मत्तय 5:1-20
मत्तय 5:1-20 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जेव्हा येशूने त्या लोकसमुदायांना पाहीले तेव्हा तो डोंगरावर चढला, मग तो तेथे खाली बसला असता त्याचे शिष्य त्याच्याजवळ आले. त्याने आपले तोंड उघडले व त्यांना शिकवले. तो म्हणाला; “जे आत्म्याने ‘दीन’ ते धन्य आहेत, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. ‘जे शोक करतात’, ते धन्य आहेत, कारण ‘त्यांचे सांत्वन करण्यात येईल.’ ‘जे सौम्य’ ते धन्य आहेत, कारण ‘त्यांना पृथ्वीचे वतन मिळेल.’ जे न्यायीपणाचे भुकेले व तान्हेले ते धन्य आहेत, कारण ते संतुष्ट होतील. जे दयाळू ते धन्य आहेत, कारण त्यांच्यावर दया करण्यात येईल. जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य आहेत, कारण ते देवाला पाहतील. जे शांती करणारे ते धन्य आहेत, कारण त्यांना देवाची मुले म्हणतील. न्यायीपणाकरता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य आहेत, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. जेव्हा लोक माझ्यामुळे तुमचा अपमान करतात व छळ करतात आणि तुमच्याविरुध्द सर्वप्रकारचे वाईट लबाडीने बोलतात तेव्हा तुम्ही धन्य आहात. आनंद व उल्लास करा, कारण तुम्हास स्वर्गात मोठे प्रतिफळ आहे, कारण तुमच्यापूर्वी जे संदेष्टे होऊन गेले त्यांचाही लोकांनी अशाचप्रकारे छळ केला. तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात, पण जर मिठाचा खारटपणा गेला तर ते पुन्हा कसे खारट बनवता येईल? ते तर पुढे कोणत्याही उपयोगाचे न राहता केवळ फेकून देण्याच्या व मनुष्यांच्या पायदळी तुडवले जाण्यापुरते उपयोगाचे राहील. तुम्ही जगाचा प्रकाश आहात; डोंगरावर वसलेले नगर लपवता येत नाही. आणि दिवा लावून तो कोणी टोपलीखाली लपवून ठेवत नाही, उलट तो दिवठणीवर ठेवतात म्हणजे तो दिवा घरातील सर्वांना प्रकाश देतो. तुमचा प्रकाश इतरांसमोर याप्रकारे प्रकाशू द्या की जेणेकरून त्यांनी तुमची चांगली कामे पाहावी आणि तुमचा पिता जो स्वर्गात आहे त्याचे गौरव करावे. नियमशास्त्र किंवा संदेष्ट्यांचे ग्रंथ रद्द करावयास मी आलो आहे असा विचार करु नका; मी ते रद्द करावयास नव्हे तर ते पूर्ण करावयास आलो आहे. कारण मी तुम्हास खरे सांगतो, आकाश व पृथ्वी ही नाहीशी होतील, परंतु सर्वकाही पूर्ण झाल्याशिवाय, नियमशास्त्रातील एकही काना किंवा मात्रा रद्द होणार नाही. यास्तव जो कोणी या लहान आज्ञातील एखादी आज्ञा रद्द करील व त्याप्रमाणे लोकांस शिकवील त्यास स्वर्गाच्या राज्यात अगदी लहान म्हणतील; पण जो कोणी त्या पाळील व शिकवील त्यास स्वर्गाच्या राज्यात महान म्हणतील. म्हणून मी तुम्हास सांगतो, शास्त्री व परूशी यांच्या न्यायीपणापेक्षा तुमचे न्यायीपण अधिक झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यांत तुमचा प्रवेश होणारच नाही.
