YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 8:1-27

मत्तय 8:1-27 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

येशू डोंगरावरून खाली उतरल्यावर असंख्य लोकांचे समुदाय त्याच्यामागे जावू लागले. तेव्हा पाहा, एक कुष्ठरोगी त्याच्याकडे आला व त्यास नमन करून म्हणाला, “प्रभूजी, आपली इच्छा असल्यास आपण मला शुद्ध करायला समर्थ आहात.” तेव्हा येशूने आपला हात पुढे करून त्यास स्पर्श केला व म्हटले, “माझी इच्छा आहे, शुद्ध हो;” आणि लगेचच त्याचा कुष्ठरोग जाऊन तो बरा झाला. मग येशूने त्यास म्हटले, “पाहा, हे कोणाला सांगू नको; तर जाऊन स्वतःस याजकाला दाखव आणि त्यांना सत्यतेची साक्ष पटावी म्हणून तुझ्या शुद्धीकरता, मोशेने नेमलेले अर्पण वाहा.” मग येशू कफर्णहूम शहरात आल्यावर एक शताधिपती त्याच्याकडे आला व त्यास विनंती करत म्हणाला, “प्रभूजी, माझा चाकर पक्षाघाताने अतिशय आजारी होऊन घरात पडून आहे.” येशू त्यास म्हणाला, “मी येऊन त्यास बरे करीन.” तेव्हा शताधिपतीने उत्तर दिले की, “प्रभूजी, आपण मा‍झ्या छपराखाली यावे अश्या योग्यतेचा मी नाही; पण आपण शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल. कारण मीही एक अधिकारी असून मा‍झ्या हाताखाली शिपाई आहेत. मी एकाला ‘जा’ म्हणले की तो जातो, दुसर्‍याला ‘ये’ म्हणले की तो येतो आणि माझ्या दासास ‘हे कर’ म्हणले की तो ते करतो.” हे ऐकून येशूला आश्चर्य वाटले व आपल्यामागे येत असलेल्या लोकांस तो म्हणाला, “मी तुम्हास खरे सांगतो, मला इस्राएलात एवढा विश्वास आढळला नाही. मी तुम्हास सांगतो की, पूर्वेकडून व पश्चिमेकडून पुष्कळजण येतील आणि स्वर्गाच्या राज्यात अब्राहाम, इसहाक व याकोब याच्या पंक्तीस बसतील; परंतु राज्याचे पुत्र बाहेरील अंधारात टाकले जातील, तेथे रडणे व दात खाणे चालेल.” मग येशू शताधिपतीला म्हणाला, “जा, तू जसा विश्वास ठेवला तसे तुला मिळाले आहे.” आणि त्याच घटकेस तो चाकर बरा झाला. नंतर येशू पेत्राच्या घरात गेला आणि त्याची सासू तापाने आजारी पडली आहे असे त्याने पाहिले. तेव्हा त्याने तिच्या हाताला स्पर्श केला व तिचा ताप निघाला; मग ती उठून त्याची सेवा करू लागली. मग संध्याकाळ झाल्यावर लोकांनी असंख्य दुष्ट आत्म्याने ग्रासलेल्यांना त्याच्याकडे आणले; तेव्हा त्याने भूते केवळ शब्दाने घालवली व सर्व आजाऱ्यांना बरे केले. “त्याने स्वतः आमचे विकार घेतले आणि आमचे रोग वाहिले,” असे जे यशया संदेष्ट्याच्याद्वारे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले. मग येशूने आपल्या सभोवती लोकसमुदाय आहे असे पाहून त्यांना गालीलच्या सरोवरापलीकडे जाण्याची आज्ञा केली. तेव्हा कोणीएक शास्त्री येऊन त्यास म्हणाला, “गुरूजी, आपण जेथे कोठे जाल तेथे मी आपल्यामागे येईन.” येशू त्यास म्हणाला, “खोकडांस बि‍ळे व आकाशातील पाखरांस घरटी आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला आपले डोके टेकण्यास ठिकाण नाही.” मग त्याच्या शिष्यांपैकी आणखी एकजण त्यास म्हणाला, “प्रभूजी, मला पित्याच्या मरणापर्यंत त्याच्याजवळ राहून, त्याच्या मरणानंतर त्यास पुरून येऊ द्या.” येशूने त्यास म्हटले, “तू माझ्यामागे ये आणि जे मरण पावलेले आहेत त्यांना आपल्या मरण पावलेल्यांना पुरू दे.” मग तो तारवात चढल्यानंतर त्याचे शिष्यही त्याच्यामागे चढले. तेव्हा पाहा, सरोवरात एवढे मोठे वादळ उठले की ते तारू लाटांनी झाकू लागले; तेव्हा येशू तर झोपेत होता. तेव्हा ते त्याच्याजवळ येऊन त्यास जागे करून म्हणाले, प्रभूजी, वाचवा. आम्ही बुडत आहोत. तो त्यांना म्हणाला, “अहो अल्पविश्वासी, तुम्ही का घाबरला?” मग तो उठला आणि त्याने वारा व सरोवर यास धमकावले. मग सर्व अगदी शांत झाले. तेव्हा त्या मनुष्यांना फार आश्चर्य वाटले व ते म्हणाले, “हा कोणत्या प्रकारचा मनुष्य आहे की वारे व लाटा ही याचे ऐकतात.”

