मत्तय 8:14-22
मत्तय 8:14-22 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
नंतर येशू पेत्राच्या घरात गेला आणि त्याची सासू तापाने आजारी पडली आहे असे त्याने पाहिले. तेव्हा त्याने तिच्या हाताला स्पर्श केला व तिचा ताप निघाला; मग ती उठून त्याची सेवा करू लागली. मग संध्याकाळ झाल्यावर लोकांनी असंख्य दुष्ट आत्म्याने ग्रासलेल्यांना त्याच्याकडे आणले; तेव्हा त्याने भूते केवळ शब्दाने घालवली व सर्व आजाऱ्यांना बरे केले. “त्याने स्वतः आमचे विकार घेतले आणि आमचे रोग वाहिले,” असे जे यशया संदेष्ट्याच्याद्वारे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले. मग येशूने आपल्या सभोवती लोकसमुदाय आहे असे पाहून त्यांना गालीलच्या सरोवरापलीकडे जाण्याची आज्ञा केली. तेव्हा कोणीएक शास्त्री येऊन त्यास म्हणाला, “गुरूजी, आपण जेथे कोठे जाल तेथे मी आपल्यामागे येईन.” येशू त्यास म्हणाला, “खोकडांस बिळे व आकाशातील पाखरांस घरटी आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला आपले डोके टेकण्यास ठिकाण नाही.” मग त्याच्या शिष्यांपैकी आणखी एकजण त्यास म्हणाला, “प्रभूजी, मला पित्याच्या मरणापर्यंत त्याच्याजवळ राहून, त्याच्या मरणानंतर त्यास पुरून येऊ द्या.” येशूने त्यास म्हटले, “तू माझ्यामागे ये आणि जे मरण पावलेले आहेत त्यांना आपल्या मरण पावलेल्यांना पुरू दे.”
मत्तय 8:14-22 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
येशू पेत्राच्या घरी आले, तेव्हा त्यांनी पेत्राची सासू तापाने फणफणली असून अंथरुणावर पडून होती असे पाहिले, तेव्हा येशूंनी हात धरून तिला उठविले आणि त्यांनी स्पर्श करताच तिचा ताप गेला; ती उठली आणि त्यांची सेवा केली. संध्याकाळ झाल्यावर अनेक भूतग्रस्त त्यांच्याकडे आणले गेले, आणि केवळ एका शब्दाने त्या दुष्ट आत्म्यांना येशूंनी हाकलून दिले आणि सर्व रोग्यांना बरे केले. यशया संदेष्ट्याद्वारे जे म्हटले गेले ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले: “त्याने आमचे विकार स्वतःवर घेतले आणि आमचे रोग वाहिले.” येशूंनी आपल्या भोवताली जमलेली गर्दी पाहिली तेव्हा शिष्यांना आज्ञा करून ते म्हणाले, “आपण सरोवराच्या पलीकडे जाऊ.” तेवढ्यात एक नियमशास्त्र शिक्षक येशूंकडे येऊन म्हणाला, “आपण जेथे कोठे जाल, तेथे मी तुमच्यामागे येईन.” येशूंनी उत्तर दिले, “हे लक्षात ठेवा की कोल्ह्यांना बिळे आणि आकाशातील पक्ष्यांना घरटी आहेत, परंतु मानवपुत्राला, डोके टेकण्यासही जागा नाही.” त्यांच्या शिष्यांपैकी दुसर्या एकाने म्हटले, “प्रभू, प्रथम मला माझ्या वडिलांना पुरावयास जाऊ द्या.” येशूंनी त्याला म्हटले, “मला अनुसर आणि जे मेलेले आहेत, त्यांना आपल्या मृतांना पुरू दे.”
मत्तय 8:14-22 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
नंतर येशू पेत्राच्या घरात गेल्यावर त्याची सासू तापाने पडली आहे असे त्याने पाहिले. तेव्हा त्याने तिच्या हाताला स्पर्श केला व तिचा ताप निघाला; आणि ती उठून त्याची सेवा करू लागली. मग संध्याकाळ झाल्यावर लोकांनी पुष्कळ भूतग्रस्तांना त्याच्याकडे आणले; तेव्हा त्याने भुते शब्दानेच घालवली व सर्व दुखणाइतांना बरे केले. “त्याने स्वत: आमचे विकार घेतले आणि आमचे रोग वाहिले,” असे जे यशया संदेष्ट्याच्या द्वारे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले. मग येशूने आपल्या सभोवती लोकसमुदाय आहे असे पाहून त्यांना पलीकडे जाण्याची आज्ञा केली. तेव्हा कोणीएक शास्त्री येऊन त्याला म्हणाला, “गुरूजी, जेथे कोठे आपण जाल तेथे मी आपल्यामागे येईन.” येशू त्याला म्हणाला, “खोकडांना बिळे व आकाशातील पाखरांना कोटी आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकण्यास ठिकाण नाही.” मग त्याच्या शिष्यांपैकी आणखी एक जण त्याला म्हणाला, “प्रभूजी, मला पहिल्याने आपल्या बापाला पुरण्यास जाऊ द्या.” येशूने त्याला म्हटले, “तू माझ्यामागे ये आणि मेलेल्यांना त्यांच्या मेलेल्यांस पुरू दे.”
मत्तय 8:14-22 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
येशू पेत्राच्या घरात गेल्यावर त्याची सासू तापाने आजारी आहे, असे त्याने पाहिले. त्याने तिच्या हाताला स्पर्श केला व तिचा ताप निघाला. ती उठून त्याची सेवा करू लागली. त्या संध्याकाळी पुष्कळ भूतग्रस्तांना लोकांनी त्याच्याकडे आणले असता त्याने त्याच्या शब्दानेच भुते घालवली व सर्व आजाऱ्यांना बरे केले. ‘त्याने स्वतः आमचे आजार घेतले आणि आमचे रोग वाहिले’, असे जे यशया संदेष्ट्याद्वारे सांगण्यात आले होते, ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले. आपल्या सभोवती लोकसमुदाय आहे, असे पाहून येशूने त्यांना सरोवराच्या पलीकडे जाण्याचा आदेश दिला. तेव्हा एक शास्त्री येऊन त्याला म्हणाला, “गुरुजी, जेथे कोठे आपण जाल तेथे मी आपल्या मागे येईन.” येशू त्याला म्हणाला, “कोल्ह्यांना बिळे व आकाशातील पक्ष्यांना घरटी आहेत. परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकायला जागा नाही.” त्याच्या शिष्यांपैकी आणखी एक जण त्याला म्हणाला, “प्रभो, मला आधी माझ्या वडिलांना पुरायला जाऊ द्या.” परंतु येशूने त्याला म्हटले, “तू माझ्या मागे ये आणि जे मेलेले आहेत, त्यांना त्यांच्या मेलेल्यांना पुरू दे.”