YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 7:1-14

मत्तय 7:1-14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

इतरांचे दोष काढू नका म्हणजे तुमचे दोष काढण्यात येणार नाहीत. कारण ज्या प्रकारे तुम्ही इतरांचे दोष काढता त्याच न्यायाने तुमचेही दोष काढले जातील आणि ज्या मापाने तुम्ही मोजून देता त्याच मापाने तुम्हास परत मोजून देण्यात येईल. तू आपल्या डोळ्यातील मुसळ लक्षात न घेता आपल्या भावाच्या डोळ्यातील कुसळ का पाहतोस? अथवा ‘तुझ्या डोळ्यांतले कुसळ मला काढू दे’ असे तू आपल्या भावाला कसे म्हणशील? पाहा, तुझ्या स्वतःच्या डोळ्यात तर मुसळ आहे. अरे ढोंग्या, पहिल्याने आपल्या डोळ्यांतले मुसळ काढून टाक म्हणजे आपल्या भावाच्या डोळयांतले कुसळ काढण्यासाठी तुला स्पष्टपणे पाहता येईल. जे पवित्र आहे ते कुत्र्यांना टाकू नका आणि आपले मोती डुकरांपुढे टाकू नका; टाकाल तर कदाचित ती त्यांना पायदळी तुडवतील व नंतर ती उलटून येवून तुम्हासही फाडतील. मागा म्हणजे तुम्हास देण्यात येईल. शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. कारण प्रत्येकजण जो मागतो त्यास मिळते, जो शोधतो त्यास सापडते आणि जो ठोठावतो, त्याच्यासाठी दरवाजा उघडले जाते. तुमच्यामध्ये कोण मनुष्य असा आहे, जो आपल्या मुलाने भाकर मागितली तर त्यास दगड देईल? किंवा त्याने मासा मागितला असता, त्याऐवजी त्यास साप देईल? वाईट असूनही जर तुम्हास आपल्या मुलांना चांगल्या गोष्टी देण्याचे कळते तर तुमच्या स्वर्गातील पित्याकडे जे मागतात, त्यांच्या गरजा तो किती चांगल्या प्रकारे भागवील? यासाठी ज्या गोष्टी लोकांनी तुमच्यासाठी कराव्यात असे तुम्हास वाटते त्या सर्व गोष्टी तुम्हीही त्यांच्यासाठी करा, कारण नियमशास्त्राच्या व संदेष्टयांच्या शिकवणीचे सार हेच आहे. अरुंद दरवाजाने आत जा कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रूंद व मार्ग प्रशस्त आहे आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ लोक आहेत. पण जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग अडचणीचा आहे आणि ज्यांस तो सापडतो ते फारच थोडके आहेत.

सामायिक करा
मत्तय 7 वाचा

मत्तय 7:1-14 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

“इतरांचा न्याय करू नका, म्हणजे तुमचाही न्याय होणार नाही. कारण ज्या पद्धतीने तुम्ही इतरांचा न्याय कराल त्याच पद्धतीने तुमचाही न्याय करण्यात येईल, ज्या मापाने तुम्ही मापून द्याल, त्याच मापाने तुम्हाला मापून देण्यात येईल. “आपल्या डोळ्यातील मुसळ लक्षात न आणता तू आपल्या भावाच्या डोळ्यातील कुसळ का पाहतोस? स्वतःच्या डोळ्यामध्ये मुसळ असताना, ‘तुझ्या डोळ्यातील कुसळ मला काढू दे’ असे तुला आपल्या भावाला कसे म्हणता येईल? अरे ढोंगी माणसा! पहिल्याने तू आपल्या डोळ्यातील मुसळ काढ म्हणजे मग तुझ्या भावाच्या डोळ्यातील कुसळ काढण्यासाठी तुला स्पष्ट दिसेल. “जे पवित्र ते कुत्र्यांना घालू नका आणि आपले मोती डुकरांपुढे टाकू नका. जर टाकले तर ते कदाचित आपल्या पायाखाली तुडवतील आणि फाडून तुमचे तुकडे करतील. “मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, दार ठोका म्हणजे ते उघडले जाईल. कारण जो कोणी मागतो त्याला मिळेल, जो कोणी शोधतो त्याला सापडेल आणि जो कोणी ठोकतो त्याच्यासाठी दार उघडले जाईल. “तुम्हामध्ये असा कोण आहे जर तुमच्या मुलाने भाकर मागितली, तर त्याला दगड देईल? किंवा मासा मागितला, तर साप देईल? जर तुम्ही वाईट असूनही तुमच्या लेकरांना चांगल्या देणग्या देण्याचे तुम्हाला समजते, तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात, त्यांना ते चांगल्या देणग्या किती विशेषकरून देतील? तर मग सर्व ज्या इतरांनी तुमच्यासाठी कराव्‍यात तसेच तुम्हीही त्यांच्यासाठी करा, नियमशास्त्र आणि संदेष्ट्यांचे सार हेच आहे. “अरुंद दाराने प्रवेश करा कारण नाशाकडे नेणारा दरवाजा रुंद व पसरट आहे. पुष्कळ लोक त्याच दरवाजातून प्रवेश करतात. तरी जीवनाकडे नेणारा दरवाजा लहान असून मार्गही अरुंद आहे आणि अगदी थोडक्यांना तो सापडतो.