मत्तय 5:1-20 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
लोकांची गर्दी पाहून, येशू टेकडीवर गेले आणि तेथे बसले. त्यांचे शिष्य त्यांच्याकडे आले. मग ते त्यांना शिकवू लागले. ते म्हणाले: “धन्य ते, जे आत्म्याने नम्र आहेत, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. धन्य ते, जे शोकग्रस्त आहेत, कारण त्यांना सांत्वन मिळेल. धन्य ते, जे सौम्य आहेत, कारण ते पृथ्वीचे वतनाधिकारी होतील. ज्यांना नीतिमत्वाची तहान व भूक लागली आहे ते धन्य कारण ते तृप्त केले जातील. धन्य ते, जे दयाळू आहेत, कारण त्यांना दयाळूपणाने वागविले जाईल. धन्य ते, जे शुद्ध हृदयाचे आहेत, कारण त्यांना परमेश्वराचे दर्शन घडेल. धन्य ते, जे शांती प्रस्थापित करतात, कारण ते परमेश्वराचे लोक म्हणून ओळखण्यात येतील. धन्य ते, ज्यांचा नीतिमत्वासाठी छळ करण्यात येतो, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. “माझे अनुयायी असल्या कारणाने लोक तुमची निंदा, तुमचा अपमान व छळ करतील व तुमच्याविरुद्ध सर्वप्रकारच्या गोष्टी लबाडीने बोलतील, तेव्हा तुम्ही धन्य. त्यामुळे तुम्ही आनंद व उल्हास करा, कारण स्वर्गामध्ये तुमचे प्रतिफळ मोठे आहे, त्यांनी प्राचीन काळाच्या संदेष्ट्यांनाही असेच छळले होते. “तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात, पण मिठाचा खारटपणा गेला तर त्याचा खारटपणा कशाने आणाल? ते बाहेर टाकून दिले पाहिजे व असे मीठ पायदळी तुडविण्याच्या लायकीचे आहे. “तुम्ही जगाचा प्रकाश आहात. डोंगरावर वसलेले शहर लपू शकत नाही. त्याचप्रमाणे लोक दिवा लावून तो मापाखाली ठेवण्याऐवजी दिवठणीवर ठेवतात म्हणजे घरातील प्रत्येकाला प्रकाश मिळावा. याचप्रकारे लोकांनी तुमची चांगली कामे पाहून तुमच्या स्वर्गीय पित्याचे गौरव करावे म्हणून तुमचा प्रकाश उजळू द्या. “मी मोशेचे नियमशास्त्र व संदेष्ट्यांची भविष्ये रद्द करण्यासाठी नाही, तर ती पूर्ण करण्यासाठी आलो आहे. मी तुम्हाला सत्य सांगतो की आकाश व पृथ्वी नाहीतशी होतील तोपर्यंत आणि सर्वगोष्टी पूर्ण होईपर्यंत नियमशास्त्रातील एकही शब्द अथवा कानामात्रा कशानेही नाहीसा होणार नाही. जो कोणी नियमशास्त्रातील लहान आज्ञा मोडील आणि दुसर्यांनाही त्यानुसार शिकविल, तो स्वर्गाच्या राज्यात कनिष्ठ गणला जाईल. परंतु जे परमेश्वराचे नियम शिकवितात आणि पाळतात ते परमेश्वराच्या राज्यात श्रेष्ठ ठरतील. कारण मी तुम्हाला सांगतो की, परूशी आणि इतर नियमशास्त्र शिक्षक यांच्या नीतिमत्वापेक्षा तुमचे नीतिमत्व अधिक असल्याशिवाय, तुम्हाला स्वर्गाच्या राज्यात कधीही प्रवेश मिळणार नाही.
