर हे बोलत असताना पाहा, कोणीएक अधिकारी येऊन त्याच्या पाया पडून म्हणाला, “माझी मुलगी इतक्यात मरण पावली आहे, तरी आपण येऊन आपला हात तिच्यावर ठेवावा म्हणजे ती जिवंत होईल.” तेव्हा येशू उठला व त्याच्यामागे आपल्या शिष्यांसह जाऊ लागला. मग पाहा, बारा वर्षे रक्तस्रावाने पिडलेली एक स्त्री त्याच्यामागे येऊन त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवली. कारण ती आपल्या मनात म्हणत होती, “मी केवळ त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवले तरी बरी होईन.” तेव्हा येशू मागे वळून तिला पाहून म्हणाला, “मुली, धीर धर, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.” आणि ती स्त्री त्याच घटकेपासून बरी झाली. मग येशू त्या अधिकार्‍याच्या घरात जाऊन पावा वाजवणार्‍यांना व गलबला करणार्‍या लोकसमुदायाला पाहून म्हणू लागला, “वाट सोडा, कारण मुलगी मेली नाही; ती झोपेत आहे.” तेव्हा ते त्याला हसू लागले. मग लोकसमुदायाला बाहेर लावून दिल्यावर आत जाऊन त्याने मुलीच्या हाताला धरले आणि ती उठली. हे वर्तमान त्या अवघ्या देशात पसरले. मग येशू तेथून पुढे जात असताना दोन आंधळे त्याच्यामागे चालत जाऊन मोठ्याने बोलले, “अहो दावीदपुत्र, आमच्यावर दया करा.” तो घरात गेल्यावर ते आंधळे त्याच्याजवळ आले; तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “हे करण्यास मी समर्थ आहे असा तुम्ही विश्वास धरता काय?” ते त्याला म्हणाले, “होय, प्रभू.” तेव्हा त्याने त्यांच्या डोळ्यांना स्पर्श करून म्हटले, “तुमच्या विश्वासाप्रमाणे तुम्हांला प्राप्त होवो.” तेव्हा त्यांना दृष्टी आली; मग येशूने त्यांना निक्षून सांगितले की, “पाहा, हे कोणाला कळू देऊ नका.” तरी ते तेथून निघून गेल्यावर त्या अवघ्या देशात त्यांनी त्याची कीर्ती गाजवली.

सामायिक करा
मत्तय 9 वाचा

मत्तय 9:18-31 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

तो त्यांच्याबरोबर हे बोलत असताना पाहा, एक यहुदी अधिकारी येऊन त्याला नमन करून म्हणाला, “माझी मुलगी आताच मरण पावली आहे. तरी आपण येऊन तिच्यावर आपले हात ठेवावेत म्हणजे ती जिवंत होईल.” येशू उठला व आपल्या शिष्यांसह त्याच्यामागे निघाला. तेव्हा बारा वर्षे रक्‍तस्रावाने पीडलेली एक स्त्री त्याच्यामागून आली व तिने त्याच्या वस्त्राच्या किनारीला स्पर्श केला. ती आपल्या मनात म्हणत होती, “मी केवळ त्याच्या वस्त्राच्या किनारीला स्पर्श केला तरी मी बरी होईन.” येशू मागे वळून तिला पाहून म्हणाला, “मुली, धीर धर, तुझ्या विश्वासामुळे तू बरी झाली आहेस.” ती स्त्री तत्क्षणी बरी झाली. नंतर येशू त्या अधिकाऱ्याच्या घरी गेला तेव्हा अंत्यविधीसाठी आलेल्या पावा वाजवणाऱ्यांना व गलबला करणाऱ्या लोकांना पाहून येशू म्हणाला, “वाट सोडा, मुलगी मेली नाही, ती झोपली आहे.” ते त्याला हसू लागले. परंतु त्यांना बाजूला सारून आत जाऊन त्याने मुलीच्या हाताला धरले, तेव्हा ती उठली! हे वर्तमान त्या विभागात सर्वत्र पसरले. येशू तेथून पुढे जात असताना दोन आंधळे त्याच्यामागे आले आणि ओरडत विनवू लागले, “अहो दावीदपुत्र, आमच्यावर दया करा.” तो घरात गेल्यावर ते आंधळे त्याच्याजवळ आले. येशूने त्यांना विचारले, “हे करायला मी समर्थ आहे, असा तुम्ही विश्वास धरता काय?” ते त्याला म्हणाले, “होय, प्रभो.” त्याने त्यांच्या डोळ्यांना स्पर्श करून म्हटले, “तुमच्या विश्वासाप्रमाणे तुम्हांला प्राप्त होवो” आणि त्यांना दिसू लागले. येशूने त्यांना निक्षून सांगितले, “पाहा, हे कोणाला सांगू नका.” परंतु ते तेथून निघून गेल्यावर त्यांनी त्याच्याविषयीचे वृत्त त्या विभागात सर्वत्र पसरवले.

सामायिक करा
मत्तय 9 वाचा