सामायिक करा
मत्तय 7 वाचा

मत्तय 7:1-14 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

तुमचे दोष काढण्यात येऊ नयेत म्हणून तुम्ही कोणाचे दोष काढू नका. कारण ज्या प्रकारे तुम्ही दोष काढाल त्या प्रकारेच तुमचे दोष काढण्यात येतील आणि ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हांला मापून देण्यात येईल. तू आपल्या डोळ्यातले मुसळ ध्यानात न आणता आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ का पाहतोस? अथवा तुझ्या डोळ्यातले कुसळ मला काढू दे असे तू आपल्या भावाला कसे म्हणशील? पाहा, तुझ्या डोळ्यात तर मुसळ आहे. अरे ढोंग्या, पहिल्याने आपल्या डोळ्यातले मुसळ काढून टाक म्हणजे आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ काढण्यास तुला स्पष्ट दिसेल. जे पवित्र ते कुत्र्यांना घालू नका आणि आपले मोती डुकरांपुढे टाकू नका; टाकाल तर ती कदाचित आपल्या पायांखाली ते तुडवतील व उलटून तुम्हांला फाडतील. मागा म्हणजे तुम्हांला दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हांला सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. कारण जो कोणी मागतो त्याला मिळते, जो शोधतो त्याला सापडते व जो ठोकतो त्याच्यासाठी उघडले जाईल. आपल्या मुलाने भाकर मागितली तर त्याला धोंडा देईल आणि मासा मागितला तर त्याला साप देईल, असा तुमच्यात कोण माणूस आहे? मग तुम्ही वाईट असताना आपल्या मुलाबाळांना चांगल्या देणग्या देणे तुम्हांला समजते, तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ जे मागतात त्यांना तो किती विशेषेकरून चांगल्या देणग्या देईल? ह्याकरता लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्हीही त्यांच्याशी वागा, कारण नियमशास्त्र व संदिष्टग्रंथ ह्यांचे सार हेच आहे. अरुंद दरवाजाने आत जा; कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद व मार्ग पसरट आहे आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ आहेत; परंतु जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग संकुचित आहे आणि ज्यांना तो सापडतो ते थोडके आहेत.

सामायिक करा
मत्तय 7 वाचा

मत्तय 7:1-14 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

तुमचा न्याय केला जाऊ नये म्हणून तुम्ही कोणाचा न्याय करू नका. ज्या न्यायानुसार तुम्ही न्याय कराल त्यानुसार तुमचा न्याय केला जाईल. ज्या मापाने तुम्ही मोजून द्याल, त्याच मापाने तुम्हांला मोजून दिले जाईल. तू तुझ्या डोळ्यातले मुसळ ध्यानात न घेता तुझ्या भावाच्या डोळ्यातले कुसळ का पाहतोस? अथवा ‘तुझ्या डोळ्यांतले कुसळ मला काढू दे’, असे तू आपल्या भावाला कसे म्हणशील? पाहा, तुझ्या डोळ्यात तर मुसळ आहे. अरे ढोंग्या, प्रथम तुझ्या डोळ्यातले मुसळ काढून टाक म्हणजे तुझ्या भावाच्या डोळ्यातले कुसळ काढायला तुला स्पष्ट दिसेल. जे पवित्र ते कुत्र्यांना घालू नका. तुमचे मोती डुकरांपुढे टाकू नका. टाकाल तर कदाचित त्यांच्या पायांखाली ती तुडवतील व उलटून तुमच्या अंगावर धावून येतील. मागा म्हणजे तुम्हांला दिले जाईल. शोधा म्हणजे तुम्हांला सापडेल. ठोठावा म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. जो कोणी मागतो त्याला मिळते; जो शोधतो त्याला सापडते व जो ठोठावतो त्याच्यासाठी उघडले जाते. आपल्या मुलाने भाकर मागितल्यावर त्याला दगड देणारा आणि मासा मागितल्यावर त्याला साप देणारा असा कोणी तुमच्यामध्ये आहे का? मग तुम्ही वाईट असताना आपल्या मुलाबाळांना चांगल्या देणग्या देणे तुम्हांला समजते, तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ जे मागतात, त्यांना तो किती मोठ्या प्रमाणात चांगल्या देणग्या देईल! लोकांनी तुमच्याशी जसे वागावे अशी तुमची इच्छा असेल, तसेच तुम्हीही त्यांच्याशी वागा. नियमशास्त्र व संदेष्ट्यांचे ग्रंथ हेच शिकवतात. अरुंद दरवाजाने आत जा, कारण नाशाकडे जाणारा दरवाजा रुंद व मार्ग सोपा आहे आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ आहेत. परंतु जीवनाकडे जाणारा मार्ग अरुंद व अवघड आहे. हा मार्ग थोड्यांनाच सापडतो.

सामायिक करा
मत्तय 7 वाचा

मत्तय 7:1-14

मत्तय 7:1-14 MARVBSI
सामायिक करा
पूर्ण धडा वाचा