YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 8:1-13

मत्तय 8:1-13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

येशू डोंगरावरून खाली उतरल्यावर असंख्य लोकांचे समुदाय त्याच्यामागे जावू लागले. तेव्हा पाहा, एक कुष्ठरोगी त्याच्याकडे आला व त्यास नमन करून म्हणाला, “प्रभूजी, आपली इच्छा असल्यास आपण मला शुद्ध करायला समर्थ आहात.” तेव्हा येशूने आपला हात पुढे करून त्यास स्पर्श केला व म्हटले, “माझी इच्छा आहे, शुद्ध हो;” आणि लगेचच त्याचा कुष्ठरोग जाऊन तो बरा झाला. मग येशूने त्यास म्हटले, “पाहा, हे कोणाला सांगू नको; तर जाऊन स्वतःस याजकाला दाखव आणि त्यांना सत्यतेची साक्ष पटावी म्हणून तुझ्या शुद्धीकरता, मोशेने नेमलेले अर्पण वाहा.” मग येशू कफर्णहूम शहरात आल्यावर एक शताधिपती त्याच्याकडे आला व त्यास विनंती करत म्हणाला, “प्रभूजी, माझा चाकर पक्षाघाताने अतिशय आजारी होऊन घरात पडून आहे.” येशू त्यास म्हणाला, “मी येऊन त्यास बरे करीन.” तेव्हा शताधिपतीने उत्तर दिले की, “प्रभूजी, आपण मा‍झ्या छपराखाली यावे अश्या योग्यतेचा मी नाही; पण आपण शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल. कारण मीही एक अधिकारी असून मा‍झ्या हाताखाली शिपाई आहेत. मी एकाला ‘जा’ म्हणले की तो जातो, दुसर्‍याला ‘ये’ म्हणले की तो येतो आणि माझ्या दासास ‘हे कर’ म्हणले की तो ते करतो.” हे ऐकून येशूला आश्चर्य वाटले व आपल्यामागे येत असलेल्या लोकांस तो म्हणाला, “मी तुम्हास खरे सांगतो, मला इस्राएलात एवढा विश्वास आढळला नाही. मी तुम्हास सांगतो की, पूर्वेकडून व पश्चिमेकडून पुष्कळजण येतील आणि स्वर्गाच्या राज्यात अब्राहाम, इसहाक व याकोब याच्या पंक्तीस बसतील; परंतु राज्याचे पुत्र बाहेरील अंधारात टाकले जातील, तेथे रडणे व दात खाणे चालेल.” मग येशू शताधिपतीला म्हणाला, “जा, तू जसा विश्वास ठेवला तसे तुला मिळाले आहे.” आणि त्याच घटकेस तो चाकर बरा झाला.

सामायिक करा
मत्तय 8 वाचा

मत्तय 8:1-13 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

येशू डोंगरावरून खाली आले, तेव्हा मोठा लोकसमुदाय त्यांच्यामागे चालू लागला. एक कुष्ठरोगी येशूंकडे आला आणि त्यांच्यापुढे गुडघे टेकून म्हणाला, “प्रभू, तुमची इच्छा असल्यास मला शुद्ध करण्यास तुम्ही समर्थ आहात.” येशूंनी आपला हात लांब करून त्याला स्पर्श केला आणि म्हटले, “माझी इच्छा आहे. शुद्ध हो!” तत्काळ त्याच्या कुष्ठरोगापासून तो शुद्ध झाला. मग येशू त्याला म्हणाले, “हे कोणाला सांगू नकोस. परंतु जा, स्वतःस याजकाला दाखव व कुष्ठरोग बरे झाल्यानंतर शुद्धीकरणाचे प्रमाण म्हणून मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे जे अर्पण करावयाचे असते, ते कर.” येशूंनी कफर्णहूममध्ये प्रवेश केला. तेव्हा एका रोमी शताधिपतीने त्यांच्याकडे येऊन त्यांना विनंती केली, “प्रभू, माझा नोकर घरी पक्षघाताने आजारी असून वेदनांनी तळमळत आहे.” येशूने त्याला म्हटले, “मी येऊन त्याला बरे करू का?” तेव्हा तो शताधिपती म्हणाला, “प्रभू, तुम्ही माझ्या छप्पराखाली यावे यास मी योग्य नाही, शब्द मात्र बोला, म्हणजे माझा नोकर बरा होईल. कारण मी स्वतः अधिकाराच्या अधीन असलेला मनुष्य असून माझ्या अधिकाराखाली सैनिक आहेत. मी एकाला, ‘जा,’ म्हटले की तो जातो आणि दुसर्‍याला, ‘ये,’ म्हटले की तो येतो आणि माझ्या नोकराला, ‘हे कर,’ अथवा ‘ते कर,’ असे म्हटले तर तो ते करतो.” येशूंनी हे ऐकले, तेव्हा ते आश्चर्यचकित झाले आणि समुदायाला म्हणाले, “मी तुम्हाला सत्य सांगतो, एवढा मोठा विश्वास मला इस्राएलातील कोणामध्येही आढळला नाही. मी तुम्हाला सांगतो की, अनेकजण पूर्व आणि पश्चिमेकडून येतील, आणि स्वर्गीय राज्यात चाललेल्या मेजवानीत, अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांच्याबरोबर आपल्या जागा घेतील. परंतु राज्याची प्रजा बाहेर अंधकारात टाकली जाईल, जिथे रडणे आणि दातखाणे असेल.” नंतर येशू त्या शताधिपतीला म्हणाले, “जा! जसा तू विश्वास ठेवलास, तसेच होवो.” आणि त्याच घटकेस त्याचा नोकर बरा झाला.

