मत्तय 5:38-48
मत्तय 5:38-48 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
‘डोळ्याबद्दल डोळा’ व ‘दाताबद्दल दात’ असे सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. परंतु मी तर तुम्हास सांगतो, दुष्टाला अडवू नका. जो कोणी तुझ्या उजव्या गालावर मारतो, त्याच्याकडे दुसरा गाल कर; जो तुझ्यावर आरोप करून तुझी बंडी घेऊ पाहतो त्यास तुझा अंगरखाही घेऊ दे; आणि जो कोणी तुला बळजबरीने धरून एक कोस नेईल त्याच्याबरोबर दोन कोस जा. जो कोणी तुझ्याजवळ काही मागतो त्यास दे आणि जो तुझ्यापासून उसने घेऊ पाहतो त्यास पाठमोरा होऊ नको. ‘आपल्या शेजार्यावर प्रीती कर व आपल्या वैऱ्याचा द्वेष कर’, असे सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हास सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. अशासाठी की, तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याचे पुत्र व्हावे; कारण तो दुष्टांवर व चांगल्यांवर आपला सूर्य उगवतो आणि नीतिमानांवर व अनीतिमानांवर पाऊस पाडतो. कारण जे तुमच्यावर प्रीती करतात त्यांच्यावर तुम्ही प्रीती केली तर तुम्हास काय प्रतिफळ मिळावे? जकातदारही तसेच करतात की नाही? आणि तुम्ही आपल्या बंधुजनांना मात्र सलाम करीत असला तर त्यामध्ये विशेष ते काय करता? परराष्ट्रीय लोकही तसेच करीतात ना? यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता परिपूर्ण आहे तसे तुम्ही परिपूर्ण व्हा.
मत्तय 5:38-48 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“जे म्हटले होते ते तुम्ही ऐकले आहे, ‘डोळ्याबद्दल डोळा व दाताबद्दल दात.’ पण मी तुम्हाला सांगतो, दुष्ट मनुष्याला प्रतिकार करू नका. तुमच्या एका गालावर कोणी चापट मारली तर दुसराही गाल पुढे करा. जो कोणी तुमच्यावर फिर्याद किंवा वाद करून तुमची बंडी घेऊ पाहतो, त्याला तुमच्या अंगरखाही देऊन टाका. जर कोणी तुम्हाला एक मैल जाण्याची सक्ती करेल, तर त्याच्याबरोबर दोन मैल जा. जे तुम्हाजवळ मागतात त्यांना द्या आणि ज्यांना उसने हवे असेल त्यांच्यापासून परत मागणी करू नका. “ ‘तुमच्या शेजार्यावर प्रीती करा आणि शत्रूंचा द्वेष करा,’ असे सांगितले होते ते तुम्ही ऐकले आहे. पण मी तुम्हाला सांगतो, तुमच्या शत्रूवर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. अशा वागण्याने तुम्ही स्वर्गीय पित्याचे पुत्र व्हाल. कारण ते आपला सूर्यप्रकाश चांगले आणि वाईट करण्यार्या अशा दोघांनाही देतात आणि नीतिमान व अनीतिमान या दोघांवरही पाऊस पाडतात. जे तुमच्यावर प्रीती करतात त्यांच्यावरच तुम्ही प्रीती केली, तर त्यात तुम्हाला असे कोणते मोठे श्रेय मिळणार आहे? जकातदारही तसेच करतात की नाही? आणि तुम्ही आपल्या बंधुनाच अभिवादन करीत असाल तर इतरांहून चांगले ते काय करता? गैरयहूदी तसेच करतात की नाही? म्हणून जसा तुमचा स्वर्गीय पिता परिपूर्ण आहे, तसे तुम्हीही परिपूर्ण असावे.”
मत्तय 5:38-48 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
‘डोळ्याबद्दल डोळा व दाताबद्दल दात’ असे सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हांला सांगतो, दुष्टाला अडवू नका. जो कोणी तुझ्या उजव्या गालावर मारतो, त्याच्याकडे दुसरा गाल कर; जो तुझ्यावर फिर्याद करून तुझी बंडी घेऊ पाहतो त्याला तुझा अंगरखाही घेऊ दे; आणि जो कोणी तुला वेठीस धरून एक कोस नेईल त्याच्याबरोबर दोन कोस जा. जो तुझ्याजवळ काही मागतो त्याला दे आणि जो तुझ्यापासून उसने घेऊ पाहतो त्याला पाठमोरा होऊ नकोस. ‘आपल्या शेजार्यावर प्रीती कर व आपल्या वैर्याचा द्वेष कर,’ असे सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हांला सांगतो, तुम्ही आपल्या वैर्यांवर प्रीती करा, [जे तुम्हांला शाप देतात त्यांना आशीर्वाद द्या, जे तुमचा द्वेष करतात त्यांचे बरे करा] आणि जे तुमचा छळ करतात [व तुमच्या पाठीस लागतात] त्यांच्यासाठी प्रार्थना करा. अशासाठी की, तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याचे पुत्र व्हावे; कारण तो वाइटांवर व चांगल्यांवर आपला सूर्य उगववतो आणि नीतिमानांवर व अनीतिमानांवर पाऊस पाडतो. कारण जे तुमच्यावर प्रीती करतात त्यांच्यावर तुम्ही प्रीती केली तर तुमचे प्रतिफळ काय? जकातदारही तसेच करतात ना? आणि तुम्ही आपल्या बंधुजनांना मात्र प्रणाम करत असलात तर त्यात विशेष काय करता? परराष्ट्रीयही तसेच करतात ना? ह्यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे ‘तुम्ही पूर्ण व्हा.’
मत्तय 5:38-48 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
‘डोळ्याबद्दल डोळा व दाताबद्दल दात’, असे जे सांगितले होते, ते तुम्ही ऐकले आहे. परंतु आता मी तुम्हांला सांगतो, दुष्टाला अडवू नका. जो कोणी तुझ्या उजव्या गालावर मारतो, त्याच्यापुढे दुसरा गाल कर. जो कोणी तुझ्यावर फिर्याद करून तुझे शर्ट घेतो, त्याला तुझा कोटही घेऊ दे. जो कोणी तुझ्यावर बळजबरी करून तुला त्याचे सामान एक किलोमीटर वाहायला लावील त्याच्याबरोबर तू दोन किलोमीटर जा. जो तुझ्याजवळ मागतो, त्याला दे आणि जो तुझ्याकडून उसने घेऊ पाहतो, त्याला टाळू नकोस. ‘तू तुझ्या शेजाऱ्यावर प्रीती कर व तुझ्या शत्रूचा द्वेष कर’, असे जे सांगितले होते, ते तुम्ही ऐकले आहे. परंतु आता मी तुम्हांला सांगतो, तुम्ही तुमच्या शत्रूंवर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. अशासाठी की, तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याची मुले व्हावेत; कारण तो दुर्जनांवर व सज्जनांवर सूर्य उदयास आणतो आणि नीतिमानांवर व अनीतिमानांवर पाऊस पाडतो. जे तुमच्यावर प्रीती करतात त्यांच्यावर तुम्ही प्रीती केली तर तुम्हांला काय पारितोषिक मिळणार? जकातदारही तसेच करतात ना? तुम्ही केवळ तुमच्या बंधुजनांना प्रणाम करत असला तर विशेष ते काय करता? जकातदारही तसेच करतात ना? म्हणून जसा तुमचा स्वर्गातील पिता पूर्ण आहे, तसे तुम्ही पूर्ण व्हा.