सामायिक करा
मत्तय 8 वाचा

मत्तय 8:1-27 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

येशू डोंगरावरून खाली आले, तेव्हा मोठा लोकसमुदाय त्यांच्यामागे चालू लागला. एक कुष्ठरोगी येशूंकडे आला आणि त्यांच्यापुढे गुडघे टेकून म्हणाला, “प्रभू, तुमची इच्छा असल्यास मला शुद्ध करण्यास तुम्ही समर्थ आहात.” येशूंनी आपला हात लांब करून त्याला स्पर्श केला आणि म्हटले, “माझी इच्छा आहे. शुद्ध हो!” तत्काळ त्याच्या कुष्ठरोगापासून तो शुद्ध झाला. मग येशू त्याला म्हणाले, “हे कोणाला सांगू नकोस. परंतु जा, स्वतःस याजकाला दाखव व कुष्ठरोग बरे झाल्यानंतर शुद्धीकरणाचे प्रमाण म्हणून मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे जे अर्पण करावयाचे असते, ते कर.” येशूंनी कफर्णहूममध्ये प्रवेश केला. तेव्हा एका रोमी शताधिपतीने त्यांच्याकडे येऊन त्यांना विनंती केली, “प्रभू, माझा नोकर घरी पक्षघाताने आजारी असून वेदनांनी तळमळत आहे.” येशूने त्याला म्हटले, “मी येऊन त्याला बरे करू का?” तेव्हा तो शताधिपती म्हणाला, “प्रभू, तुम्ही माझ्या छप्पराखाली यावे यास मी योग्य नाही, शब्द मात्र बोला, म्हणजे माझा नोकर बरा होईल. कारण मी स्वतः अधिकाराच्या अधीन असलेला मनुष्य असून माझ्या अधिकाराखाली सैनिक आहेत. मी एकाला, ‘जा,’ म्हटले की तो जातो आणि दुसर्‍याला, ‘ये,’ म्हटले की तो येतो आणि माझ्या नोकराला, ‘हे कर,’ अथवा ‘ते कर,’ असे म्हटले तर तो ते करतो.” येशूंनी हे ऐकले, तेव्हा ते आश्चर्यचकित झाले आणि समुदायाला म्हणाले, “मी तुम्हाला सत्य सांगतो, एवढा मोठा विश्वास मला इस्राएलातील कोणामध्येही आढळला नाही. मी तुम्हाला सांगतो की, अनेकजण पूर्व आणि पश्चिमेकडून येतील, आणि स्वर्गीय राज्यात चाललेल्या मेजवानीत, अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांच्याबरोबर आपल्या जागा घेतील. परंतु राज्याची प्रजा बाहेर अंधकारात टाकली जाईल, जिथे रडणे आणि दातखाणे असेल.” नंतर येशू त्या शताधिपतीला म्हणाले, “जा! जसा