YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 5:22-48

मत्तय 5:22-48 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

मी तर तुम्हास सांगतो, जो कोणी आपल्या भावावर (उगाच) रागावेल तो न्याय‍सभेच्या शिक्षेस पात्र होईल; जो कोणी आपल्या भावाला, ‘अरे वेडगळा,’ असे म्हणेल तो वरिष्ठ सभेच्या पात्र होईल आणि जो कोणी त्याला, ‘अरे मूर्खा,’ असे म्हणेल, तो नरकाग्नीच्या शिक्षेस पात्र होईल. यास्तव तू आपले अर्पण वेदीवर अर्पिण्यास आणीत असता आपल्या भावाच्या मनात आपल्याविरूद्ध काही आहे अशी तुला तेथे आठवण झाली, तर आपले अर्पण तसेच वेदीसमोर ठेव आणि आपल्या मार्गाने परत जा व प्रथम आपल्या भावासोबत समेट कर आणि मग येऊन आपले अर्पण वेदीवर अर्पण कर. तुझा फिर्यादी तुझ्याबरोबर वाटेवर आहे तोच त्याच्याशी समेट कर, नाही तर कदाचित फिर्यादी तुला न्यायाधीशाच्या हाती देईल, न्यायाधीश तुला शिपायांच्या हाती देईल आणि तू तुरूंगात पडशील. मी तुला खरे सांगतो शेवटची दमडी फेडीपर्यंत तू त्याच्यातून सुटणारच नाहीस. ‘व्यभिचार करू नको,’ म्हणून सांगितले होते हे तुम्ही ऐकले आहे, मी तर तुम्हास सांगतो, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामवासनेने पाहतो त्याने आपल्या अंतःकरणात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे; तुझा उजवा डोळा तुला पाप करण्यासाठी प्रवृत्त करीत असेल तर तो उपट आणि फेकून दे; कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात टाकले जावे यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचे आहे. तुझा उजवा हात तुला पाप करण्यासाठी प्रवृत्त करीत असेल तर तो तोडून टाकून दे; कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात पडावे, यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचे आहे. ‘कोणी आपली पत्नी सोडून देतो तर त्याने तिला सूटपत्र द्यावे’ हे सांगितले होते. मी तर तुम्हास सांगतो की, जो कोणी आपल्या पत्नीला व्यभिचाराच्या कारणाशिवाय टाकतो, तो तिला व्यभिचारिणी करतो आणि जो कोणी अशा टाकलेल्या पत्नीबरोबर लग्न करतो तो व्यभिचार करतो. आणखी ‘खोटी शपथ वाहू नको’ तर ‘आपल्या शपथा परमेश्वरापुढे खऱ्या कर’ म्हणून प्राचीन काळच्या लोकांस सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हास सांगतो शपथ वाहूच नका; स्वर्गाची नका, कारण ते देवाचे आसन आहे; पृथ्वीचीही वाहू नका, कारण ती त्याचे पादासन आहे; यरूशलेमेचीहि वाहू नका कारण ती थोर राजाची नगरी आहे. आपल्या मस्तकाचीही शपथ वाहू नको, कारण तू आपला एकही केस पांढरा किंवा काळा करू शकत नाहीस. तर तुमचे बोलणे, होय तर होय आणि नाही तर नाही एवढेच असावे; याहून जे अधिक ते त्या दुष्टापासून आहे. ‘डोळ्याबद्दल डोळा’ व ‘दाताबद्दल दात’ असे सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. परंतु मी तर तुम्हास सांगतो, दुष्टाला अडवू नका. जो कोणी तुझ्या उजव्या गालावर मारतो, त्याच्याकडे दुसरा गाल कर; जो तुझ्यावर आरोप करून तुझी बंडी घेऊ पाहतो त्यास तुझा अंगरखाही घेऊ दे; आणि जो कोणी तुला बळजबरीने धरून एक कोस नेईल त्याच्याबरोबर दोन कोस जा. जो कोणी तुझ्याजवळ काही मागतो त्यास दे आणि जो तुझ्यापासून उसने घेऊ पाहतो त्यास पाठमोरा होऊ नको. ‘आपल्या शेजार्‍यावर प्रीती कर व आपल्या वैऱ्याचा द्वेष कर’, असे सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हास सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. अशासाठी की, तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याचे पुत्र व्हावे; कारण तो दुष्टांवर व चांगल्यांवर आपला सूर्य उगवतो आणि नीतिमानांवर व अनीतिमानांवर पाऊस पाडतो. कारण जे तुमच्यावर प्रीती करतात त्यांच्यावर तुम्ही प्रीती केली तर तुम्हास काय प्रतिफळ मिळावे? जकातदारही तसेच करतात की नाही? आणि तुम्ही आपल्या बंधुजनांना मात्र सलाम करीत असला तर त्यामध्ये विशेष ते काय करता? परराष्ट्रीय लोकही तसेच करीतात ना? यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता परिपूर्ण आहे तसे तुम्ही परिपूर्ण व्हा.