सामायिक करा
मत्तय 8 वाचा

मत्तय 8:1-13 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मग तो डोंगरावरून उतरल्यावर लोकांचे थवे त्याच्यामागे चालले. आणि पाहा, एक कुष्ठरोगी त्याच्याकडे आला व त्याच्या पाया पडून त्याला म्हणाला, “प्रभूजी, आपली इच्छा असली तर मला शुद्ध करण्यास आपण समर्थ आहात.” तेव्हा येशूने हात पुढे करून त्याला स्पर्श केला व म्हटले, “माझी इच्छा आहे, शुद्ध हो;” लगेच त्याचे कुष्ठ जाऊन तो शुद्ध झाला. मग येशूने त्याला म्हटले, “पाहा, हे कोणाला सांगू नकोस; तर जाऊन ‘स्वतःस याजकाला दाखव’ आणि त्यांना प्रमाण पटावे म्हणून तुझ्या शुद्धीकरता, मोशेने नेमलेले अर्पण वाहा.” मग येशू कफर्णहूमास आल्यावर एक शताधिपती त्याच्याकडे आला व त्याला विनंती करून म्हणाला, “प्रभूजी, माझा चाकर पक्षाघाताने अतिशय पीडित होऊन घरात पडला आहे.” येशू त्याला म्हणाला, “मी येऊन त्याला बरे करीन.” तेव्हा शताधिपतीने उत्तर दिले की, “प्रभूजी, आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही; पण शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल. कारण मीही ताबेदार मनुष्य आहे आणि माझ्या हाताखाली शिपाई असून मी एकाला ‘जा’ म्हटले की तो जातो, दुसर्‍याला ‘ये’ म्हटले की तो येतो, आणि माझ्या दासाला ‘अमुक कर’ म्हटले की तो ते करतो.” हे ऐकून येशूला आश्‍चर्य वाटले व आपल्या मागे येत असलेल्या लोकांना तो म्हणाला, “मी तुम्हांला खचीत सांगतो, एवढा विश्वास मला इस्राएलात आढळला नाही. मी तुम्हांला सांगतो की, ‘पूर्वेकडून व पश्‍चिमेकडून’ पुष्कळ जण येतील आणि स्वर्गाच्या राज्यात अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांच्या पंक्तीस बसतील; परंतु राज्याचे पुत्र बाहेरील अंधारात टाकले जातील, तेथे रडणे व दात खाणे चालेल.” मग येशू शताधिपतीला म्हणाला, “जा, तू विश्वास ठेवल्याप्रमाणे तुला प्राप्त होवो,” आणि त्याच घटकेस तो चाकर बरा झाला.

सामायिक करा
मत्तय 8 वाचा

मत्तय 8:1-13 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

येशू डोंगरावरून खाली उतरला तेव्हा त्याच्या मागे लोकांच्या झुंडी जाऊ लागल्या. त्या वेळी एक कुष्ठरोगी त्याच्याकडे आला व त्याच्या पाया पडून त्याला म्हणाला, “प्रभो, आपली इच्छा असली तर मला शुद्ध करायला आपण समर्थ आहात.” येशूने त्याच्यावर हात ठेवून त्याला स्पर्श केला व म्हटले, “माझी इच्छा आहे. शुद्ध हो.” लगेच त्याचे कुष्ठ जाऊन तो बरा झाला. नंतर येशूने त्याला म्हटले, “पाहा, हे कोणाला सांगू नकोस; तर जाऊन स्वतःला याजकाला दाखव आणि तू बरा झालास ह्याचे सर्वांना प्रमाण म्हणून मोशेने नेमलेले अर्पण कर.” येशू कफर्णहूमला आल्यावर एका शताधिपतीने येशूकडे येऊन विनंती केली, “प्रभो, माझा नोकर पक्षाघाताने अतिशय पीडित होऊन घरात पडला आहे.” येशू त्याला म्हणाला, “मी येऊन त्याला बरे करीन.” त्या रोमन अधिकाऱ्याने उत्तर दिले, “प्रभो, आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही. आपण शब्द मात्र बोला आणि माझा नोकर बरा होईल. मीही जबाबदार मनुष्य आहे आणि माझ्या हाताखाली सैनिक असून मी एकाला जा म्हटले की, तो जातो, दुसऱ्याला ये म्हटले की, तो येतो, माझ्या नोकराला अमुक कर म्हटले की, तो तसे करतो.” हे ऐकून येशूला आश्‍चर्य वाटले व आपल्या मागे येत असलेल्या लोकांना तो म्हणाला, “मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, एवढा मोठा विश्वास मला इस्राएलात कुठेही आढळला नाही. मी तुम्हांला सांगतो, पूर्वेकडून व पश्‍चिमेकडून पुष्कळ जण येतील आणि स्वर्गाच्या राज्यात अब्राहाम, इसहाक आणि याकोब ह्यांच्या बरोबर बसतील; परंतु स्वर्गाच्या राज्याचे वारसदार बाहेरील अंधारात टाकले जातील. तेथे आक्रोश केला जाईल व दात ओठ खाणे चालेल.” नंतर येशू रोमन अधिकाऱ्याला म्हणाला, “जा, तू विश्वास ठेवल्याप्रमाणे तुझ्यासाठी होवो.” त्याच घटकेस त्याचा नोकर बरा झाला.

सामायिक करा
मत्तय 8 वाचा