तू विश्वास ठेवलास, तसेच होवो.” आणि त्याच घटकेस त्याचा नोकर बरा झाला. येशू पेत्राच्या घरी आले, तेव्हा त्यांनी पेत्राची सासू तापाने फणफणली असून अंथरुणावर पडून होती असे पाहिले. तेव्हा येशूंनी हात धरून तिला उठविले आणि त्यांनी स्पर्श करताच तिचा ताप गेला; ती उठली आणि त्यांची सेवा केली. संध्याकाळ झाल्यावर अनेक भूतग्रस्तांना त्यांच्याकडे आणण्यात आले आणि केवळ त्यांच्या शब्दाने त्या दुष्ट आत्म्यांना येशूंनी हाकलून दिले आणि सर्व रोग्यांना बरे केले. यशायाह संदेष्ट्याद्वारे जे म्हटले गेले ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले: “त्याने आमचे विकार स्वतःवर घेतले आणि आमचे रोग वाहिले.” येशूंनी आपल्या भोवताली जमलेली गर्दी पाहिली तेव्हा शिष्यांना आज्ञा करून ते म्हणाले, “आपण सरोवराच्या पलीकडे जाऊ.” तेवढ्यात एक नियमशास्त्र शिक्षक येशूंकडे येऊन म्हणाला, “आपण जिथे कुठे जाल, तिथे मी तुमच्यामागे येईन.” येशूंनी उत्तर दिले, “कोल्ह्यांना बिळे आणि आकाशातील पक्ष्यांना घरटी आहेत, परंतु मानवपुत्राला डोके टेकण्यासही जागा नाही.” त्यांच्या शिष्यांपैकी दुसर्‍या एकाने म्हटले, “प्रभूजी, प्रथम मला माझ्या वडिलांना पुरावयास जाऊ द्या.” येशूंनी त्याला म्हटले, “मला अनुसर आणि जे मेलेले आहेत, त्यांना आपल्या मृतांना मूठमाती देऊ दे.” मग त्यांचे शिष्य होडीत बसून त्यांच्याबरोबर गेले. तेव्हा, एकाएकी सरोवरात भयंकर वादळ सुटले, लाटा होडीवर आदळू लागल्या व त्यांची होडी बुडू लागली. पण येशू झोपी गेले होते. तेव्हा शिष्यांनी त्यांना उठविले आणि ते त्यांना म्हणाले, “प्रभूजी, आम्हाला वाचवा! आपण सर्वजण बुडत आहोत!” येशू त्यांना म्हणाले, “अहो, अल्पविश्वासी, तुम्ही इतके का घाबरला?” मग ते उठले आणि त्यांनी वार्‍याला व लाटांना धमकाविले आणि सर्वकाही शांत झाले. ते पाहून शिष्य चकित झाले आणि एकमेकास म्हणू लागले: “हे कोणत्या प्रकारचे व्यक्ती आहेत? वारा आणि लाटाही त्यांच्या आज्ञा पाळतात!”