सामायिक करा
मत्तय 5 वाचा

मत्तय 5:22-48 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

पण मी सांगतो की, तुम्ही बहीण किंवा भावावर रागवाल, तर तुम्ही न्यायदंडास पात्र व्हाल, जो कोणी त्यांना मूर्ख ‘राका,’ असे म्हणेल, तर त्याला न्यायालयासमोर उत्तर द्यावे लागेल. पण जो कोणी ‘तू मूर्ख’ असे म्हणेल तर त्याला नरकाच्या अग्नीत टाकले जाण्याची भीती आहे. “यास्तव, जर तुम्ही वेदीवर भेट अर्पण करीत आहात आणि तेथे तुम्हाला आठवले की, तुझ्या बंधू किंवा भगिनीच्या मनात तुमच्याविरुद्ध काही आहे, तर तुमची भेट तेथेच वेदीपुढे ठेवा. पहिले जाऊन त्यांच्याबरोबर समेट करा आणि मग येऊन आपली भेट अर्पण करा. “तुमच्या शत्रूने तुम्हाला न्यायालयात नेण्यापूर्वीच, तुम्ही त्याच्याबरोबर वाटेत असतानाच लवकर त्याच्याशी संबंध नीट करा. नाही तर तुमचा शत्रू तुम्हाला न्यायाधीशाच्या स्वाधीन करेल आणि न्यायाधीश तुम्हाला शिपायांच्या स्वाधीन करील आणि तुम्हाला तुरुंगात टाकेल. मी तुम्हाला निश्चित सांगतो की प्रत्येक दमडी चुकती केल्याशिवाय तुमची तुरुंगातून सुटका होणार नाही. “ ‘तू व्यभिचार करू नको,’ असे सांगितलेले होते ते तुम्ही ऐकले आहे. पण मी तुम्हाला सांगतो, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामवासनेच्या दृष्टीने पाहतो, त्याने तिच्याबरोबर आपल्या अंतःकरणात आधीच व्यभिचार केला आहे. जर तुमचा उजवा डोळा, तुम्हाला पापाला प्रवृत करीत असेल तर तो उपटून फेकून द्या. तुम्ही संपूर्ण शरीर नरकात जाण्यापेक्षा शरीराचा एक भाग नष्ट होणे अधिक उत्तम आहे; आणि जर तुमचा उजवा हात तुम्हाला पापाला प्रवृत्त करीत असेल, तर तो कापून टाक. संपूर्ण शरीर नरकात जाण्याऐवजी तुम्ही तुमच्या शरीराच्या एका भागाला मुकणे अधिक हिताचे आहे.” नियमशास्त्र सांगते की, “जो कोणी आपल्या पत्नीपासून विभक्त होऊ इच्छितो, त्याने तिला सूटपत्र लिहून द्यावे.” मी तुम्हाला सांगतो, जो कोणी आपल्या पत्नीला व्यभिचाराच्या कारणाशिवाय सूटपत्र देतो तो तिला व्यभिचाराचे भक्ष करतो आणि सोडलेल्या स्त्रीशी जो कोणी लग्न करतो तो व्यभिचार करतो. “प्राचीन काळाच्या लोकांना सांगितले होते ते तुम्ही ऐकले आहे, ‘शपथ मोडू नका, तर प्रभुला वाहिलेली प्रत्येक शपथ खरी करा.’ परंतु मी तुम्हाला सांगतो, शपथ मुळीच वाहू नका. स्वर्गाची नव्हे कारण ते परमेश्वराचे सिंहासन आहे. किंवा पृथ्वीची कारण ते त्यांचे पायासन आहे; किंवा यरुशलेमची, कारण ती थोर राजाची नगरी आहे, आणि स्वतःच्या मस्तकाचीही शपथ वाहू नका, कारण तुम्हाला एक केसही पांढरा किंवा काळा करता येत नाही. जे काही तुम्हाला म्हणावयाचे ते साधे ‘होय’ किंवा ‘नाही’; असावे यापेक्षा अधिक त्या दुष्टापासून येते. “जे म्हटले होते ते तुम्ही ऐकले आहे, ‘डोळ्याबद्दल डोळा व दाताबद्दल दात.’ पण मी तुम्हाला सांगतो, दुष्ट मनुष्याला प्रतिकार करू नका. तुमच्या एका गालावर कोणी चापट मारली तर दुसराही गाल पुढे करा. जो कोणी तुमच्यावर फिर्याद किंवा वाद करून तुमची बंडी घेऊ पाहतो, त्याला तुमच्या अंगरखाही देऊन टाका. जर कोणी तुम्हाला एक मैल जाण्याची सक्ती करेल, तर त्याच्याबरोबर दोन मैल जा. जे तुम्हाजवळ मागतात त्यांना द्या आणि ज्यांना उसने हवे असेल त्यांच्यापासून परत मागणी करू नका. “ ‘तुमच्या शेजार्‍यावर प्रीती करा आणि शत्रूंचा द्वेष करा,’ असे सांगितले होते ते तुम्ही ऐकले आहे. पण मी तुम्हाला सांगतो, तुमच्या शत्रूवर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. अशा वागण्याने तुम्ही स्वर्गीय पित्याचे पुत्र व्हाल. कारण ते आपला सूर्यप्रकाश चांगले आणि वाईट करण्यार्‍या अशा दोघांनाही देतात आणि नीतिमान व अनीतिमान या दोघांवरही पाऊस पाडतात. जे तुमच्यावर प्रीती करतात त्यांच्यावरच तुम्ही प्रीती केली, तर त्यात तुम्हाला असे कोणते मोठे श्रेय मिळणार आहे? जकातदारही तसेच करतात की नाही? आणि तुम्ही आपल्या बंधुनाच अभिवादन करीत असाल तर इतरांहून चांगले ते काय करता? गैरयहूदी तसेच करतात की नाही? म्हणून जसा तुमचा स्वर्गीय पिता परिपूर्ण आहे, तसे तुम्हीही परिपूर्ण असावे.”