मत्तय 5:1-20 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तेव्हा त्या लोकसमुदायांना पाहून तो डोंगरावर चढला, व तो खाली बसल्यावर त्याचे शिष्य त्याच्याजवळ आले. मग तो तोंड उघडून त्यांना शिकवू लागला. “जे आत्म्याने ‘दीन’ ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. ‘जे शोक करीत आहेत’ ते धन्य, कारण ‘त्यांचे सांत्वन करण्यात येईल.’ ‘जे सौम्य’ ते धन्य, कारण ‘ते पृथ्वीचे वतन भोगतील.’ जे नीतिमत्त्वाचे भुकेले व तान्हेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील. जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया होईल. ‘जे अंत:करणाचे शुद्ध’ ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. जे शांती करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हणतील. नीतिमत्त्वाकरता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुमच्याविरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील तेव्हा तुम्ही धन्य. आनंद करा, उल्लास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे; कारण तुमच्यापूर्वी जे संदेष्टे होऊन गेले त्यांचा त्यांनी तसाच छळ केला. तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात; पण जर मिठाचा खारटपणाच गेला तर तो खारटपणा त्याला कशाने आणता येईल? पुढे ते बाहेर फेकले जाऊन माणसांच्या पायांखाली तुडवले जाण्यापलीकडे त्याचा कसलाच उपयोग नाही. तुम्ही जगाचा प्रकाश आहात; डोंगरावर वसलेले नगर लपू शकत नाही. दिवा लावून मापाखाली ठेवत नसतात, दिवठणीवर ठेवतात म्हणजे तो घरातल्या सर्वांना प्रकाश देतो. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचा गौरव करावा. नियमशास्त्र किंवा संदेष्ट्यांचे ग्रंथ रद्द करण्यास मी आलो आहे असे समजू नका; मी रद्द करण्यास नव्हे तर पूर्ण करण्यास आलो आहे. कारण मी तुम्हांला खचीत सांगतो, आकाश व पृथ्वी ही नाहीशी होईपर्यंत सर्वकाही पूर्ण झाल्याशिवाय नियमशास्त्रातील एकही काना किंवा मात्रा रद्द होणार नाही. ह्यास्तव जो कोणी ह्या लहान आज्ञांतील एखादी रद्द करील व त्याप्रमाणे लोकांना शिकवील त्याला स्वर्गाच्या राज्यात अगदी लहान म्हणतील; पण जो कोणी त्या पाळील व शिकवील त्याला स्वर्गाच्या राज्यात मोठा म्हणतील. मी तुम्हांला सांगतो, शास्त्री व परूशी ह्यांच्या नीतिमत्त्वापेक्षा तुमचे नीतिमत्त्व अधिक झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही.
मत्तय 5:1-20 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
लोकसमुदायाला पाहून येशू एका डोंगरावर चढला. तेथे खाली बसल्यावर त्याचे शिष्य त्याच्याजवळ आले. तेव्हा तो त्यांना शिकवू लागला. “जे आत्म्याने दीन आहेत ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. जे शोक करत आहेत ते धन्य, कारण त्यांचे सांत्वन केले जाईल. जे सौम्य ते धन्य, कारण त्यांना पृथ्वीचे वतन मिळेल. ज्यांना नीतिमत्त्वाची भूक व तहान लागलेली आहे ते धन्य, कारण ते तृप्त होतील. जे दयाळू ते धन्य, कारण त्यांना दया मिळेल. जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. जे शांती प्रस्थापित करण्यासाठी झटतात ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हटले जाईल. नीतिमत्त्वाकरता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुमच्याविरुद्ध सर्व प्रकारचे खोटे आरोप करतील, तेव्हा तुम्ही धन्य. आनंद करा. उल्हास करा; कारण स्वर्गात तुमचे पारितोषिक महान आहे. तुमच्यापूर्वी जे संदेष्टे होऊन गेले त्यांचाही त्यांनी असाच छळ केला. तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. पण जर मिठाचा खारटपणाच गेला तर तो खारटपणा त्याला कशाने आणता येईल? ते मीठ बाहेर फेकले जाऊन माणसांच्या पायांखाली तुडवले जाण्यापलीकडे त्याचा कसलाच उपयोग नाही. तुम्ही जगाचा प्रकाश आहात. डोंगरावर वसलेले नगर लपू शकत नाही. दिवा पेटवून तो मापाखाली नव्हे तर दिवठणीवर ठेवतात, म्हणजे तो घरातल्या सर्वांना प्रकाश देतो. त्याचप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की, त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचा गौरव करावा. नियमशास्त्र किंवा संदेष्ट्यांचे ग्रंथ नष्ट करायला मी आलो आहे, असे समजू नका; मी नष्ट करायला नव्हे तर पूर्ण करायला आलो आहे. मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, आकाश व पृथ्वी नाहीशी होईपर्यंत व सर्व काही पूर्ण झाल्याशिवाय, नियमशास्त्रातील एकही काना किंवा मात्रा नाहीशी होणार नाही. म्हणून जो कोणी ह्या लहान आज्ञांतील एखादी मोडील व त्याप्रमाणे लोकांना शिकवील त्याला स्वर्गाच्या राज्यात अगदी लहान म्हणतील. पण जो कोणी त्या पाळील व शिकवील त्याला स्वर्गाच्या राज्यात महान म्हणतील. मी तुम्हांला सांगतो, शास्त्री व परुशी ह्यांच्यापेक्षा तुमचे नीतिमत्व अधिक झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुम्हांला मुळीच प्रवेश मिळणार नाही.