सामायिक करा
मत्तय 8 वाचा

मत्तय 8:1-27 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मग तो डोंगरावरून उतरल्यावर लोकांचे थवे त्याच्यामागे चालले. आणि पाहा, एक कुष्ठरोगी त्याच्याकडे आला व त्याच्या पाया पडून त्याला म्हणाला, “प्रभूजी, आपली इच्छा असली तर मला शुद्ध करण्यास आपण समर्थ आहात.” तेव्हा येशूने हात पुढे करून त्याला स्पर्श केला व म्हटले, “माझी इच्छा आहे, शुद्ध हो;” लगेच त्याचे कुष्ठ जाऊन तो शुद्ध झाला. मग येशूने त्याला म्हटले, “पाहा, हे कोणाला सांगू नकोस; तर जाऊन ‘स्वतःस याजकाला दाखव’ आणि त्यांना प्रमाण पटावे म्हणून तुझ्या शुद्धीकरता, मोशेने नेमलेले अर्पण वाहा.” मग येशू कफर्णहूमास आल्यावर एक शताधिपती त्याच्याकडे आला व त्याला विनंती करून म्हणाला, “प्रभूजी, माझा चाकर पक्षाघाताने अतिशय पीडित होऊन घरात पडला आहे.” येशू त्याला म्हणाला, “मी येऊन त्याला बरे करीन.” तेव्हा शताधिपतीने उत्तर दिले की, “प्रभूजी, आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही; पण शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल. कारण मीही ताबेदार मनुष्य आहे आणि माझ्या हाताखाली शिपाई असून मी एकाला ‘जा’ म्हटले की तो जातो, दुसर्‍याला ‘ये’ म्हटले की तो येतो, आणि माझ्या दासाला ‘अमुक कर’ म्हटले की तो ते करतो.” हे ऐकून येशूला आश्‍चर्य वाटले व आपल्या मागे येत असलेल्या लोकांना तो म्हणाला, “मी तुम्हांला खचीत सांगतो, एवढा विश्वास मला इस्राएलात आढळला नाही. मी तुम्हांला सांगतो की, ‘पूर्वेकडून व पश्‍चिमेकडून’ पुष्कळ जण येतील आणि स्वर्गाच्या राज्यात अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांच्या पंक्तीस बसतील; परंतु राज्याचे पुत्र बाहेरील अंधारात टाकले जातील, तेथे रडणे व दात खाणे चालेल.” मग येशू शताधिपतीला म्हणाला, “जा, तू विश्वास ठेवल्याप्रमाणे तुला प्राप्त होवो,” आणि त्याच घटकेस तो चाकर बरा झाला. नंतर येशू पेत्राच्या घरात गेल्यावर त्याची सासू तापाने पडली आहे असे त्याने पाहिले. तेव्हा त्याने तिच्या हाताला स्पर्श केला व तिचा ताप निघाला; आणि ती उठून त्याची सेवा करू लागली. मग संध्याकाळ झाल्यावर लोकांनी पुष्कळ भूतग्रस्तांना त्याच्याकडे आणले; तेव्हा त्याने भुते शब्दानेच घालवली व सर्व दुखणाइतांना बरे केले. “त्याने स्वत: आमचे विकार घेतले आणि आमचे रोग वाहिले,” असे जे यशया संदेष्ट्याच्या द्वारे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले. मग येशूने आपल्या सभोवती लोकसमुदाय आहे असे पाहून त्यांना पलीकडे जाण्याची आज्ञा केली. तेव्हा कोणीएक शास्त्री येऊन त्याला म्हणाला, “गुरूजी, जेथे कोठे आपण जाल तेथे मी आपल्यामागे येईन.” येशू त्याला म्हणाला, “खोकडांना बिळे व आकाशातील पाखरांना कोटी आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकण्यास ठिकाण नाही.” मग त्याच्या शिष्यांपैकी आणखी एक जण त्याला म्हणाला, “प्रभूजी, मला पहिल्याने आपल्या बापाला पुरण्यास जाऊ द्या.” येशूने त्याला म्हटले, “तू माझ्यामागे ये आणि मेलेल्यांना त्यांच्या मेलेल्यांस पुरू दे.” मग तो तारवात चढल्यानंतर त्याचे शिष्य त्याच्यामागे गेले. तेव्हा पाहा, समुद्रात मोठे वादळ उठले, इतके की तारू लाटांनी झाकू लागले; परंतु तो झोपेत होता. तेव्हा ते त्याच्याजवळ येऊन त्याला जागे करून म्हणाले, “प्रभूजी, वाचवा, आम्ही बुडालो.” तो त्यांना म्हणाला, “अहो अल्पविश्वासी, तुम्ही का घाबरलात?” मग उठून त्याने वारे व समुद्र ह्यांना धमकावले आणि अगदी निवांत झाले. तेव्हा त्या माणसांना आश्‍चर्य वाटले व ते म्हणाले, “हा कोणत्या प्रकारचा माणूस आहे की वारे व समुद्रही ह्याचे ऐकतात!”