सामायिक करा
मत्तय 5 वाचा

मत्तय 5:22-48 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मी तर तुम्हांला सांगतो, जो कोणी आपल्या भावावर [उगाच] रागावेल तो न्यायसभेच्या शिक्षेस पात्र होईल; जो कोणी आपल्या भावाला, ‘अरे वेडगळा,’ असे म्हणेल तो वरिष्ठ सभेच्या शिक्षेस पात्र होईल आणि जो कोणी त्याला ‘अरे मूर्खा,’ असे म्हणेल, तो नरकाग्नीच्या शिक्षेस पात्र होईल. ह्यास्तव तू आपले दान अर्पण करण्यास वेदीजवळ आणत असता आपल्या भावाच्या मनात आपल्याविरुद्ध काही आहे असे तुला स्मरण झाले, तर तेथेच वेदीपुढे आपले दान तसेच ठेव आणि निघून जा; प्रथम आपल्या भावाबरोबर समेट कर, मग येऊन आपले दान अर्पण कर. वाटेवर तुझा वादी तुझ्याबरोबर आहे तोच त्याच्याशी सलोखा कर; नाहीतर कदाचित वादी तुला न्यायाधीशाच्या हाती देईल, न्यायाधीश तुला शिपायांच्या हाती देईल, आणि तू तुरुंगात पडशील. मी तुला खचीत सांगतो दमडीन् दमडी फेडीपर्यंत तू त्याच्यातून सुटणार नाहीस. ‘व्यभिचार करू नकोस’ म्हणून [पूर्वी त्यांनी] सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हांला सांगतो, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे. तुझा उजवा डोळा तुला पापास प्रवृत्त करत असेल तर तो उपटून टाकून दे; कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात टाकले जावे ह्यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचे आहे. तुझा उजवा हात तुला पापास प्रवृत्त करत असेल तर तो तोडून टाकून दे; कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात पडावे, ह्यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचे आहे. ‘कोणी आपली बायको टाकली तर त्याने तिला सूटपत्र द्यावे’ हेही सांगितले होते. मी तर तुम्हांला सांगतो की, जो कोणी आपली बायको व्यभिचाराच्या कारणावाचून टाकतो, तो तिला व्यभिचारिणी करतो आणि जो कोणी अशा टाकलेल्या बायकोबरोबर लग्न करतो तो व्यभिचार करतो. ‘खोटी शपथ वाहू नकोस तर आपल्या शपथा परमेश्वरापुढे खर्‍या कर’ म्हणून प्राचीन काळच्या लोकांना सांगितले होते, हेही तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हांला सांगतो, शपथ वाहूच नका; ‘स्वर्गाची’ नका, कारण ‘ते देवाचे राजासन आहे;’ ‘पृथ्वीचीही’ वाहू नका, कारण ‘ती त्याचे पादासन आहे;’ यरुशलेमेचीही नका, कारण ती ‘थोर राजाची’ नगरी आहे. आपल्या मस्तकाचीही शपथ वाहू नकोस, कारण तू आपला एकही केस पांढरा किंवा काळा करू शकत नाहीस. तर तुमचे बोलणे, होय तर होय, नाही तर नाही, एवढेच असावे; ह्याहून जे अधिक ते वाइटापासून आहे. ‘डोळ्याबद्दल डोळा व दाताबद्दल दात’ असे सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हांला सांगतो, दुष्टाला अडवू नका. जो कोणी तुझ्या उजव्या गालावर मारतो, त्याच्याकडे दुसरा गाल कर; जो तुझ्यावर फिर्याद करून तुझी बंडी घेऊ पाहतो त्याला तुझा अंगरखाही घेऊ दे; आणि जो कोणी तुला वेठीस धरून एक कोस नेईल त्याच्याबरोबर दोन कोस जा. जो तुझ्याजवळ काही मागतो त्याला दे आणि जो तुझ्यापासून उसने घेऊ पाहतो त्याला पाठमोरा होऊ नकोस. ‘आपल्या शेजार्‍यावर प्रीती कर व आपल्या वैर्‍याचा द्वेष कर,’ असे सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हांला सांगतो, तुम्ही आपल्या वैर्‍यांवर प्रीती करा, [जे तुम्हांला शाप देतात त्यांना आशीर्वाद द्या, जे तुमचा द्वेष करतात त्यांचे बरे करा] आणि जे तुमचा छळ करतात [व तुमच्या पाठीस लागतात] त्यांच्यासाठी प्रार्थना करा. अशासाठी की, तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याचे पुत्र व्हावे; कारण तो वाइटांवर व चांगल्यांवर आपला सूर्य उगववतो आणि नीतिमानांवर व अनीतिमानांवर पाऊस पाडतो. कारण जे तुमच्यावर प्रीती करतात त्यांच्यावर तुम्ही प्रीती केली तर तुमचे प्रतिफळ काय? जकातदारही तसेच करतात ना? आणि तुम्ही आपल्या बंधुजनांना मात्र प्रणाम करत असलात तर त्यात विशेष काय करता? परराष्ट्रीयही तसेच करतात ना? ह्यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे ‘तुम्ही पूर्ण व्हा.’