सामायिक करा
मत्तय 8 वाचा

मत्तय 8:1-27 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

येशू डोंगरावरून खाली उतरला तेव्हा त्याच्या मागे लोकांच्या झुंडी जाऊ लागल्या. त्या वेळी एक कुष्ठरोगी त्याच्याकडे आला व त्याच्या पाया पडून त्याला म्हणाला, “प्रभो, आपली इच्छा असली तर मला शुद्ध करायला आपण समर्थ आहात.” येशूने त्याच्यावर हात ठेवून त्याला स्पर्श केला व म्हटले, “माझी इच्छा आहे. शुद्ध हो.” लगेच त्याचे कुष्ठ जाऊन तो बरा झाला. नंतर येशूने त्याला म्हटले, “पाहा, हे कोणाला सांगू नकोस; तर जाऊन स्वतःला याजकाला दाखव आणि तू बरा झालास ह्याचे सर्वांना प्रमाण म्हणून मोशेने नेमलेले अर्पण कर.” येशू कफर्णहूमला आल्यावर एका शताधिपतीने येशूकडे येऊन विनंती केली, “प्रभो, माझा नोकर पक्षाघाताने अतिशय पीडित होऊन घरात पडला आहे.” येशू त्याला म्हणाला, “मी येऊन त्याला बरे करीन.” त्या रोमन अधिकाऱ्याने उत्तर दिले, “प्रभो, आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही. आपण शब्द मात्र बोला आणि माझा नोकर बरा होईल. मीही जबाबदार मनुष्य आहे आणि माझ्या हाताखाली सैनिक असून मी एकाला जा म्हटले की, तो जातो, दुसऱ्याला ये म्हटले की, तो येतो, माझ्या नोकराला अमुक कर म्हटले की, तो तसे करतो.” हे ऐकून येशूला आश्‍चर्य वाटले व आपल्या मागे येत असलेल्या लोकांना तो म्हणाला, “मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, एवढा मोठा विश्वास मला इस्राएलात कुठेही आढळला नाही. मी तुम्हांला सांगतो, पूर्वेकडून व पश्‍चिमेकडून पुष्कळ जण येतील आणि स्वर्गाच्या राज्यात अब्राहाम, इसहाक आणि याकोब ह्यांच्या बरोबर बसतील; परंतु स्वर्गाच्या राज्याचे वारसदार बाहेरील अंधारात टाकले जातील. तेथे आक्रोश केला जाईल व दात ओठ खाणे चालेल.” नंतर येशू रोमन अधिकाऱ्याला म्हणाला, “जा, तू विश्वास ठेवल्याप्रमाणे तुझ्यासाठी होवो.” त्याच घटकेस त्याचा नोकर बरा झाला. येशू पेत्राच्या घरात गेल्यावर त्याची सासू तापाने आजारी आहे, असे त्याने पाहिले. त्याने तिच्या हाताला स्पर्श केला व तिचा ताप निघाला. ती उठून त्याची सेवा करू लागली. त्या संध्याकाळी पुष्कळ भूतग्रस्तांना लोकांनी त्याच्याकडे आणले असता त्याने त्याच्या शब्दानेच भुते घालवली व सर्व आजाऱ्यांना बरे केले. ‘त्याने स्वतः आमचे आजार घेतले आणि आमचे रोग वाहिले’, असे जे यशया संदेष्ट्याद्वारे सांगण्यात आले होते, ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले. आपल्या सभोवती लोकसमुदाय आहे, असे पाहून येशूने त्यांना सरोवराच्या पलीकडे जाण्याचा आदेश दिला. तेव्हा एक शास्त्री येऊन त्याला म्हणाला, “गुरुजी, जेथे कोठे आपण जाल तेथे मी आपल्या मागे येईन.” येशू त्याला म्हणाला, “कोल्ह्यांना बिळे व आकाशातील पक्ष्यांना घरटी आहेत. परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकायला जागा नाही.” त्याच्या शिष्यांपैकी आणखी एक जण त्याला म्हणाला, “प्रभो, मला आधी माझ्या वडिलांना पुरायला जाऊ द्या.” परंतु येशूने त्याला म्हटले, “तू माझ्या मागे ये आणि जे मेलेले आहेत, त्यांना त्यांच्या मेलेल्यांना पुरू दे.” येशू तारवात चढल्यानंतर त्याचे शिष्य त्याच्या मागे गेले. एकाएकी त्या सरोवरात इतके प्रचंड वादळ उठले की, तारू लाटांखाली बुडू लागले. येशू मात्र झोपला होता. ते त्याच्याजवळ येऊन त्याला जागे करून म्हणाले, “प्रभो, आम्ही बुडत आहोत, आम्हांला वाचवा.” तो त्यांना म्हणाला, “अहो अल्पविश्वासी, तुम्ही घाबरलात कशाला?” मग उठून त्याने वाऱ्याला व लाटांना दटावले. तेव्हा सारे निवांत झाले. हे पाहून त्यांना आश्‍चर्य वाटले व ते म्हणाले, “वारा आणि लाटा ह्याचे ऐकतात, असा हा आहे तरी कोण?”

सामायिक करा
मत्तय 8 वाचा