सामायिक करा
मत्तय 5 वाचा

मत्तय 5:22-48 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

मी तर तुम्हांला सांगतो, जो कोणी त्याच्या भावावर विनाकारण रागावेल, त्याचा न्याय केला जाईल. जो कोणी त्याच्या भावाला, “अरे मूर्खा’, असे म्हणेल, तो न्यायसभेच्या शिक्षेस पात्र ठरेल. तसेच जो कोणी त्याला ‘अरे महामूर्खा’, असे म्हणेल, तो नरकाग्नीच्या शिक्षेस पात्र ठरेल. तर मग तू आपले दान अर्पण करण्याकरता वेदीजवळ आणत असता तुझ्या भावाच्या मनात तुझ्याविरुद्ध काही आहे, असे तुला आठवले, तर तेथे वेदीपुढे तुझे दान तसेच ठेव आणि निघून जा. प्रथम तुझ्या भावाबरोबर समेट कर व नंतर येऊन तुझे दान अर्पण कर. वाटेवर तुझा वादी तुझ्याबरोबर आहे तोपर्यंत त्याच्याशी समेट कर. नाहीतर कदाचित वादी तुला न्यायाधीशाच्या हाती देईल आणि तू तुरुंगात पडशील. मी तुला खातरीपूर्वक सांगतो, पैसा अन् पैसा फेडीपर्यंत तू त्यातून सुटणार नाहीस. ‘व्यभिचार करू नकोस’, असे प्राचीन लोकांना जे सांगितले होते, ते तुम्ही ऐकले आहे. परंतु मी तुम्हांला सांगतो, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे वासनेने पाहतो, त्याने त्याच्या अंतःकरणात तिच्याशी व्यभिचार केलेलाच आहे. तुझा उजवा डोळा जर तुला पापास प्रवृत्त करत असेल, तर तो उपटून टाक; कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात टाकले जावे, ह्यापेक्षा तुझ्या एका अवयवयाचा नाश व्हावा, हे तुझ्या हिताचे आहे. तुझा उजवा हात जर तुला पापास प्रवृत्त करत असेल, तर तो तोडून टाक; कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात जावे, ह्यापेक्षा तुझ्या एका अवयवयाचा नाश व्हावा, हे तुझ्या हिताचे आहे. असे सांगितले होते, “जो कोणी त्याची पत्नी टाकेल, त्याने तिला सूटपत्र द्यावे’, परंतु आता मी तुम्हांला सांगतो, जो कोणी त्याची पत्नी व्यभिचाराच्या कारणावाचून टाकतो, तो तिला व्यभिचारिणी करतो आणि जो कोणी अशा टाकलेल्या स्त्रीबरोबर लग्न करतो, तो व्यभिचार करतो. तसेच ‘खोटी शपथ वाहू नकोस आणि प्रभूपुढे घेतलेल्या तुझ्या शपथा पूर्ण कर’, असे प्राचीन लोकांना सांगितलेले तुम्ही ऐकले आहे. मात्र मी आता तुम्हांला सांगतो, शपथ मुळीच वाहू नकोस, स्वर्गाची नको कारण ते देवाचे राजासन आहे; पृथ्वीचीही नको कारण ती त्याचे पादासन आहे आणि यरुशलेमची नको कारण ती थोर राजाची नगरी आहे. तुझ्या मस्तकाचीही शपथ वाहू नकोस कारण तू तुझा एकही केस पांढरा किंवा काळा करू शकत नाहीस. उलट तुमचे बोलणे, होय तर होय, नाही तर नाही, असे असावे. ह्यापेक्षा जे अधिक, ते वाइटाकडून येत असते. ‘डोळ्याबद्दल डोळा व दाताबद्दल दात’, असे जे सांगितले होते, ते तुम्ही ऐकले आहे. परंतु आता मी तुम्हांला सांगतो, दुष्टाला अडवू नका. जो कोणी तुझ्या उजव्या गालावर मारतो, त्याच्यापुढे दुसरा गाल कर. जो कोणी तुझ्यावर फिर्याद करून तुझे शर्ट घेतो, त्याला तुझा कोटही घेऊ दे. जो कोणी तुझ्यावर बळजबरी करून तुला त्याचे सामान एक किलोमीटर वाहायला लावील त्याच्याबरोबर तू दोन किलोमीटर जा. जो तुझ्याजवळ मागतो, त्याला दे आणि जो तुझ्याकडून उसने घेऊ पाहतो, त्याला टाळू नकोस. ‘तू तुझ्या शेजाऱ्यावर प्रीती कर व तुझ्या शत्रूचा द्वेष कर’, असे जे सांगितले होते, ते तुम्ही ऐकले आहे. परंतु आता मी तुम्हांला सांगतो, तुम्ही तुमच्या शत्रूंवर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. अशासाठी की, तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याची मुले व्हावेत; कारण तो दुर्जनांवर व सज्जनांवर सूर्य उदयास आणतो आणि नीतिमानांवर व अनीतिमानांवर पाऊस पाडतो. जे तुमच्यावर प्रीती करतात त्यांच्यावर तुम्ही प्रीती केली तर तुम्हांला काय पारितोषिक मिळणार? जकातदारही तसेच करतात ना? तुम्ही केवळ तुमच्या बंधुजनांना प्रणाम करत असला तर विशेष ते काय करता? जकातदारही तसेच करतात ना? म्हणून जसा तुमचा स्वर्गातील पिता पूर्ण आहे, तसे तुम्ही पूर्ण व्हा.

सामायिक करा
मत्तय 5 वाचा